कपिलदेव यांच्यावर अँजिओप्लास्टी | Kapil Dev suffered a heart attack
कपिलदेव यांच्यावर अँजिओप्लास्टी
24 ऑक्टोबर 2020 |
भारताला पहिला विश्वकरंडक जिंकून देणारे कर्णधार कपिलदेव यांना 22 ऑक्टोबर 2020 रोजी हृदयविकाराचा झटका आला. त्यांच्यावर शुक्रवारी, 23 ऑक्टोबर रोजी अँजिओप्लास्टी करण्यात आली. दोन दिवसांत त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज केले जाण्याची शक्यता आहे.
Kapil Dev suffered a heart attack | ही माहिती कपिलदेव यांनीच इन्स्टाग्रामवर दिली. इन्स्टाग्रामवर त्यांनी नमूद केले, की ‘आता प्रकृतीत सुधारणा होत आहे.’’
‘हरियाणा हरिकेन’ नावाने प्रसिद्ध असलेले कपिलदेव भारतीय प्रादेशिक सेनेचे लेफ्टनंट कर्नलही आहेत.
दिल्लीतील सुंदरनगरात राहणारे कपिलदेन (वय 61) यांना गुरुवारी, 22 ऑक्टोबर रोजी हृदयात वेदना होत असल्याने ओखला येथील फोर्टिस एस्कॉर्ट्स हार्ट इन्स्टिट्यूटच्या आपत्कालीन विभागात दाखल करण्यात आले.
रुग्णालयानेही सुरुवातीला कपिलदेव यांच्या हृदयात वेदना होत असल्याचेच नमूद केले होते. मात्र, निदान झाल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे समोर आले. त्यांची तपासणी केल्यानंतर 22 ऑक्टोबरच्या रात्री त्यांच्यावर कोरोनरी अँजिओप्लास्टी करण्यात आली.
‘‘मोठ्या मनाचा आहे आमचा कर्णधार. त्याने कधीही हार मानली नाही. लवकरच तो यातून बरा होईल. भारतीय क्रिकेटमधील या महान खेळाडूला काहीच अशक्य नाही. कपिल माझा परममित्र आणि चांगला माणूस आहे. लवकरच आपण सोबत भोजन करू.’’ – कीर्ती आझाद
सध्या ते डॉ. अतुल माथूर आणि त्यांच्या टीमच्या देखरेखीखाली आयसीयूत आहेत. आता त्यांच्या प्रकृती स्थिर आहे. त्यांना दोन दिवसांत रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
Kapil Dev suffered a heart attack |
हृदयातील धमन्या ब्लॉक झाल्यानंतर अँजिओप्लास्टी केली जाते. त्यामुळे हृदयाचा रक्तप्रवाह सुरळीत होतो.
कपिलदेव यांना हृदयविकार झाल्याचे समजताच चाहत्यांनी त्यांच्या उत्तम स्वास्थ्यासाठी प्रार्थना केली. अनेकांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर काळजीही व्यक्त केली. त्यावर कपिलदेव यांनीही दिलासा देत प्रकृतीत सुधारणा होत असल्याची पोस्ट केली.
सोशल मीडियावर अनेकांनी त्यांच्या उत्तम स्वास्थ्याची प्रार्थना केली. यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि सचिन तेंडुलकरसह अनेक खेळाडूंचा समावेश आहे.
तेंडुलकर म्हणाले, ‘‘काळजी घ्या. तुम्ही लवकरच यातून बाहेर याल, अशी प्रार्थना करतो.’’
कोहलीने ट्वीट केले, ‘‘पाजी, तुम्ही लवकरच बरे व्हाल’’
शिखर धवन, कपिलदेवचे सहकारी मदनलाल या सर्वांनी त्यांच्या स्वास्थ्याची प्रार्थना केली.
भारतीय संघाचे माजी कर्णधार कपिलदेव यांनी 131 कसोटी आणि 225 वन-डे सामने खेळले आहेत.
कपिलदेव क्रिकेटच्या इतिहासातील एकमेव क्रिकेटपटू आहेत, ज्यांनी 400 पेक्षा जास्त विकेट (434) घेत कसोटी सामन्यांत 5000 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत.
कपिलदेव 1999 आणि 2000 मध्ये भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षकही होते. त्यांना 2010 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या हॉल ऑफ फेममध्येही समाविष्ट करण्यात आले होते.
युवराजसिंग म्हणाला, ‘‘पाजी, तुम्ही लवकर बरे व्हाल, अशी प्रार्थना करतो. तुम्ही लवकर बरे व्हा. क्रिकेटनंतर मला आता तुमच्याकडून गोल्फचं काही कौशल्य शिकण्याची गरज आहे.’’
[jnews_block_8 first_title=”Read more at :” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”65″] [jnews_block_24 first_title=”Read more at : ” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”87″]