जागतिक बुद्धिबळ स्पर्धेचा दर्जा घसरला?
प्रश्न हा आहे, की काही रशियन बुद्धिबळपटूंच्या मतांनुसार, खरंच या स्पर्धेचा दर्जा घसरला आहे का?

जागतिक बुद्धिबळ स्पर्धेचा दर्जा घसरला?
भारताचा ग्रँडमास्टर दोम्माराजू गुकेश याने जागतिक बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद जिंकले आणि भारतात आनंदाच्या लाटा उसळल्या. ते स्वाभाविकही आहे. कारण वयाच्या १८ व्या वर्षी अशी कामगिरी करणारा गुकेश जगातला सर्वांत लहान जगज्जेता ठरला. विश्वनाथन आनंदनंतर तो दुसराच भारतीय खेळाडू आहे. त्याने चीनचा गतविजेता डिंग लिरेन याला १४ व्या डावात पराभूत करीत विजेतेपदाला गवसणी घातली. एकीकडे भारतात आनंदाचं भरतं आलं असताना दुसरीकडे रशियात कमालीची नाराजी पसरलीय. जागतिक बुद्धिबळ स्पर्धेचा दर्जा घसरल्याची टीका माजी जगज्जेता व रशियाचा अव्वल बुद्धिबळपटू व्लादिमिर क्रामनिक याने केली आहे, तर रशियन बुद्धिबळ महासंघाच्या सचिवाने या स्पर्धेचीच चौकशी करण्याची मागणी केली आहे. एकूणच या स्पर्धेबाबत अनेक शंका उपस्थित घेतल्या जात असल्याने बुद्धिबळविश्वात खळबळ उडालीय. प्रश्न हा आहे, की काही रशियन बुद्धिबळपटूंच्या मतांनुसार, खरंच या स्पर्धेचा दर्जा घसरला आहे का?
स्पर्धेच्या दर्जाबाबत प्रश्न कुठे उपस्थित झाला हे समजून घेऊया. विश्वविजेतेपदाची लढत तशी दोन आशियाई देशांमधील. म्हणजे युरोपीय खेळाडू नसलेली स्पर्धा. चीनचा डिंग लिरेन याने २०२३ मध्ये रशियाच्या इयान नेपोमियाची याला पराभूत करीत विश्वविजेतेपद जिंकले होते. त्यामुळे त्याला आव्हान देण्यासाठी कँडिडेट मास्टर स्पर्धा घेतली जाते. या स्पर्धेतून येणारा विजेता डिंग लिरेनचा आव्हानवीर ठरणार होता. ही स्पर्धा भारताचा गुकेश दोम्माराजू याने जिंकली आणि डिंग लिरेन विरुद्ध गुकेश हे चित्र स्पष्ट झालं. गुकेशचं एलो रेटिंग होतं २७८३, तर डिंग लिरेनचं रेटिंग २७२८. मुळात २७०० पेक्षा अधिक रेटिंग असलेले खेळाडू सुपर ग्रँडमास्टर म्हणजे अलौकिक बुद्धिमत्ता असलेलेच असतात. त्यामुळे दोघांमध्ये ५० अंकांचा फरक फार तर कागदोपत्री वजन स्पष्ट करू शकेल. प्रत्यक्षात खेळात त्याला फारशी किंमत नाही, असं मला तरी वाटतं. थोडक्यात काय, तर २७०० पार केलेला रेटिंगप्राप्त खेळाडू संगणकाच्या तोडीच्या चाली करू शकतो. अचूकता, व्यूहरचना यांची उत्तम सांगड घालताना या दिग्गजांच्या चाली अनुभवणं हा एक अनुपम सोहळा असतो.
महत्त्वाचं म्हणजे या विश्वविजेतेपदाच्या लढतीतून मॅग्नस कार्लसनने केव्हाच अंग काढून घेतलं आहे. त्याने पाच वेळा विश्वविजेतेपद जिंकलं आहे. तो ब्लिट्झ, क्लासिक आणि रॅपिड या तिन्ही प्रकारांत विश्वविजेता आहे. त्यामुळे आता त्याला आणखी काही मिळवायचं राहिलेलं नाही. सगळं काही त्याने जिंकलंय. म्हणूनच तो म्हणतो, ‘मला आता आणखी काही सिद्ध करण्याची गरज नाही.’ असो. सांगायचा मुद्दा हा, की मॅग्नस कार्लसनने जेव्हा विश्वविजेतेपदाचा बचाव करण्यास नकार दिला तेव्हाच अनेक महान दिग्गज खेळाडूंनी सांगून टाकलं, की जागतिक बुद्धिबळ स्पर्धेचं महत्त्व आता तसुभरही उरलेलं नाही.
जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत आतापर्यंत अनेक दिग्गजांनी आपली योग्यता सिद्ध केली आहे. विल्हेल्म स्टेनित्झ, स्पास्की, बॉबी फिशरपासून आनंद, कारपोव, कास्पारोव मॅग्नस कार्लसनपर्यंत जेवढे विश्वविजेते झाले, त्यांचा खेळ अलौकिकच होता. मात्र, गुकेश आणि डिंग लिरेन यांच्यातील जगज्जेतेपदाची लढत त्या तोडीची अजिबातच नव्हती, असा सूर उमटत आहे.
काय आहे आक्षेप?
दोम्माराजू गुकेश आणि डिंग लिरेन यांच्यातील जगज्जेतेपदाची लढत चुरशीचीच होती. नवख्या गुकेशला पहिल्याच डावात पराभूत करीत डिंग लिरेनने धक्का दिला. मात्र, तिसऱ्या डावात गुकेशने जोरदार पुनरागमन करीत डिंग लिरेनवर विजय मिळवला आणि १.५-१.५ अशी समान गुणस्थिती आली. त्यानंतर सलग सात डाव बरोबरीत सुटले. ही बरोबरीची कोंडी ११ व्या डावात गुकेशने फोडली आणि महत्त्वपूर्ण विजय मिळवला. १४ डावांच्या या लढतीत केवळ तीन डाव शिल्लक होते. दोघेही तोडीस तोड खेळत होते. त्यामुळे उर्वरित डावांत डिंगला कमबॅक करणं सोपंही नव्हतं. या पराभवानंतर डिंग लिरेन म्हणाला होता, की “अशी परिस्थिती मी गेल्या विश्वविजेतेपदाच्या लढतीतही अनुभवली होती. त्या वेळी मी बाराव्या डावात इयान नेपोनियाचीविरुद्ध विजय मिळवला होता. त्यामुळे अशा दबावातून मी गेलो आहे.” डिंग लिरेन म्हणाला तसंच झालंही. बाराव्या डावात डिंग लिरेन जिंकला आणि पुन्हा समान गुणस्थिती झाली. तेरावा डाव बरोबरीत सुटला. १४ व्या डावातही अखेरपर्यंत स्थिती समान होती. ही स्पर्धा आता सडनडेथवर खेळवली जाईल, अशीच अटकळे बांधली जात होती. मात्र, डिंग लिरेनची हत्तीची चाल चुकली. तिथेच डावाचं चित्र बदललं. जो डाव बरोबरीत सुटणार होता, तो डिंग लिरेनने गमावला. हत्ती आणि उंटांची अदलाबदल गुकेशच्या पथ्यावर पडली. इथेच स्पर्धेच्या दर्जावरून आक्षेप घेण्यास सुरुवात झाली. एखादा क्लब स्तरावरचा खेळाडूही अशी चूक करणार नाही, असा दावा करीत रशियन खेळाडूंनी टीकेची झोड उठवली.
फिलाटोव काय म्हणाले?
रशियन बुद्धिबळ महासंघाचे आंद्रेई फिलाटोव यांनीही जागतिक बुद्धिबळ स्पर्धेच्या लढतीवर चिंता व्यक्त केली. त्यांनी विश्व बुद्धिबळ महासंघाकडे (फिडे) सामन्याची चौकशी करण्याची मागणी केली. विशेषतः 14 व्या डावाची चौकशी व्हायला हवी, असं त्यांचं म्हणणं आहे. चीनचा ग्रँडमास्टर डिंग लिरेन जाणूनबुजून पराभूत झाला, असा आरोप फिलाटोव यांनी केला आहे. रशियाच्या तास (TASS) वृत्तसंस्थेत हे वृत्त प्रसिद्ध झाल्याचे युक्रेनचे बुद्धिबळ प्रशिक्षक यांनी एक्सवर सांगितले.
फिलाटोव यांनी उपस्थित केलेले मुद्दे
- मागील काही डावांचे निकाल व्यावसायिक आणि बुद्धिबळप्रेमींसाठी चिंता वाढविणारे आहेत.
- निर्णायक क्षणी चीनच्या खेळाडूच्या (डिंग लिरेन) हालचाली संशयास्पद होत्या. याची फिडेने स्वतंत्र चौकशी करायला हवी.
- 14 व्या डावातील चिनी खेळाडूचा पराभव अनेक प्रश्न उपस्थित करतो. असं वाटतं, की तो जाणूनबुजून पराभूत झाला आहे.
- बरोबरीची स्थिती असताना डिंग लिरेनने 55 व्या चालीला चूक केली, ज्यामुळे गुकेशने मोहऱ्यांच्या अखेरीस आघाडी घेतली.
हाच तो १४ वा डाव ज्यात डिंग लिरेनने गंभीर चूक केली
क्रामनिक काय म्हणाला?
दोम्माराजू गुकेश आणि डिंग लिरेनच्या लढतीबाबत माजी विश्वविजेता व्लादिमीर क्रामनिक फारसे प्रभावित दिसले नाहीत. डिंगने चूक केल्यानंतर क्रामनिक म्हणाले, हा तर ‘बुद्धिबळाचा अंत’. १४ डाव आटोपल्यानंतर क्रामनिकने खेळाच्या दर्जावर नाराजी व्यक्त केली. लिरेनकडून झालेली गंभीर चूक ‘पोरकटपणा’ असल्याचे म्हटले. क्रामनिकने ‘एक्स’वर पोस्ट केले, की ‘‘काहीच बोलायचं नाही. दु:खद. बुद्धिबळाचा अंतर झाला आहे, जे आम्ही जाणतोय.’’ आणखी एका पोस्टमध्ये ते म्हणतात, ‘‘आतापर्यंत कोणत्याही जागतिक बुद्धिबळ स्पर्धेच्या जेतेपदाचा निर्णय अशा पोरकटपणाच्या चुकीने झालेला नाही.’’ क्रामनिकने या स्पर्धेतील सहाव्या डावानंतरही खेळाच्या दर्जावर टीका केली होती. या डावाला ते ‘दुर्बळ’ म्हणाले होते. ते म्हणाले, ‘‘खरं सांगायचं, तर सहावा डाव पाहून खूप निराश झालो आहे. एवढंच नाही तर पाचवा डावही फार उच्च दर्जाचा नव्हता. मात्र, आज व्यावसायिक खेळाडूंसाठी दोन्ही खेळाडूंचा खेळ फारच कमकुवत होता. खूपच निराशाजनक दर्जा.’’ रशियाचे 49 वर्षीय क्रामनिक 2000 ते 2006 पर्यंत क्लासिकल जागतिक बुद्धिबळ स्पर्धेचे विजेते राहिले आहेत. क्रामनिकने 2000 मध्ये दिग्गज गॅरी कास्पारोवला पराभूत करीत विश्वविजेतेपद जिंकले होते.
(क्रामनिकने आक्षेप घेतलेल्या पाचव्या व सहाव्या डावाचे व्हिडीओ ब्लॉगच्या शेवटी दिले आहेत.)
कास्पारोवचं काय मत आहे?
एकीकडे रशियन टीकेची झोड उठवत असताना रशियाचाच माजी विश्वविजेता गॅरी कास्पारोवने मात्र गुकेशचं कौतुक करीत टीकाकारांनाही सुनावलं. तो म्हणाला, ‘भारतीय खेळाडूने ‘सर्वोच्च शिखराला गवसणी घातली आहे. आणि चुकांचा हिशेब करणाऱ्यांना हे माहिती असलं पाहिजे, की मागील कोणताही सामना चुकांशिवाय झालेला नाही.” हा तोच कास्पारोव आहे, ज्याच्या नावावर सर्वांत कमी वयाच्या विश्वविजेतेपदाचा बहुमान होता. मात्र हा विक्रम गुकेशने सिंगापूरमध्ये मोडीत काढला. कास्पारोवने 1985 मध्ये 22 वर्षीय अनातोली कारपोवचा पराभव केला होता.
कास्पारोवने ‘एक्स’वर पोस्ट केले, की ‘‘त्याने सर्वांत उंच शिखर सर केले आहे आणि आपल्या आईला खूश केले आहे. गुकेश रस्त्यात येणाऱ्या प्रत्येक अडथळे आणि प्रतिस्पर्ध्याला प्रतिभावान शैलीत पार केले आहे. विशेषत: त्याचं वय पाहता यापेक्षा जास्त त्याच्याकडून काहीही मागता येऊ शकत नाही.’’ कास्पारोवचं हे मत का महत्त्वाचं आहे, हे समजून घ्यायला हवं. २०२३ मध्ये जेव्हा विश्वातला नंबर एकचा खेळाडू मॅग्नस कार्लसनने विश्वविजेतेपदाची लढत न खेळण्याचा निर्णय घेतला, तेव्हा बुद्धिबळातील अनेक महान खेळाडूंनी म्हटलं होतं, की जागतिक बुद्धिबळ स्पर्धा आता संपली. या महान खेळाडूंपैकी एक कास्पारोवही आहे, ज्याचं मतही हेच आहे.
कास्पोरोव आता 61 वर्षांचा आहे. गुकेशच्या विजयानंतर कास्पारोव म्हणाले, ‘‘आजची गोष्ट तशी नाही.’’ कास्पारोव सध्या न्यूयॉर्कमध्ये राहतो. तो आता रशियन राजकारणातही सक्रिय आहे. त्याचा समकालीन व्लादिमीर क्रामनिकशी ते अजिबात सहमत नाहीत. ते म्हणाले, की “दोन्ही खेळाडूंची कामगिरी निराशाजनक असेलही आणि स्पर्धेत अनेक चुकाही झाल्या असतील. पण खेळाचा दर्जा फारच उंचावलेला होता. कमीत कमी मागच्या स्पर्धेइतकाच उच्च होता. डिंगने सुंदर प्रतिकार केला. जिथे चुकांचा प्रश्न आहे, तर मला सांगा, अशी कोणती जागतिक स्पर्धा आहे ज्यात चुकाच झाल्या नाहीत. मीही चुका केल्या आणि २०१४ मध्ये कार्लसन-आनंद लढतीतही ‘जी6’ ची दुहेरी चूक आठवा. सामना फार थकविणारे असतात.’’
कास्पारोव म्हणाले, ‘‘गुकेशची तयारी चांगली होती. ज्या खेळाडूने चांगली कामगिरी केली तो जिंकला. त्याचं जिंकणं भारतासाठी एका अभूतपूर्व वर्षाचा समारोप आहे.’’
आनंद गुकेशला म्हणाला, ‘टीकेकडे दुर्लक्ष कर!’
जागतिक बुद्धिबळ स्पर्धेच्या दर्जावर टीका करणाऱ्यांकडे दुर्लक्ष कर, असा सल्ला पाच वेळचे जगज्जेते विश्वनाथन आनंद यांनी गुकेशला दिला. ते म्हणाले, यश नेहमीच टीकेसोबत येतं. गुकेशच्या विजयाने मला आनंद आहे. मी खरोखर इतिहास बनताना पाहिलं.’’ ते म्हणाले, की ‘‘टीका प्रत्येक सामन्यासोबत येते. प्रामाणिकपणे सांगायचं, तर मला वाटतं ती यशासोबत येते. तू याकडे दुर्लक्ष कर. जर तुम्ही ऑलिम्पियाड स्पर्धा पाहिली असेल तर तो खरोखर मजबूत खेळाडू झाला आहे.’’ आनंद म्हणाला, ‘‘आमच्यापैकी बहुतांश जणांना तो १४ वा डाव बरोबरी होईल असंच वाटत होतं. जर डिंगने उंट मागे घेतला असता तर गुकेशला आणखी वेळ लागला असता. मात्र, अचानक खेळाचं चित्र बदललं आणि गुकेश जिंकला. ते भारीच होतं. गुकेशकडे एक जास्तीचं प्यादं होतं. तो जिंकण्याचा मार्ग शोधत होता.’’
कोणताही खेळ असो, चुका होतच असतात. तो खेळाचा एक भाग आहे. मात्र, जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत झालेल्या चुका जागतिक दर्जाच्या खेळाडूंना शोभणाऱ्या नाहीत, असं क्रामनिकसह रशियन बुद्धिबळ महासंघाचं मतही महत्त्वाचं आहे. आतापर्यंत जेवढे जगज्जेते झाले, त्यांचा खेळ पाहणे एक अलौकिक अनुभूती होती. ही परंपरा अगदी अलीकडच्या मॅग्नस कार्लसनपर्यंत टिकून आहे. कार्लसन याला हरवणं आजही सोपं नाही. त्याच्याही आधी अनातोली कारपोव, गॅरी कास्पारोव, विश्वनाथन आनंद असो, किंवा त्यांच्याही आधी स्पास्की, बॉबी फिशर यांचा दबदबा होता. कार्लसनच्या तोडीचा खेळाडू आजही नाही. त्याला जगज्जेतेपदाच्या लढतीत कोणीही हरवू शकलं नाही. जगज्जेते होणं काय असतं तर या अशा खेळाडूंकडे पाहून कळतं. मात्र, तसं चीनच्या डिंग लिरेनकडे पाहून वाटत होतं का, किंबहुना गुकेशकडे पाहून वाटतं का? गुकेशचं वय पाहता त्याच्याबाबत आताच काही निष्कर्ष काढणं धाडसाचं ठरेल. डिंग लिरेन सलग 100 डाव पराभूत झाला नव्हता. हा एक विक्रमच होता, जो अलीकडेच मॅग्नस कार्लसनने मोडीत काढला. मात्र, तरीही कार्लसन हाच विश्वातला सर्वोत्तम खेळाडू आहे. गुकेश आणि डिंग लिरेन यांच्या उत्तम दर्जाबाबत कुणालाही शंका नाही, पण ते महान खेळाडूंच्या पंक्तीत जाऊन बसतील का हे येणारा काळच ठरवेल. त्यामुळेच नवा जगज्जेता पुढे किती काळ पटावर हुकूमत राखतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.