All Sportssports newsTennis

To नदाल  From फेडरर : तुझं ते केस सेट करणं, तुझ्यासोबत खेळणं…

To नदाल  From फेडरर : तुझं ते केस सेट करणं, तुझ्यासोबत खेळणं... पत्रात काय काय आठवणी आहेत फेडररच्या नदालविषयी...?

To नदाल  From फेडरर : तुझं ते केस सेट करणं, तुझ्यासोबत खेळणं…

स्पेनचा रफाएल नदाल डेव्हिस कप टेनिस स्पर्धेत नेदरलँड्सविरुद्धच्या लढतीत खेळून निवृत्त झाला. घरच्या मैदानावर त्याचा अखेरचा सामना पाहण्यासाठी त्याच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. या वेळी त्याला अश्रू अनावर झाले. त्याआधी त्याच्या विषयी त्याचा मित्र आणि पारंपरिक प्रतिस्पर्धी स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने लिहिलेले पत्र…

प्रिय राफा!

टेनिसमधून तू आता निवृत्त होत आहेस. तुझ्याबाबतीत कदाचित मी अधिक अधिक भावुक होण्याआधी मला तुझ्याबद्दलच्या काही गोष्टी सांगायच्या आहेत.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे, तू मला खूप वेळा पराभूत केलं आहेस. मी जितक्या वेळा तुला हरवलं आहे, त्यापेक्षा जास्त वेळा. तुझ्यासारखं आव्हान मला कोणीही देऊ शकलं नाही. क्ले कोर्टवर खेळताना जणू काही तुझ्या घरच्या मैदानावर तुला आव्हान देतं असल्यासारखचं वाटायचं. त्या मैदानावर तुझ्यासमोर नुसते पाय रोवण्यासाठीही मला मला दुप्पट मेहनत घ्यावी लागायची. तुझ्यामुळे मी माझ्या खेळाचा नव्याने शोध घेऊ शकलो. कदाचित याचमुळे मी माझ्या रॅकेटचा आकारही बदलून बघितला होता. वेडी आशा होती, कदाचित त्यामुळे तरी मी तुझ्या बालेकिल्ल्यात जिंकू शकेन.

तुझं ते केसांना हात लावणं…

खरं सांगू का, राफा मी काही फार अंधश्रद्धाळू व्यक्ती नाही; पण तू काही गोष्ट प्रचंड श्रद्धेने करायचा. लहान मुलं खेळण्यांमधील छोटे सैनिक कसे एका रांगेत उभे करतात, तसे तू तुझ्या पाण्याच्या बाटल्या ठेवत होता. सातत्याने केसांना हात लावणे, त्यांना निटनेटके करणे, पायांमध्ये अडकलेली शॉट्स व्यवस्थित करणे… या सर्व गोष्टींचं मला अप्रूप होतं. कारण, यापूर्वी असे करताना मी कधीही कोणाला पाहिलेले नव्हते. आणि तुझ्यामुळेच मी या खेळाचा जास्त आनंद लुटू शकलो.

बायसेप्स दाखवत तुझं कोर्टवर अवतरणं…

सन २००४च्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये मी पहिल्यांदा एटीपी क्रमवारीत अव्वल झालो होतो. तेव्हा वाटत होतं, की मी जगातील सर्वोच्च टेनिसपटू आहे. याच्या दोन महिन्यांनंतर मियामी येथील टेनिस कोर्टवर माझा तुझ्याशी सामना झाला. तू लाल रंगाचा बाह्या नसलेला टी-शर्ट घातलेला होता. बायसेप्स दाखवत तू कोर्टवर अवतरलास. त्या वेळी तू मला सहज हरवलं. तेव्हा तुझ्याबद्दल खूप ऐकलं होतं. मार्लोका येथून एका टेनिसचा उगवता तारा आला आहे. तो प्रतिभावान असून, अप्रतिम खेळतो. नैसर्गिक गुणवत्ता त्यात आहे. लवकरच तो ग्रँड स्लॅम जेतेपद पटकावेल… अशी बरीच चर्चा कानावर येत होती. तुझ्याबद्दलच्या त्या खोट्या थापा नव्हत्या, हे लवकरच तू सिद्ध केलं.

अर्ध कोर्ट गवताचं, अर्ध कोर्ट मातीचं

आपण दोघांनी आपला प्रवास नुकताच सुरू केला होता. राफा, आज २० वर्षांनंतर मला तुला सांगावंसं वाटतयं, तुझी कारकीर्द जबरदस्त राहिली आहे. एकूण २२ ग्रँड स्लॅम आणि त्यातील ऐतिहासिक १४ फ्रेंच ओपनची जेतीपदे. स्पेनवासीयांना, नव्हे संपूर्ण टेनिस जगताला तुझा अभिमान वाटावा, अशी तुझी कामगिरी आहे. या प्रवासात आपल्या अनेक आठवणी आहेत. तुला आठवतं राफा, आपण केपटाउनमध्ये एक सामना खेळलो होतो. तेथे अर्ध्या कोर्टवर गवत होतं आणि अर्ध कोर्ट मातीचं होतं. आपला तो सामना पाहण्यासाठी ५० हजारपेक्षा जास्त चाहते उपस्थित होते. काय लढलो होतो ना? अशा अनेक लढती आजही मला लख्ख आठवतात.

एक सुखद आठवण

अशीच एक सुखद आठवण म्हणजे २०१६मध्ये तुझ्या रफा नदाल अकादमीच्या उद्घाटनासाठी तू मला मायोर्काला बोलावले होतं. खरं तर मीच त्या कार्यक्रमाला आलो होतो. मी तिथे यावं, यासाठी तू खूप नम्रपणे मला विनंती केली होती. खरं तर मलाच तो कार्यक्रम चुकवायचा नव्हता. जगभरातील लहान मुलांचा (टेनिसपटू) तू आदर्श आहेस. मिर्का आणि मला अभिमान आहे, की आमची मुलं तुझ्या अकादमीत टेनिस शिकतात. इतर हजारो टेनिसपटूंसारखं तेही खूप काही शिकत आहेत. तुझा त्यांच्यावर एवढा प्रभाव आहे, की मला भीती आहे ते घरी डावखुरे टेनिसपटू होऊनच परत येतील की काय.

लाव्हेर कपमधील माझी ती अंतिम लढत

राफा, तुला आठवतो का रे २०२२चा लंडनमधील लाव्हेर कप. माझी ती अंतिम लढत होती. त्या वेळी तू माझ्या शेजारी असणं माझ्यासाठी फार महत्त्वाचं होतं रे. खरं सांगू, तेव्हा तू माझा प्रतिस्पर्धी नव्हतास. होतास माझा दुहेरीचा जोडीदार. त्या रात्री तुझ्यासोबत खेळणं, ती रडारड आता मी शब्दांत वर्णन करू शकत नाही रे. तो माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असेल.

तुझ्याशी भरपूर गप्पा मारायच्याय रे…

तुझ्या निवृत्तीनंतर मला तुझ्याशी भरपूर गप्पा मारायच्या आहेत. या क्षणी मला फक्त तुझ्या कुटुंबीयांचं आणि तुझ्या संघाचं अभिनंदन करायचं आहे. तुझ्या यशात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. शेवटी एवढचं सांगीन तुझा हा मित्र नेहमीच तुझ्या पाठीशी असेन. पुढे तू जे काही करशील त्याला माझा पाठिंबाच असेल. तूर्तास एवढचं!

तुझाच चाहता,

– रॉजर

तुम्हाला या दोघांच्या मैत्रीबद्दल काय वाटतं, याबद्दल आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा.

या लेखाचा व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

Visit us

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!