लिस हार्टेल- एका डॅनिश महिलेची ‘घोडदौड’
1952 च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये देशाला पहिलं ऑलिम्पिक मेडल मिळवून देणारे खाशाबा जाधव भारतासाठी जेवढे गौरवास्पद आहे, तेवढीच डेन्मार्कसाठी लिस हार्टेल. लिस हार्टेलची कामगिरी समस्त महिला वर्गासाठी प्रेरणादायी होतीच, परंतु पोलिओग्रस्तांनाही प्रेरणादायी ठरली. पोलिओतून बचावल्यानंतर पॅरालिसिस झाल्यानंतरही जेव्हा लिस हार्टेल हिने घोडेस्वारीमध्ये रौप्य पदक जिंकले तेव्हा डॅनिश लोकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू ओघळले होते… तिच्या कामगिरीविषयी…
इक्वेस्ट्रियन (equestrian) हा खेळ फारसा लोकप्रिय नाही. अनेकांना तर ‘इक्वेस्ट्रियन’ म्हणजे काय, हेच माहीत नाही. मात्र, घोडेस्वारी म्हंटलं, की लगेच लक्षात येतं. पन्नासच्या दशकात घोडेस्वारी प्रतिष्ठेची बाब होती. विशेषत: पुरुषांची यावर हुकूमत. मुलीने सायकल चालवली तरी आपल्याकडे त्या वेळी कुतूहलाचा विषय होता. घोडेस्वारी तर महिलांसाठी फारच विशेष म्हणावा लागेल. अशा काळात लिस हार्टेल नावाची डॅनिश महिला घोडेस्वारी करीत होती.
पन्नासच्या दशकात एखाद्या महिलेने रस्त्यावर स्पर्धा करणंही दुरापास्त होतं, अशा काळात एक महिला ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकते ही केवढी मोठी गोष्ट! डेन्मार्कसारख्या छोट्याशा देशातील महिलेची ही कामगिरी पाहून आनंदाश्रूंचा पूरच वाहिला. कल्पना करा, की तिच्या रौप्य पदकाने डोळ्यांच्या ओलावलेल्या कडा पुसण्यासाठी असे किती टिश्यूपेपर लागले असतील! ही महिला होती लिस हार्टेल, जिची कधीही हार न मानण्याची जिद्द देशाला स्पर्शून गेली.
हेलरुपमध्ये घोडेस्वारी
लिस हार्टेल हिच्या बालपणात विशेष असं फारसं काहीही नव्हतं आणि दुर्दैवीही असं काही नव्हतं. ती कोपेनहेगनमधील हेलरुप या संपन्न उपनगरात वाढली. तिचा जन्म 1921 चा. अन्य मुलींप्रमाणेच ती आणि तिची बहीण टोव्ह या दोघींनी उमेदीची बरीच वर्षे घोड्यांसोबत घालवली. घोडेस्वारी मात्र त्यांच्या आईने शिकवलं. तसं पाहिलं तर किशोरावस्थेत अनेकांच्या आवडीनिवडी बदलतात. विशेषत: मुलं व्यापाराकडे वळतात. तारुण्यातली लिस हिचं मात्र घोड्यांप्रती प्रेम तसुभरही कमी झालं नव्हतं. पुढे ती अशा माणसाला भेटली, ज्याने तिचं घोड्यांप्रती असलेलं प्रेम ओळखलं. तिला समजून घेतलं. लिसने त्याच व्यक्तीशी वयाच्या 20 व्या वर्षी लग्न केलं. त्या वेळी तिची घोडेस्वारीमधील कारकीर्द आधीपेक्षा अधिक चांगलं होतं. 1934 पासून ती कोपेनहेगनमधील स्पोर्ट्स रायडिंग क्लबमध्ये शो जम्पिंग आणि ड्रेसेज या दोन स्पर्धांतही सहभाग नोंदवत आली.
घोडेस्वारीवरील लिसचं प्रेम इतकं, की त्यापासून तिला कोणीही विलग करू शकलं नाही. तिचं लग्न तर नाहीच नाही आणि पुढे 1942 मध्ये तिच्या पहिल्या मुलीचा- पेर्निलचा जन्म झाला, तेव्हाही नाही. लिसने 1943 मध्ये ‘ड्रेसेज’मध्ये प्रथमच डॅनिश चॅम्पियनशिप जिंकली. या पराक्रमाची 1944 मध्येही पुनरावृत्ती केली. हे डोळ्यांत भरणारं यश कमाल होतं, पण काय कोण जाणे, पण तिच्या यशाला नजर लागली. झालं काय, की 1945 मध्ये तिने दुसरं मूल- अॅन याला जन्म दिला आणि पोलिओ या जीवघेण्या आजाराने तिला घेरलं. चाळीसच्या दशकात पोलिओ आजार नवा नव्हताच. मुलांमध्ये तर सहजपणे आढळायचा. यातून लिस वाचली, पण हा पोलिओ तिला आयुष्यभराचं अपंगत्व देऊन गेला. चालणंही तिला शक्य होत नव्हतं. आता ती रायडिंगची कारकीर्द पुन्हा सुरू करू शकेल, ही शक्यता धूसर झाली होती. तिची अवस्था पाहिली, तर जवळजवळ तिची कारकीर्दच संपली, असाच निष्कर्ष सर्वांनी काढला. शरीर शरपंजरी झालं तरी तिची जिद्द, इच्छाशक्ती अफाट होती. आश्चर्य पाहा, तीन वर्षांनंतर तिने पुन्हा घोड्याचा लगाम हाती धरला.
प्रसिद्ध ट्रेनर गुन्नर अँडरसन (Gunnar Andersen) यांनी 1951 पासून हार्टेलला प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. 1952 मध्ये हेलसिंकी येथे झालेल्या ऑलिम्पिकमधील हार्टेलच्या प्रवेशाचे श्रेयदेखील याच प्रशिक्षकाला जाते. अपंग नसतानाही लिस हार्टेल इतिहास रचतच होती. या वेळी ऑलिम्पिक समितीने महिलांनाही घोडेस्वारी स्पर्धेत प्रवेश देण्याचा निर्णय घेतला होता. 1952 ची हेलसिंकी ऑलिम्पिक ही पहिलीच स्पर्धा होती, ज्यात महिला प्रतिनिधित्व करणार होत्या.
घोडेस्वारी हा पूर्वी अधिकारी आणि सज्जनांसाठीच मर्यादित होता. आता मात्रा या श्रेणीत पुरुष आणि महिलांना एकमेकांच्या बरोबरीने स्पर्धा करण्याची संधी मिळाली होती. हार्टेलने ऑलिम्पिकमध्ये तिच्या ज्युबिली घोडीवर मिळवलेले दुसरे स्थान ही घटनाच मुळी सनसनाटी होती. भलेही ती दुसरी आली, तरी डेन्मार्कच्या प्रत्येक नागरिकाच्या हृदयात तिने पहिले स्थान मिळविले होते.
1952 ची ऑलिम्पिकमधील पदक हा सर्वोच्च बिंदू असला तरी लिस हार्टेलची कारकीर्द मात्र संपलेली नव्हती. 1956 च्या ऑलिम्पिकमध्ये पुन्हा तिने रौप्य पदकावर मोहोर उमटवली. या वेळीही तिला ज्युबिलीने साथ दिली. या ज्युबिलीने लिस हार्टेलला 1952 आणि 1954 आणि पुन्हा 1956 मध्ये सलग तीन डॅनिश चॅम्पियनशिपमध्ये विजेतेपद मिळवून देण्यास मदत केली.
लिस हार्टेलने पुढे एक दशक ‘घोडदौड’ सुरूच ठेवली. अर्थात, तिच्या कामगिरीचा स्तर नंतर हळूहळू खालावत गेला. लिस हार्टेलने स्पर्धात्मक सहभाग बंद केल्यानंतर तरुणांना प्रशिक्षण देणे सुरू केले. तिच्याच मार्गदर्शनाखाली निल्स हागेन्सन (Nils Haagensen) यांच्यासारखे घोडेस्वार तयार झाले. मात्र, 2000 च्या सिडनी ऑलिम्पिकनंतर त्याला दुखापतीमुळे जायबंदी केले.
स्पर्धात्मक खेळांच्याही पलीकडे हार्टेलच्या यशाचा अर्थ पोलिओतून वाचलेल्यांसाठी खूप मोठा आहे. पोलिओ फाउंडेशनच्या माध्यमातून तिने जगभर सार्वजनिकपणे भूमिका मांडली. हॉलंडमध्ये अपंगांसाठी असलेल्या रायडिंग स्कूलला तिच्या सन्मानार्थ नाव देण्यात आले आहे. 1994 मध्ये, ती आंतरराष्ट्रीय महिला क्रीडा हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट होणारी पहिली स्कँडिनेव्हियन महिला होती. 2009 मध्ये वयाच्या 87 व्या वर्षी लिस हार्टेलने जगाचा निरोप घेतला.
पॅरालिम्पिकमध्ये विश्वविक्रम रचत जाझरियाने मिळविले भारतीय संघात स्थान
[jnews_block_9 first_title=”Read more at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”103″]