‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’ संकटात
करोना महामारीमुळे (coronavirus) सध्या ‘क्रिकेट आस्ट्रेलिया’ (Cricket Australia) आर्थिक संकटात सापडली आहे. यापूर्वीच त्यांनी खर्चात कपात, शिवाय वरिष्ठ प्रशासकांचा बोनसमध्येही कपात केली होती. एवढेच नाही तर आता 40 टक्के कर्मचाऱ्यांची कपात करण्यात येणार आहे. करोना महामारीचं संकट कमी होत नसल्याने ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’चे पाय आणखी खोलात गेले आहेत. त्यामुळे या संकटातून बाहेर येण्यासाठी त्यांनी कर्मचारी कपातीबरोबरच आणखी एक निर्णय घेतला आहे, तो म्हणजे ऑस्ट्रेलिया अ संघाचे आंतरराष्ट्रीय दौरे करण्याचा.
‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’चे केविन रॉबर्ट्स यांना १६ जून २०२० रोजी राजीनामा द्यावा लागला होता. आता त्यांच्या जागी मुख्य कार्यकारी अधिकारी पद निक हॉकले यांच्याकडे आले आहे. त्यांनी एक नवी योजना आणली आहे. या नव्या योजनेनुसार त्यांना वाटतं, की यामुळे खेळाला आणखी दीर्घकालीन स्थैर्य आणि विकास निश्चित करता येईल. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने १७ जून २०२० रोजी एक प्रसिद्धिपत्रक प्रकाशित केलं आहे. त्यात नमूद केलं आहे, ‘‘आम्हाला खेदाने सांगावे लागत आहे, की 40 टक्के कर्मचाऱ्यांची कपात करावी लागणार आहे. हा क्रिकेटसाठी अत्यंत कठीण काळ आहे.’’
रॉबर्ट्सच्या नेतृत्वाखाली ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’ने एप्रिलमध्ये आपला ८० टक्के स्टाफ सरकारी खर्चात टाकला होता. ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’चे अध्यक्ष अर्ल एडिंग्स यांनी सांगितले, की हा कर्मचाऱ्यांसाठी कठीण काळ आहे. मात्र, हा निर्णय करोना महामारीदरम्यान खेळाला स्थैर्य देण्यासाठी घेतला आहे. एवढेच नाही, तर ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’ने २०२१ या आर्थिक वर्षातील ऑस्ट्रेलिया अ संघाचे सर्व कार्यक्रम, फॉक्स क्रिकेट राष्ट्रीय प्रीमियर क्रिकेट टी-२० आणि टोयोटा सेकंड इलेव्हन स्पर्धाही रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.