सूर्यनमस्कार घाला नि हे आजार पळवा!
सूर्यनमस्कार घाला नि हे आजार पळवा..!
सूर्यनमस्कार ही एक प्राचीन उपासना व व्यायामपद्धती असून, नियमित सूर्यनमस्कार Surya Namaskar | घातल्याने सर्वांगीण आरोग्य लाभते. सूर्यनमस्कार शक्यतो सकाळीच करावेत. सकाळी अगदीच शक्य नसेल तर दिवसभरात ज्या वेळी पोट रिकामे असेल त्या वेळी करावे.
रोज सूर्यनमस्कार केल्याने भरपूर फायदे मिळतात. जसे पचनशक्ती सुधारते. वाताचा त्रास कमी होतो. आम्लपित्त, अपचन, बद्धकोष्ठता इ. त्रास कमी होतात. अतिरिक्त चरबी, वजन कमी होते. क्षमता वाढते. श्वसनक्षमता सुधारते. रक्ताभिसरण सुधारते. शरीराची लवचिकता वाढते. पाठीच्या व कंबरेच्या स्नायूंची ताकद वाढते.
थायरॉइड, दमा, मधुमेह, महिलांच्या समस्या, वातामुळे होणारी दुखणी इ. त्रास कमी करण्यासाठी सूर्यनमस्कार अभ्यासाचा रोज सराव करावा. सूर्यनमस्कार Surya Namaskar | शांतपणे करावेत. घाईगडबडीने उरकू नयेत.
सर्वप्रथम सराव करण्यापूर्वी योग्य मार्गदर्शनाखाली शिकून घेणे आवश्यक आहे. काही जुने त्रास किंवा व्याधी असेल तर योग्य सल्ला घेऊन मगच सराव सुरू करावा. सूर्यनमस्कार करण्याच्या विविध पद्धती आहेत. दहा अंकात, बारा अंकात, विविध आसने त्यामध्ये अंतर्भूत आहेत. त्याचप्रमाणे खुर्चीवर बसूनही सूर्यनमस्कार करता येतात. ज्यांना वाकणे किंवा अतिवजनामुळे शक्य नाही, त्यांनी खुर्चीत बसून सराव करावा.
आपण सूर्यनमस्कार दहा अंकातील बघणार आहोत; पण त्याआधी सूर्यनमस्काराचे श्लोक व मंत्र बघूयात.
सूर्यनमस्कार करण्यापूर्वी हा श्लोक म्हणावा…
ॐ ध्येयः सदा सवितृ मण्डल मध्यवर्ती।
नारायणः सरसिजा सन सन्निविष्ट ।
केयुरवान् मकरकुण्डलवान् किरीटी हारी ।
हिरण्यमय वपुर्धृतशखँ चक्रः ॐ।।
त्यानंतर एक मंत्र- एक सूर्यनमस्कार असे 14 मंत्र व 14 सूर्यनमस्कार घालावेत. मंत्र पुढीलप्रमाणे…
1. ॐ मित्राय नमः
2. ॐ रवये नमः
3. ॐ सूर्याय नमः
4.ॐ भानवे नमः
5.ॐ खगाय नमः
6. ॐ पूष्णे नमः
7. ॐ हिरण्यगर्भाय नमः
8. ॐ मरीचये नमः
9. ॐ आदित्याय नमः
10. ॐ सवित्रे नमः
11. ॐ अर्काय नमः
12. ॐ भास्कराय नमः
13. ॐ सवितृ सूर्यनारायणाय नमः।
14. ॐ ऱ्हाम ऱ्हीम ऱ्हूम ऱ्हैम ऱ्हौम ऱ्ह:।
सूर्यनमस्कार झाल्यावर पुढील श्लोक म्हणावा…
आदित्यस्य नमस्कारान् ये कुर्वन्ति दिने दिने।
आयुः प्रज्ञा बलं वीर्यं तेजस्तेषां च जायते ॥
सूर्यनमस्कार करण्यासाठी स्वच्छ, मोकळी, हवेशीर जागा निवडावी. सूर्यनमस्कार करताना योग्य कपडे परिधान करावेत, जेणेकरून सूर्यनमस्कार करताना अडथळा येणार नाही. आपण आता दहा अंकातील सूर्यनमस्कार स्थितींचा अभ्यास करूयात.
प्रथम दोन्ही हात जोडून व पाऊले जुळवून ताठ उभे राहावे. श्वसन संथ सुरू ठेवावेत. या स्थितीमध्ये श्वोक व मंत्र म्हणावा. म्हणजेच नमस्कार स्थिती.
स्थिती 1. ताडासन
दोन्ही हात वरच्या दिशेला ताणून घेणे, दोन्ही दंड दोन्ही कानांना टेकलेले असावेत. जेवढे शक्य आहे तेवढे कंबरेतून मागे वाकावे. श्वास घेत हात वर घेणे.
स्थिती 2. पादहस्तासन
श्वास सोडून कंबरेतून पुढे वाकणे. हाताचे तळवे जमिनीला पावलांच्या बाजूला टेकविणे. कपाळ गुडघ्याच्या खाली व पोट मांडीला टेकविणे. दोन्ही गुडघे ताठ ठेवणे.
स्थिती 3. अर्धभुजंगासन किंवा अश्वसंचलनासन
श्वास घेत डावा पाय मागे घ्यावा. मागच्या पायाचा गुडघा जमिनीवर टेकवावा. पुढच्या पायाची मांडी व पोटरी एकमेकांना जुळवावी. पाऊल दोन हातांच्या मागे असावे. मान समोर किंवा वरच्या बाजूला असावी.
स्थिती 4. हस्तपादासन
श्वास रोखत पुढचा पाय मागे घ्यावा. मागच्या पावलाजवळ पुढचे पाऊल नेऊन दोन्ही पाय जुळवावेत. वजन हाताच्या तळव्यावर व पायाच्या चवड्यावर तोलले जाईल. नजर स्थिर ठेवावी.
स्थिती 5. अष्टांगासन
श्वास सोडत कंबरेतून जमिनीच्या दिशेला जावे. अष्टांग- कपाळ, छाती, दोन्ही हातांचे तळवे, दोन्ही गुडघे, दोन्ही चवडे जमिनीला टेकवावेत. पायाचा भाग जमिनीपासून वर उचलावा.
स्थिती 6. भुजंगासन
श्वास घेत शरीराचा पुढचा भाग डोके, छाती, पोट जमिनीपासून वर उचलावा. मान मागे करावी. मांडी, पाय जमिनीला टेकलेले असावे. दोन्ही पावले जुळलेली असावीत. हात कोपरात ताठ असावेत.
स्थिती 7. अधोमुखश्वानासन
श्वास सोडत पोट व मांडीचा भाग जमिनीपासून वर उचलावा. हाताचे तळवे, पायाचे तळवे व डोक्याचा वरचा भाग (टाळू) जमिनीला टेकलेला असावा. दोन्ही हात व दोन्ही पाय ताठ असावेत. हनुवटी कठकुपात रुतवावी.
स्थिती 8. अर्धभुजंगासन व अश्वसंचलनासन
श्वास घेत डावा पाय (पाऊल) दोन्ही हातांच्या मधे पुढच्या बाजूला घ्यावा. मागच्या पाया गुडघा जमिनीला टेकवावा. मान वरच्या बाजूला घ्यावी. पुढच्या पायाची मांडी व पोटरी एकमेकांना जुळलेली असावी.
स्थिती 9. पादहस्तासन
श्वास सोडत मागचा पाय पुढे घ्यावा. पुढच्या पावलाला जुळवावा. दोन्ही हातांच्या मधे घ्यावा. दोन्ही गुडघे ताठ करावेत. गुडघ्यांच्या खाली टेकवावे. पोट मांडीला टेकवावे.
स्थिती 10. नमस्कारासन
श्वास घेत कंबरेतून ताठ व्हावे. सरळ उभे राहावे. दोन्ही हात नमस्कार स्थितीमध्ये ठेवावे. म्हणजेच पूर्ण स्थितीमध्ये यावे.
आसन म्हणजे काय?
[jnews_block_8 first_title=”Read more at :” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”1238″]
Excellent guidelines
Thanks for ur guidance. Do u take some classes.
Awesome information!!
Thanks for sharing Manali