वर्ल्डकपमधील पाकिस्तानचा हा निर्णय मूर्खपणाचा ठरला…
क्रिकेटमध्ये जेव्हा भारत आणि पाकिस्तान आमनेसामने आले आहेत, तेव्हा ते एक युद्ध म्हणूनच पाहिले गेले. विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतही या दोन संघांतील खुन्नस मैदानावर अनेकदा पाहायला मिळते. अर्थात, या स्पर्धेत पाकिस्तानला भारताविरुद्ध अद्याप एकदाही विजय मिळवता आलेला नाही. गेल्या वर्षीही २०१९ च्या वर्ल्डकपमध्ये भारताने पाकिस्तानला सहज पराभूत केले होते. त्या वेळी भारत विश्वविजेतेपदाचा दावेदार मानला जात होता, तर पाकिस्तान साखळीतून बाहेर पडतो की नाही, याची चिंता होती. तरीही त्यांनी भारताविरुद्ध खेळताना एक चूक केली, ती म्हणजे भारतीय फलंदाजांना कमी लेखण्याची.
याबाबत पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि प्रशिक्षक वकार युनिसने (Waqar Younis) सांगितले, की गेल्या वर्षी 2019 मध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या वनडे विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानने भारताच्या आघाडीच्या फलंदाजांना कमी लेखण्याची चूक केली होती. त्याची मोठी किंमत त्यांना चुकवावी लागली. मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर 16 जून 2019 रोजी झालेल्या या सामन्यात भारताने डकवर्थ लुइस प्रणालीत पाकिस्तानला 89 धावांनी पराभूत केले होते.
वकारने (Waqar Younis) ‘ग्लोफॅन्स’च्या अधिकृत ट्विटर हँडलवर याबाबतचा खुलासा केला आहे. पाकिस्तानला वाटले होते, की प्रथम गोलंदाजी केली तर भारताच्या आघाडीच्या फलंदाजांना स्वस्तात तंबूत धाडू शकू. त्यामुळे भारतीय संघ दबावाखाली येईल. पण पाकिस्तानची ही मोठी चूक होती. कारण भारताकडे उच्च दर्जाचे फलंदाज होते.
वकार (Waqar Younis) म्हणाला, ‘‘मला वाटते, की पाकिस्तानने नाणेफेक यष्टिरक्षण करण्याची मोठी चूक केली होती. पाकिस्तानला आशा होती, की सुरुवातीला खेळपट्टी गोलंदाजांसाठी पोषक ठरेल आणि भारताचे सलामीचे फलंदाज लवकर तंबूत धाडू शकू. त्यामुळे भारत दबावाखाली खेळून सामना गमावतील. मात्र, त्यांना माहीत नव्हतं, की भारताकडे उत्तम सलामीचे फलंदाज होते. खेळपट्टी आणि परिस्थितीने वेगवान गोलंदाजांना अजिबात साथ दिली नाही. भारतीय फलंदाजांनी गोलंदाजांना वर्चस्वाची एकही संधी दिली नाही. भारताने धावांचा एवढा डोंगर उभा केला, की तो पार करणं पाकिस्तानला अशक्य झालं.’’
भारताचा सलामीचा फलंदाज रोहित शर्मा याने 113 चेंडूंत 140 धावांची शतकी खेळी साकारली. या शतकाच्या जोरावर भारताने 50 षटकांत पाच बाद 336 धावा केल्या. हे पाकिस्तानसाठी अवघड लक्ष्य होतं. नंतर पावसामुळे हजेरी लावल्याने डकवर्थ लुईस नियमानुसार पाकिस्तानला 40 षटकांत सहा बाद 212 धावाच करता आल्या.
वकार म्हणाला, ‘‘मला वाटते, नाणेफेक जिंकून पाकिस्तानने गोलंदाजीचा निर्णय घेणे मूर्खपणाचे होते. त्या खेळपट्टीवर प्रथम फलंदाजी करून मोठी धावसंख्या उभारता आली असती, ज्यामुळे भारतावर दबाव राखता आला असता. त्या वेळी पाकिस्तानच्या गोलंदाजांना मात्र खेळपट्टीने साथ दिली नाही आणि भारताने उत्तम प्रदर्शन केलं.’’
विश्वकरंडक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध भारताचा हा सातवा विजय होता. या स्पर्धेत पाकिस्तानला भारताविरुद्ध एकदाही विजय मिळवता आलेला नाही. विश्वकरंडकच्या इतिहासात भारत-पाकिस्तान सामन्यातील सर्वोत्तम खेळी जर असेल तर ती २००३ मधील सचिन तेंडुलकरची धुव्वाधार खेळी. दक्षिण आफ्रिकेत झालेल्या या सामन्यात 274 धावांचं लक्ष्य भारतासाठी आव्हानात्मकच होतं. मात्र, सचिन तेंडुलकरने अप्रतिम फलंदाजी करताना ९८ धावा केल्या. अवघ्या दोन धावांनी त्याचं शतक हुकलं होतं. भारताने हा सामना सहा गडी राखून जिंकला होता.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा चाहता सुधीर कुमार चौधरी याने सचिनच्या विशेष खेळीबाबत विचारले होते. त्यावर वकार म्हणाला, ‘‘2003 मधील सचिनची खेळी शब्दातीत आहे. आमच्या संघात अनुभवी गोलंदाजही होते आणि भारतावर त्यांचा दबावही होता. जर तुम्ही सचिनला याबाबत विचारले तर तो माझ्याशी सहमत असेल. कदाचित त्याच्या सर्वोत्तम खेळींपैकी तरी ही ९८ धावांची खेळी असून शकेल. शोएब अख्तर, वसीम अक्रमसह माझ्यावर त्याच्या फलंदाजीने वर्चस्व मिळवले होते. ज्या प्रकारे त्याने वेगाने धावा जमवल्या, ते सगळंच अद्भुत होतं.’’