कोहली, गंभीर… शब्दाला शब्द शब्दन् शब्द!
गौतम गंभीर हा विराट कोहली याच्या पुढ्यात येतो आणि कोहलीला म्हणतो.. “काय बोलतोय बोल…”
विराट कोहली : मी तुम्हाला काही बोललोच नाही… तुम्ही मधे का घुसताय?
गंभीर : तू जर माझ्या खेळाडूला बोलला, म्हणजे माझ्या कुटुंबाला शिवी दिलीस.
विराट कोहली : मग तुम्ही तुमच्या कुटुंबाला सांभाळा!
गंभीर : मग आता तू मला शिकवशील.
ज्यांनी प्रत्यक्ष ऐकलं, ते असं होतं. मात्र, हे असंच घडलं होतं का, याबाबत मी दावा करू शकत नाही. कारण अद्याप अधिकृतपणे वादाचे नेमके संवाद समोर आलेले नाहीत.
मात्र, हा वाद पाहिल्यानंतर विराट कोहली, गौतम गंभीर, पैसा, ग्लॅमर, अहंकार हे सगळे समानार्थी शब्द वाटायला लागले आहेत. शब्दाला शब्द शब्दन् शब्द वाढत गेले. आयपीएल आणि वाद समीकरण पुन्हा एकदा दृढ झालं.
मुळातच इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) पैसा, ग्लॅमरचं माहेरघर. या वादाची सुरुवात अर्थातच 1 मे 2024 रोजी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील लढतीतून झाली. साहेबांचा खेळ म्हणून ज्या क्रिकेटचं नाव घेतलं जातं, त्याला विराट कोहली-गौतम गंभीरच्या वादाने गालबोट लागलं. हा वाद कोहली आणि नवीन-उल-हक यांच्यातील वादातून भडकला. खरं तर आताच हा वाद झाला असं नाही. यापूर्वीही या दोघांमध्ये वाद झाले होते.
या वेळी मात्र विराट कोहली आणि नवीन उल-हक दोघेही तापले होते. सामना संपला की मैदानातला वादही संपुष्टात येतो, असा अलिखित संकेत आहे. इथं मात्र तसं घडलं नाही. लढत संपल्यानंतर विराट कोहली आणि गौतम गंभीर दोघे आमनेसामने आले.
बेंगळुरू जिंकल्यानंतर विराट आक्रमक
वाजपेयी स्टेडियममध्ये 1 मे 2024 रोजी बेंगळुरू-लखनौ संघ आमनेसामने आले. यात बेंगळुरूचा खंदा फलंदाज विराट कोहली अधिक आक्रमक झाला होता. कारण लखनौने बेंगळुरूला मागील लढतीत त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत केले होते. त्याचा वचपा बेंगळुरूने या वेळी काढला. बेंगळुरूने ही लढत 18 धावांनी जिंकली. या लढतीला पावसाचाही फटका बसला. बेंगळुरूने प्रथम फलंदाजी करताना 9 बाद 126 धावा केल्या होत्या. लक्ष्याचा पाठलाग करताना लखनौचा डाव 19.5 षटकांत 108 धावांत आटोपला. या वादाची पहिली ठिणगी पडली कोहली आणि लखनौचा गोलंदाज नवीन यांच्यातील शाब्दिक चकमकीने. त्याचे पर्यवसान कोहली आणि लखनौ संघाचा मेन्टॉर गौतम गंभीरच्या वादात झाले.
काय होते वादाचे मुख्य कारण?
- लखनौची फलंदाजी सुरू होती. डावाचे चौथे षटक होते. ग्लेन मॅक्सवेलच्या गोलंदाजीवर कृणाल पंड्याने लाँगऑफला चेंडू टोलविला. मात्र हा हवेतला चेंडू विराट कोहलीच्या हातात विसावला. हा आनंद कोहलीने दणक्यात साजरा केला. त्याने छातीवर हात मारला आणि ओठांवर बोट ठेवून लोकांना शांत राहण्यास सांगितलं.
- 16 व्या षटकात कोहली धावत आला आणि त्याने दहाव्या क्रमांकाचा फलंदाज नवीन-उल-हक याच्याकडे बघून काही तरी इशारा केला. यामुळे नवीनही कोहलीच्या दिशेने आला. दोघांमध्ये शाब्दिक चकमक झडली. या वेळी पंच आणि दुसऱ्या बाजूने फलंदाजी करणारा अमित मिश्रा यांनी मध्यस्थी केली. यानंतर कोहलीने बुटांना लागलेली माती काढली आणि बुटांकडे इशाराही केला.
- लढत संपल्यानंतर लखनौ आणि बेंगळुरूचे खेळाडू एकमेकांशी हस्तांदोलन करीत होते. त्या वेळी कोहलीने नवीनशीही हात मिळवला. त्या वेळी दोघांमध्ये पुन्हा शाब्दिक युद्ध रंगले. यानंतर नवीनने कोहलीचा हात झटकला. त्यामुळे कोहली चिडला. कोहलीने पुन्हा त्याला सुनावले.
- यानंतर कोहली मैदानातून येत असताना त्याचा लखनौच्या काइल मेयर्ससोबत संवाद सुरू होता. तेथे गौतम गंभीर आला आणि तो मेयर्सचा हात हातात घेऊन त्याला ओढून घेऊन गेला. गंभीरचं हे कृत्य अशोभनीयच होतं. या वेळी गंभीर आणि कोहली एकमेकांविरुद्ध काही तरी पुटपुटले. यातून दोघांमध्ये पुन्हा शाब्दिक वाद झाला.
- कोहली त्या वेळी काय बोलला, हे कळले नाही; पण त्यामुळे गंभीरचा पारा चढला. तो कोहलीच्या दिशेने जाऊ लागला. लखनौच्या खेळाडूंनी गंभीरला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, गंभीर काही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. दुसरीकडे कोहलीही शांत बसणारा नव्हता. त्यालाही बेंगळुरूचा कर्णधार फाफ डुप्लेसिससह इतरांनी रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, गंभीर-कोहली आमनेसामने आलेच. या वेळी दोघांमध्ये चांगलाच वाद रंगला. सुरुवातीला कोहलीने गंभीरच्या खांद्यावर हात ठेवून त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. तेव्हाही अमित मिश्राने मध्यस्थी करून दोघांना बाजूला केले.
यानंतर कोहली आणि लोकेश राहुल यांच्यात दीर्घ चर्चा झाली. त्या वेळीही नवीन तेथे आला होता. तो रागातच होता.
सुरुवात गंभीरकडून?
या वादाचे मूळ 10 एप्रिल 2024 रोजी बेंगळुरूत लखनौ आणि बेंगळुरूदरम्यान झालेल्या लढतीमध्ये दडल्याचे म्हटले जात आहे. एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये ही लढत झाली होती. त्या वेळी बेंगळुरूने 2 बाद 212 धावा केल्या होत्या. लखनौने हे लक्ष्य अखेरच्या चेंडूवर नऊ विकेट गमावून साध्य केले होते. त्या वेळी विजयानंतर लखनौ संघाचा मेन्टॉर गंभीरने तोंडावर बोट ठेवून बेंगळुरूच्या चाहत्यांना शांत राहण्याचा इशारा केला होता. त्याचेच प्रत्युत्तर कोहलीने एक मे 2024 रोजी लखनौत झालेल्या लढतीत दिले. त्या पराभवाची परतफेड बेंगळुरूने केल्याचा आनंदही कोहली व्यक्त करीत होता.
यापूर्वीही कोहली-गंभीर यांच्यामध्ये वाद
34 वर्षीय कोहली आणि 41 वर्षीय गंभीर दोन्हीही दिल्लीचे. स्वभावाने तापट. आरेला कारे करणारे. 2013 च्या आयपीएल मोसमातही कोहली-गंभीर यांच्यात मैदानातच तू-तू मैं-मैं झाली होती. त्या वेळी कोहली बेंगळुरूकडूनच खेळत होता, तर गंभीर कोलकात्याचा कर्णधार होता.
नवीन उल-हक हाही वादग्रस्त
23 वर्षीय नवीन अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज. त्याने सात वन-डेत 14, तर 27 आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांत 34 विकेट घेतल्या आहेत. आयपीएलमध्ये चार सामन्यांत त्याने सात विकेट घेतल्या आहेत. अनेक लीगमध्ये तो खेळला आहे. यापूर्वी लंका प्रीमियर लीगमध्ये त्याने शाहीद आफ्रिदीशीही वाद घातला होता. महंमद आमीरसोबतही त्याचे भांडण झाले आहे.
कोहली, गंभीर दोघांवर दंडात्मक कारवाई
वाद घालणारे कोहली, नवीन आणि गंभीर या तिघांनाही शिक्षेला सामोरे जावे लागणारच होते. अर्थात, फक्त दंडात्मक कारवाई झाली. या तिघांनी आयपीएलच्या नियम 2.21 चा भंग केला आहे. सार्वजनिक गैरवर्तन, अनियंत्रित सार्वजनिक वर्तन आणि खेळाच्या हितासाठी हानिकारक अयोग्य शेरेबाजी असे आरोप या खेळाडूंवर लावण्यात आले होते. यानुसार नवीनच्या सामन्याच्या मानधनातून ५० टक्के रक्कम कापली जाणार आहे. मात्र, गौतम गंभीर आणि विराट कोहलीच्या मानधनातून शंभर टक्के रक्कम कापण्यात येणार आहे. तिघांनीही आपली चूक मान्य केली आहे.
[jnews_element_embedplaylist playlist=”https://www.youtube.com/watch?v=8gMt9QYX8aI” column_width=”4″] [jnews_element_embedplaylist playlist=”https://www.youtube.com/watch?v=YHK5TOvwSoQ” column_width=”4″]खेळाशी भावना जुळलेल्या असतात. मात्र, मैदानावर तुम्ही अशा पद्धतीने आपल्या भावना व्यक्त करू शकत नाहीत. एकमेकांमध्ये सुसंवाद असावा. मात्र, जे काही मैदानात झाले, ते अजिबात पटणारे नाही. कारण काहीही असो, तुम्ही प्रतिस्पर्धी आणि खेळाचा आदर केला पाहिजे. कदाचित काही तरी वैयक्तिक कारण असू शकेल. मला माहिती नाही; पण गौतम गंभीर, विराट कोहली आणि इतर ज्या पद्धतीने मैदानात वागले, ते काही बरे नाही.
– अनिल कुंबळे
एखादी टिप्पणी केल्यावर त्याच्या प्रत्युत्तरास सामोरे जाण्याची तयारी असावीच लागते, ती नसेल, तर शेरेबाजी करू नका.
– विराट कोहली (संघाच्या बैठकीत बोलताना)
बाप होण्यापूर्वी कोहलीला मेरी कोमकडून हे शिकायचंय… | Virat Kohli Instagram chat with Mary Kom
[jnews_block_9 first_title=”Read more at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ header_filter_category=”71,65,87″ header_filter_author=”1″]