शैलेश नेर्लीकर- बुद्धिबळातला स्टीफन हॉकिंग
मला स्टीफन हॉकिंग यांचं कमालीचं अप्रूप वाटायचं. गलितगात्र क्षीण झालेल्या अवस्थेतली व्हीलचेअरवरील त्यांची ती केविलवाणी मूर्ती पाहिली, की कारुण्य आणि अचंबा हे दोन्ही भाव मनात दाटतात. ही कोणती देहावस्था आहे, ज्यात ब्रह्मांडाचा रहस्यभेद करण्याची ऊर्जा सामावलेली आहे…? कुठून येतं हे बळ…? ब्रह्मांडाच्या रहस्यापेक्षाही मला पडलेला हा जटिल प्रश्न होता. हा प्रश्न स्टीफन हॉकिंगला किती तरी जणांनी विचारला असेल आणि त्याचं उत्तर त्यांनी दिलंही असेल. पण मला काही ते कळलं नाही. कदाचित ते माझ्या बुद्धिब्रह्मांडाच्या पल्याड असेल. पण मी असा स्टीफन हॉकिंग पाहिला ज्याने ब्रह्मांड बुद्धिबळाच्या पटात पाहिलं. कदाचित ब्रिटनच्या स्टीफनलाही सापडली नसतील अशी किचकट ब्रह्मांडाची रहस्ये तो लीलया शोधायचा. हा बुद्धिबळातला स्टीफन हॉकिंग म्हणजे कोल्हापूरचा शैलेश नेर्लीकर.
2008 ची ही गोष्ट. मी जळगावातच होतो. राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेनिमित्त साधारण तिशीतला एक विकलांग तरुण खेळायला आला होता. सोबत त्याची आई होती. कोणी सोबत नसेल तर त्याची आईच दोन हातांची झोळी करून त्याला उचलून आणायची. त्याला पाहिल्यानंतर कोणाच्याही मनात कारुण्यभाव उमटेल. पण खेळत असा होता, की दिग्गज खेळाडू त्याला शरण जायचे. बुद्धिबळात शरण जाणे म्हणजे सपशेल पराभव पत्करणे. त्याचा खेळ पाहून थक्क झालो. इथे कारुण्यभाव केव्हाच संपला होता आणि त्याची जागा अचंब्याने घेतली. पुन्हा जिज्ञासा जागृत झाली आणि पुन्हा तोच प्रश्न, जो स्टीफन हॉकिंगला पाहताना मनी दाटला. कुठून येतं हे बळ…?
शैलेश नेर्लीकर याच्याकडे फक्त श्वास आणि बुद्धी
शैलेशचा हा आजार असा होता, की तो उभा राहू शकत नव्हता. हाताच्या हालचालींना कमालीच्या मर्यादा होत्या. त्यामुळे बुद्धिबळ तो झोपूनच खेळायचा. त्याच्याकडे दोनच गोष्टी होत्या. एक म्हणजे श्वास आणि दुसरी बुद्धी! या पलीकडे त्याच्याकडे काहीही नव्हतं. म्हणायला फक्त एक शरपंजरी देह. त्याच्यासाठी स्पर्धेत ऐन वेळी बेड उपलब्ध करून दिला जायचा. तशी व्यवस्था आयोजक करायचे ही जमेची बाजू. जळगावात तर त्याची विशेष काळजी घेतली गेली यात दुमत नव्हतं. त्या वेळी त्याची राहण्याची व्यवस्था तेली समाज कॉम्प्लेक्समध्ये केली होती. या कार्यालयाजवळ कॉलेज, हॉस्पिटल … म्हणजे प्रचंड वर्दळीच्या रस्त्यावर शैलेशची निवासव्यवस्था असल्याने एका दृष्टीने ते उत्तम होतं. अनुभवी बुद्धिबळपटू प्रवीण सोमाणी तेथून जवळच राहायचा. शैलेशला अंघोळीसाठी बादली नव्हती. सोमाणीला कळलं तर त्याने लगेच घरातली बादली उचलली आणि तडक मंगल कार्यालयाच्या दिशेने निघाला.
त्याच्या वडिलांनी विचारलं, ❛❛ए बादली कुठं घेऊन चालला रे…❜❜
सोमाणीला घरी कोणी असं विचारलं, की तो कधीच विश्लेषण, माहिती देण्याच्या भानगडीत पडत नसायचा. ❛❛काही नाही… आलो…❜❜ एवढं बोलून भररस्त्यावरून सोमाणी बादली घेऊन आला. शैलेश नेर्लीकर याच्यावर मनापासून प्रेम करणारी माणसं अशी प्रत्येक शहरात होती.
[jnews_block_27 first_title=”हेही वाचा…” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_post=”687,4308″]शैलेशचा खडतर प्रवास सांगताना त्याच्या आईचा कंठ दाटून यायचा. पण शैलेश मात्र शांत. त्याच्या चेहऱ्यावरची ही शांतता चिवर परिधान केलेल्या बुद्धासारखी भासायची. इतरांसाठी त्याची ही केविलवाणी धडपड होती. त्याने मात्र ती नकळत्या वयातच स्वीकारली होती. शैलेशला बोलतानाही कमालीचा त्रास व्हायचा. त्याच्या एका वाक्यानंतर त्याची आई पुढची कहाणी कथन करायची.
शैलेश एक मात्र ठामपणे म्हणायचा, ❛❛माझ्याकडे शरीर नसलं तरी बुद्धी आहे. याच बुद्धीच्या जोरावर मी मोठा होईन. खंत एवढीच आहे, की माझ्यासाठी आईला खूप त्रास सहन करावा लागतोय. तिच्यामुळेच मी आज स्पर्धा खेळू शकतोय.❜❜
शैलेशच्या मनातली खंत कळत होती; पण जिंकण्याची ऊर्मी स्वस्थ बसू देत नव्हती. त्याच्याकडे ही आंतरिक ऊर्जा कमालीची होती. अगदी स्टीफन हॉकिंगसारखीच. 2008 मध्ये तो राज्यस्तरीय स्पर्धेत तिसरा आला आणि थक्कच झालो. अनेक दिग्गज खेळाडू त्या वेळी स्पर्धेत खेळत होते. त्यांनाही मागे टाकून शैलेश जिंकला. धडधाकटांच्या गटात शैलेशचं हे खेळणंच त्याला कधीही विकलांग करू शकलं नाही. मनातली आंतरिक शक्ती इतकी मोठी होती, की मांसल शक्तीही त्यापुढे थिटी पडली. मला तर ती एक भेट जणू स्टीफन हॉकिंगला भेटून आल्यासारखी होती! त्यानंतर तो सलग तीन वर्षे जळगावातील स्पर्धा खेळला. नंतर मात्र त्याच्याशी पुन्हा कधी भेट होऊ शकली नाही. मात्र, त्याच्या विजयाच्या वार्ता सतत कानी पडत होत्या. मध्यंतरी तो जर्मनीतही खेळला. तामिळनाडूतील त्रिचीमध्ये 2015 मध्ये झालेल्या राष्ट्रीय विकलांग बुद्धिबळ स्पर्धेत त्याने ब्राँझ मेडलही जिंकलं होतं. क्रीडा पुरस्कारानेही त्याला गौरविण्यात आलं.
शैलेशचं वैशिष्ट्य होतं, ते म्हणजे विकलांग म्हणून त्याने खेळात कधीही सवलत मागितली नाही. म्हणजे घड्याळाच्या काट्यावरही त्याचा डाव रंगला, पण कधी म्हंटला नाही, की मला दोन सेकंद प्रतिस्पर्ध्यापेक्षा जास्त द्या. त्याने तेवढाच वेळ घेतला, जेवढा वेळ समोरच्याकडे होता. त्याला घड्याळाचे बटण प्रेस करताना कमालीचा त्रास होत असेल. कदाचित वेळेचा दबावही येत असेलच; पण त्याची ती वेदना त्याने चेहऱ्यावर कधीही आणली नाही. आंतरिक ऊर्जा यापेक्षा दुसरी कोणती असेल…!
ही ऊर्जा कमालच म्हणावी, जी आमच्यासारख्या धडधाकटांनाही उभं राहण्याची प्रेरणा देत होती. मात्र, अचानक शनिवारी व्हॉट्सअॅपवर एका ओळीतला संदेश धडकला… शैलेश गेला…!! भयंकर धक्का बसला. पटावर अनेक लढाया लढणारा हा योद्धा रात्रीच्या नीरव शांततेत गाढ झोपी गेला होता… मनावर अचानक आघात झाला. पहिल्यांदा जाणवलं, की विकलांगता काय असते ती… संभ्रमावस्था अशी आहे, की हे काळाने टाकलेले क्रूर पाऊल म्हणावे की वेदनामुक्त करणारी सुंदर चाल म्हणावी…?
Follow on Facebook Page kheliyad
[jnews_block_9 first_title=”Read more at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”82″]