खरंच श्रीलंकेने भारताला सामना ‘विकला?’
भारताने जिंकलेल्या २०११ च्या विश्वकरंडकावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. २०११ मध्ये विश्वकरंडक क्रिकेट (cricket) स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताने श्रीलंकेला पराभूत करून विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. मात्र, हा सामना श्रीलंकेने (Sri lanka) भारताला ‘विकला’(match fixing) होता, असा सनसनाटी आरोप श्रीलंकेचे माजी क्रीडामंत्री महिंदानंद अलुथगामगे यांनी १८ जून २०२० रोजी केला आहे. त्यामुळे यावरून उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. हा आरोप तथ्यहीन असल्याची टीका श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकारा आणि माहेला जयवर्धने यांनी केला आहे. पुरावे द्या, मग आरोप करा, असे आव्हानच या दोन्ही क्रिकेटपटूंनी केला आहे.
श्रीलंकेतील ‘सिरासा’ या वाहिनीवर अलुथगामगे यांनी मुलाखत दिली आहे. त्यात त्यांनी आरोप केला, की भारताविरुद्धचा सामना निश्चित होता. या सामन्यात श्रीलंकेने २७५ धावांचे लक्ष्य दिले होते. त्याचा पाठलाग करताना गौतम गंभीर (९७) आणि कर्णधार महेंद्रसिंह धोनी (९१) यांच्या धुव्वाधार फलंदाजीच्या जोरावर भारताने हा सामना जिंकला होता.
मात्र, श्रीलंकेचे तत्कालीन क्रीडामंत्री अलुथगामगे यांनी सांगितले, ‘‘मी ठामपणे सांगू शकतो, की आम्ही २०११ चा विश्वकरंडक भारताला विकला होता. जेव्हा मी क्रीडामंत्री होतो तेव्हा मी हे सांगितलं होतं.’’
श्रीलंकेत पाच ऑगस्टमध्ये निवडणुका आहेत. सध्याच्या काळजीवाहू सरकारमध्ये अलुथामगे वीज राज्यमंत्री आहेत. ते म्हणाले, ‘‘एका देशाचा प्रतिनिधी म्हणून मी ही घोषणा करणार नव्हतो. मला आठवत नाही, की ते वर्ष २०११ होते की २०१२. मात्र, आम्ही तो सामना जिंकायला हवा होता.’’
ते म्हणाले, ‘‘मी हे अत्यंत जबाबदारीने सांगत आहे. मला जाणवलं, की तो सामना निश्चित होता. मी कोणाशीही युक्तिवाद करू शकतो. मला माहीत आहे, की अनेक जण यामुळे चिंतीत असतील.’’
हे वृत्त धडकले तेव्हा श्रीलंकेच्या कर्णधार संगकाराने अलुथामगे यांना ट्विटरवर प्रत्युत्तर दिले आहे. तुमच्याकडे माहिती असेल तर भ्रष्टाचारविरोधी चौकशी समितीकडे पुरावे सादर करा. संगकाराने ट्विटवर सांगितले, ‘‘त्यांनी आपल्या आपले साक्षीपुरावे आयसीसीकडे सादर करावेत, ज्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी होऊ शकेल.’’
या सामन्यात श्रीलंकेचा माजी कर्णधार माहेला जयवर्धने याने शतक झळकावले होते. त्याने हे आरोप फेटाळले आहेत. त्याने अलुथामगे यांना ट्विटवर टोला हाणला- ‘‘काय निवडणुका होत आहेत?…. जी सर्कस सुरू झाली आहे ती आवडलीय… नाव आणि पुरावे?’’
अलुथगामगे यांनी सांगितले, की माझा रोख निकाल निश्चित करणाऱ्या खेळाडूंवरच नाही, तर काही पक्षही यात सहभागी होते. अलुथगामगे यांनी यापूर्वीही संकेत दिले होते, की तो सामना निश्चित होता. अलुथगामगे आणि तत्कालीन राष्ट्रपती महिंदा राजपक्षे यांना मुंबईत वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या अंतिम सामन्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. विश्वकरंडक विजेत्या श्रीलंका संघाचे कर्णधारपद भूषविलेल्या अर्जुन रणतुंगाने २०११ च्या विश्वकरंडक स्पर्धेच्या अंतिम सामनानिश्चिती प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती.
खरंच असं घडलं होतं का?
श्रीलंकेचे तत्कालीन क्रीडामंत्री अलुथगामगे यांनी गौप्यस्फोट करून खळबळ तर उडवून दिलीय, पण आता प्रश्न हा उपस्थित होतोय, की खरंच असं काही घडलं होतं का? त्यांच्या एकूणच वक्तव्यातून स्पष्टता कुठेही दिसत नाही. कारण त्यांना हे स्पष्टपणे आठवत नाही, की ते वर्ष २०११ होते की २०१२? मात्र, तरीही ते २०११ च्या वर्ल्डकपची फायनल होती असं ते म्हणत आहेत.
दुसरा मुद्दा पुराव्यांचा. जर त्यांना सामनानिश्चिती झाली होती असं वाटत होतं, तर त्याविरुद्धचे पुरावे द्यायला हवे. ठीक आहे, आरोप करण्यापूर्वी पुरावे सादर केले नसतील, पण त्यांनी आरोप करताना प्रत्येक घटनेच्या संशयास्पद बाबींचा मुद्देसूद उलगडा तरी केला असता. पण तसेही त्यांनी काही केलेले नाही. जर हे खरे असेल तर ते आयसीसीच्या निदर्शनास आणून का दिले नाही? यामागचे कारण वेगळेच असू शकते.
तिसरा मुद्दा म्हणजे पुढच्याच महिन्यात श्रीलंकेची निवडणूक आहे. माहेला जयवर्धनेनेही ट्विटवर याच मुद्द्याकडे लक्ष वेधले आहे. सवंग लोकप्रियतेसाठी अलुथगामगे यांनी केलेली ही जाणीवपूर्वक शब्दपेरणी आहे. कारण त्यांनी आरोप करताना असेही म्हंटले आहे, की माझा रोख खेळाडूंवरच नाही, तर काही पक्षांवरही आहे. म्हणजेच त्यांनी हा निवडणुकीचा एक फंडाही असू शकतो.
असो, पण आरोपाने श्रीलंकेचे खेळाडूच नाही, तर महेंद्रसिंह धोनीच्याही प्रामाणिकपणावर शंका घेतली आहे. हे खरं आहे की खोटं, हे पाहण्यापूर्वी शंका घेणारे प्रश्नांची राळ उठवणार हे नक्की. जे साध्य करायचं होतं ते अलुथगामगे यांनी साध्य केलं आहे. आता खेळाडूंसह बीसीसीआय याविरुद्ध काय भूमिका घेते हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. काहीही असो, पण आता चर्चा तर होणारच…
फिक्सिंगच्या आरोपांची चौकशी होणार
विश्व कप २०११ मधील अंतिम फेरीत श्रीलंकेने भारताविरुद्ध सामना निश्चित केल्याचा आरोप श्रीलंकेचे तत्कालीन क्रीडामंत्री महिंदानंदा अलुथगामेगे यांनी केल्यानंतर खळबळ उडाली होती. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश श्रीलंका सरकारने दिले आहेत. क्रीडामंत्री डल्लास अलाहाप्पेरूमा यांनी चौकशीचे आदेश देण्याबरोबरच दर दोन आठवड्यांनी अहवाल सादर करण्यासही सांगितले आहे. क्रीडा सचिव रूवानचंद्रा यांनी क्रीडामंत्र्यांच्या निर्देशानुसार शनिवारी, १९ जून २०२० रोजी मंत्रालयाच्या चौकशी अधिकाऱ्यासमोर तक्रार दाखल केली होती. अलुथगामेगे यांनी आरोप केला होता, की श्रीलंका संघाने भारताविरुद्धचा सामना ‘विकला’ होता. तत्कालीन कर्णधार कुमार संगकारा आणि माहेला जयवर्धने यांनी आरोपाचे खंडन करीत पुरावे सादर करण्याची मागणी केली होती.
संगकाराला द्यावा लागणार जबाब
श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकाराला क्रीडा मंत्रालयाच्या विशेष चौकशी समितीसमोर जबाब देण्यास सांगितले आहे. विश्वकप २०११ मध्ये भारताविरुद्धचा अंतिम फेरीतला सामना निश्चित असल्याच्या आरोपाची चौकशी ही समिती करणार आहे.
श्रीलंकेचे माजी क्रीडामंत्री महिंदानंदा अलुथगामगे यांनी आरोप केला होता, की २०११ च्या विश्व कप स्पर्धेत अंतिम फेरीत भारताविरुद्ध श्रीलंकेच्या संघाचा काही पक्षांनी निश्चित केला होता. त्या वेळी संगकारा श्रीलंकेचा कर्णधार होता. ‘डेली मिरर’ या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, संगकाराला चौकशी समितीने जबाब देण्यास सांगितले आहे. संगकाराला गुरुवारी २ जुलै २०२० रोजी सकाळी ९ वाजता चौकशी समितीसमोर जबाब देण्यास सांगितल्याचेही या वृत्तात नमूद करण्यात आले आहे. विशेष चौकशी समितीने श्रीलंकेचा फलंदाज अरविंद डी’सिल्वा आणि उपुल थरंगा यांचे जबाबही नोंदवले आहेत. त्या वेळी डी’सिल्वा संघनिवड समितीचे अध्यक्ष होते. चौकशी समितीने २४ जून रोजी अलुथगामगे यांचा जबाबही घेतला होता. अलुथगामगे यांनी सुरुवातीला फक्त शंका व्यक्त केली होती. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, असे ते म्हणाले होते.