ऑलिम्पिकच्या तयारीसाठी या खेळाडूने गमावले तीस लाख रुपये…

कोरोना महामारीमुळे खेळाडूंचं आयुष्य दावणीला लागलं आहे. कारण वर्षभरात एकही स्पर्धा नाही आणि काही खेळाडू तर वयाच्या अशा टप्प्यात आहेत, ज्यांना पुढील वर्षात खेळायला मिळेल का, या चिंतेनेच ग्रासले आहे. कोरोना महामारीमुळे सरावही करता येत नाही. अशा वेळी खेळाडू अगतिक होणार नाही तरच नवल. त्यातही ज्यांनी आपलं संपूर्ण करिअर ऑलिम्पिकसाठी पणाला लावलं त्यांची अवस्था तर विचारता सोय नाही… अशीच एक धावपटू सध्या भयंकर अस्वस्थ आहे. ही धावपटू आहे द्युती चंद.‘‘ऑलिम्पिकच्या तयारीसाठी माझ्या पदरचे सगळे पैसे खर्च झाले. वेळही वाया घालवला. आता मला पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागणार आहे. त्यासाठी कुठून पैसे आणायचे? आता मला मदत मिळेल की नाही याचीही शाश्वती राहिली नाही.’’ ही अस्वस्थता आहे आशियाई स्पर्धेत दोन वेळा रौप्यपदक जिंकणारी भारताची वेगवान धावपटू द्युती चंदची.
कोरोना महामारीचा विळखा coronavirus pandemic | आणि त्यानंतर जगभरातील ठप्प झालेल्या क्रीडा स्पर्धा. यामुळे ओडिशाच्या या धावपटूच्या सरावातच बाधा आली. केवळ सरावच खुंटला नाही, तर त्यासाठी प्रशिक्षक आणि परदेशातील प्रशिक्षण व्यवस्थेसाठी तिला पदरचे तब्बल तीस लाख रुपये खर्च करावे लागले.
भुवनेश्वर येथे एका मुलाखतीत द्युतीने Dutee Chand | आपली कैफियत मांडताना सांगितले, ‘‘मी ऑक्टोबरमध्ये एक टीम तयार करून सराव सुरू केला होता. या टीममध्ये प्रशिक्षक, सहाय्यक प्रशिक्षक, ट्रेनर, रनिंग पार्टनरसह दहा सदस्यांचा समावेश होता. या प्रशिक्षणासह खुराकावरच माझा दर महिन्याला साडेचार लाख रुपये खर्च होत होता. आतापर्यंत तीस लाख रुपये खर्च करून बसले.’’
जाकार्ता आशियाई स्पर्धेत 2018 मध्ये 100 मीटरमध्ये रौप्यपदक जिंकणारी द्युती चंद क्रीडा मंत्रालयाच्या टारगेट ऑलिम्पिक पोडियम योजनेत (टॉप्स) नाही. तिची जबाबदारी ओडिशा सरकार आणि केआयआयटीने घेतली होती. मात्र, तीही केवळ टोकियो ऑलिम्पिक 2020 पर्यंतच. ऑलिम्पिक स्थगित झाल्यानंतर सद्यःस्थितीत सराव पुढे सुरू ठेवणे द्युतीसाठी अवघड झाले आहे.
ओडिशा मायनिंग कॉर्पोरेशनमध्ये कार्यरत असलेल्या द्युती चंदने सांगितले, की ‘‘कोरोना महामारीमुळे देशच नाही, तर संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था डगमगली आहे. आता मूलभूत सुविधांवरच लक्ष्य केंद्रित झाले आहे. अशा स्थितीत प्रायोजकत्व मिळेल की नाही याबाबत काहीच सांगता येत नाही.’’
मी जर्मनीतील तीन महिन्यांच्या सरावासाठी तिकीट बुक केले होते. त्याचेही पैसे अद्याप परत मिळालेले नाहीत. याशिवाय तेथे 20 लाख रुपये आगावू दिले होते. तेही अद्याप परत मिळालेले नाहीत.
आर्थिक नुकसान सोसणाऱ्या द्युतीला Dutee Chand | आता कामगिरी उंचावता येईल का, याचीही भीती सतावत आहे. कामगिरी पूर्ववत साधण्यासाठी तिला किमान सहा महिने लागतील. ती म्हणाली, ‘‘आमच्या सरावाचा कार्यक्रम असा होता, की ऑक्टोबरपासून हळूहळू वेग पकडतो आणि मार्चपासून आणखी शिस्तबद्ध सराव सुरू होतो. एप्रिलमध्ये पूर्ण वेग पकडतो. मी मार्च ते जूनपर्यंत जर्मनीत सराव केल्यानंतर थेट टोकियोत जाण्याचा विचार करीत होते. दुर्दैवाने आत सर्वच अपेक्षांवर पाणी फिरले आहे.’’
आता पुढच्या वर्षी ऑलिम्पिक होईल की नाही, यावर अनिश्चिततेचे सावट आहे. द्युती म्हणते, ‘‘अद्याप कोरोना महामारीचा प्रभाव कमी झालेला नाही आणि त्यावर व्हॅक्सिनही बनलेली नाही. मला नाही वाटत, व्हॅक्सिन येईपर्यंत कोणताही खेळ होऊ शकेल. परदेशात जाण्याचा तर प्रश्नच नाही आणि भारतात अॅथलेटिक्सच्या सरावासाठी ना पुरेशा सुविधा आहेत, ना कोणतीही मोठी स्पर्धा होणार आहे.’’
ऑलिम्पिक पात्रतेसाठी परदेशात सराव करणे अत्यंत आवश्यक आहे. ज्या भारतीय खेळाडूंनी ऑलिम्पिक पात्रता सिद्ध केली आहे, त्या सर्वजण परदेशातील सरावाच्या जोरावरच पात्र ठरू शकले आहेत. मग तो नीरज चोपडा (भालाफेक) असो वा 400 मीटर रिलेचा संघ असो.
द्युतीला सध्या अस्वस्थतेने घेरले आहे. त्याची दोन कारणे स्पष्टपणे समोर येत आहेत. ती म्हणजे आर्थिक फटका आणि सराव न होणे. ज्या टोकियो ऑलिम्पिकची ती तयारी करीत होती, ती स्पर्धा वर्षभर पुढे ढकलली गेली असली तरी या स्पर्धेची पात्रता गाठायची कशी हाच प्रश्न तिच्यासमोर आ वासून उभा आहे. ही द्युतीचीच अस्वस्थता नाही, तर जगातील सर्वच खेळाडूंची असेल; पण आर्थिक फटका सोसावा लागल्याने तिची मनःस्थिती दोलायमान झाली हे नक्की…
[jnews_block_11 first_title=”Read more at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”95,60″]