मोहम्मद शमी परतला १४ महिन्यांनी!
भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने जवळपास १४ महिन्यांनंतर भारतीय क्रिकेट संघात पुनरागमन केले आहे.

मोहम्मद शमी परतला १४ महिन्यांनी!
मुंबई, १२ जानेवारी २०२५
भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने जवळपास १४ महिन्यांनंतर भारतीय क्रिकेट संघात पुनरागमन केले आहे. इंग्लंडविरुद्धच्या आगामी टी-२० मालिकेसाठी शनिवारी शमीची टीम इंडियात निवड झाली.
१९ नोव्हेंबरला पार पडलेल्या वर्ल्ड कप वनडे स्पर्धेच्या अंतिम फेरीनंतर ३४ वर्षीय मोहम्मद शमी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. घोट्याच्या शस्त्रक्रियेनंतर त्याने बीसीसीआयच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत पुनर्वसनाचा कार्यक्रम पूर्ण केला. मात्र गुडघ्याला सूज आल्याने त्याला गावस्कर-बॉर्डर करंडक कसोटी मालिकेत भाग घेता आला नव्हता.
आगामी चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्या दृष्टिकोनातून शमीला आता मायदेशातील या टी-२० मालिकेत संधी देण्यात आली आहे. जेणेकरून त्याला आंतरराष्ट्रीय व्यासपिठावरही सूर गवसेल. तसेच त्याचा फिटनेसही जोखता येईल. इंग्लंडविरुद्धची ही मालिका पाच टी-२० सामन्यांची आहे. मात्र शमीला सगळ्याच सामन्यांत खेळवण्याची शक्यताही कमी आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघात स्थान देण्यात आलेल्या रमणदीप सिंगऐवजी ऑस्ट्रेलिया दौरा गाजविणाऱ्या नितीश कुमार रेड्डीला या संघात संधी देण्यात आली आहे. तर आवेश खान आणि यश दयाल या गोलंदाजांऐवजी शमी आणि हर्षित राणा यांची निवड झाली आहे. यष्टिरक्षक जितेश शर्माऐवजी ध्रुव जुरेलला पसंती देण्यात आली आहे.
भारतीय संघ
सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, रिंकू सिंग, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल (उपकर्णधार), हर्षित राणा, अर्शदीपसिंग, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्णोई, वॉशिंग्टन सुंदर, ध्रुव जुरेल (यष्टिरक्षक).
टी-२० मालिकेचा कार्यक्रम
- २२ जानेवारी : कोलकाता
- २५ जानेवारी : चेन्नई
- २८ जानेवारी : राजकोट
- ३१ जानेवारी : पुणे
- २ फेब्रुवारी : मुंबई
(सर्व लढती सायंकाळी ७ पासून)