मी का गप्प बसावं?
मँचेस्टर
अमेरिकेत जॉर्ज फ्लॉयडची वर्णद्वेषातून (racism) हत्या करण्यात आल्यानंतर जगभरात त्याचे पडसाद उमटत आहेत. या वर्णद्वेषाने अनेक खेळाडूंनाही बऱ्याच कटू प्रसंगांना सामोरे जावे लागले आहे. जसे महिलांविरुद्ध हॅशटॅग मी टू प्रकरण गाजलं, तसंच वर्णद्वेषावरून हॅशटॅग ब्लॅक लाइव्ह्स मॅटर #blacklivesmatter | प्रचंड गाजत आहे. आता या प्रकरणात जेम्स अँडरसननेही James Anderson | उडी घेतली आहे. ज्या वेळी गेल्या वर्षी न्यूझीलंड दौऱ्यात इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरवर वर्णद्वेषी टिप्पणी करण्यात आली होती, त्या वेळी मी काहीही बोललो नाही. मी या घटनेकडे पाठ फिरवल्याने मीही दोषी असल्याची सल अँडरसनने व्यक्त केली आहे.
अमेरिकेत एका पोलिसाने मूळ आफ्रिकी वंशाच्या जॉर्ज फ्लॉयड या अमेरिकी नागरिकाला जीव गमवावा लागल्यानंतर संपूर्ण क्रीडाविश्व वर्णभेदाविरुद्ध जागतिक अभियानात सहभागी होत आहे. अँडरसन न्यूझीलंड दौऱ्यात नव्हता. मात्र, तो म्हणाला, की जेव्हा आर्चरवर वर्णद्वेषी टिप्पणी करण्यात आली तेव्हा मी आत्मचिंतन केलं होतं. न्यूझीलंड दौऱ्यात एका प्रेक्षकाने आर्चरवर वर्णद्वेषी टिप्पणी केली होती. त्या वेळी आर्चरने हा उलगडा जगासमोर केला होता. मात्र, त्यावर क्रिकेटमध्ये फारशा प्रतिक्रिया उमटल्या नाहीत. मात्र, जॉर्ज फ्लॉयडच्या मृत्यूनंतर आता वर्णभेदावर खुलेपणाने खेळाडू बोलत आहेत.
अँडरसन म्हणाला, ‘‘आता खेळाडू आणि खेळ या नात्याने या प्रकरणावर अधिक स्पष्टपणे विरोध करायला हवा. त्या वेळी मी विचार केला, की कधी मीही क्रिकेटच्या मैदानावर वर्णभेदाचा अनुभव केला आहे? मला तर अशी कोणतीही घटना आठवत नाही. मी त्या वेळी न्यूझीलंड दौऱ्यावर नव्हतो, जेव्हा जोफ्रावर वर्णद्वेषी टिप्पणी करण्यात आली होती.’’
अँडरसन म्हणाला, ‘‘आता मला विचार करण्यास प्रवृत्त केले आहे. अशा घटना घडत असताना मी त्याकडे दुर्लक्ष तर केले नाही ना? मी अशा घटनेकडे तोंड फिरवले तर नाही ना? जर माझ्या सहकाऱ्यांबाबत असा दुराचार झाला असेल, तर मला या खेळाडूंच्या पाठीशी राहायला हवे.’’
अँडरसनने मांडलेले हे मत क्रीडाविश्वात महत्त्वपूर्ण मानले जात आहे. अँडरसन श्वेतवर्णीय आहे. अशा वेळी त्याने जगजाहीर भूमिका मांडल्याने वर्णभेदाविरुद्ध नव्याने चर्चेला तोंड फुटले आहे हे नक्की.
कोण आहे अँडरसन?
जेम्स अँडरसनला जिमी अँडरसन म्हणून ओळखले जाते. त्याचा जन्म इंग्लंडमधील बर्नली लँकेशायर येथे 30 जुलै 1982 रोजी झाला आहे. वेगवान गोलंदाज म्हणून इंग्लंडच्या संघातील तो हुकमी क्रिकेटपटू cricket | होता. लँकेशायर संघातर्फे त्याने इंग्लिश कौंटी सामने गाजवले आहेत. आपल्या गुणवत्तेच्या जोरावर तो इंग्लंड क्रिकेट संघात दाखल झाला. वेगवान गोलंदाज म्हणून आपला दबदबा राखताना त्याने ग्लेन मॅकग्रथचा सर्वाधिक 563 गडी टिपण्याचा विक्रम मोडीत काढला होता. कसोटी आणि वन-डे आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात इंग्लंड संघातर्फे सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम आजही त्याच्याच नावावर आहे. इंग्लंडचा तो संघातील एकमेव व जगातील सहावा गोलंदाज आहे, ज्याने पाचशेपेक्षा अधिक विकेट घेतल्या आहेत.