भारतीय फुटबॉल महासंघ- बायचुंग भुतिया का हरले?
भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्षपद प्रथमच माजी फुटबॉलपटूने भूषवले. हा माजी फुटबॉलपटू आहे कल्याण चौबे. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या इतिहासात प्रथमच माजी खेळाडू अध्यक्ष झाला ही स्वागतार्ह बाब आहे. रुखरुख याचीच आहे, की भारतीय फुटबॉल महासंघ निवडणुकीत त्यांच्याविरुद्ध बायचुंग भुतिया यांच्यासारख्या मातब्बर खेळाडूला निराशाजनक पराभव स्वीकारावा लागल्याची. भारतीय फुटबॉल महासंघाची 2 सप्टेंबर 2022 रोजी निवडणूक झाली. ज्या दिवशी उमेदवार यादी जाहीर झाली, तेव्हाच निवडणुकीचं चित्र जवळपास स्पष्ट झालं होतं. माजी गोलरक्षक कल्याण चौबे यांचाच विजय होईल, अशीच चिन्हे दिसत होती आणि झालेही तसेच. या लढतीचे वर्णन अॅम्बेसिडर विरुद्ध फेरारी असे करण्यात आले होते. अर्थात, हा निवडणूक प्रचाराचा फंडा होता. मात्र, अॅम्बेसिडर कोण आणि फेरारी कोण, यात सामान्यांनी पडण्याचे कारण नाही. कारण दोन्हीही माजी खेळाडू आहेत, एवढेच दिलासादायक चित्र पुरेसे आहे.
भारतीय फुटबॉल महासंघ अध्यक्षपदाच्या या एकतर्फी निवडणुकीत माजी गोलरक्षक कल्याण चौबे यांनी देशातील अव्वल खेळाडू बायचुंग भुतिया यांचा धुव्वा उडवला. या निवडणुकीत भुतियांना अवघे एक मत मिळाले. कल्याण चौबे यांनी बायचुंग भुतिया यांचा ३३-१ असा एकतर्फी विजय मिळवला. अर्थात, या निकालात अनपेक्षित काहीच नव्हते. कारण भुतिया यांना सिक्कीम संघटनेनेही मतदार केले नव्हते. त्यांना कोणत्याही राज्य संघटनेची साथ नसल्याचे स्पष्ट दिसत होते. यापूर्वीचे दोन अध्यक्ष प्रियरंजन दासमुन्शी आणि प्रफुल्ल पटेल हे पूर्णवेळ राजकारणात होते. आता कल्याण चौबे यांनीही पश्चिम बंगालमधून भाजपसाठी निवडणूक लढवली आहे; पण त्यांना स्पर्धात्मक फुटबॉलचा दांडगा अनुभव आहे.
भारतीय फुटबॉल महासंघ निवडणुकीतले उमेदवार बायचुंग भुतिया आणि कल्याण चौबे हे दोघेही समवयीन माजी खेळाडू. दोघेही ४५ वर्षांचे. दोघेही एकाच वेळी ईस्ट बंगाल संघाकडून खेळले होते. कल्याण चौबे राष्ट्रीय संघातून कधीही खेळले नाहीत, तर बायचुंग भुतिया यांच्यावर भारतीय संघाची मदार असे. कल्याण चौबे बंगालमधील भाजपचे नेते आहेत. त्यांना गुजरात आणि अरुणाचल प्रदेश या प्रमुख संघटनांचा पाठिंबा होता. त्यांची बिनविरोध निवड होणार असतानाच बायचुंग भुतिया यांना दोन राज्य संघटनांनी साथ दिली आणि निवडणुकीत रंग भरले. कल्याण चौबे यांना ईशान्य भारतातील ताकदवान नेत्याचा भक्कम पाठिंबा असल्याची चर्चा होती. हा नेता भारतीय क्रीडा क्षेत्रात चांगलाच सक्रिय आहे, याकडे लक्ष वेधले जात होते. हा नेता दुसरातिसरा कोणी नाही, तर केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू होते हे आता लपून राहिलेले नाही. दुसरीकडे बायचुंग भुतिया यांची बाजू तितकीशी भक्कम नव्हती. राजकारणाचे मैदान आणि खेळाचे मैदान यात मोठा फरक आहे. मैदान कितीही गाजवले तरी त्याचा राजकीय मैदानावर अपवादानेच फायदा होता. भुतिया यांचं दुर्दैव पाहा, ज्या राज्याचं ते प्रतिनिधित्व करीत होते, ज्या राज्याचं भूषण म्हणून त्यांचा उल्लेख होता, त्या सिक्कीमनेही त्यांना साथ दिली नाही. केवढी ही शोकांतिका!
कल्याण चौबे यांना कर्नाटकामधील काँग्रेसचे नेते एन. ए. हॅरिस यांची साथ असल्याची चर्चा होती. उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत हॅरिस यांना राजस्थान संघटनेचे अध्यक्ष, तसेच काँग्रेसचे नेते मानवेंद्र सिंग यांनी आव्हान दिले होते. मानवेंद्र यांच्या राजस्थान संघटनेने बायचुंग भुतिया यांना साथ दिली होती. भुतिया यांना जाहीर पाठिंबा दिलेले अरुणाचल प्रदेशचे किपा अजय यांनी खजिनदारपदासाठी अर्ज दाखल केला होता. मध्यंतरी अजय यांनी माघार घेतल्याचीही चर्चा होती. मात्र ती चर्चाच होती. अजय यांच्याविरुद्ध आंध्र प्रदेश संघटनेचे अध्यक्ष गोपालकृष्ण कोसाराजू यांनी आव्हान दिले होते. गंमत पाहा, किपा अजय विरुद्ध गोपालकृष्ण कोसाराजू हे आमनेसामने असले तरी या दोघांनीही बायचुंग भुतिया यांना खुलेआम पाठिंबा दिला होता. या खजिनदारपदाच्या निवडणुकीत किपा अजय यांनी गोपालकृष्ण कोसाराजू यांना ३२-१ असा धुव्वा उडवला. कोसाराजू यांना एकच मत पडले. दुसरीकडे उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत कर्नाटकमधील काँग्रेसचे नेते एन. ए. हॅरिस यांनी बायचुंग भुतिया यांचे साथीदार असलेले राजस्थानमधील काँग्रेसचे नेते मानवेंद्रसिंह यांचा २९-५ असा पराभव केला.
किरेन रिजिजू यांच्याकडून दडपण?
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी राज्य संघटनांवर बायचुंग भुतिया यांच्या विरोधात मतदान करण्यासाठी दडपण आणले. प्रत्येक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या हॉटेल रूममध्ये जाऊन त्यांनी हे दडपण आणल्याचा दावा उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीतील पराभूत उमेदवार मानवेंद्रसिंह यांनी केला. या निवडणुकीत सुरुवातीलाच हस्तक्षेप केला जात होता. रिजीजू यांनी गुरुवारी रात्री सर्व मतदारांची भेट घेतली आणि बायचुंग भुतिया यांना मत न देण्याची सूचना केली. हा हस्तक्षेप योग्य नव्हे. भारतीय फुटबॉलचे यामुळे अधिकच नुकसान होणार आहे, असेही त्यांनी सांगितले. फुटबॉल महासंघाच्या अध्यक्षपदी चांगल्या खेळाडूची निवड आवश्यक होती. ही फॉर्म्युला वन शर्यत होती. त्यासाठी अॅम्बेसिडर नव्हे, फेरारी हवी. मतदारांनी बायचुंग भुतिया यांनाच पसंती देणे योग्य ठरले असते. एक आठवड्यापूर्वी सर्व राज्य संघटनांनी कोणत्याही दडपणाला बळी न पडण्याचे ठरवले होते; पण सर्वच चित्र बदलले, असेही मानवेंद्रसिंह म्हणाले.
आमनेसामने
कल्याण चौबे | बायचुंग भुतिया |
1. कल्याण चौबे टाटा फुटबॉल अकादमीतील पदवीधर; बागान, इस्ट बंगाल, जेसीटी; तसेच साळगावकरकडून चौबे खेळले | 1. युरोपातील क्लबने कराराबद्ध केलेले पहिले भारतीय खेळाडू |
2. सॅफ विजेत्या संघात तीनदा स्थान; पाच विविध राज्यांकडून चौबे राष्ट्रीय स्पर्धात खेळले | 2. मोहन बागान, इस्ट बंगाल, साळगावकर; तसेच युनायटेड सिक्कीमकडून खेळण्याचा भुतियांना अनुभव |
3. जर्मनीतील लीगसाठी दोन क्लबकडून चाचणीसाठी निमंत्रण | 3. भुतिया यापूर्वी महासंघाच्या तांत्रिक समितीचे प्रमुख |
मालोजीराजे छत्रपती सदस्यपदी
वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष व माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांची अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या सदस्यपदी निवड झाली आहे. महाराष्ट्रातून निवड झालेले ते एकमेव सदस्य आहेत. ते गेली दहा वर्षे वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष, तसेच कोल्हापूर जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. फुटबॉलच्या प्रसारासाठी त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. ते पुण्यातील ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीचेही सचिव आहेत.
[jnews_block_9 first_title=”Read more at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”63″]भारतीय फुटबॉलच्या प्रगतीसाठी मी प्रयत्न करीत राहणार. कल्याण चौबे भारतीय फुटबॉलला प्रगतिपथावर नेतील, अशी अपेक्षा आहे. मी संघटनेच्या कार्यकारिणीत आहे. त्यामुळे भारतीय फुटबॉल महासंघासाठी काम करीत राहीन.
– बायचुंग भुतिया