फर्नांडीस आणि रादुकानू 12 वर्षांखालील स्पर्धेतही आल्या होत्या आमनेसामने
वर्षअखेरच्या अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या महिला एकेरीची अंतिम लढत रंगतदार होण्याची शक्यता आहे. कॅनडाची लीलह फर्नांडीस आणि ब्रिटनची एम्मा रादुकानू या दोन्ही जेतेपदासाठी आपले कौशल्य पणास लावणार आहेत. अर्थात, ग्रँडस्लॅम स्पर्धेत प्रथमच आमनेसामने आलेल्या या दोन्ही खेळाडू यापूर्वी बारा वर्षांखालील स्पर्धेत आमनेसामने आल्या होत्या. विशेष म्हणजे, त्या वेळी प्रशिक्षकाने फर्नांडीसला टेनिस सोडण्याचा सल्ला दिला होता.
फर्नांडीस आणि रादुकानू या दोन्ही खेळाडूंमध्ये बरंचसं साम्य आढळतं. टेनिसवर प्रेम तर आहेच, पण या दोन्ही खेळाडूंचं कनेक्शन कॅनडाशी आहे. दोघींची आई मूळ आशियन आहे. फर्नांडीस कॅनडात राहते, तर रादुकानूचा जन्मही याच देशातला आहे.
लीलहचे वडील आणि प्रशिक्षक जॉर्ज फर्नांडीस यांनी सांगितले, ‘‘दोन्ही खेळाडू उत्तम आहेत. या दोघीही नव्या खेळाडूंना प्रेरणा देतील.’’
फर्नांडीसचा जन्म माँट्रियलमधील आहे, तर रादुकानूचा जन्म टोरंटोचा. रादुकानूकडे अजूनही कॅनडाचा पासपोर्ट आहे. ती जेव्हा दोन वर्षांची होती, तेव्हा तिचा परिवार इंग्लंडमध्ये स्थायिक झाला.
फर्नांडीसवर आता कॅनडासह पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्यासह जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मात्र, तिचा यशाचा मार्ग सोपा नाही.
तिला आठवतं, की जेव्हा ती पाचव्या इयत्तेत शिकत होती, तेव्हा तिला बॅकहँडपेक्षा ‘ब्लॅकबोर्ड’वर अधिक लक्ष देण्यास सांगितले जात होते.
फर्नांडीस म्हणाली, ‘‘मला एक शिक्षक चांगला आठवतो, जो खूपच गमतीदार होता. त्या वेळी नाही, पण आता मला त्याचं खूपच हसू येतंय.”
फर्नांडीस म्हणाली, ‘‘त्यांनी मला सांगितलं, की टेनिस खेळणं बंद कर, तू कधीच खेळाडू बनू शकणार नाहीस. तू फक्त शाळेकडं लक्ष दे.’’
जागतिक क्रमवारीत 73 व्या स्थानावर असलेली 19 वर्षीय फर्नांडीस हिने फायनलचा मार्ग अनेक अडथळे पार करीत पार केला. तिने 2018 आणि 2020 ची विजेती, तृतीय मानांकित नाओमी ओसाका, 2016 ची विजेती16 वी मानांकित अँजेलिक कर्बर, तसेच पाचवी मानांकित इलिना स्वितोलिना आणि द्वितीय मानांकित आर्यना सबालेंका या दिग्गज खेळाडूंना पराभूत केले आहे.
बिगरमानांकित फर्नांडीसची ही कामगिरी थक्क करणारी आहेत. ती प्रथमच ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचली आहे.
रादुकानूचीही या स्पर्धेतली कहाणी वेगळी नाही. अठरा वर्षीय रादुकानूनेही प्रथमच ग्रँडस्लॅमच्या अंतिम फेरीत पोहोचली आहे. रादुकानूने 2018 ची ज्युनिअर विम्बल्डन स्पर्धेत फर्नांडीसला पराभूत केले आहे. मात्र, त्यानंतर प्रथमच या दोन्ही खेळाडूंनी मोठा पल्ला गाठला आहे.
रादुकानू म्हणाली, ‘‘अर्थातच, या स्पर्धेनंतर (ज्युनिअर विम्बल्डन) आम्ही खूप पुढे गेलो आहोत. मला माहीत आहे, की जेव्हा आम्ही आमनेसामने आलो होतो, त्या तुलनेत ही लढत खूपच वेगळी असेल.’’