जल्लोषात टीम इंडियाची मिरवणूक

जल्लोषात टीम इंडियाची मिरवणूक
भारतीय राजकीय मानसशास्त्रज्ञ आशीष नंदी म्हणाले होते, की “क्रिकेट हा भारतीय खेळ आहे. चुकून तो ब्रिटिशांनी शोधला.” गुरुवारी 4 जुलै 2024 रोजी मुंबईत त्याचा प्रत्यय आला. निमित्त होते टी20 वर्ल्ड कप स्पर्धेचे जगज्जेतेपद पटकावणाऱ्या टीम इंडियाच्या मिरवणुकीचे. गेल्या शनिवारी टी20 वर्ल्ड कप स्पर्धेचे जगज्जेतेपद पटकावणाऱ्या टीम इंडियाची मिरवणूक जल्लोषात झाली.

भारतीयांसाठी क्रिकेट म्हणजे प्रेम, जोश, उत्साह… आणि त्यात जगज्जेतेपदाचे निमित्त असेल तर आनंदाचा परमोच्च क्षण… हाच माहोल गुरुवारी, 4 जुलै 2024 रोजी मुंबईत होता. गेल्या शनिवारी टी20 वर्ल्ड कप स्पर्धेचे जगज्जेतेपद पटकावणाऱ्या टीम इंडियाची मिरवणूक जल्लोषात झाली.
चार जुलै 2024 च्या दुपारी एकदीडच्या सुमारास तमाम क्रिकेटप्रेमींची पावले दक्षिण मुंबईतील वानखेडे स्टेडियमकडे वळली होती. साऱ्यांना प्रतीक्षा होती ती विजयीवीरांची. रोहित आणि कंपनीचे पहाटे साडेसहाच्या सुमारास बार्बाडोसहून राजधानी दिल्लीत आगमन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीम इंडियाला खास आमंत्रण दिले होते. ही भेट झाल्यानंतर भारतीय संघ चाहत्यांच्या भेटीसाठी मुंबईत दाखल झाला अन् विजयोत्सवची धुंद टिपेस पोहोचली.
विजेतेपदात क्रिकेटप्रेमींचाही वाटा
भारतीय क्रिकेट संघाने वर्ल्ड कप टी20 स्पर्धा जिंकली, त्या यशात चाहत्यांचाही आमच्याइतकाच वाटा आहे, अशी भावना भारतीय क्रिकेट संघाने आपल्या कौतुक सोहळ्यात व्यक्त केली. भारताने २०११ मध्ये वर्ल्ड कप वनडे स्पर्धा जिंकली होती. त्याच मैदानावर संघाचा कौतुक सोहळा झाला. आपल्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केलेल्या चाहत्यांना रोहित शर्मा, विराट कोहली तसेच जसप्रीत बुमराहने आवर्जून श्रेय दिले. भारतीय कर्णधाराने आमच्यापेक्षा विजेतेपदाची आस चाहत्यांना जास्त होती, असे सांगितले. त्याचवेळी वर्ल्ड कप विजेतेपद जिंकल्यावर नेमकी भावना काय असते याचा अनुभव मला या विजेतेपदाने खऱ्या अर्थाने दिला. चाहत्यांचे प्रेम आता मोठ्या प्रमाणावर अनुभवत आहे, असे विराटने सांगितले. त्याचवेळी जसप्रीत बुमराहने हा कौतुकाचा दिवस कधीच विसरणार नाही अशी भावना व्यक्त केली.
आणि विराटने राजीव शुक्लांना मागे जाण्यास सांगितले…
मिरवणुकीदरम्यान रोहितने आपल्या सहकाऱ्यांना प्राधान्य देत, स्वत : मागे राहणे पसंत केले. मात्र बसमध्ये पुढे असलेल्या राजीव शुक्ला यांना मागे जाण्यास सांगत विराट कोहलीने रोहितला पुढे आणले. त्याच्या हाती जगज्जेतेपदाची ट्रॉफी दिली अन् जोरदार जल्लोष केला. संघातील सीनियरमधील ही खिलाडूवृत्ती संघाच्या जेतेपदात महत्त्वाची ठरली, हेदेखील इथे प्रामुख्याने दिसून आले.
हुर्यो उडविणाऱ्या मुंबईकरांकडून आता हार्दिकचे कौतुक
वर्ल्ड कप टी20 स्पर्धेपूर्वी जेमतेम काही आठवडे झालेल्या आयपीएलमधील मुंबईतील प्रत्येक सामन्याच्यावेळी हार्दिक पंड्याची हुर्यो उडवण्यात आली होती. त्याला प्रोत्साहित करण्याच्या आवाहनाकडेही दुर्लक्ष करण्यात आले होते. मात्र गुरुवारी हार्दिक… हार्दिक अशा आवाहनास जोरदार प्रतिसाद देण्यात आला होता. वर्ल्ड कप विजेतेपदात मोलाची कामगिरी बजावणाऱ्या हार्दिकवर मुंबईकरांनी भरपूर कौतुक केले.
आनंदोत्सवाच्या धारा…
वर्ल्ड कप टी20 क्रिकेट स्पर्धेत पावसाने व्यत्यय आणला होता. सामने लांबले होते. आता सत्कार सोहळ्याच्या दिवशीही दुपारी पाऊस आला आणि संध्याकाळीही. स्टँडमध्ये पुढच्या रांगेत असलेल्या चाहत्यांनी पावसाचा आनंद घेताना जागेवरच नाच केला.
पाणी नसल्याची तक्रार
अनेक चाहते दुपारपासून स्टेडियममध्ये आले होते, मात्र स्टेडियममध्ये पाणी नसल्याची तक्रार अनेक चाहत्यांनी केली. त्याचबरोबर स्वच्छता गृहेही सुरुवातीस खुली नसल्याची तक्रार काही चाहत्यांनी केली.
जल्लोषात निघाली टीम इंडियाची मिरवणूक
जल्लोषात निघालेली क्रिकेट टीम इंडियाची मिरवणूक आणखी एका कारणाने लक्षवेधी ठरली. झालं काय, की मुंबईतील उपनगरी रेल्वेतील चर्चगेट आणि छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या दिशेने होणारी गर्दी एरव्ही दुपारनंतर काहीशी कमी होते, पण भारतीय क्रिकेट संघाच्या विजेतेपदाने गुरुवारी हे चित्र बदलले होते. दुपारपासूनच चर्चगेट आणि छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या दिशेने जाणाऱ्या उपनगरी रेल्वे गर्दीने ओसंडून वाहण्यास सुरुवात झाली. या चेंगराचेंगरीत झोकून देणाऱ्या प्रत्येकाला जगज्जेत्या भारतीय संघाचे दर्शन हवे होते. काही चाहत्यांनी हुशारी दाखवली होती. वानखेडे स्टेडियम दुपारी चाहत्यांसाठी खुले होईल, असे सकाळी जाहीर करण्यात आले, पण काही चाहत्यांनी हुशारी करुन दुपारी तीन वाजताच आपण वानखेडे स्टेडियमच्या दाराशी असणार याची खबरदारी घेतली. त्यामुळे दुपारी साडेतीनपासूनच स्टेडियम परिसरात मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे स्टेडियमवरील व्यवस्था पाहणाऱ्या खाजगी सुरक्षा रक्षकांनाही स्टेडियममध्ये प्रवेश करण्यासाठी कष्ट पडले होते.
वानखेडे स्टेडियमकडे जाणाऱ्या मार्गावर रांगा
प्रत्येक प्रवेशद्वारावरील गर्दी सातत्याने वाढत होती. चर्चगेट, मरीन लाइन्स आणि चर्नी रोड स्टेशनवरुन बाहेर पडून वानखेडे स्टेडियमवर जाणाऱ्या मार्गावर रांगा लागल्या आणि धक्काबुक्की सुरू झाली. रेल्वे स्टेशनवरील बंदोबस्त वाढवण्यात आला होता. त्यातच दादर, परळ, प्रभादेवी या स्थानकांत चर्चगेटला येणाऱ्यांची जास्त गर्दी झाली आणि रेल्वे पादचारी पूलही ओसंडून वाहू लागले. वानखेडे स्टेडियमच्या प्रवेशद्वाराजवळील गर्दी सातत्याने वाढत असल्यामुळे हे दरवाजे उघडण्याचा निर्णय घेणे भाग पडले. प्रवेशद्वार उघडल्याचे समजल्यावर जास्तच गर्दी झाली. स्टँडमध्ये जाताना होणारी चेंगराचेंगरी टाळण्यासाठी सुरक्षा यंत्रणेने चाहत्यांना रोखण्यासाठी प्रयत्न केले. मात्र प्रत्येकजण स्टेडियममध्ये जाऊन जागेवर बसण्यासाठी उत्सुक असल्याने तेही अवघड झाले. अनेक प्रवेशद्वारावर धक्काबुक्की झाली. चेंगराचेंगरी टळली, अखेर सात वाजता नियोजित असलेल्या सोहळ्यासाठी स्टेडियमची प्रवेशद्वार पाचच्यापूर्वीच बंद करण्याचा निर्णय पोलिसांना घेणे भाग पडले. त्यानंतर अनेक प्रवेशद्वारांबाहेर चाहत्यांची गर्दी होती.
मुंबईचा राजा कोण रोहित शर्मा… रोहित शर्मा…
भारतीय संघाची विजयी मिरवणूक पाचच्या सुमारास सुरू होईल, या मिरवणूकीसाठी विमानतळावरून बसहून एनसीपीएला जाणारा भारतीय संघ आपल्याला बघता येईल या अपेक्षेने चाहत्यांनी मरिन लाईन्स परिसरात गर्दी केली होती. पण संघाचे आगमन लांबत गेले. प्रत्येक बस दिसल्यावर चाहते भारतमाता की जय,… मुंबईचा राजा… रोहित शर्मा.. रोहित शर्मा अशा घोषणा देत होते.
वाढता जनसागर
मरिन लाइन्स परिसरातील मुख्य रस्ता समुद्राशी स्पर्धा होईल एवढ्या चाहत्यांच्या गर्दीने फुलला होता. एवढेच नव्हे तर या गर्दीत भारतीय संघाच्या विजयी मिरवणूकीसाठी तयार केलेली खास बसही फसली. चाहते एकमेकांचा उत्साह वाढवण्यासाठी भारतमाता की जय… मुंबईचा राजा… रोहित शर्मा… रोहित शर्मा अशा घोषणा देत होते.
पाण्याच्या फवाऱ्याची सलामी
भारतीय क्रिकेट संघास दिल्लीहून घेऊन आलेले मुंबईत उतरले आणि संघ असलेल्या विमानास पाण्याच्या फवाऱ्याची सलामी देण्यात आली.
काय रोहित, मातीची चव कशी होती?

मातीची चव कशी होती… अंतिम लढतीत मैदानात उतरल्यावर मनात काय विचार सुरू होते… वरच्या क्रमांकावर बढती मिळाल्यावर कसे वाटत होते, हे प्रश्न आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे. टी20 क्रिकेट वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघाने गुरुवारी मोदींची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यानंतर मोदींनी प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यासह भारतीय खेळाडूंशी संवाद साधला. ही भेट संस्मरणीय झाल्याचेही त्यांनी सांगितले.
भारतीय संघ गुरुवारी ‘चार्टर्ड फ्लाइट’ने पहाटे दिल्लीत दाखल झाला. यानंतर संघाने पंतप्रधान मोदींची भेट घेतली. मोदींनी विजेत्या सर्वांचे अभिनंदन केले. त्यांच्यासह नाश्ता केला. गप्पाही मारल्या. मोदींनी अनेक खेळाडूंना रोमहर्षक झालेल्या अंतिम लढतीबाबत विविध पैलूंबद्दल विचारले. ही ‘ग्रेट भेट’ जवळपास दोन तास होती. भारतीय संघाने टी20चे जगज्जेतेपद जिंकल्याबद्दल मोदींनी आनंद व्यक्त केला.
यानंतर त्यांनी रोहितला विचारले की मातीची चव कशी होती. कारण, रोहितने विजयानंतर अंतिम लढत झालेल्या बार्बाडोसच्या खेळपट्टीवरील मातीची चव चाखली होती. विराट कोहलीचा वर्ल्ड कपमध्ये फॉर्म हरपला होता. मात्र, अंतिम लढतीत त्याने खणखणीत खेळी करून दाखवली. त्या वेळी अंतिम लढतीपूर्वी तुझ्या डोक्यात काय सुरू होते, असे मोदींनी कोहलीला विचारले. अंतिम लढतीत वरच्या क्रमांकावर बढती मिळाल्यावर काय वाटले, असे त्यांनी अक्षर पटेलला विचारले.
हेन्रिच क्लासेन आणि डेव्हिड मिलर यांनी फटकेबाजी सुरू केली तेव्हा दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी ३० चेंडूंत ३० धावांची गरज होती. ही लढत दक्षिण आफ्रिका सहज जिंकणार, असे वाटत होते. अर्थात, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग आणि हार्दिक पंड्याने अचूक मारा करून भारताला विजय मिळवून दिला. यात सूर्यकुमार यादवने घेतलेला डेव्हिड मिलरचा झेल लढतीचा ‘टर्निंग पॉइंट’ ठरला. भारतीय संघासोबतची क्षणचित्रे मोदींनी सोशल मीडियावरही टाकली.
‘आपल्या चॅम्पियन्स संघासोबतची भेट अविस्मरणीय ठरली. स्पर्धेतील अनुभवाबाबत खेळाडूंकडून जाणून घेतले. हा संवाद संस्मरणीय होता,’ असे ट्वीट मोदींनी केले. यानंतर मोदींनी भारतीय खेळाडूंसह फोटोही काढला. विशेष म्हणजे या वेळी काही खेळाडू कुटुंबासह आले होते. मोदींनी त्यांच्या कुटुंबासोबत फोटो काढून घेतले. यानंतर जवळपास प्रत्येक खेळाडूंनी पंतप्रधान मोदींसोबतची भेट कशी ‘ग्रेट’ होती, याचे वर्णन फोटोसह सोशल मीडियावरही केले. या वेळी बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि सचिव जय शहाही उपस्थित होते. बिन्नी आणि शहा यांनी मोदींना ‘नमो – १’ नावाची जर्सीही प्रदान केली.
4 जुलै 2024 रोजी Team India चे असे झाले स्वागत…
- सकाळी ६.०० : भारतीय संघास घेऊन आलेले अविजित विमान नवी दिल्लीतील विमानतळावर उतरले
- सकाळी ६.२५ : भारतीय संघाचा हॉटेलच्या दिशेने प्रवास सुरू. विमानतळावर चाहत्यांचा उत्साह. रोहित शर्मा बसमधून वर्ल्ड कप उंचावत चाहत्यांच्या जल्लोषात सहभागी
- सकाळी १०.२५ : भारतीय संघ हॉटेलमधून पंतप्रधानांच्या निवासस्थानाकडे रवाना.
- सकाळी ११.०३ : भारतीय संघाचे पंतप्रधानांच्या लोक कल्याण मार्गावरील निवासस्थानी आगमन
- दुपारी १२.४२ : पंतप्रधानांच्या निवासस्थानातून भारतीय संघ दिल्ली विमानतळाकडे रवाना
- दुपारी १.१० : भारतीय संघ मुंबईस रवाना होण्यासाठी दिल्ली विमानतळावर
- दुपारी ३.४१ : भारतीय संघाचे दिल्लीहून प्रयाण
- संध्याकाळी ०५.२७ : भारतीय संघास घेऊन आलेले विमान मुंबईत उतरले
- संध्याकाळी ६.२८ : भारतीय संघ विमानतळावरून रवाना
- संध्याकाळी ७.३० : भारतीय संघाची मुंबईतील विजयी मिरवणूक सुरू
Visit us
- Facebook page : @kheliyad
- Instagram : @kheliyad
- X : @kheliyad
- Linkedin : @MaheshPathade03
- Youtube Channel : Team Kheliyad
- WhatsApp Channel: kheliyad
- email : kheliyad.sports@gmail.com