यामुळे पॅरालिम्पिक स्पर्धेत भाविनाने रचला इतिहास
कोविड-19 महामारीमुळे संपूर्ण विश्व प्रभावित झाले होते. माणसांना जगण्याच्या मूलभूत गरजांव्यतिरिक्त दुसरे काहीही करण्यास जेथे निर्बंध होते, तेथे क्रीडा स्पर्धा, सराव तर लांबचा विषय… पॅरालिम्पिक स्पर्धेच्या तयारीवरही या कोविड 19 ने खोडा घातला. मात्र, भाविनाबेन पटेल हिला एका गोष्टीमुळे सराव करता आला. तो म्हणजे टेबल टेनिस रोबोटमुळे. किंबहुना भाविना या रोबोटमुळेच इतिहास रचू शकली.
टेबल टेनिस खेळाडू भाविनाबेन पटेल हिला भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (साइ) एक रोबोट सरावासाठी दिला होता. भाविना म्हणते, टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेच्या मोहिमेत मला या रोबोटची फारच मदत झाली. त्यामुळेच ती ऐतिहासिक रौप्य पदक जिंकण्यात यशस्वी झाली.
पॅरालिम्पिक टेबल टेनिस स्पर्धेत भाविना पदक जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू ठरली. अंतिम फेरीत जगातील अव्वल खेळाडू चीनची यिंग झोउ हिच्याकडून पराभूत झाली होती.
टोकियोवरून परतल्यानंतर टेबल टेनिस खेळाडू भाविना हिने एका मुलाखतीत सांगितले, ‘‘मला साइ ‘टॉप्स’च्या (टारगेट ऑलिम्पिक पोडियम योजना) माध्यमातून एक रोबोट मिळाला. तो एक प्रगत रोबोट आहे. त्याची अनेक वैशिष्ट्ये आहेत. यामुळे वेगवेगळ्या कोनातून तुम्ही स्ट्रोक मारू शकता.’’
भाविना म्हणाली, ‘‘या रोबोटमुळे मला खेळात सुधारणा करण्याची संधी मिळाली. याशिवाय ‘टॉप्स’ने आम्हाला रॅकेटसारखी उपकरणे दिली.’’
असा आहे भाविना पटेलचा रोबोट
या टेबल टेनिस रोबोटची (बटरफ्लाय- एमिकस प्राइम) किंमत 2,73,500 रुपये आहे. या रोबोटसोबतच एक ‘ओटोबॉक व्हीलचेअर’ही देण्यात आली होती. या व्हीलचेअरची कीमत 2,84,707 रुपये आहे. हंगेरीची निर्मिती असलेला ‘एमिकस प्राइम’ रोबोट सर्वोत्तम ‘पिंग पाँग (सातत्याने चेंडू बाहेर फेकणारा)’ असल्याचा दावा केला जात आहे. या रोबोटमध्ये सरावासाठी 21 पर्याय उपलब्ध आहेत. हा रोबोटमधून प्रतिमिनिट 120 चेंडू बाहेर पडतात.
भाविना म्हणाली, ‘‘महामारीदरम्यान (लॉकडाउन), माझ्या पतीने माझ्यासाठी घरातच एका टेबलची व्यवस्था केली होती. त्या वेळी माझ्या प्रशिक्षकाने मला सेकंडहँड रोबोट दिला होता. या रोबोटच्या माध्यमातूनच मी सराव करीत होते. मात्र, त्यानंतर मला फेब्रुवारी-मार्च 2020 मध्ये ‘साइ’कडून हा प्रगत रोबोट मिळाला.’’
खेळात जी काही सुधारणा झाली त्याचे श्रेय भाविनाबेन पटेल हिने या रोबोटलाच दिले आहे. ती म्हणाली, ‘‘रोबोटसोबत खेळल्याने माझे स्ट्रोक आणखी मजबूत झाले. मी रोबोटसोबत दिवसाला 5000 चेंडू खेळत होते. यामुळे चेंडूवर नियंत्रण आणि तो योग्य ठिकाणी मारण्यात यश मिळाले. यात मी ‘स्पिन’ आणि ‘कट’ नियंत्रित करण्यात अधिक सक्षम झाले.’’
भाविनाचा प्रेमविवाह
भाविनाबेन पटेल हिने रोबोटबरोबरच आपल्या परिवाराला, विशेषत: पती निकुंज पटेल यांनाही यशाचे श्रेय दिले. निकुंज गुजरातच्या पूर्व ज्युनिअर स्तरावरील क्रिकेटपटू आहे. भाविनाने 2017 मध्ये निकुंजशी प्रेमविवाह केला. भाविना म्हणाली, ‘‘निकुंज यांनी माझ्या खेळाला नेहमीच प्रोत्साहन दिले. ते मला म्हणायचे, ‘तू जिंकू शकतेस आणि तुला खेळायलाच हवे. कारण तुला पाहून अनेक खेळाडू पुढे येतील. तुला त्यांची प्रेरणा बनायला हवं.’’
भाविना म्हणाली, की अहमदाबाद येथील ‘ब्लाइंड (दृष्टिबाधित) पीपुल्स असोसिएशन’मध्ये गेल्यानंतर माझी खेळाकडे पाहण्याची दृष्टी बदलली.
भाविना म्हणाली, ‘‘माझा जन्म 6 नोव्हेंबर 1986 रोजी झाला. जन्मानंतर एक वर्षाने मला पोलिओ झाला. मात्र, मला घरातली सर्वांत भाग्यवान मानले जायचे. कारण माझ्या जन्मानंतर घरातल्या सर्व समस्या सुटल्या.’’
भाविनाने सांगितले, ‘‘2004-05 मध्ये मी अहमदाबाद येथे ‘ब्लाइंड पीपुल्स असोसिएशन’चा दौरा सुरू केला. तिथे मी माझ्या बऱ्याच मित्रांना टेबल टेनिस खेळताना पाहिले. त्यांना पाहून मी विचार केला, की मला खेळ शौक म्हणून सुरू करायला हवा. जेव्हा मी खेळणे सुरू केले, तेव्हा मला खूप छान वाटले.’’
भाविना आता पुढील जागतिक स्पर्धांमध्ये आणखी उत्तम कामगिरी करण्यास उत्सुक आहे. ती म्हणाली, ‘‘मला आगामी राष्ट्रकुल स्पर्धा, पॅरा आशियाई स्पर्धा आणि पैरा विश्व स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करायची आहे. सुवर्ण पदक जिंकायचे आहे. पॅरिसमधील पुढच्या पॅरालिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याची तिची इच्छा आहे.’’
[jnews_block_9 first_title=”Read more at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”95″ sort_by=”popular_post”]