All SportsCricketWomen Power

पहिल्याच सामन्यात आपल्या पोरी जिंकल्या

भारतीय महिला क्रिकेट संघ पहिल्या वन-डे क्रिकेट लढतीत आयर्लंडवर सहा विकेटनी मात

भारतीय महिला क्रिकेट संघ पहिल्या वन-डे क्रिकेट लढतीत आयर्लंडवर सहा विकेटनी मात

राजकोट, १० जानेवारी २०२५

प्रतीका रावल आणि तेजल हसबनिस यांच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने मालिकेतील पहिल्या वन-डे क्रिकेट सामन्यात आयर्लंडवर सहा विकेटनी मात केली. आयर्लंडने प्रथम फलंदाजी करताना ७ बाद २३८ धावा केल्या. भारताने विजयी लक्ष्य ९३ चेंडू राखून ३४.३ षटकांत चार विकेटच्या मोबदल्यात पूर्ण केले. यासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. मालिकेतील दुसरी वन-डे रविवारी होणार आहे.

सौराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर शुक्रवारी ही लढत झाली. आयर्लंडने दिलेल्या २३९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कर्णधार स्मृती मानधना आणि प्रतीकाने १० षटकांत ७० धावांची सलामी दिली. हरमनप्रीत कौरच्या अनुपस्थितीत नेतृत्व सांभाळणाऱ्या स्मृतीने आक्रमक सुरुवात केली. मात्र, तिला चांगल्या सुरुवातीचे रूपांतर मोठ्या खेळीत करता आले नाही. तिचा स्वीपचा फटका चुकला. स्मृतीने २९ चेंडूंत सहा चौकार व एका षटकारासह ४१ धावा केल्या. यानंतर प्रतीकाने हर्लिन देओलच्या साथीने संघाला शंभर धावांचा टप्पा ओलांडून दिला. हर्लिनला अधिक वेळ मैदानावर स्थिरावता आले नाही. यानंतर जेमिमा रॉड्रिग्जही झटपट माघारी परतली. त्यामुळे बिनबाद ७० वरून भारताची ३ बाद ११६ अशी स्थिती झाली.

यानंतर प्रतीका आणि तेजलने ८४ चेंडूंत ११६ धावांची भागीदारी करून भारताला विजयाच्या समीप पोहोचविले. या जोडीने चौफेर फटकेबाजी केली. विजयासाठी अवघ्या सात धावांची गरज असताना प्रतीका बाद झाली. युवा फलंदाज प्रतीकाने आपली प्रगल्भता दाखवून दिली. तिने ९६ चेंडूंत १० चौकार व एका षटकारासह ८९ धावा केल्या. यानंतर रिचा घोषने दोन चौकार मारून भारताचा विजय साकारला. तेजलने ४६ चेंडूंत नऊ चौकारांसह नाबाद ५३ धावा केल्या. चौथी वन-डे खेळत असलेल्या महाराष्ट्राच्या २७ वर्षीय तेजलचे हे पहिलेच अर्धशतक ठरले. तिने पुनरागमन संस्मरणीय केले. तेजलने अखेरचा सामना गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये खेळला होता.

तत्पूर्वी, आयर्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी अचूक मारा करून आयर्लंडची १३.३ षटकांत ४ बाद ५६ अशी स्थिती केली होती. यानंतर कर्णधार गॅबी लेविस आणि लीह पॉल यांनी आयर्लंडचा डाव सावरला. या जोडीने पाचव्या विकेटसाठी १५० चेंडूंत ११७ धावा केल्या. या जोडीला झटपट रोखण्यात भारतीय गोलंदाजांना यश आले नाही. त्यामुळे आयर्लंडला दोनशे धावांचा टप्पा ओलांडता आला. अर्थात, खराब क्षेत्ररक्षणाचा भारताला फटका बसला. भारतीय महिलांनी तीन झेल सोडले; तसेच काही वेळा गलथान क्षेत्ररक्षणही केले. पॉलने ७३ चेंडूंत सात चौकारांसह ५९ धावा केल्या. दीप्ती शर्माने गॅबीला स्वत:च्या गोलंदाजीवर झेलबाद करून शतकापासून रोखले. गॅबीने १२९ चेंडूंत १५ चौकारांसह ९२ धावा केल्या. आयर्लंडला ५० षटकांच्या आत रोखण्यात भारतीय गोलंदाज अपयशी ठरल्या.

धावफलक

आयर्लंड – ५० षटकांत ७ बाद २३८ (गॅबी लेविस ९२, लीह पॉल ५९, अर्लिनी केली २८, ख्रिस्टिना रेली नाबाद १५, प्रिया मिश्रा २-५६, सायली सातघरे १-४३, तितास साधू १-४८, दीप्ती शर्मा १-४१) पराभूत वि. भारत – ३४.३ षटकांत ४ बाद २४१ (प्रतीका रावल ८९, तेजल हसबनिस नाबाद ५३, स्मृती मानधना ४१, हर्लिन देओल २०, ॲमी मॅगुरे ३-५७, फ्रेया सर्जंट १-३८).

खेळ आकड्यांचा

  • वन-डे क्रिकेटमध्ये चार हजार धावांचा टप्पा गाठणारी स्मृती मानधना भारताची दुसरीच, तर एकूण पंधरावी महिला क्रिकेटपटू ठरली. याआधी मिताली राज (७८०५ धावा).
    स्मृतीने ९५ वन-डे क्रिकेट सामन्यांत ४४.९५च्या सरासरीने ४००१ धावा केल्या. यात नऊ शतके आणि २९ अर्धशतकांचा समावेश आहे.
  • गॅबी लेविस आणि लीह पॉल यांच्यातील भागीदारी. ही वन-डेतील आयर्लंडच्या महिला संघाची पाचव्या विकेटसाठीची सर्वोच्च भागीदारी ठरली.

भारत-आयर्लंड लढतीदरम्यानच्या धावा. उभय संघांतील वन-डेतील सर्वाधिक

आम्हाला क्षेत्ररक्षण सुधारायला हवे. आयर्लंडला १८० धावांत रोखू शकलो असतो. अर्थात, यातून योग्य तो धडा घेऊ. मात्र, गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. आमच्या फलंदाजांनीही चांगली कामगिरी केली. तेजलने शेवट चांगला केला. सरतेशेवटी दिवस चांगला राहिला. आम्ही आमच्या योजनांनुसार खेळ केल्याचा आनंद आहे. – स्मृती मानधना, भारताची कर्णधार

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!