काचुर्ली जंगल पाहिलंय का?
काचुर्ली जंगल कुणी पाहिलंय का, आम्ही पाहिलंय. काय सुरेख नजारा…! अहाहा!! एकदा तरी तुम्ही अशा निसर्गरम्य ठिकाणाला अवश्य भेट द्यायला हवी. मित्रांसोबत नाही तर किमान कुटुंबासोबत तरी…
काचुर्ली गावातलं निसर्गमयी जगणं कमाल होतं. भलेही ते एक दिवसाचं का असेना… आता हे काचुर्ली काय, हे बऱ्याच जणांना कळणार नाही, पण ज्यांना माहीत नाही, त्यांच्यासाठी हा ब्लॉग प्रपंच. नाशिकपासून 45 किलोमीटरवर, तर त्र्यंबकेश्वरपासून अवघ्या पाच किलोमीटरवर काचुर्ली हे निसर्गरम्य आदिवासी गाव आहे. एरवी मी मित्रांसमवेत ट्रेकचा आनंद लुटला आहे. यंदा मात्र 2 डिसेंबर 2023 रोजी आम्ही कुटुंबासह जंगल ट्रिप आयोजित केली. खरं तर आमच्या नियोजनात फक्त फिरणं होतं. कुठे तरी एक दिवस सर्व नातेवाइकांनी एकत्र यायचं आणि तो दिवस मनसोक्त गप्पागोष्टी करीत आनंदात घालवायचा. सगळी नातेवाईक मंडळी मुंबई, पुणे, नाशिक अशी विखुरलेली. या सर्वांना एकत्र यायचं आणि त्यात तारखेवर एकमत होणं मोठं दिव्यच होतं. तरीही आम्ही 2 डिसेंबर 2023 ही तारखी तीन महिन्यांपूर्वीच निश्चित केली.
आता आमच्यासमोर दोन प्रश्न होते. एक तर किती जण येणार? आणि दुसरं म्हणजे फिरायला जायचं कुठं?
काका, मावशी, मामा, त्यांची मुलं, बायकापोरं असा सगळा हिशेब केला तर 40 ते 50 जण एकत्र येतील असा आमचा अंदाज होता. तारीख जवळ येईपर्यंत कोणताही निश्चित आकडा आमच्या हाती येत नव्हता. मात्र, जायचं तर 2 व 3 डिसेंबर रोजीच हे मात्र नक्की होतं. तत्पूर्वी आम्ही स्थळ शोधू लागलो. त्र्यंबकेश्वर, इगतपुरीजवळची ठिकाणं शोधली. आम्हाला कुठेही 40-50 जणांसाठी मोठा फार्महाउस सापडेना. सापडला तरी राहण्याची व्यवस्था पुरेशी नाही. आता एकच पर्याय होता, तो म्हणजे तंबूचा. काचुर्ली येथे ही व्यवस्था होणार होती. तेथे 100 तंबूंची व्यवस्था होती. आम्हाला एवढ्या तंबूंची गरज नव्हती. मात्र, राहण्याचा प्रश्न सुटला. निसर्गरम्य परिसर आणि जवळच तलाव आणि सभोवताली जंगल. ते पाहताक्षणी आमची उत्स्फूर्त प्रतिक्रिया…. काय झाडी, काय डोंगार, एकदम ओके.
झालं. ठिकाण तर निश्चित झालं. जे जे येणार त्यांचा ग्रुप तयार केला आणि प्रत्यक्ष ट्रिपच्या तारखेला 35 जणांनी हजेरी लावली. दुर्गराज निसर्गमयी कॅम्पने आमची छान बडदास्त ठेवली. आल्यापासून धम्माल सुरू होती. आम्ही सर्व एकमेकांचे नातेवाईक असलो तरी काही जण एकमेकांना प्रथमच पाहत होती. अरे ही तर पुतणी, हा तर भाचा, तू काय करतो, करते वगैरे गप्पागोष्टी झाल्या. धम्माल तर पुढे होती. सायंकाळ झाली, अंधार दाटू लागला. तंबू लागले आणि निसर्गाच्या सान्निध्यात राहताना काय काळजी घ्यायची याबाबत दुर्गराज निसर्गमयी संस्थेने सूचना केल्या.
तोपर्यंत आम्ही चहा घेऊन एकत्र जमलो होतो. संस्थेचे उगले यांनी सांगितलं, हा संपूर्ण परिसर निसर्गमयी आहे. इथे प्रदूषण झीरो आहे. इथे बिबट्यासह अनेक पशुपक्ष्यांचा मुक्त वावर आहे. त्यामुळे कुठेही काहीही खाऊ नये, अन्न कुठेही टाकू नये. आताच तुम्ही चहा घेतला आणि बिस्किटे, चहाचे कप तेथेच सोडले. त्यामुळे होईल काय, की बिस्कीट खाण्यासाठी एकेक कीटक येऊ लागेल, त्याच्यामागे त्या कीटकाला खाणारे साप येतील, बिबट्या येईल. एकूणच काय, तर तुम्ही टाकलेल्या अन्नामुळे एक अन्नसाखळी तयार होईल.
सगळ्यांच्या भुवया उंचावल्या. आता रात्री बिबट्या येतो की काय…!! तंबूत झोपायचं की नाही आता…? अनेकांच्या मनात अनेक प्रश्नांचं मोहोळ तयार झालं.
अर्थात, काचुर्लीमध्ये आम्ही जेथे थांबलो तेथे बिबट्याचा वावर 10-12 वर्षांत आढळलेला नाही. मात्र, तो येणारच नाही असंही अजिबात नाही. असो. दुपारी मनसोक्त क्रिकेट खेळलो. रात्री कॅम्प फायर करीत गप्पागोष्टी रंगल्या. गाण्यांच्या भेंड्या झाल्या. रात्री एक वाजला तरी समजलं नाही. आम्हाला रात्री प्राणी पाहायला जंगलात जायचं होतं. रात्री दीडच्या सुमारास आम्ही पाच-दहा जण जंगलाकडे निघालो. अर्थात, सोबत आदिवासी तरुण होता. तो आम्हाला निबीड जंगलात घेऊन गेला. रात्रीच्या किर्रर्र अंधारात आम्हाला टॉर्चच्या प्रकाशात वाट धुंडाळत निघालो. खाली पाहून चालायचं आणि आवाज करायचा नाही, या दोन सूचना प्रकर्षाने पाळायला लावल्या. प्रत्येकाच्या मनात भीती…. साप दिसला तर, बिबट्याने हल्ला केला तर…
सुदैवाने यापैकी काही घडलं नाही. कारण एकही प्राणी आम्हाला दिसला नाही. तो आदिवासी तरुण जंगलाच्या मध्यात आल्यावर आम्हाला एका जागेवर थांबायला सांगितलं. तो सावकाशपणे पावलं टाकत पुढे गेला. त्याने टॉर्चचा प्रकाशझोत सोडला. त्याला काय दिसलं किंवा नाही माहीत नाही. माघारी फिरत आमच्याकडे आला नि म्हणाला, इकडं आता एकही प्राणी दिसत नाही. फक्त जंगली ससा दिसला.
आमचा भ्रमनिरास. च्यामारी! आपल्याला काहीच दिसलं नाही. मग आम्ही किर्रर्र अंधारातून तलावाकडे आलो. तिथं रात्रीच्या अंधारातलं जंगल न्याहाळलं. कमालीचं भीतिदायक होतं. आम्ही एकमेकांसोबत होतो म्हणून फार भीती वाटली नाही. आम्ही सर्व जण पुन्हा तंबूकडे परतलो. आम्हाला सगळे उत्सुकतेने विचारू लागले, काही दिसलं का
आम्ही म्हंटलो, नाही… पण एकदम नाही कसं म्हणायचं, मग आम्ही सांगितलं, आम्हाला एक जंगली ससा दिसला.
पण सगळ्यांना भारी वाटलं. कारण एवढ्या किर्रर्र अंधारात ही सगळी मंडळी जाऊन आली, याचं त्यांना भयंकर अप्रूप वाटलं.
असो, हा सगळा आनंद शब्दांमध्ये सांगता येणार नाही, पण आम्ही छायाचित्रे टिपली आहेत. या छायाचित्रांतून तुम्हाला निसर्गरम्य काचुर्ली पाहता येईल.
छायाचित्रांतून काचुर्लीचं जंगल परिसर कसा वाटला, हे नक्की कळवा…
काचुर्ली गावातलं हे दाट जंगल. इथं दरी आहे… पावसाळ्यात तर इथं फिरणं कमालीचं भारी वाटत असेल. मात्र, या जंगलात फिरताना काळजीही तेवढीच घ्यावी लागते.
हा देखणा निसर्ग एका दिवसात कवेत घेताच येणार नाही. आम्ही ही सर्व छायाचित्रे कॅमेऱ्यात आधाशासारखे बंदिस्त करीत होतो. हिरवीगार झाडी, डोंगर कमालच. हिरव्या रंगाच्या छटाही किती तरी..! फिकट हिरवा, गर्द हिरवा, पिवळसर हिरवा.
काचुर्ली जंगलातली ही नदी. सध्या नदीला पाणी नाही. मात्र, एकदमच कोरडीठाक नव्हती. छोटी छोटी डबकी पाण्याने भरलेली होती. फारसा मानवी हस्तक्षेप नसल्याने त्या डबक्यातलं पाणीही नितळगार दिसत होतं.
नदी परिसरातले खडक काळेभोर होते. अगदी दगडी कोळशासारखे. नदीतले हे काळेभोर खडक काचुर्ली गावात इतरत्रही आढळतात. खडकावर बसून फोटोग्राफी करायला कोणाला नाही आवडणार..?
काचुर्ली परिसरातील जंगल सफारीचे हे काही क्षण नि छटा.
काचुर्ली जंगलातल्या नदीकडे जाण्यासाठी निसरडा झालेला रस्ता. प्रचंड झाडाझुडपांतून पायवाटेने खाली उतरत नदीकडे येणे तसे अवघडच. मात्र, तरीही या अवघड वाटेने नदीपर्यंत जाण्याचा आनंद काही औरच.
गर्द झाडीत आमची टोळी खाली पोहोचलेल्या दुसऱ्या टोळीला आनंदाने इशारे करताना.
जंगल सफारीला निघालेले एक पथक, दुसऱ्या छायाचित्रात चिमुकल्यांनी गावाकडचा टायरातल्या झोक्याचा आनंद लुटला, तर तिसऱ्या छायाचित्रात निसर्गाचा साक्षात्कार झाल्यानंतर अशी तंद्री लागते. या नाना छटा शहरातल्या सिमेंटच्या जंगलात अजिबात पाहायला मिळणार नाही.
हा नदीजवळचा नजारा. सगळ्यांनी इथे काही क्षण विसावा घेतला. कुठेही कचरा नाही. होता फक्त पालापाचोळा आणि निसर्गमयी वातावरण.
निसर्गातला वावर कसा मिस करणार…! एक तो फोटो बनता है ना भाई..
काचुर्ली जंगल परिसरातील आमच्या राहुट्या. अर्थात तंबू. एकूण 25 तंबूंमध्ये आमचा मुक्काम होता. सर्व तंबू बंदिस्त होते. त्यामुळे आत डास, चिलटे नाही की थंडी नाही. भारीच होतं.
गावाकडचा हा आनंद आम्हा शहरी माणसांना अजिबात मिळत नाही. मग काय, लहान-मोठे सर्वांनीच हा आनंद मनसोक्त लुटला.
So Beautiful, So Elegant Looking Like a Wow… निसर्गाचा आनंद लुटताना यापलीकडे दुसरे शब्द नाहीत.
ही आम्हा नातेवाइकांची टोळी. डावीकडून मेधावी, अभिजित तुपे, आदित्य घुगे, रिचू (हरीश) तुपे व त्याची पत्नी, हितेंद्र सौंदाणकर, अक्षता निरगुडकर, ऋतुजा माने, माधुरी सौंदाणकर, अॅड नलिनी जठार, रोहिणी तुपे, प्राजक्ता तुपे, अपूर्वा प्रसाद जठार, निवृत्त मुख्याध्यापिका मीनाक्षी तुपे, निवृत्त शिक्षिका शैलजा सौंदाणकर, सुषमा माने, मंजूषा माने, सुचिता तुपे, पुतणी, पुतण्या, स्वप्नील तुपे, गणेश तुपे, विनोद सूर्यवंशी, योगेंद्र सौंदाणकर, ओम तुपे, महेश पठाडे, खुर्चीवर बसलेले- निवृत्त मुख्याध्यापक अरुण तुपे, डॉ. प्रल्हाद जठार.
जंगलातला कॅम्प फायर. रात्री उत्तरोत्तर काय गप्पा रंगल्या…! शेकोटीच्या उबेपेक्षाही कौटुंबिक प्रेमाची ऊब अधिक अनुभवली.
[jnews_block_9 first_title=”Read more at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”1640″]
खुप छान
सुंदर वर्णन केलस महेश