Chess Mom कोनेरू हम्पी
ग्रँडमास्टर कोनेरू हम्पी हिने वयाच्या ३७ व्या वर्षी महिलांच्या फिडे जागतिक रॅपिड (जलद) बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले

Chess Mom कोनेरू हम्पी
भारताची ग्रँडमास्टर कोनेरू हम्पी (Koneru Humpy) हिने वयाच्या ३७ व्या वर्षी महिलांच्या फिडे जागतिक रॅपिड (जलद) बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आणि २०२४ ला दिमाखात निरोप दिला. दोम्माराजू गुकेशनंतर भारताला मिळालेलं हे दुसरं विश्वविजेतेपद. मात्र, त्यासाठी या ‘चेस मॉम’नं बरंच काही सोसलं…
पूर्वी बाईचं दु:ख व्यक्त करण्याची हक्काची जागा जात्याभोवती फिरायची. नकळत ओव्यांचा आधार घ्यायची… ‘एक लिंबू झेलू बाई दोन लिंबू झेलू’. आताही महिलेचं दु:ख बदललेलं नाही. मात्र, या दु:खावर मात करण्यासाठी तिचं ‘जातं’ बदललंय. ती अंतराळात जाऊ पाहतेय. ती आपल्या बौद्धिक कौशल्यावर विश्व कवेत घेऊ पाहतेय. कृष्णेच्या काठावरची कोनेरू हम्पी आज अशाच महिलांचं प्रतिनिधित्व करीत आहे. बुद्धिबळाच्या पटावर ती आपली घुसमट झुगारू पाहतेय.
कोनेरू हम्पीचा बुद्धिबळप्रवास
हम्पीचा बुद्धिबळप्रवास कृष्णेच्या पाण्यासारखाच प्रवाही. हम्पीचा जन्म आंध्र प्रदेशातील गुडीवाड्यातला. हम्पीचे वडील कोनेरू अशोक स्वत: बुद्धिबळपटू. एकदा ते बुद्धिबळाचे कोडे सोडवत होते. मात्र, चाल सुचत नव्हती. जवळच सहा वर्षांची हम्पी हे पाहत होती. तिने सहजपणे एक चाल सुचवली. ती इतकी चपखल होती, की वडील स्तीमित झाले. वडिलांना तिच्यातली चुणूक दिसली आणि त्यांनी तिला गांभीर्याने बुद्धिबळ शिकवायला सुरुवात केली. इथून हम्पीचा बुद्धिबळप्रवास खऱ्या अर्थाने सुरू झाला.
हम्पीने वयाची १३ वर्षे पूर्ण केली नाही तोपर्यंत तिने १०, १२, १४ वर्षांखालील गटातील तीन विश्वविजेतीपदे ओळीने जिंकली. विशेष म्हणजे मुलांच्या गटात खेळत तिने १२ वर्षांखालील आशियन यूथ बुद्धिबळ स्पर्धाही जिंकली. कारण बुद्धिबळ असा खेळ आहे, जिथे महिला आणि पुरुष असा बुद्धिभेद अजिबात मान्य नाही. तरीही महिलांना प्रोत्साहन मिळावं म्हणून महिला गटाच्या स्पर्धा स्वतंत्र घेतल्या जातात. मात्र, काही महिला अशाही आहेत ज्या महिलांमध्येच नाही तर पुरुष गटातही खेळतात. हम्पी त्यापैकीच एक.
ग्रँडमास्टरचा बहुमान
हम्पीने ग्रँडमास्टरचा बहुमान महिला गटातून अजिबात मिळवला नाही. तिने पुरुष गटात खेळून वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षीच ग्रँडमास्टरचा बहुमान मिळवला. विशेष म्हणजे अशी कामगिरी करणारी ती जगातली सर्वांत लहान महिला ग्रँडमास्टर ठरली. यापूर्वी हा विक्रम हंगेरीच्या ज्युडिट पोल्गरच्या नावावर होता. वयाच्या २२ व्या वर्षी म्हणजे जुलै २००९ मध्ये ती महिलांमध्ये जगात दुसऱ्या क्रमांकाची एलो रेटिंग (२६३०) मिळविणारी बुद्धिबळपटू ठरली. यश तिच्या पायाशी लोळण घेत होतं.
असं म्हणतात, की मुलींचं विश्व लग्नानंतर बदलतं. त्याचा प्रत्यय हम्पीला प्रकर्षाने जाणवलं. म्हणजे तिला ‘सासुरवास’ नव्हता; पण संसाराचा भार पेलावा लागला. तो अपरिहार्य आहे. २०१४ मध्ये लग्न झालं. २०१७ मध्ये आहना नावाच्या मुलीला जन्म दिला आणि बुद्धिबळविश्वात हम्पी ‘चेस मॉम’ म्हणूनच ओळखली जाऊ लागली. या सगळ्यात तिचं ‘बुद्धिबळ’ मात्र मागे पडत चाललं. तरीही ती संपली नव्हती. तिला कमबॅक करायचं होतं; पण आहनाची जबाबदारी टाळताही येणार नव्हती. आहना तेव्हा सहा महिन्यांचीच होती. तिला आईची गरज होती. त्यामुळे हम्पीने खेळातून ब्रेक घेतला. मात्र, सराव सुरूच होता. मात्र तो एकसुरी अजिबातच नव्हता.
हम्पी रोज चार-पाच तास सराव करायची. हम्पी म्हणते, “सराव सुरू असला तरी माझं प्राधान्य मुलीलाच होतं. जर तिला माझी गरज वाटली तर माझी सरावातली एकाग्रता ढळायची. मग तिच्यासाठी धावाधाव करायचे आणि पुन्हा सरावात ढळलेली एकाग्रता पुन्हा साधण्याचा प्रयत्न करायचे.”
हम्पी जे सांगतेय, ते एक आईच समजू शकेल. एखादा पुरुष लग्नानंतर सगळ्या जबाबदाऱ्या बायकोवर ढकलून सहज सराव साधू शकतो; पण एक महिला असं करू शकेल का? उत्तर नकारार्थीच येईल. हम्पी भावनिक पातळीवर कसा समतोल साधत असेल हे कल्पनेच्या पलीकडचं आहे.
आहना दीड वर्षाची झाल्यानंतर २०१८ मध्ये हम्पीने कमबॅक केलं. करोना काळात जागतिक जलद बुद्धिबळ स्पर्धेचं विश्वविजेतेपद जिंकलं, पण ते जोरदार कमबॅक जाणवलंच नाही. करोना काळात हे यश काहीसं झाकोळलं. लग्नानंतर किती मर्यादा येतात ते एक महिलाच सांगू शकते. हम्पी हे सगळे चढउतार सोसत होती. बुद्धिबळात नव्या पिढीनेही आव्हान उभं केलं होतं. जगातली अव्वल खेळाडू विजयासाठी धडपडत होती.
२०२४ चा सुखद समारोप
२०२४ च्या सरत्या वर्षात नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा, टाटा स्टील स्पर्धेत ती तळाच्या स्थानी राहिली. एका अव्वल दर्जाच्या खेळाडूच्या वाट्याला हा बॅडपॅच भयंकरच होता. आता तिच्यासमोर जागतिक जलद बुद्धिबळ स्पर्धा ही एकमेव आशा होती. या स्पर्धेत पहिल्याच डावात ती पराभूत झाली. चार डावांत तिच्या खात्यात केवळ अडीच गुण झाले. इथं सर्वांनीच आशा सोडली. हम्पी आता काही जिंकत नाही. मात्र, हम्पीने दुसऱ्या दिवशी कमाल केली. तिने ओळीने चार डाव जिंकले आणि अचानक विजेतेपदाच्या शर्यतीत उभी ठाकली. आणि काय आश्चर्य! ११ डावांत साडेआठ गुण घेत तिने विश्वविजेतेपदाला गवसणीही घातली. २०२४ चा समारोप इतका सुखद होईल, असं तिलाही वाटलं नव्हतं.
हम्पी म्हणते, “मी २०१८ मध्ये खेळायला सुरुवात केली तेव्हा आहना एक वर्षाची होती. तसं म्हंटलं तर पुनरागमन करणं कोणत्याही खेळातील जागतिक स्तरावर सोपं नसतं. मी तीन स्पर्धांमध्ये अपयशी ठरले. मी प्रचंड संघर्ष केला. मी कुठं चुकत होते हे पाहिलं. हळूहळू मी बदल करीत गेले. फार कठीण काळ होता माझ्यासाठी.”
एरव्ही अव्वल दर्जाच्या खेळाडू स्वतंत्र प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली सराव करतात. हम्पीने मात्र एकाकी सराव केला. अनुभव पणाशी लावला. बरं हे सगळं करताना तिची चिमुकली आहना डोळ्यांसमोर येत नसेल का? तिची आठवणही तिला अस्वस्थ करीत होतीच… पण तिला घरी ठेवून हम्पीने स्वत:ला सिद्ध केलं.
तान्हुल्या बाळासाठी व्याकुळ झालेली इतिहासातली हिरकणी अजस्त्र रायगड उतरून आली. हम्पीचं मात्र उलट होतं. तान्हुल्या बाळाला घरी ठेवून ती मात्र गड सर करायला निघाली आणि जिंकलीही! खरंच हम्पीचं ‘आईपण भारी देवा’!
