भुयारातून कवडसा शोधणारी वैष्णवी
टनेल अँड जिओटेक्निकल इंजिनीअरिंग असं या अभ्यासक्रमाचं नाव आहे. एम. टेक. करणाऱ्यांना या विषयातही करिअर करता येऊ शकेल...

भुयारातून कवडसा शोधणारी वैष्णवी
इंजिनीअरिंग केलं, पुढं काय, करिअर कशात करावं, कोणता विषय निवडावा, असा गोंधळ अनेकांचा होतो. मात्र, भुयार क्षेत्रातही करिअर करता येतं आणि ते आव्हानात्मक असलं तरी समाधान देणारं आहे. टनेल अँड जिओटेक्निकल इंजिनीअरिंग असं या अभ्यासक्रमाचं नाव आहे. एम. टेक. करणाऱ्यांना या विषयातही करिअर करता येऊ शकेल, त्यातल्या त्यात मुलींनी तर या क्षेत्रात वळायला हरकत नाही, हे नाशिकमधील वैष्णवी रमेश सानप या तरुणीने सिद्ध केलं आहे. तिचीच ही कहाणी…
कर्नाटकातलं एक छोटंसं गावं होतं. वीजनिर्मितीच्या एका प्रोजेक्टसाठी तिच्या कंपनीची पाचपन्नास जणांची एक टीम या गावात आली. हजारपाचशे ग्रामस्थ या टीमला बघायला… कारण हीच टीम या गावातल्या प्रत्येक घरात प्रकाश पेरणार होती. गावाला या टीमचं भारी अप्रूप. या टीममध्ये सगळे पुरुष. त्यात एकच मुलगी. आत्मविश्वासाने चमकणारे तिचे ते डोळे. कुजबूजली बायामाणसं. त्या क्षणी तिला जाणवलं, की स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा देऊन हिमतीने पुढे जाऊ शकते. हा आत्मविश्वास तिला वेगळीच अनुभूती देत होता. कारण आपल्या छोट्याशा कामाने किती तरी संसार प्रकाशमान होणार होते. आशियातल्या सर्वांत मोठ्या भुयारांपासून दुर्गम भागातील धरणांपर्यंतच्या प्रकल्पांवर आत्मविश्वासाने काम करणारी ही मुलगी आहे नाशिकची वैष्णवी रमेश सानप.
रोहतांगचा अटल टनेल ज्या कंपनीने साकारला त्या ‘स्मेक’ या मल्टिनॅशनल कंपनीत वैष्णवी टनेल अँड जिओटेक्निकल इंजिनीअर म्हणून काम करते. मुळात या क्षेत्रात मुलींचं प्रमाण फारच नगण्य आहे. इंटरनॅशनल कमिटी ऑफ लार्ज डॅम (आयकोल्ड)शी संलग्न असलेल्या भारतीय ‘इनकोल्ड’च्या एका सर्वेक्षणात असं आढळलं आहे, की या टनेल इंजिनीअरिंग क्षेत्रात जगभरात दहा टक्क्यांपेक्षाही कमी मुली आहेत. यात वैष्णवीचा समावेश आहे हे विशेष.
वैष्णवीचा प्रवासच मुळी तिच्या नावापासून सुरू होतो. कारण तिचं नाव वैष्णोदेवीवरूनच ठेवण्यात आलं. या देवीच्या दर्शनासाठी भुयारी मार्गातूनच जावं लागतं. ही वैष्णवीही अनेकांच्या जीवनात प्रकाशाचा एक कवडसा अशाच भुयारी मार्गातून शोधत आहे. वैष्णवीचं शालेय शिक्षण किलबिल सेंट जोसेफ हायस्कूलमधून, तर पुण्यात सिव्हिल इंजिनीअरिंग केलं. त्यानंतर गेट परीक्षा देऊन तिने ‘एमआयटी’मधून टनेल इंजिनीअरिंग केलं. त्या वेळी हा कोर्स सुरू होऊन पाचच वर्षे उलटली होती. मुळात लहानपणापासूनच तिला फोर लेन, सिक्स लेन महामार्गांचं, भुयारांचं विशेष आकर्षण होतं. केवढं मोठं हे भुयार! कसं बनवलं असेल? वगैरे प्रश्न तिला नेहमीच पडायचे. ‘नॅशनल जिओग्राफिक’वरील ‘मेगास्ट्रक्चर्स’ या मालिकेने तर तिच्यातलं कुतूहल आणखी जागृत झालं. आता त्याच क्षेत्रात प्रत्यक्षात काम करताना तिला कमालीचा आनंद होतो.
अनेक प्रकल्पांवर काम
एम.टेक.ला असतानाच वैष्णवीने स्वारगेटच्या मेट्रो प्रकल्पावर दोन महिने बारा-बारा तास उभं राहून काम केलं आहे. अर्थात, ते शिकण्याचं वय होतं. आशियातील सर्वांत खोल असलेल्या या प्रोजेक्टनंतर वैष्णवी अरुणाचल प्रदेशातील दिबांग या आशियातल्या सर्वांत मोठ्या आरसीसी धरणावरही काम करीत आहे. मुंबईतही काही वॉटर टनेलचे प्रोजेक्ट सुरू आहेत. या प्रोजेक्टमध्ये रीझर वायरमधून पाणी आणून त्यावर वॉटर ट्रीटमेंट करून शुद्ध पाण्याचा पुरवठा शहराला केला जाणार आहे. वैष्णवी अशा एक ना अनेक प्रोजेक्टवर एकाच वेळी काम करीत आहे. या प्रोजेक्टमध्ये टनेल खोदण्यापासून ते कसं उभं राहील याचे डिझाइन ती करते. दगडमातीचा पोत कसा आहे, तो जर कमकुवत असेल तर त्याचं डिझाइन कसं असायला हवं, ज्यामुळे भुयार किंवा धरण भक्कमपणे उभं राहू शकेल. तिचं डिझाइन झाल्यानंतर इतर स्ट्रक्चरल अर्थात रचनात्मक डिझाइन दुसरा इंजिनीअर पाहतो. यासाठी अनेकदा तिला त्या भुयारात किंवा धरणाच्या कामावर जाऊन पाहणीही करावी लागते. आव्हानात्मक प्रकल्पांवर काम करताना, तो साकारताना पाहताना वेगळाच आत्मविश्वास मिळतो, असं वैष्णवी अभिमानाने सांगते.
आव्हान स्वीकारण्याचे धैर्य
इंटरनॅशन कमिटी ऑफ लार्ज डॅम (आयकोल्ड)शी संलग्न टनेलिंग असोसिएशन ऑफ इंडियाची (इनकोल्ड) आधी ती सक्रिय सदस्या होती. आता ती त्याची कमिटी मेंबर आहे. या संघटनेच्या यंग प्रोफेशनल फोरमचीही ती सदस्या आहे. ही संघटना टनेल क्षेत्रातील बदल, नवनवे शोध या विषयांवर परिषदा घेत असते. टनेल क्षेत्रातील अशा अनेक महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये तिने सहभाग घेतला आहे. वैष्णवी म्हणते, या क्षेत्रात महिला धजावत नाहीत. त्यांना सेफ झोनमधून बाहेर पडायचं असतं, पण ते अशा क्षेत्राच्या माध्यमातून नाही. शिवाय या क्षेत्रात काही आव्हानेही आहेत, जे पेलण्यास मुलीच्या घरचे प्रतिसाद देत नाहीत. त्यामुळे महिला या क्षेत्राकडे वळत नाहीत. मात्र, माझ्या चार-पाच वर्षांच्या काळात मला एकदाही भीती वाटली नाही किंवा असुरक्षितताही जाणवली नाही. आव्हान स्वीकारण्यासाठी मी नेहमीच सज्ज असते, असे वैष्णवी आत्मविश्वासाने सांगते. अर्थात, या प्रवासात तिला वडील रमेश व आई अलका या दोघांनी दिलेली साथ मोलाची वाटते.
या क्षेत्रात काही आव्हानेही आहेत, जे पेलण्यास मुलीच्या घरचे प्रतिसाद देत नाहीत. त्यामुळे महिला या क्षेत्राकडे वळत नाहीत. मात्र, माझ्या चार-पाच वर्षांच्या काळात मला एकदाही भीती वाटली नाही किंवा असुरक्षितताही जाणवली नाही. – वैष्णवी सानप
