ज्युडिट पोल्गारची पुरुषी मानसिकतेविरुद्ध ‘चाल’!
महिला ग्रँडमास्टरचा बहुमान रद्द करा,हंगेरीची ग्रँडमास्टर ज्युडिट पोल्गारची मागणी

ज्युडिट पोल्गारची पुरुषी मानसिकतेविरुद्ध ‘चाल’!
महिला ग्रँडमास्टरचा बहुमान रद्द करण्याची मागणी हंगेरीची ग्रँडमास्टर ज्युडिट पोल्गार हिने केली. बुद्धिबळात महिला-पुरुष भेद कशासाठी, असा प्रश्न ती त्वेशाने मांडते. ज्युडिट पोल्गारची पटावरील लिंगसमानतेची ‘चाल’ कुणाला बुचकळ्यात टाकणारी आहे, यावर टाकलेला प्रकाश.
सात वर्षीय मुलगा आणि मुलगी दोघे एका प्रशिक्षकाकडे बुद्धिबळ शिकत असतात. दोन्ही खेळाडू प्रतिभावान. मात्र, फरक बघा. प्रशिक्षक जेव्हा मुलाला प्रोत्साहन देताना म्हणतो, “एक दिवस तू मॅग्नस कार्लसनसारखा विश्वविजेता होशील.” आणि मुलीला प्रोत्साहन देताना म्हणतो, ‘तू एक दिवस महिलांमध्ये विश्वविजेती होशील.” याच मानसिकतेवर ती प्रहार करते आणि म्हणते, बुद्धिबळात महिला ग्रँडमास्टरचा बहुमानच बंद करा!
बुद्धिबळातल्या महिला-पुरुष भेदावर प्रहार करणारी ही महिला आहे हंगेरीची ग्रँडमास्टर ज्युडिट पोल्गार. ती म्हणते, जर बुद्धिबळ हा बुद्धीचा खेळ आहे, तर महिला-पुरुष भेद कशाला? बंद करा महिला ग्रँडमास्टरच्या पदव्या, महिला विभागाच्या स्पर्धा! तरच महिलांना दर्जा सुधारता येईल. बुद्धिबळात एकच ग्रँडमास्टरची पदवी असावी, जी पुरुष आणि महिलांसाठी समान असेल. हाच धागा पकडत भारताची ग्रँडमास्टर आर. वैशाली हिनेही महिला ग्रँडमास्टरची पदवी नकोच, अशी मागणी बुद्धिबळ महासंघाकडे केली. मात्र, बुद्धिबळ महासंघाने नुकतीच ही मागणी फेटाळली. त्यांच्या मते, महिला खेळाडूंची संख्या आणि पुरुषांच्या तुलनेत त्यांची गुणवत्ता यांची आकडेवारी पाहता महिला विभागातल्या स्पर्धा रद्द करता येणर नाहीत. केवळ मते आणि तर्कावर कोणताही निर्णय घेता येत नाही. आकडे काय सांगतात, याला जास्त महत्त्व आहे. मात्र, महिलांना पुरुषांच्या स्पर्धांत खेळण्याचीही मुभा आहे, असेही बुद्धिबळ महासंघाने स्पष्ट केले.
बुद्धिबळात महिला क्रांतीची ठिणगी
एकूणच बुद्धिबळात क्रांतीची एक ठिणगी पडली आहे आणि ही ठिणगी टाकलीय हंगेरीची ग्रँडमास्टर ज्युडिट पोल्गार हिने. पटावर अतिशय निष्ठूरपणे आक्रमणे रचणारी हंगेरीची ग्रँडमास्टर ज्युडिट पोल्गार बुद्धिबळाच्या इतिहासातली सर्वांत लोकप्रिय खेळाडू. १९८९ ते २०१५ दरम्यानच्या आपल्या २६ वर्षांच्या कारकिर्दीत ज्युडिट जगातील अव्वल आठ खेळाडूंपैकी एक होती. तिला आजही सर्वोत्तम महिला खेळाडू म्हणून ओळखले जाते. गॅरी कास्पारोव, अनातोली कारपोव, बोरिस स्पास्की, विश्वनाथन आनंद एवढेच नाही, तर सध्याचा अव्वल मानांकित मॅग्नस कार्लसन अशा ११ विश्वविजेत्यांना तिने पराभूत केले आहे.
पुरुषी वर्चस्वाला सुरुंग लावणाऱ्या पोल्गार भगिनी
ज्युडिट यहुदी कुटुंबातली. दुसऱ्या महायुद्धात यहुद्यांवर अनन्वित अत्याचार झाले. पोल्गार कुटुंबातील अनेक सदस्य होलोकॉस्ट छळछावणीत मृत्युमुखी पडले. सुदैवाने ऑश्वित्झ छळछावणीतून तिचे आजी-आजोबा वाचले. ते जर वाचले नसते तर पोल्गार कुटुंबातील बुद्धिबळकौशल्य जगासमोर आलंही नसतं. यहुदी-हंगेरियन कुटुंबातलं ज्युडिट हे तिसरं अपत्य. दान्यूब नदीकाठावरील हंगेरीची राजधानी बुडापेस्टमध्ये २३ जुलै १९७६ रोजी तिचा जन्म झाला. ज्युडिट घरात शेंडेफळ. तिला दोन बहिणी. थोरली बहीण सुसान आणि मधली सोफिया. सुसान ग्रँडमास्टर, तर सोफिया आंतरराष्ट्रीय मास्टर. दोघीही बहिणी पुरुषांमध्येच खेळल्या.
आईवडिलांनी घडवल्या जीनिअस पोल्गार भगिनी
बहिणींचाच कित्ता गिरवत ज्युडिटनेही बुद्धिबळात लौकिक मिळवला. तिन्ही बहिणींच्या यशाकडे पाहून अनेकांची आपसूकच प्रतिक्रिया असायची, या पोरी जन्मजातच हुशार! पण त्यांचे वडील लाझ्लो पोल्गार यांचं मत वेगळं होतं. ते म्हणतात, ‘जन्मजात काही नसतं. जीनिअस घडवावे लागतात.” वडील लाझ्लो आणि आई क्लारा दोघेही उच्चविद्याविभूषित असल्याने ते प्रयोगशील होते. त्यांनी तिन्ही मुलींना बुद्धिबळच नाही, तर ‘एस्पीरांटो’ ही जगात मोठ्या प्रमाणावर बोलली जाणारी भाषा शिकवली, त्याचबरोबर अगदी लहान वयात त्यांना शिक्षणाबरोबरच बुद्धिबळही शिकवलं. विशेष म्हणजे ७० च्या दशकात होम स्कूलिंग म्हणजे शाळेत न पाठवता मुलींना घरीच शिकवण्याचा धाडसी निर्णय पोल्गार दाम्पत्याने घेतला. त्या वेळी हा निर्णय भयंकरच होता. तिच्या वडिलांना तर या गुन्ह्याखाली अटक होता होता राहिली. मात्र, रीतसर परवानगी घेतल्यानंतर त्यांची अटक टळली. ‘मुलींचं बालपण हिरावणारा बाप’ म्हणून त्यांच्या या निर्णयाची पाश्चात्त्यांनी निर्भर्त्सनाही केली. त्या वेळी बुद्धिबळ हा पुरुषांचाच खेळ म्हटला जायचा. बुद्धीच्या पातळीवर महिला कमकुवत मानल्या जात असल्याने त्यांना पुरुषांमध्ये खेळण्यास परवानगी नव्हती. त्या वेळी पोल्गार भगिनींना अनेक कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागले. पुरुषांच्या स्पर्धेत भाग घेतला म्हणून ज्युडिटची मोठी बहीण सुसानला आंतरराष्ट्रीय दौरे करण्यास बंदीही घातली होती.
मात्र, या अडथळ्यांचा सामना करताना पोल्गार भगिनींमध्ये लिंगसमानतेची भावना दृढ होत गेली, जी बुद्धिबळविश्वात चर्चेचा विषय ठरली. ज्युडिट १९९१ मध्ये पुरुषांमध्ये ग्रँडमास्टर झाली, त्या वेळी तिचं वय होतं अवघं १५ वर्षे चार महिने. त्या वेळी तिने माजी जगज्जेता बॉबी फिशर यांचा विक्रम मोडीत काढत जगातली सर्वांत लहान ग्रँडमास्टरचा बहुमान मिळवला होता.
बालपणापासूनच कुशाग्र
ज्युडिट म्हणजे पोल्गार भगिनींमधली सुपर कम्प्युटर. एके सायंकाळी तिची मोठी बहीण सुसान आंतरराष्ट्रीय मास्टर असलेल्या प्रशिक्षकासोबत बुद्धिबळातल्या एंड गेमचा अभ्यास करीत होती. पटावर अंतिम स्थिती मांडून ते उत्तम चाल शोधत होते. मात्र, त्यांना चाल सुचेना. अखेर त्यांनी अंथरुणावर झोपलेल्या ज्युडिटला उठवलं आणि तिला चाल शोधण्यास सांगितलं. अर्धवट ग्लानीतल्या ज्युडिटने आळस देत पटावरची स्थिती चुटकीसरशी सोडवली आणि तिला पुन्हा अंथरुणात झोपवलं.
२७३५ एलो रेटिंग मिळविणारी एकमेव महिला!
ज्युडिटने आपल्या कौशल्याने पुरुषी वर्चस्वाला अनेक धक्के दिले. १९८९ मध्ये तिने जगातील अव्वल १०० खेळाडूंत स्थान मिळवले. तिने अवघ्या १२ व्या वर्षीच जागतिक क्रमवारीत ५५ वे स्थान मिळवले. बुद्धिबळात एलो रेटिंग म्हणजे एक प्रकारचा बुद्ध्यांकच. जगातली ती एकमेव महिला खेळाडू आहे, जिने २७०० पेक्षा अधिक एलो रेटिंगचा टप्पा गाठला. २००५ मध्ये तिचं एलो रेटिंग होतं २७३५. अद्याप या रेटिंगपर्यंत एकही महिला पोहोचू शकलेली नाही. तिने १९८९ मध्ये महिलांमध्ये अव्वल स्थान मिळवले. अगदी निवृत्त झाल्यानंतरही म्हणजे १३ ऑगस्ट २०१४ पर्यंत ती अव्वलस्थानी कायम होती. अर्थात, तिला त्याचं कधीचं अप्रूप वाटलं नाही. पुरुषांमध्ये मी कुठे याला ती अधिक महत्त्व देत होती. पुरुषांमध्ये ती एकमेव महिला होती, जी जगातील अव्वल दहा खेळाडूंमध्ये स्थान मिळवू शकली. बुद्धिबळाच्या इतिहासात अशी कामगिरी अद्याप तरी कोणत्याही महिलेला करता आलेली नाही.
महिलांनी स्वत:ला बांधून घेतलंय चौकटीत!
ज्युडिट पोल्गार पुरुषी मानसिकतेच्या बुद्धिबळाला सुरुंग लावत होती. मात्र, तिचा एकटीचा लढा पुरेसा नव्हता. तिने गेल्या वर्षी महिला विभागाच्या बहुमानच बंद करण्याची मागणी केली. तिचं म्हणणं आहे, की जास्तीत जास्त स्पर्धा खुल्या ठेवल्या पाहिजेत. जर महिलांनी स्वतःला एका चौकटीत बांधून ठेवलं तर त्या कुठपर्यंत पोहोचू शकतील? अव्वल महिला खेळाडूंनी यावर विचार करायला हवा. मला वाटतं, पुरुषांइतकंच महिलाही महिलांचं नुकसान करतात. केवळ मुलगी आहे म्हणून तिला एका मर्यादित चौकटीत अडकवणं चुकीचं आहे, असं ज्युडिट ठामपणे सांगते.
कुठे असतात पोल्गार भगिनी?
असं असलं तरी ज्युडिट १९९० मध्ये हंगेरी संघाकडून ऑलिम्पियाड खेळली. ही तिची पहिली आणि अखेरची महिला गटातली स्पर्धा. त्या वेळी ती किशोरावस्थेतच होती. तिच्यासोबत संघात सुसान आणि सोफिया या तिच्या दोन्ही बहिणीही होत्या. ती म्हणते, या स्पर्धेत मला गंमतच वाटली. कारण आव्हानचं नव्हतं! ज्युडिट आता निवृत्त झाली आहे. मात्र, अनेक स्पर्धांत समालोचन, प्रशिक्षक म्हणून आजही कार्यरत आहे. ऑगस्ट २००० मध्ये हंगेरियन पशुवैद्यकीय सर्जन गुस्झटाव्ह फाँटशी ती विवाहबद्ध झाली. त्यांना मुलगा आणि मुलगी अशी दोन मुले आहेत. आता पोल्गार कुटुंब तीन देशांत विभागलं आहे. सोफिया इस्रायलमध्ये, सुसान अमेरिकेत, तर ज्युडिट हंगेरीत. आईवडील मात्र कधी अमेरिकेत, तर कधी इस्रायलमध्ये असतात. पोल्गार भगिनी वेगवेगळ्या देशांत राहत असल्या तरी बुद्धिबळातील लिंगसमानतेसाठीचा लढा मात्र त्या अजूनही लढत आहेत.
ज्युडिटला पुरुषी मानसिकतेचा फटका अनेकदा बसला. जगातील सर्वोत्तम बुद्धिबळपटूंशी खेळण्यासाठी १९९४ मध्ये एका स्पर्धेत ज्युडिटला आमंत्रित केले होते. त्या वेळी ज्युडिट अवघी १७ वर्षांची होती. या स्पर्धेच्या पाचव्या फेरीत तिची गाठ विश्वविजेत्या गॅरी कास्पारोवशी पडली. तसं पाहिलं तर कास्पारोवने ३५ व्या चालीपर्यंत डावावर बऱ्यापैकी वर्चस्व मिळवले होते. मात्र, ३६ व्या चालीत कास्पारोवने घोड्याची चाल खेळली. मात्र, ती चुकली असं लक्षात येताच मायक्रो सेकंदात त्याने चाल बदलली. बुद्धिबळात एकदा केलेली चाल मागे घेता येत नाही. मात्र, कास्पारोवने चीटिंग केली आणि हा प्रकार तिथे जमलेल्या सर्वांच्या लक्षात आला. कास्पारोवने चाल बदलली. ज्युडिटने पंचाकडे पाहिलं, पण त्याने त्यात हस्तक्षेप केला नाही. या डावाचा व्हिडीओही जाणीवपूर्वक कुठेही प्रसिद्ध केला नाही. त्या वेळी वृत्तवाहिन्यांवर ही सनसनाटी बातमी झळकली. ‘मला स्पर्धेत आमंत्रित केल्याने मी यात कोणताही वाद नको म्हणून मी बोलले नाही,’ असं ज्युडिट म्हणाली. त्या वेळी कास्पारोव ज्युडिटवरच आरोप करीत म्हणाला, “तिचा हा प्रसिद्धीचा स्टंट आहे. तिचं वय पाहता, कुठे काय बोलावं, याचा शिष्टाचार तिने शिकला पाहिजे.” मात्र, कास्पारोवने केलेल्या चुकीचा व्हिडीओ आजही यूट्यूबवर उपलब्ध आहे.
निगेल शॉर्टचं वादग्रस्त वक्तव्य
अजूनही पुरुषी मानसिकेतून अनेक ग्रँडमास्टर दर्जाचे खेळाडू बाहेर पडलेले नाहीत. ब्रिटनचा ग्रँडमास्टर निगेल शॉर्ट याने २०२० मध्ये महिला बुद्धिबळपटूंना कमी लेखले होते. ते म्हणाले, की पुरुष खेळाडूंमध्ये महिलांपेक्षा अधिक कठोर मेहनत घेत असतात. बुद्धिबळात महिला पुरुषांना कधीच मागे टाकू शकणार नाही. मात्र, ज्युडिटने शॉर्टला अनेकदा पराभूत केले होते. याकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले, मी सरासरी संख्येवर बोलतोय. एखाद्या महिलेच्या कामगिरीबाबत नाही. शॉर्टच्या या वक्तव्याचा ज्युडिटनेही समाचार घेतला होता.
महिला गटातील स्पर्धा बंद कराव्यात का?
महिला ग्रँडमास्टरचा बहुमान खरंच बंद करावा की नको, या प्रश्नाचं उत्तर अद्याप कुणालाही ठोसपणे देता आलेलं नाही. मात्र, ज्युडिटच्या मते, जर महिला पुरुषांच्या स्पर्धा खेळणारच नसतील तर त्यांची कामगिरी उंचावणार नाही. आज २३०० एलो रेटिंगवर महिला ग्रँडमास्टरचा नॉर्म मिळतो. मात्र खुल्या गटातील ग्रँडमास्टरचा बहुमान मिळविण्यासाठी किमान २५०० एलो रेटिंग आवश्यक आहे. महिला ग्रँडमास्टरच्या २३०० एलो रेटिंगवर खुल्या गटातला आंतरराष्ट्रीय मास्टरचा बहुमानही मिळणार नाही, याकडे ज्युडिट लक्ष वेधते. महिलांनी मानसिकता बदलायला हवी, यावर ज्युडिट जोर देत आहे. महिला गटातल्या स्पर्धांविरुद्ध मी अजिबात नाही; मात्र महिला गटातले बहुमान नको, यावर तिचा जोर अधिक आहे. अर्थात, काही महिला बुद्धिबळपटूंना वाटतं, की महिलांना प्रोत्साहन मिळण्यासाठी महिला गटाच्या स्पर्धा, बहुमान असायलाच हवे. बुद्धिबळात पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या फारच कमी आहे. जर पुरुषांच्या गटात खेळवले तर ती आणखी घटण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. असे असले तरी ज्युडिटच्या मतांशी महिला खेळाडू सहमत आहेत. मात्र, केवळ समर्थन असून उपयोग नाही. प्रत्यक्षात त्या पुरुषी मानसिकतेविरुद्ध निर्णायक विजयी ‘चाल’ शोधणार का, हा खरा प्रश्न आहे.