सिंधूचं सुवर्णस्वप्न भंगलं, अमितकडून निराशा, कमलप्रीतने लावल्या आशा
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारत उत्तम कामगिरीच्या आशेने उतरला खरा, मात्र स्पर्धेला आठ दिवस उलटले तरी भारताच्या खात्यावर एकमेव रौप्य पदक आहे. भारत ऑलिम्पिक स्पर्धेत यंदा उत्तम कामगिरी करेल अशी आशा आता जवळजवळ धूसर झाली आहे. कारण पदकाचे दावेदार असलेल्या बहुतांश भारतीय खेळाडूंचं आव्हान संपुष्टात आलं आहे.
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत बॅडमिंटन स्टार पी. व्ही. सिंधूचं महिला एकेरीत सुवर्णपदक जिंकण्याचं स्वप्न अखेर भंगलं. उपांत्य फेरीत 31 जुलै 2021 रोजी तिला पराभवाचा सामना करावा लागला. बॉक्सिंगमध्ये पदकाचा प्रबळ दावेदार मानला जाणारा अमित पंघालही पहिल्याच फेरीत पराभूत झाल्याने त्याचे टोकियो ऑलिम्पिकमधील आव्हान संपुष्टात आले आहे. मात्र, थाळी फेक स्पर्धेत कमलप्रीत कौरने अंतिम यादीत स्थान मिळवल्याने भारतीयांच्या पदकाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
भारतीय महिला हॉकी संघाची वंदना कटारिया हिच्या हॅटट्रिकमुळे दक्षिण आफ्रिकेचा 4-3 असा पराभव झाला. या विजयाने भारत 41 वर्षांनी प्रथमच ऑलिम्पिकमध्ये उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवू शकला आहे. नेमबाजी आणि तिरंदाजीत भारतीयांचा नेम पुन्हा चुकला. गोल्फमध्ये चमत्कार झाला तरच अनिर्बान लाहिड़ी ‘पोडियम’पर्यंत पोहोचू शकेल. भारताच्या नावावर आतापर्यंत फक्त रौप्य पदकच आहे. या एका पदकावर भारत पदक तालिकेत शनिवारी 57 वरून 60 व्या स्थानापर्यंत घसरलेला होता.
सिंधूची झुंज आता कांस्य पदकासाठी
ऑलिम्पिक स्पर्धेत भारत बॅडमिंटनमध्ये उत्तम कामगिरी करेल अशी आशा होती. मात्र, दुहेरी आणि पुरुष एकेरीतील आव्हान संपुष्टात आल्यानंतर सगळी मदार सिंधूवर आहे. सुवर्णपदकाची प्रबळ दावेदार म्हणून तिच्याकडे पाहिलं जात होतं. मात्र, भारताला 31 जुलैला पहिला झटका बसला तो बॅडमिंटन स्टार सिंधूच्याच पराभवामुळे. सुवर्णपदकाची प्रबळ दावेदार असलेल्या सिंधूला आता कांस्य पदकासाठी झुंजावे लागणार आहे. चिनी तैपेईची जगातील अव्वल खेळाडू ताइ जु यिंग हिने सिंधूला 40 मिनिटांपर्यंत चाललेल्या उपांत्य फेरीच्या लढतीत 18-21, 12-21 असे पराभूत केले. कांस्यपदक जिंकल्यास दोन वेळा ऑलिम्पिक पदक जिंकणारी सिंधू एकमेव भारतीय खेळाडू ठरेल. भारतीय बॉक्सिंगसाठीही शनिवारचा दिवस निराशाजनकच ठरला.
मुष्टियोद्धा पंघालचा धक्कादायक पराभव
जगातला अव्वल मुष्टियोद्धा अमित पंघाल (52 किलो) याच्यानंतर पूजा राणी (75 किलो) पराभूत झाल्याने त्यांचे आव्हान संपुष्टात आले. पंघालवर भारताला पदकाची आशा होती. मात्र, तो उपउपांत्यपूर्व फेरीत कोलंबियाच्या युबिर्जेन मार्टिनेझविरुद्ध 1-4 असा पराभूत झाला. अव्वल मानांकित पंघालची ही पहिलीच ऑलिम्पिकवारी होती. त्याला पहिल्या फेरीत बाय मिळाला होता. याच दिवशी सायंकाळी झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत पूजा राणीला 0-5 असा पराभव स्वीकारावा लागला.
कमलप्रीतकडून कमाल
अॅथलेटिक्समध्ये भारत ऑलिम्पिक पदक जिंकेल अशी आशा असली, तरी खेळाडूंची एकूण कामगिरी पाहता चमत्कार घडला तर एखादं पदक हाती लागू शकेल. अर्थात, या निराशाजनक वातावरणातही अॅथलेटिक्समध्ये कमलप्रीत कौरने आशेचे किरण दाखवले. कमलप्रीत कौरने महिलांच्या थाळीफेक पात्रताफेरीत दुसरे स्थान मिळवत अंतिम फेरी गाठली. मात्र, अनुभवी सीमा पुनियाचे आव्हान संपुष्टात आले. कमलप्रीतने आपल्या तिसऱ्या प्रयत्नात 64 मीटरपर्यंत थाळी फेकली. पात्रता फेरीत अव्वल असलेल्या अमेरिकेच्या वालारी आलमॅन हिच्यानंतर 64 मीटर किंवा त्यापेक्षा अधिक अंतरावर थाळी फेकणारी ती एकमेव खेळाडू आहे. थाळीफेकची अंतिम फेरी 2 ऑगस्ट रोजी होणार आहे. दोन्ही गटांमधील 31 खेळाडूंपैकी 64 मीटरची मर्यादारेषा 12 खेळाडूंनी पार केली आहे. सीमा पुनिया अ गटात 60.57 मीटर थाळी फेकली. ती गटात सहाव्या स्थानावर, तर एकूण खेळाडूंमध्ये 16 व्या स्थानावर राहिली. सीमाचा पहिला प्रयत्न फाउल गेला होता. दुसऱ्या प्रयत्नात तिने 60.57 आणि तिसऱ्या प्रयत्नात 58.93 मीटर थाळी फेकली.
लांब उडीत निराशा
पुरुष गटात लांब उडीमध्ये श्रीशंकरला विशेष छाप पाडता आली नाही. तो एकूण खेळाडूंमध्ये 25 व्या स्थानावर राहिला. श्रीशंकरने पहिल्या प्रयत्नात 7.69 मीटर उडी घेतली. मात्र, दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रयत्नात तो यापेक्षा उत्तम कामगिरी करू शकला नाही. भारतीय महिला हॉकीत वंदनाने ऐतिहासिक कामगिरी केली. तिने हॅटट्रिक केली. त्या जोरावरच भारताने ‘करो या मरो’ लढतीत तळातल्या दक्षिण आफ्रिकेचा 4-3 असा पराभव करीत उपांत्यपूर्व फेरीत पराभव केला. वंदनाने चौथ्या, 17 व्या आणि 49 व्या मिनिटाला गोल केला. ऑलिम्पिकच्या इतिहासात हॅटट्रिक करणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. नंतर नेहा गोयलने 32 व्या मिनिटाला गोल केला. दक्षिण आफ्रिकेकडून टेरिन ग्लस्बी (15 वा मिनिट), कर्णधार एरिन हंटर (30 वा) आणि मेरिजेन मराइस (39 वा मिनिट) यांनी गोल केले. भारताने गट साखळीत पहिले तीन सामने गमावल्यानंतर अखेरचे दोन सामने जिंकले. याच दिवशी सायंकाळी ब्रिटनने आयर्लंडवर 2-0 असा विजय मिळविल्याने भारताचं अंतिम आठमधील स्थान पक्क झालं. उपांत्यपूर्व फेरीत भारतासमोर ऑस्ट्रेलियाचे कडवे आव्हान असेल.
नेमबाजी, तिरंदाजीतही नेम चुकला
भारत तिरंदाजीत हमखास ऑलिम्पिक पदक जिंकेल, अशी आशा बाळगण्याचं कारण म्हणजे दीपिका कुमारीची गेल्या काही स्पर्धांतील उत्तम कामगिरी. मात्र, तिचे आव्हान संपुष्टात आले. तिरंदाजीत भारताची शेवटची आशा अतनू दासवर टिकून होती. पुरुषांच्या वैयक्तिक प्रकारात उपउपांत्यपूर्व फेरीत अतनू दासचे आव्हान जपानच्या ताकाहारू फुरूकावाने 4-6 असे संपुष्टात आणले. दास पाचव्या सेटमध्ये एकदाही 10 चा स्कोअर करू शकला नाही. जगातली अव्वल क्रमांकावरील तिरंदाज दीपिका कुमारी उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाल्यानंतर भारताची आशा अतनू दासवरच होती. नेमबाजीत अंजुम मोदगिल आणि तेजस्विनी सावंत महिलांच्या 50 मीटर रायफल थ्री पोजिशन स्पर्धेत अनुक्रमे 15 व्या आणि 33 व्या स्थानावर राहिल्याने या दोन्ही नेमबाज अंतिम फेरी गाठण्यात अपयशी ठरल्या. असाका नेमबाजी परिसरात झालेल्या या स्पर्धेत जागतिक स्पर्धेतील रौप्यपदक विजेती अंजुम ‘54 इनर 10 (10 गुणांत 54 नेम)’सह 1167 गुण मिळवले. अनुभवी तेजस्विनीने स्टँडिंग, नीलिंग आणि प्रोन पोजिशन या तिन्ही प्रकारांत केवळ 1154 गुण मिळवू शकली.
गोल्फमध्ये अनिर्बान लाहिडीने तिसऱ्या फेरीत तीन अंडर 68 चे कार्ड खेळले. त्याने शनिवारी सकाळी दुसरी फेरी पूर्ण केली आणि एक ओवर 72 चा स्कोअर केला होता. तिसऱ्या फेरीनंतर त्याचा एकूण निकाल सहा अंडर 207 राहिला. तो संयुक्त 28 व्या स्थानी राहिला. त्याचबरोबर उदयन माने याने 70 चे कार्ड खेळले. यात 2 ओव्हर 215 चे कार्ड खेळल्यानंतर तो संयुक्त 55 व्या स्थानी राहिला. पाल नौकानयन (सेलिंग) स्पर्धेत पुरुषांच्या स्किफ 49अर स्पर्धेत के. सी. गणपती आणि वरुण ठक्कर ही भारतीय जोडी अनुक्रमे 16, नवव्या आणि 14 व्या स्थानी राहिली. या भारतीय जोडीने 154 गुणांसह 19 जोड्यांमध्ये एकूण 17 वे स्थान मिळवले.
ऑलिम्पिकमध्ये भारताची कामगिरी
- ऑलिम्पिक स्पर्धेत प्रथमच घोडेस्वारीत आव्हान देणाऱ्या फवाद मिर्झाने इव्हेंटिंग प्रकारात ड्रेसेज फेरी पूर्ण झाल्यानंतर संयुक्त नवव्या स्थानी राहिला.
- टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंची कामगिरी 30 जुलै 2021 रोजी आठव्या दिवशीही यथातथाच राहिली.
- तिरंदाजीत अतनू दास पुरुषांच्या वैयक्तिक स्पर्धेत उपउपांत्यपूर्व फेरीत ताकाहारू फुरूकावा (जपान) याच्याकडून 4-6 असा पराभूत झाला. या पराभवासह त्याचे ऑलिम्पिकमधील आव्हान संपुष्टात आले.
- कमलप्रीत कौरने महिलाच्या थाळी फेक स्पर्धेत 64 मीटर थाळी फेकून अंतिम यादीत स्थान मिळवले. मात्र, सीमा पूनिया 16 व्या स्थानावर राहिल्याने तिचे ऑलिम्पिकमधील आव्हान संपुष्टात आले.
- पुरुष गटात श्रीशंकर 7.69 मीटरपर्यंतच लांब उडी घेऊ शकल्याने तो 25 व्या स्थानावर राहिला. त्यामुळे त्याला अंतिम 16 जणांत स्थान मिळवता आले नाही.
- बॅडमिंटनमध्ये पी. व्ही. सिंधू महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत चिनी तैपेईच्या ताइ जु यिंग हिच्याकडून 18-21, 12-21 पराभूत झाली. आता कांस्य पदकासाठी तिच्यासमोर चीनच्या बिंग जियाओ हिचे आव्हान आहे.
- मुष्टियुद्धात अमित पंघाल पुरुषांच्या 52 किलो गटात उपउपांत्यपूर्व फेरीत युबिर्जेन मार्टिनेझ (कोलंबिया) याच्याकडून 1-4 असा पराभूत झाला, तर पूजा राणी महिलांच्या 75 किलो वजनगटात उपांत्यपूर्व फेरीत लि कियान (चीन) हिच्याकडून 0-5 अशी पराभूत झाली.
- गोल्फमध्ये पुरुषांच्या वैयक्तिक स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत अनिर्बान लाहिड़ी संयुक्त 28 व्या, तर उदयन माने संयुक्त 55 व्या स्थानी राहिला.
- भारतीय महिला हॉकी संघाने दक्षिण आफ्रिकेला 4-3 असे पराभूत करीत उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले.
- सेलिंग (पाल नौकानयन) स्पर्धेत पुरुषांच्या स्किफ 49अर स्पर्धेत केसी गणपती आणि वरुण ठक्कर ही भारतीय जोड़ी तीन शर्यतींत अनुक्रमे 16 व्या, नवव्या आणि 14 व्या स्थानी राहिली.
- नेमबाजीत अंजुम मोदगिल आणि तेजस्विनी सावंत महिलांच्या 50 मीटर रायफल थ्री पोजिशन स्पर्धेत अनुक्रमे 15 व्या आणि 33 व्या स्थानी राहिल्याने अंतिम फेरीत स्थान मिळवू शकल्या नाहीत.