जिंगल क्वीन चित्रा आणि जगजीत सिंग यांची पहिली भेट (भाग 4)
जिंगल क्वीन चित्रा आणि जगजीत सिंग यांची पहिली भेट (भाग 4)
kheliyad.sports@gmail.com | M. +91 80875 64549
आंख को जाम समझ बैठा था अंजाने में
साकिया होश कहाँ था तेरे दिवाने में…
रात्रभर जगजीत सिंग यांच्या मनात हे गीत रुंजी घालत होतं. स्टार बनण्याचे स्वप्न आता बाळसं धरत होतं. 1968 मध्ये जगजीत यांना गुजराती चित्रपट ‘बहुरूपी’मध्ये गायनाची संधी मिळाली.
राम नाम की पावन बन्सी
राम मिलन मे काज हे मनवा…
याच काळात त्यांची मैत्री राजेंद्र मेहतांशी झाली. होय, हेच ते राजेंंद्र मेहता ज्यांनी निना यांच्याशी जोडी बनवली आणि त्यांनी सुरेख गझला लोकांपर्यंत पोहोचवल्या.
चित्रपटसृष्टीत कोणाची कोणत्या टप्प्यावर ओळख होईल हे सांगता येत नाही. राजेंद्र मेहता यांची ओळखही जगजीत सिंग यांना तशी सरप्राइजच होती. राजेंद्र आणि जगजीत सिंग हे एकमेकांना भेटले ते मनमोहन किशन यांच्या घरी. राजेंद्र मेहता किंग सर्कलवर राहायचे. त्या वेळी त्यांच्या घरी कार्यक्रम होता. कार्यक्रमानंतर मनमोहन किशन यांनी राजेंद्र यांना एक मेसेज पाठवला, की कोणी एक मुलगा बिकानेरहून आलाय. खरं तर तो पंजाबी सरदार आहे लुधियानाचा, पण तो तुझ्याबद्दल विचारत होता. मी त्याला तुझा पत्ता दिला.
एक दिवस बिल्डिंगखाली राजेंद्र आणि मनमोहन किशन उभे होते. त्याच वेळी जगजीत सिंग त्यांना तिथे भेटले.
राजेंद्र म्हणाले, ”तुम्ही जगजीत सिंग आहात का?”
तो म्हणाला, ”हो. तुम्ही राजेंदर का?”
”हो?”
जगजीत सिंग म्हणाले, ”मी शेर-ए-पंजाबमध्ये राहतोय. मला जालंधरमध्ये तुमच्याविषयी सांगितलं होतं. मला बिकानेरमध्येही काही लोकांनी तुमच्याविषयी सांगितलं होतं.”
ही ओळख जगजीत सिंग यांच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरली. त्यानंतर जगजीत सिंग यांचं राजेंद्र यांच्याकडे येणं-जाणं सुरू झालं. जगजीत राहत होते तेथे इतरही अनेक जण होते. राजेंद्रही पेइंग गेस्ट म्हणूनच राहत होते. त्यांचं घरही वैशिष्ट्यपूर्ण होतं. म्हणजे इनमिन दोन खोल्यांचं घर. एका खोलीत किचन बनवलेलं होतं, तर दुसरी खोली संगीत मैफलींचं. जगजीत सिंग यांचाही हळूहळू संगीत ग्रुप छान जमत होता. त्यांच्यासोबत दोन मुले होती- नारायण आणि गोविंद. ते तबला वाजवायचे.
राजेंद्र मेहतांचा एक रेकॉर्ड जगजीत सिंग यांच्या मदतीने निघाला होता. राजेंद्र यांनी गझल गायल्या, तर जगजीत यांनी संगीत दिलं होतं. हापण एक ईपी होता आणि तो एचएमव्हीनेही काढला होता. 1967 चा तो काळ. एक संगीतकार म्हणून जगजीत सिंग य़ांचा हा पहिला रेकॉर्ड होता.
असा सुरू झाला चित्रा यांचा जिंगल गायनाचा प्रवास
कंपनी आता जगजीत यांच्या कामावर बेहद खूश होती. 1969 मध्ये त्यांनी जगजीत सिंग यांचे आणखी दोन रेकॉर्ड काढले. ते लोकांना खूप आवडले. याच काळात जगजीत यांची ओळख झाली देबू प्रसाद दत्ता यांच्याशी. ते दक्षिण मुंबईत राहायचे. ते एका बिस्कीट कंपनीत मॅनेजर होते, पण जाणते संगीतप्रेमीही होते. संगीत रेकॉर्डिंगचे नवनवे तंत्रज्ञान त्यांना माहीत होते. त्यांनी त्यांच्या ड्रॉइंग रूममध्ये स्टुडिओ बनवला होता आणि मोठमोठे लोक- जसे श्याम बेनेगल, वनराज भाटिया, मृणाल सेन, सुलक्षणा पंडित अशी अनेक दिग्गज मंडळी रेकॉर्डिंगसाठी त्यांच्याजवळ येत होती. त्यांची पत्नी रेडिओवर जिंगल गायची. इतका गोड आवाज होता, की जगजीत दंग होऊन जायचे. त्यांना ‘जिंगल क्वीन’ म्हंटलं जायचं. तो आवाज जगजीत यांच्या मनात इतका कोरला गेला, की त्या आवाजाने त्यांचं आयुष्यच बदलून टाकलं.
या जिंगल क्वीन दुसऱ्यातिसऱ्या कोणी नाही तर चित्रा होत्या. याच जिंगल क्वीन चित्रा पुढे जगजीत सिंग यांच्या अर्धांगिनी झाल्या. तीही वेगळीच प्रेमकहाणी आहे. मात्र, पहिल्याच भेटीत जगजीत यांचा आवाज त्यांना अजिबात आवडला नाही. त्यांच्यासोबत गायन करण्यासही त्यांनी स्पष्ट नकार दिला होता.
चित्रा मूळच्या कलकत्त्याच्या (आताचे कोलकाता). तिथेच जन्म झाला आणि तिथेच शिक्षण. चित्रा यांची आई शास्त्रीय संगीताच्या चांगल्या जाणकार होत्या. आई रियाज करायची, तर चित्रा शांतपणे ऐकायची. कोणतेही शिक्षण न घेता संगीत चित्राच्या नसानसांमध्ये भिनलं. वयाच्या पाचव्या वर्षीच चित्रा ऑल इंडिया रेडिओवर ‘रवींद्र संगीत’ गाऊ लागली होती. ऐकणारे चकित व्हायचे. मात्र, त्याचं उमलत्या वयातच म्हणजे वयाच्या 14-15 व्या वर्षीच घरच्यांनी लग्न लावलं. लग्नानंतर त्या बंगालहून महाराष्ट्रात आल्या. पती मुंबईत राहायचे म्हणून चित्राचे नवे बस्तान मायानगरीत झाले. एक वर्षानंतर वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षीच त्यांनी एका गोंडस मुलीला (मोनिका) जन्म दिला.
चित्राचे पती देबू दत्ता संगीताचे खूप शौकीन होते. त्यांना चित्रा यांच्या गायनाबद्दल माहिती होती. म्हणून त्यांनी कधीच गायनापासून त्यांना रोखलं नाही. त्यांच्या घरासमोर एक गुजराती परिवार राहत होता. हा परिवारही संगीतप्रेमी होता. अनेकदा त्यांच्या घरी संगीतमैफली व्हायच्या. तेथे एका शिक्षकाकडून चित्रा यांनी तीन महिने संगीत शिक्षण घेतले. त्यानंतर संगीतकार वैद्यनाथन यांच्याशी ओळख झाली. त्यांनी रेडिओवर जिंगल्स गायनाची संधी दिली आणि पाहता पाहता चित्रा ‘जिंगल स्टार’ झाल्या.
चित्रा तशा जिंगल गायनात अपघातानेच आल्या. त्या वेळी रेडिओवर लक्ष्मी शंकर गाणार होत्या. त्या हिंदी, तसेच अन्य भाषांतही गायच्या. त्या काळातल्या त्या हुकमी गायिका होत्या. बैद्यनाथनशी चित्रा यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. त्या वेळी लक्ष्मी शंकर आजारी पडल्या की काही तरी अडचणी आल्या कोण जाणे. त्या वेळी रेकॉर्डिंगची डेडलाइन ठरलेली असायची. बैद्यनाथन यांना तर जिंगल देणेच होते. आता प्रश्न पडला, की लक्ष्मी गाणार नसेल तर मग दुसरे कोण गाणार? माहीत नाही कुठून चर्चेला सुरुवात झाली. कौटुंबिक मैत्री असूनही त्यांना चित्रा यांच्या गायनाविषयी फारशी माहिती नव्हती. गायन करीत असतीलही, पण त्यांना हे माहिती नव्हतं, की त्या चांगल्या गातातही.
ते अचानक चित्रा यांना म्हणाले, “चला तुम्ही गा. प्रयत्न करा.”
चित्रा उडाल्याच. “मी गाऊ?”
ते म्हणाले, “हो… तुम्ही गायन कराच. प्रयत्न करा. तसंही ते जिंगल आहे.”
अशा प्रकारे चित्रा यांनी जिंगल गायनात पाऊल ठेवलं. जय सौंदर्य साबणाच्या जाहिरातीसाठी ते जिंगल होतं. पुढे ते लोकप्रिय झालंच, शिवाय यामुळे चित्रा यांना अनेक ठिकाणांहून बोलावणं येऊ लागलं. यापूर्वी चित्रा यांनी कधीही बाहेर गायन केलेले नव्हते. वैद्यनाथन यांनी चित्रा यांची जिंगलसाठी कायमस्वरूपी नियुक्ती केली. त्यांना आता लक्ष्मी शंकर नको होत्या. चित्रा यांची यानंतर ओळख झाली मोहिंदरजित सिंग यांच्याशी. ते देबू दत्ता यांच्या घरी अनेकदा रेकॉर्डिंगसाठी यायचे. त्यांनी चित्रा यांची रेकॉर्डिंग ऐकली तेव्हा ते म्हणाले, “हा तर एकदम नूर जहाँचा आवाज आहे!” त्यांनी दोन गाणी चित्रा यांना दिली. त्यातील एक गाणे जगजीत सिंग यांच्यासोबत होते. अर्थात, मोहिंदर यांनीच जगजीत सिंग यांची चित्रा यांच्याशी ओळख करून दिली होती.
चित्रा यांना आवडला नाही जगजीत सिंग यांचा आवाज
मोहिंदर यांना गाणे यासाठी रेकॉर्डिंग करून हवे होते, की ते प्रोड्युसरला ऐकवता येईल. त्या वेळी त्यांनी अनेक नवोदित गायकांना बोलावले होते. मानस मुखर्जी, यशपालसिंग (‘गीत गाता चल’ फेम), सुलक्षणा पंडित अशा सर्वांना त्यांनी एकत्र केले होते. या सर्वांना रिहर्सलसाठी बोलावून घेतले. ही मैफल चित्रा यांच्या घरीच बसली होती. सर्व आर्टिस्ट आले. वेळ झाली. तेवढ्यात दारावर बेल वाजली. चित्रा यांनी दरवाजा उघडला. पाहतात तर काय, समोर एक माणूस भिंतीवर एक हात ठेवून झोपेच्या धुंदीत उभा होता. चित्रा यांना समोर पाहताच जागा झाला. घरात आला.
थोड्या वेळाने मोहिंदरजित आले नि म्हणाले, “ओय लल्लू, ऊठ. तू अपना गाना देख ले.”
हा लल्लू उठला. तोंड- हात न धुताच बाजा (हार्मोनिअम) ओढून बसला. चित्रा यांच्यासह जमलेल्या सर्वच कलाकारांना त्या वेळी जगजीत नावाचं गारूड अजिबातच माहिती नव्हतं. मोहिंदरजित सिंग यांनी त्याची ओळख करून दिली. “हा पंजाबमधून आलेला आहे. जगजीत सिंग नाव आहे त्याचं.”
एक तर जगजीत झोपेतून उठले होते. त्यात त्यांचा आवाज डबल. चित्रा यांनी तर त्याला कधीच ऐकलेलं नव्हतं.
मोहिंदर चित्रा यांना म्हणाले, “तुला याच्यासोबत डुएट गायचंय.”
चित्रा चपापल्या. त्या म्हणाल्या, “प्लीज, माफ करा. हा कसा डबल भारी आवाजात गातोय आणि माझा किती पातळ आवाज! मी त्याच्या स्ट्रेंथने नाही गाऊ शकणार. हे डुएट गाणं माझ्याकडून नाही होणार.”
चित्रा जगजीत यांची आणखी एक सवय सांगतात- ते म्हणजे एकदा त्याच्या हातात बाजा गेला तर तो दुसऱ्याच्या नशिबात येतच नव्हता. तोच गात राहणार. दुसऱ्याला काही संधीच नाही.
जगजीत सिंग यांनी जिंकलं जिंगल क्वीन चित्रा यांचं मन
एकदा रिहर्सल दुसऱ्या ठिकाणी ठेवली होती. तिथे हीच सर्व आर्टिस्ट मंडळी होती. जगजीत सिंगही तेथे होते. रिहर्सल संपली आणि सर्व घरी जाण्यास निघाले. त्या वेळी चित्रा जगजीत यांना म्हणाल्या, “तू कुठे राहतो?”
तो म्हणाला, “मी आग्रीपाडा, शेर-ए-पंजाब.”
चित्रा यांच्या रस्त्यावरच त्यांचा एरिया होता. त्यामुळे त्यांनी जगजीत सिंग यांना त्यांच्या कारमध्ये लिफ्ट दिली. त्या म्हणाल्या, “मी तुम्हाला सोडते, पण ड्रायव्हर आधी मला घरी सोडेल. नंतर ड्रायव्हर तुम्हाला तुमच्या खोलीवर सोडेल.”
चित्रा त्यांच्या घराजवळ उतरल्या. घराकडे निघणार त्याच वेळी त्यांना वाटलं, की अरे आपण याला चहापाणी विचारलं पाहिजे.
“चला चहा घेऊया आपण घरी.” -चित्रा
या आग्रहावर जगजीत लगेच आले. घरात बाजा होताच आणि बाजा पाहिला की जगजीत सोडत नसायचे. चित्रा किचनमध्ये चहा बनवायला गेल्या. चहा बनवून बाहेर आल्या, तर जगजीत तल्लीन होऊन गात होते. चित्रा यांनी त्यांची तंद्री भंग न करता शांतपणे त्यांच्यासमोर बसल्या. चित्रा यांना त्यांच्या आवाजाची जादू तेव्हा कळली. त्यांनी मनात विचार केला, की याचं गाणं आपल्याला थोडंसंही आवडलेलं नव्हतं, पण आता जो हा गात आहे, त्यात वेगळीच जादू आहे. कारण या वेळी ते कोणासाठीही गात नव्हते, तर उत्स्फूर्तपणे गात होते. त्या गाण्याचे शब्द होते…
[jnews_element_embedplaylist scheme=”dark” playlist=”https://www.youtube.com/watch?v=-PhCwgfCxGg” column_width=”4″]धुंआ उठा था दीवाने के जलते घर से सारी रात,
लेकिन वो ख़ामोश रहे दुनिया के ड़र से सारी रात
(गीतरचना : शमीम शहाबादी)
हेच गाणं पुढे टर्निंग पॉइंट ठरलं. त्या वेळी चित्रा यांना कम्पोझिशन काय चीज असते ते समजलं. यापूर्वी त्या कधीही कम्पोझिशन समजून घेण्याच्या फंदात पडत नव्हत्या. फक्त गाणं गायचं, एवढंच त्यांना ठाऊक होतं. मात्र, जेव्हा हे गाणं ऐकलं, तेव्हा त्यांंचे डोळे खाडकन् उघडले.
चित्रा यांनी आश्चर्याने विचारलं, “हे गाणं तुम्ही बसवलं?”
ते म्हणाले, “हो.”
चित्रा चकित झाल्या. चित्रा यांना आणखी धक्का तर पुढे बसला. कारण कॉलेज संपवून जेव्हा जगजीत मुंबईत पाऊल ठेवलं त्याच्याही दोन-तीन वर्षांपूर्वी त्यांनी ही चाल दिली होती. त्या वेळी जगजीत यांचं वय असेल 21-22 वर्षांचं. तेव्हा हे गाणं त्यांनी बसवलं होतं.
त्यानंतर चित्रा यांना जगजीत सिंग यांचेही गाणे आवडू लागले.. इथूनच पुढे एकमेकांशी संवादाचा सिलसिला सुरू झाला. जगजीत सिंग यांनी जिगंल क्वीन चित्रा यांचं मन जिंकलं होतं.. दोघांनी जिंगल गायन सुरू केलं. चित्रा यांना एका जिंगलसाठी 200 रुपये मिळत होते, तर जगजीत सिंग यांना 50 किंवा 100 रुपये. कमाल ही होती, की बंगाल आणि पंजाबची ही जोडी सुमारे 20 भाषांमध्ये जिंगल गायन करीत होती!
कौन है हर सुबह सभी को सवारे
किस की ये आँखे ये प्यार के तारे
ये नर्मी ये गर्मी ये स्वाद ये चेहरे
ये रौनक जगायें…
आणि लगेच जाहिरातीची लाइन ऐकवली जाते…असली वनस्पती आज भी ममता की कसौटी पर खरा..
ही जाहिरात 60 च्या दशकातील असेल, जी रेडिओवर जगजीत सिंग यांच्या आवाजात जिंगलच्या स्वरूपात ऐकायला मिळायची.
(क्रमशः)
गझल गायक जगजीत सिंग आणि चित्रा यांच्या लग्नाची गोष्ट! (भाग 5)
[jnews_widget_facebookpage title=”Follow on Facebook Page kheliyad” url=”https://www.facebook.com/kheliyad” small=”true” header_icon=”fa-facebook-square” url=”https://www.facebook.com/kheliyad” header_type=”heading_4″ header_background=”#3b5998″ header_text_color=”#ffffff”]