Football

अखेर लिव्हरपूल ३० वर्षांनी चॅम्पियन

Kheliyad News 
लंडन ः

‘लिव्हरपूल’च्या किती पिढ्या संपल्या असतील माहीत नाही, पण ३० वर्षांची प्रतीक्षा ‘लिवरपूल’साठी खूपच मोठी आहे. १९९० मध्ये या क्लबने इंग्लिश प्रीमियर लीग फुटबॉलचा शेवटचा किताब liverpool-epl-champion | जिंकला होता. त्यानंतर या क्लबला सतत विजेतेपदाने हुलकावणी दिली. यंदा मात्र या क्लबने विजेतेपदावर मोहोर उमटवली.

इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये विजेतेपद liverpool-epl-champion | मिळविण्याचं लिवरपूलचं स्वप्न होतं. अर्थात, हे नव्या पिढीचं स्वप्न होतं. ९० च्या दशकातील खेळाडूंनी विजेतेपदाचा आनंद लुटला होता. एका अर्थाने नव्या पिढीला केवळ विजेतेपदाचा वारसा मिळाला, पण अनुभव नाही. तसं पाहिलं तर यंदा लिवरपूलने विजेतेपद जवळजवळ निश्चित केलं होतं. केवळ घोषणेची औपचारिकताच तेवढी बाकी होती. कारण लिवरपूलने ३१ सामन्यांत तब्बल ८६ गुण मिळवले होते. त्यांच्या आसपास एकही संघ नव्हता. त्यांच्या खालोखाल मँचेस्टर सिटीचा नंबर लागतो. मात्र, त्यांचे गुण होते ६३. म्हणजे तब्बल २३ गुणांचं अंतर. हे अंतर भरून निघणं केवळ अशक्य. मात्र, हातातोंडाशी आलेलं हे विजेतेपद कोरोना महामारीमुळे आणखी लांबलं. स्पर्धा रद्द झाल्या. धोका टळला नसला तरी क्रीडा स्पर्धांनी काहीअंशी मैदानाची दारं किलकिले केली होती. त्यातलाच एक भाग म्हणजे इंग्लिश प्रीमियर लीग.

ही स्पर्धा २६ जून २०२० रोजी सुरू झाली. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या मँचेस्टर सिटीला चेल्सी संघाने २-१ असे पराभूत केले आणि लिवरपूल सर्वाधिक गुणांसह विजेतेपदावर liverpool-epl-champion | विराजमान झाला. गंमत म्हणजे या विजेतेपदासाठी लिवरपूलला मैदानावर उतरावेही लागले नाही. कारण मँचेस्टर सिटीचे अद्याप सात सामने बाकी आहेत. हे सर्व सामने जिंकले तरी ते लिवरपूलशी बरोबरी करू शकणार नाही. चेल्सीचे ५४ गुण आहेत. हा संघ चौथ्या स्थानावर घसरला आहे. चेल्सीपेक्षा केवळ एका गुणाने पुढे असलेला लिस्टर सिटी तिसऱ्या स्थानावर राहिला, तर चेल्सीपेक्षा पाच गुणांनी मागे असलेला मँचेस्टर युनायटेड पाचव्या स्थानावर राहिला.

लिवरपूलने अशा वेळी हे विजेतेपद मिळवलं, जेथे जगभरात क्रीडाविश्व ठप्प झालं आहे. तब्बल तीन महिन्यांपासून स्पर्धा बंद होत्या. आता ज्या स्पर्धा होत आहेत, तेथे प्रेक्षकांना बंदी आहे. स्टॅनफोर्ड ब्रिजवर जेव्हा शेवटची व्हिसल वाजली तेव्हा काही डझनावरच प्रेक्षक स्टेडियमबाहेर होते. मात्र, काही वेळातच प्रेक्षकांची संख्या शेकड्याने झाली आणि लिवरपूलच्या विजेतेपदाची आतषबाजी सुरू झाली.

लिवरपूलचा मॅनेजर जर्गेन क्लॉप यांनी सांगितले, ‘‘हा खूप मोठा क्षण आहे. आज मी खूप खूश आहे.’’

मँचेस्टर सिटीविरुद्धच्या सामन्यात चेल्सीकडून ख्रिस्तियन पुलिसिच याने ३६ व्या, तर विलियनने ७८ व्या मिनिटाला पेनल्टीवर गोल केला. ही पेनल्टीची संधीही चेल्सीला फर्नांडिन्होच्या चुकीमुळे मिळाली. त्याच्या या चुकीमुळे त्याला लाल कार्ड दाखवण्यात आले. मँचेस्टर सिटीकडून ५५ व्या मिनिटाला ब्रुएनने गोल केला. दुसऱ्या एका सामन्यात आर्सेनलने एडी निकिटिया (२० व्या मिनिटाला) आणि जो विलोक (८७ वा मिनिट) यांनी केलेल्या गोलच्या जोरावर साउथम्पटन संघाचा २-० असे पराभूत केले.

करोना महामारीमुळे तीन महिन्यांपासून ठप्प झाल्यानंतर प्रथमच १७ जून २०२० रोजी इंग्लिश प्रीमियर लीगने पुनरागमन केले. लिव्हरपूलला विजेतेपदच मिळाले नाही, तर युरोपीयन चॅम्पियनशिपमध्ये खेळण्याची संधीही मिळाली आहे. म्हणूनच लिव्हरपूलसाठी ही स्पर्धा महत्त्वाची होती. कारण तब्बल ३० वर्षांनंतर प्रथमच हा संघ विजेता झाला आहे. दुर्दैवाने विजेतेपदाची ट्रॉफी घेताना स्टेडियममध्ये प्रेक्षकांच्या टाळ्यांचा कडकडाट नव्हता.

युरोपीय चॅम्पियनशिपचं तिकीट मिळाल्याने लिवरपूल खूश नक्कीच असेल. ही स्पर्धा पुढच्या वर्षी होणार आहे.

लिव्हरपूलच्या विजेतेपदामागची कारणे


करोना महामारीमुळे मार्चमध्ये प्रीमियर लीग निलंबित करण्यात आली होती. ज्या वेळी ही स्पर्धा निलंबित करण्यात आली, त्या वेळी लिव्हरपूल आणि मँचेस्टर सिटी यांच्यात विजेतेपदासाठी लढत सुरू होती. आपला कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या मँचेस्टर सिटीपेक्षा लिव्हरपूल तब्बल २५ गुणांनी पुढे होता (आता हे अंतर अवघ्या दोन गुणांनी कमी झालं.). त्यामुळे लिव्हरपूलचे विजेतेपद जवळजवळ निश्चितच झाले होते. मात्र, ३० वर्षांपासून विजेतेपदासाठी आसुसलेल्या लिव्हरपूलला कोरोना महामारीमुळे आणखी वाट पाहण्यास भाग पाडले होते. लिव्हरपूलने दोन सामने जिंकले असल्याने मँचेस्टर सिटीचे विजेतेपद जवळजवळ धूसर झाले होते. लिव्हरपूलने पहिला सामना जिंकला आहे आणि आता मँचेस्टर सिटी अंतिम सामन्यात पराभवाच्या छायेत आहे.

लिव्हरपूलचा कर्णधार जॉर्डन हेंडरसनने १९९० मध्ये प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या याच मैदानात चॅम्पियन लीगची ट्रॉफी उंचावली होती. यंदा मात्र हे वैभव लिव्हरपूल|च्या वाट्याला आले नाही. कारण प्रेक्षकांविना स्पर्धा खेळण्याचा त्यांचा हा पहिलाच अनुभव आहे.

चॅम्पियन्स लीगचा विचार केला तर तेथे लिव्हरपूलने आपले स्थान निश्चित केले आहेच. त्यानंतर मँचेस्टर सिटी, लिसेस्टर आणि चेल्सी या संघांचा क्रम लागतो. मात्र, मँचेस्टर सिटी युरोपच्या क्लब स्तरावरील आघाडीच्या स्पर्धांमध्ये पुढच्या दोन सत्रांपर्यंत भाग घेऊ शकणार नाही. कारण ‘आर्थिक फेयर प्ले’चे उल्लंघन केल्यामुळे त्यांच्यावर स्पर्धा खेळण्यास बंदी घातली आहे. मँचेस्टर सिटीने याविरुद्ध अपील केले आहे. जर हे अपील ग्राह्य धरून निर्णय बदललाच तर ते क्लबच्या स्पर्धांमध्ये कडवे प्रतिस्पर्धी ठरू शकतील. जर सध्या हा निर्णय कायम राहिलाच तर जो संघ पाचव्या स्थानावर राहील तो चॅम्पियन्स लीगसाठी पात्र ठरेल. सध्या मँचेस्टर युनायटेड पाचव्या स्थानावर आहे. अर्थात, हे स्थान तसे डळमळीतच आहे. कारण वॉल्व्स आणि शेफिल्ड युनायटेड त्यांच्यापासून केवळ दोन गुण ते मागे आहेत. आठव्या आणि नवव्या स्थानावर असलेले टॉटेनहॅम आणि आर्सेनल संघांनाही पाचव्या स्थानावर पोहोचण्याची संधी आहे.

हिल्सबोरफ स्मारक रंगले लाल रंगात


लिवरपूलला मिळालेले इंग्लिश प्रीमियर लीगचे विजेतेपद जणू ३० वर्षांचा दुष्काळ सरला. स्टेडियमबाहेर लिव्हरपूलचे चाहते बोटावर मोजण्याइतके होते. काही जण मोबाइलवर, तर काही जण रेडिओवर निकालाच्या प्रतीक्षेत होते. तसाही लिवरपूल विजेता निश्चितच होता, पण अधिकृत घोषणेसाठी चाहत्यांनी जिवाचे कान करून रेडिओवर ऐकत होते. जेव्हा लिवरपूलला विजेता घोषित करण्यात आले, तेव्हा हिल्सबोरफ स्मारकाजवळ चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली. संपूर्ण स्मारक परिसर लाल रंगाने न्हाऊन निघाला होता. लिवरपूलचे खेळाडूही मैदानावर नव्हते. ते मँचेस्टर सिटी आणि चेल्सी संघात सुरू असलेल्या सामन्याचा आनंद घेत होते. चाहत्यांच्या चेहऱ्यावरील आनंद वर्णनातीत होता. ६१ वर्षीय चाहता फ्रान्सिस मर्फी म्हणाला, ‘‘हा क्षण खूपच वेगळा आहे. मी नेहमीच लिवरपूलचा समर्थक राहिलो आहे. विजेतेपदाविना ३० वर्षे राहणे वेदनादायी होते.’’

संघाचे मॅनेजर जुर्गेन क्लॉप म्हणाले, ‘‘माझ्या भावना मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही. मला दिलासा मिळाला आहे. मी खूश आहे. मला अभिमान आहे लिवरपूलचा.’’

घरीच जल्लोष करण्याचे आवाहन


लिवरपूल : बहुप्रतीक्षेनंतर ‘लिवरपूल’ला liverpool | विजय liverpool-epl-champion | मिळाल्यानंतर चाहत्यांचा आनंद गगनात मावत नाही. मात्र, चौकाचौकात आनंद साजरा करण्यापेक्षा चाहत्यांनी वैयक्तिक स्तरावर घरीच आनंद साजरा करावा, असे आवाहन ‘लिवरपूल’ संघाचे प्रशिक्षक जर्गेन क्लॉप Jurgen Klopp | यांनी २९ जानेवारी २०२० रोजी केले.

सुरक्षित अंतर राखून वैयक्तिक स्तरावर घरीच आनंद साजरा करणे जास्त योग्य राहील, असे क्लॉप यांनी चाहत्यांना आवाहन केले. कोरोना महामारीमुळे गर्दी करण्याचे टाळायला हवे. मात्र, असे असले तरी लिवरपूलच्या चाहत्यांनी २५ जून २०२० रोजी रात्री सिटी सेंटरवर एकत्र येऊन जल्लोष केला होता.

क्लॉप म्हणाले, ‘‘जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा आपण जल्लोष नक्की करू; मात्र सध्या जेवढे शक्य होईल तेवढे आपल्या घरीच राहा. मोठ्या संख्येने सिटी सेंटर किंवा फुटबॉल मैदानांवर जाण्याची ही वेळ नाही.’’

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!