Chetan Sharma Sting- भारतीय खेळाडू उत्तेजक घेतात!
Chetan Sharma Sting- भारतीय खेळाडू उत्तेजक घेतात!
भारतीय क्रिकेटपटू उत्तेजक घेतात का? या प्रश्नाचं उत्तर थेट देणं धाडसाचं ठरेल. मात्र, दस्तूरखुद्द निवड राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा (Chetan Sharma Sting) यांनीच त्याचं थेट उत्तर दिल्यानं आमचंही धाडस वाढलं…
एका स्टिंग (Sting) ऑपरेशनमध्येच 14 फेब्रुवारी 2023 रोजी चेतन शर्मा (Chetan Sharma) यांनी सांगितलं, की होय, भारताचे आघाडीचे खेळाडू उत्तेजक घेतात.
हा धक्कादायक खुलासा होता. यामुळे भारतीय क्रिकेटची प्रतिमा मलिन तर झालीच, शिवाय त्यांचं पदही धोक्यात आलं. जेव्हा हे स्टिंग ऑपरेशन आलं त्याच्या तीनच दिवसांत 17 फेब्रुवारी 2023 रोजी त्यांना राजीनामा द्यावा लागला.
‘भारताचे आघाडीचे क्रिकेटपटू तंदुरुस्त राहण्यासाठी उत्तेजकांचे सेवन करतात,’ असा दावा चेतन शर्मा (Chetan Sharma) यांनी एका ‘स्टिंग (Sting) ऑपरेशन’मध्ये केला होता.
उत्तेजक चाचणीत पकडले जाणार नाही, अशी इंजक्शनेच खेळाडू घेतात, असेही त्यांनी म्हटले.
खरं तर हा वैश्विक मुद्दा आहे. चेतन शर्मा यांनी भारतीय क्रिकेटपटूंना लक्ष्य केलं असलं तरी जगभरात हे सर्रास होतं.
यापूर्वी शेन वॉर्न, युसूफ पठाण, आंद्रे रसेल यांच्यापासून तर अलीकडे पृथ्वी साव याच्यासारखा तरुण खेळाडूलाही उत्तेजक घेतल्याने बंदीला सामोरे जावे लागले होते. असो..
Sting Operation मध्ये काय म्हणाले Chetan Sharma?
‘भारतीय क्रिकेटपटू उत्तेजक घेतात; पण ते उत्तेजक चाचणीत आढळत नाही.
राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक संस्थाही या खेळाडूंना पकडू शकत नाही.
भारतीय संघात 80 किंवा 85 टक्के तंदुरुस्त असलेल्या खेळाडूंना स्थान मिळत नाही.
चेतन शर्मा (Chetan Sharma) यांनी स्टिंग (Sting) ऑपरेशनमध्ये आणखी बरेच काही खुलासे केले आहेत.
कशासाठी घेतले जाते उत्तेजक द्रव?
भारतीय क्रिकेटपटू कशासाठी हे उत्तेजक द्रव घेतात, याचं उत्तरही चेतन शर्मा यांनी दिलं आहे.
भारतीय संघातील स्थान कायम राखण्यासाठी खेळाडू उत्तेजक घेतात.
त्यामुळे त्यांची शारीरिक क्षमता वाढते. भारतीय संघातील स्थानासाठी खूप तीव्र स्पर्धा आहे.
कोणीही संघातील स्थान गमावण्यास तयार नसतो. ते आपल्या लहान, मोठ्या दुखापती लपवण्याचा प्रयत्न करतात.
हे खेळाडू उत्तेजक घेतल्याचा आपल्याकडे कोणताही पुरावा नाही.
मात्र, हे खेळाडू कोण आहेत, हे मी जाणतो, असेही ते म्हणाला.
कोहली गांगुलीच्या विरोधात?
भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे माजी अध्यक्ष सौरभ गांगुली यांच्यातही वाद होता.
कोहली तर गांगुलीच्या पाठीमागे लागला होता, असा दावाही शर्मा यांनी केला आहे.
एखादा क्रिकेटपटू मोठा झाला की आपण काहीही करू शकतो असे त्याला वाटते.
त्यामुळे त्याने (कोहली) अध्यक्षांना लक्ष्य करण्याचे ठरवले.
गांगुली याबाबत माझ्याशी काहीही बोलले नाहीत; पण कोहली त्यांच्या मागे लागला होता, असा दावा शर्मा यांनी केला.
गांगुलीमुळे आपण कर्णधारपद गमावले असे कोहलीला वाटत होते.
निवड समितीच्या बैठकीस एकूण नऊ जण उपस्थित होते.
तू एकदा विचार कर, असे गांगुलींनी कोहलीला सांगितले असावे.
कोहलीने ते कदाचित ऐकले नसावे, असेही शर्मा म्हणाले.
चेतन शर्मा बोलले, पण…
स्टिंग ऑपरेशनदरम्यान बीसीसीआय, माजी अध्यक्ष आणि खेळाडूंबद्दल माहिती दिल्याने चेतन शर्मा यांनी मात्र वाद ओढवून घेतला.
एवढं सगळं उघड केल्यानंतर बीसीसीआय शांत कशी बसणार?
काही तरी दखल घ्यावी लागणारच. म्हणूनच बीसीसीआय त्यांच्यावर काय कारवाई करणार, याबाबत उत्सुकता साहजिकच होती.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघाची निवड पुढील बैठकीत अपेक्षित आहे.
या बैठकीत शर्मा यांना प्रवेश मिळणार का, हाही एक प्रश्न उपस्थित केला जात होता.
बीसीसीआयमधील काही जणांनी चेतन शर्माचे आरोप चुकीचे ठरवले. साहजिकच आहे.
एवढा मोठा गौप्यस्फोट केल्यानंतर काही तरी सारवासारव करावी लागणारच.
गांगुली-कोहलीच्या संबंधाबाबतही भाष्य केल्याने या दोघांकडूनही कधी तरी प्रतिक्रिया उमटणारच.
यावर गांगुली किंवा कोहली लगेच उत्तर देणार नाहीत.
मात्र, यथावकाश त्याचाही खुलासा या दोघांनाही कधी तरी करावा लागेलच.
अखेर चेतन शर्मा यांचा राजीनामा
भारतीय क्रिकेटपटूंना लक्ष्य केल्याची शिक्षा अखेर चेतन शर्मा यांना झालीच.
शर्मा यांनी आपल्या अध्यक्षपदाचा शुक्रवारी, 17 फेब्रुवारी 2023 रोजी राजीनामा दिला.
दिला की द्यावा लागला, याचं उत्तर आपापल्या सोयीने लावावं.
मात्र, राजीनामा देणे भाग पडले हे मात्र नक्की.
कारण शर्मा हे निवड समितीमधील सहकाऱ्यांसह बंगाल आणि सौराष्ट्र यांच्यातील रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम लढतीस पहिल्या दिवशी उपस्थित होते.
मात्र, लढतीच्या दुसऱ्या दिवशी शर्मा मैदानात दिसले नाहीत.
काही वेळातच शर्मा यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा सुरू झाली.
त्याला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी दुजोराही दिला.
झी वृत्तवाहिनीने स्टिंग ऑपरेशन करणे चुकीचे होते, असा पवित्रा सुरुवातीला ‘बीसीसीआय’च्या काही पदाधिकाऱ्यांनी घेतला होता.
मात्र, त्यांना काय दोष द्यायचा? आपलंच नाणं खोटं. म्हणून त्यांनी शर्मा यांनाच लक्ष्य केलं.
चेतन शर्मा यांनी कोणाशीही खासगीत बोलताना भान बाळगायला हवं होतं, असंही बोललं जाऊ लागलं.
शर्मा यांच्या शेरेबाजीचे दूरगामी परिणाम लक्षात घेऊन शर्मा यांच्यावर कारवाई होणारच होती.
मात्र, ही नामुष्की ओढवण्यापूर्वीच शर्मा यांनी राजीनामा दिला.
शर्मा यांच्यासह सलील अंकोला, सुब्रतो बॅनर्जी, एस. शरथ; तसेच शिवसुंदर दास हे निवड समितीचे सदस्य गुरुवारी रणजी अंतिम सामन्याच्या पहिल्या दिवशी स्टेडियमवर उपस्थित होते.
हे सदस्य पुन्हा काही बोलण्यापूर्वीच त्यांना प्रसिद्धी माध्यमांपासून दूर ठेवण्यात आलं होतं.
शर्मा यांनी 17 फेब्रुवारी 2023 रोजी मैदानावर येणे टाळले.
तसेच कोलकात्याहूनच राजीनाम्याचा ई-मेल पाठवल्याचे सूत्रांनी सांगितले.
ते तातडीने दिल्लीकडे रवानाही झाले. त्यांनी माध्यमांशी बोलणे टाळले.
माजी खेळाडू नाराज तर होणारच…
आता एवढा गौप्यस्फोट केल्यानंतर माजी खेळाडू नाराज तर होणारच.
माजी अध्यक्ष सौरभ गांगुली यांना बीसीसीआयच्या अध्यक्षपदावरून हटवण्यासाठी विराट कोहलीने प्रयत्न केले.
त्याचबरोबर हार्दिक पंड्या आणि रोहित शर्मा सातत्याने आपली भेट घेत होते.
आपल्या घरी कित्येक तास थांबत असत, अशी शेरेबाजी शर्मा यांनी केल्याचे दिसले होते.
त्यामुळे भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडूही नाराज होते.
त्यांनी याबाबत बोर्डाकडे तक्रार केली होती.
त्यामुळेच शर्मा यांच्याविरुद्ध कारवाई अटळ होती. त्यावर हालचालीही सुरू झाल्या.
कारवाई इतक्या सहज होत नाही. त्यासाठी चौकशी समिती नेमावी लागेल.
हे सगळं करण्यापेक्षा चेतन शर्मा यांच्याशीच कदाचित बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांचं बोलणं झालं असावं.
आणखी काही वाद चव्हाट्यावर येण्यापूर्वीच तू राजीनामा दे, असं कदाचित सुचवलं असावं.
बदनामीही टळेल आणि चर्चाही थांबतील. चौकशी समिती नेमण्याची झंझटही राहणार नाही.
त्यामुळेच चेतन शर्मा यांनी राजीनामा देऊन बीसीसीआयचं काम सोपं केलं असावं.
बुमराहचं दुखणं आणि तक्रार…
जसप्रीत बुमराहला भारतीय संघात आणण्यासाठी संघव्यवस्थापन कमालीचे आग्रही होते.
त्यामुळे बुमराहची निवड करणे भाग पडल्याचे संकेत शर्मा यांनी दिले होते.
शर्मा यांच्या या वक्तव्यामुळे निवड समिती आणि संघव्यवस्थापनात संघर्ष असल्याचे यातून स्पष्ट होते.
बुमराहला काही सामन्यानंतरच संघाबाहेर जावे लागले होते.
त्यामुळे निवड समिती तयार नसतानाही संघ व्यवस्थापनाच्या आग्रहामुळे पूर्ण तंदुरुस्त नसलेला बुमराह संघात आल्याचे चित्र निर्माण झाले, याकडे संघ व्यवस्थापनाने बीसीसीआय पदाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले होते.
निवड समितीसाठी नव्याने हालचाली
चेतन शर्मा यांची निवड समिती तशीही टीकेचं लक्ष्य ठरली होतीच.
आशिया कपमध्ये भारतीय संघाचं आव्हान साखळीतच संपुष्टात आलं होतं.
टी-२० क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेतही उपांत्य फेरीत भारताचा पराभवही जिव्हारी लागला होता.
यावरून चेतन शर्मा यांच्या निवडीवरच प्रश्नचिन्ह होते.
बीसीसीआयने नवी निवड समिती नेमण्याची प्रक्रिया सुरू केली.
म्हणजेच शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील समिती बरखास्त केल्याचे यातून संकेत मिळालेही होते.
मात्र, नव्या निवड समितीची निवड करताना शर्मा यांना अध्यक्षपदी कायम ठेवले.
त्यामुळे अन्य सदस्यांची फेरनिवड टाळली होती. आता चेतन शर्मा यांनीच राजीनामा दिल्याने सुंठेवाचून खोकला गेला.
साहजिकच निवड समितीचा नवा अध्यक्ष कोण, यावर चर्चा झडणार.
तूर्तास शिवसुंदर दास आणि सलील अंकोला यांची नावे चर्चेत आहेत.
1989 मध्ये कसोटी खेळलेले सलील अंकोला यांना जास्त पसंती असल्याची चर्चा आहे.
मात्र, दास अन्य सर्व सदस्यांपेक्षा जास्त कसोटी (23 कसोटी) खेळले आहेत.
त्यामुळे त्यांचाही विचार सुरू आहे. शर्मा यांच्याऐवजी उत्तर विभागातील प्रतिनिधीचीही निवड होईल, अशी अटकळे आहेत.
शर्मा यांनी बीसीसीआयचे सचिव जय शहा यांच्याकडे राजीनामा पाठवला.
हा राजीनामा नाकारण्याचं तसंही ठोस कारण नव्हतंच. त्यामुळे तो राजीनामा स्वीकारण्यात आला.
स्टिंगनंतर त्यांचा बचाव करणेही अशक्य होते. त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला आहे. त्यांना तो देण्यास सांगितले होते.
– बीसीसीआयचे वरिष्ठ पदाधिकारी
गांगुली-विराटविषयी नेमके काय म्हणाले…
[jnews_element_embedplaylist playlist=”https://www.youtube.com/watch?v=UV8f77VisUU” column_width=”4″]इतिहासात डोकावताना….
शेन वॉर्नवर घातली होती एक वर्षाची बंदी
दिग्गज लेग स्पिनर शेन वॉर्न आज हयात नाहीत.
मात्र, 2003 च्या वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेच्या एक दिवस आधी तो उत्तेजक द्रव चाचणीत पॉझिटिव्ह आढळला होता.
त्याच्या शरीरात ड्युरेटिक (diuretic) नावाचा प्रतिबंधित उत्तेजक द्रव आढळल्याचे निष्पन्न झाले.
त्यावर स्पष्टीकरण देताना शेन वॉर्न म्हणाला, मला माझ्या आईने फ्लूवरील एक गोळी दिली होती. ती मी घेतली होती.
मात्र, ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने केलेल्या चाचणीत तो दोषी आढळल्याने त्याच्यावर एक वर्षाची बंदी घातली होती.
त्यामुळे त्याला 2003 ची वर्ल्ड कप स्पर्धा खेळता आली नव्हती.
युसूफ पठाणवर घातली होती पाच महिन्यांची बंदी
दोन विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा खेळलेला युसूफ पठाण उत्तेजक द्रव चाचणीत दोषी आढळला होता.
त्याने 2007 ची टी20 वर्ल्ड कप आणि 2011 च्या वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं.
प्रथमश्रेणी क्रिकेट स्पर्धेपूर्वी घेण्यात आलेल्या युरिन चाचणीत तो पॉझिटिव्ह आढळला होता.
त्याच्या शरीरात टर्बुटॅलाइन (Terbutaline) नावाचा प्रतिबंधित उत्तेजक घटक आढळला होता.
त्यावर जागतिक उत्तेजक द्रव प्रतिबंधित संस्थेने (World Anti-Doping Agency) बंदी घातलेली होती.
त्याच्यावर पाच महिन्यांची बंदी घालण्यात आली होती. दोषी आढळल्यानंतर त्याने, ‘यापुढे मी अधिक काळजी घेईन’, असे म्हंटले होते.
आंद्रे रसेलनेही घेतले होते उत्तेजक द्रव
वेस्ट इंडीजचा अष्टपैलू क्रिकेटपटू आंद्रे रसेल हादेखील उत्तेजक द्रव चाचणीत दोषी आढळला होता.
त्याला 2017 मध्ये एक वर्षाच्या बंदीला सामोरे जावे लागले होते. टी 20 लीगमध्ये सर्वांत यशस्वी खेळाडू म्हणून आंद्रे रसेलचं नाव घेतलं जातं.
पाकिस्तान सुपरलीग, इंडियन प्रीमियर लीग आदी स्पर्धांमध्ये खेळला आहे.
पृथ्वी साव यालाही सामोरे जावे लागले बंदीला
भारताचा आघाडीचा फलंदाज पृथ्वी साव उत्तेजक द्रव चाचणीत दोषी आढळला होता.
कफ सिरप घेतल्याने त्याच्या शरीरात टर्बुटॅलाइन नावाचा उत्तेजक घटक आढळला होता.
सईद मुश्ताक अली करंडक स्पर्धेदरम्यान त्याची चाचणी घेण्यात आली होती. त्यात तो दोषी आढळला होता.
त्याच्यावर आठ महिन्यांची बंदी घालण्यात आली होती. कसोटी मालिकेसाठी त्याची भारतीय संघातही निवड झाली होती.
मात्र, बंदी घातल्याने त्याला ही मालिका गमवावी लागली.
ॲलेक्स हाल्सवर 21 दिवसांची बंदी
ॲलेक्स हाल्स (Alex Hales) हा इंग्लंडचा आघाडीचा खेळाडू. त्याची दोन वेळा उत्तेजक द्रव चाचणी घेण्यात आली.
या दोन्ही वेळा तो पॉझिटिव्ह आढळला. त्यामुळे त्याला वर्ल्ड कपसाठी जाणाऱ्या इंग्लंड संघातून वगळण्यात आले होते.
बिग बॅश लीगमध्ये तो कमालीचा यशस्वी ठरला होता.
[jnews_widget_facebookpage title=”Facebook Page” url=”https://www.facebook.com/kheliyad” second_title=” kheliyad” url=”https://www.facebook.com/kheliyad” header_text_color=”#1e73be” header_line_color=”#1e73be”] [jnews_block_9 first_title=”Read more at: ” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#1e73be” include_category=”65″]