आयुष्याच्या धावफलकावरही शतकी मोहोर
भारताचे प्रथमश्रेणी क्रिकेटचे सर्वांत ज्येष्ठ क्रिकेटपटू वसंत रायजी यांचे १३ जून २०२० रोजी निधन झाले. ते शंभर वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी व दोन मुली आहेत. दक्षिण मुंबईच्या वाळकेश्वरमधील निवासस्थानी मध्यरात्री 2 वाजून 20 मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली.
प्रथमश्रेणी क्रिकेटमधील उजव्या हाताचे उत्तम फलंदाज असलेले वसंत रायजी यांनी ४० चे दशक गाजवले होते. त्या वेळी आजसारखे टीव्ही, मोबाइल अजिबातच नव्हते. प्रसिद्धीची हौस नव्हती. फक्त निष्ठेने खेळत राहायचे. अर्धशतक झळकावल्यानंतरही ते कदाचित शांतपणे आनंद व्यक्त करीत असतील. आज शतक किंवा अर्धशतक झळकावल्यानंतर बॅट उंचावण्याची खास स्टाइल आहे. त्या वेळी असा आनंद व्यक्त करण्याची स्टाइल नसेलही. ४० च्या दशकातील त्यांची खेळी आजच्या पिढीला माहीत नसेल. तो काळच असा होता, की खेळ दुय्यम होता. मात्र, अशा काळात रायजी क्रिकेटच्या मैदानावर उतरणे हेच कौतुकास्पद होते.
रायजी यांनी 1940 च्या दशकात नऊ प्रथम श्रेणी क्रिकेट सामने खेळले. त्यांनी कारकिर्दीत एकूण २७७ धावा केल्या, ज्यात ६८ ही त्यांची सर्वोच्च खेळी. त्यांनी 1939 मध्ये क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या संघात पदार्पण केले. ते नागपूरमध्ये मध्य प्रांत अर्थात बडोदा संघाविरुद्ध खेळले. १९४१ मध्ये ते मुंबई संघाकडून पहिल्यांदा खेळले. त्या वेळी विजय मर्चंट संघाचे कर्णधार होते. त्यांच्याच नेतृत्वाखालील संघाकडून रायजी पश्चिम भारत संघाविरुद्ध खेळले. नंतर रायजी बडोद्याच्या संघाकडूनही खेळले.
40 च्या दशकात क्रिकेट म्हणजे करिअर नव्हतं, तर ती एक हौस होती. त्यामुळे रायजी यांची क्रिकेटव्यतिरिक्तही एक ओळख होती. ते चार्टर्ड अकौंटंट होते. क्रिकेटचे इतिहासकार म्हणूनही त्यांची ओळख होती. ते 13 वर्षांचे होते, त्या वेळी भारतीय संघाने बॉम्बे जिमखान्यात आपला पहिला कसोटी सामना खेळला होता. रायजी जानेवारीत जेव्हा 100 वा वाढदिवस साजरा करीत होते, तेव्हा दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव वॉ यांनी त्यांना भेट दिली होती.
रायजी यांच्या निधनानंतर सचिन तेंडुलकरने त्यांच्याशी झालेल्या पहिल्या भेटीची आठवण सांगितली. बीसीसीआयनेही रायजी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले. रायजी मुंबईच्या जॉली क्रिकेट क्लबचे संस्थापक सदस्य होते. त्यांनी रणजीतसिंह, दुलीपसिंह, विक्टर ट्रम्पर, सी. के. नायडू आणि एलपी जय यांच्यावर पुस्तकेही लिहिली आहेत. मुंबई क्रिकेट संघाचे (एमसीए) अध्यक्ष डॉ. विजय पाटील यांनीही रायजी यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण केली. क्रिकेटच्या समृद्ध इतिहासाचं एक पान गळून पडल्याची भावना अनेक क्रिकेटपटूंनी व्यक्त केली.