बीसीसीआय विरुद्ध शशांक मनोहर
सध्या क्रिकेटमध्ये टी-२० आणि आयपीएल यापैकी कोणाला निवडायचे यावरून चर्चा झडत आहे. यात आयसीसीची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. अद्याप यावर कोणताही निर्णय झाला नसला तरी विश्वकरंडक टी-२० स्पर्धेवरून आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. वर्ल्डकप टी-२० सामन्यावर निर्णय घेण्यात टाळाटाळ होत असून, यामागे शशांक मनोहर असल्याचा थेट आरोप बीसीसीआयने केला आहे. शशांक मनोहर यांनीच खोडा घातला असल्याने यावर कोणताही निर्णय होत नसल्याचा आरोप बीसीसीआयने केला आहे. त्यामुळे बीसीसीआय विरुद्ध शशांक मनोहर (BCCI vs Shashank Manohar) हा नवा अंक क्रिकेटच्या रंगभूमीवर जोरदार गाजत आहे. वर्ल्डकप टी-२० स्पर्धा यंदा १८ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबरदरम्यान ऑस्ट्रेलियात होणार आहे. मात्र, ऑस्ट्रेलिया आता ही स्पर्धा आयोजित करण्याच्या परिस्थितीत नाही. त्यामुळे ही स्पर्धा घ्यावी किंवा नाही, यावर आयसीसीने अद्याप तरी कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्याचा फटका आयपीएलला बसत आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे चेअरमन अर्ल एडिंग्स यांनी या स्पर्धेचे यजमानपद स्वीकारण्यास सक्षम नसल्याचे जाहीर केले आहे. अशातच बीसीसीआयला वाटते, की आयसीसी यावर कोणताही निर्णय घेत नसल्याने त्याचा परिणाम आयपीएलच्या आयोजनावर होईल. बीसीसीआयचे एक वरिष्ठ अधिकारी म्हणाले, ‘‘आयसीसीचे माजी अध्यक्ष का संभ्रम निर्माण करीत आहेत? जर यजमान क्रिकेट बोर्ड टी-20 वर्ल्ड कप आयोजित करू शकत नसेल तर तो निर्णय जाहीर करण्यासाठी त्यांना एक महिन्याचा अवधी कशाला हवाय?’’
क्रिकेट ऑस्ट्रेलिया टी-20 वर्ल्डकप घेऊ शकत नाही. जूनच्या सुरुवातीला याबाबत आयसीसीने एक बैठक घेतली होती. या बैठकीत आयसीसीने एक महिना आणखी प्रतीक्षा करण्याचा निर्णय घेतला होता. करोना महामारीच्या काळात स्पर्धा आयोजनावर निर्णय करण्यापेक्षा या आपत्कालीन स्थितीत काय योजना करता येतील यावर विचार करण्याची गरज आहे. अधिकाऱ्यांना वाटते, की स्पर्धा स्थगित करण्यावर जर लवकर निर्णय झाला तर सदस्य देशांना दोन देशांमध्ये मालिका आयोजित करण्याची योजना आखण्यास मदत होईल.
बीसीसीआयचा एक नाराज अधिकारी म्हणाला, ‘‘हा केवळी बीसीसीआय किंवा आयपीएलचा मुद्दा नाही. जर आयसीसी या महिन्यात स्पर्धा रद्द करण्याची घोषणा केली तर ज्या सदस्य देशांतील खेळाडू आयपीएलचा भाग नाहीत, ते या काळात द्विपक्षीय मालिका आयोजित करण्याची योजना आखू शकतात. निर्णय करण्यास उशीर केला तर सर्वांचेच नुकसान होईल.’’
आयसीसी जर वेळेत निर्णय घेणार असेल तर बीसीसीआयची आयपीएलमधील संघ स्पर्धेची तयारी सुरू करू शकतील. यात श्रीलंकाही सहभागी होऊ शकेल. त्यांच्याकडे प्रेमदासा, पाल्लेकल आणि हंबनटोटा ही मैदाने आहेत. युनायटेड अरब अमिरातीच्या तुलनेत श्रीलंका स्वस्त यजमान ठरू शकतो. यावर सुनील गावसकरांनी म्हंटले आहे, की सप्टेंबरमध्ये आयपीएल घेण्यासाठी हाच एकमेव आदर्श देश होऊ शकेल. बीसीसीआय आणि शशांक मनोहर यांच्यातील मतभेद नवे नाहीत. नागपूरचे वकील असलेले मनोहर बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांच्यात नेहमीच वितुष्ट राहिले आहे. या तणावाचे प्रमुख कारण या वितुष्टात दडलेले आहे.
बीसीसीआयचा अधिकारी म्हणाला, ‘‘ते (मनोहर) बीसीसीआयचे माजी अध्यक्ष आहेत. मात्र, तरीही ते बीसीसीआयच्या विरुद्ध काम करीत आहेत. आयसीसीच्या महसुलात बीसीसीआयचे योगदान सर्वाधिक असूनही बीसीसीआयच्या महसुलात कपात करण्यात आली आहे.’’
बीसीसीआयशी संबंधित लोकही आता हा प्रश्न उपस्थित करीत आहेत, की पुढच्या अध्यक्षपदाच्या नामांकनाची अधिकृत प्रक्रिया का सुरू करण्यात आलेली नाही?
अध्यक्षपदाच्या शर्यतीत गांगुली उतरणार?
बीसीसीआयचा आणखी एका अनुभवी अधिकारी म्हणाला, ‘‘आयसीसी बोर्डाच्या काही बैठकी झाल्या. मात्र, त्यात ईमेल लीग आणि छाननीप्रक्रियेला अधिक प्राधान्य दिले. जर तुम्ही मला विचाराल, तर मनोहर अध्यक्षपद सोडतील आणि तिसऱ्यांदा पदासाठी प्रयत्नच करणार नाहीत, यावर माझा तरी विश्वास बसणार नाही.’’ आयसीसीच्या चेअरमनपदाचा कार्यकाळ दोन वर्षांचा असून, तो तीनदा उपभोगता येऊ शकतो. आयसीसीच्या बोर्डातील सदस्यांना भीती आहे, की नामांकनप्रक्रियेत वेळ दवडला तर सर्वसंमतीने उमेदवार निवडण्यात अडचण येऊ शकते.
बोर्डाच्या सदस्यांनी सांगितले, ‘‘कोलिन ग्रेव्स यांचं नाव आताही सर्वांत पुढे आहे आणि जर सौरव गांगुली यांनी यात उडी घेतली नाही तर मग बीसीसीआयलाही ग्रेव्स यांना समर्थन देण्याशिवाय पर्याय नाही. जर बिनविरोध निवड झाली नाही आणि गांगुली यांनीही उमेदवारी सादर केली तर मग पुढे काय होईल हे पाहणे औत्सुक्याचे असेल.’’
आयसीसीच्या अध्यक्षपदासाठी एहसान मनीही दावेदार आहेत. मात्र, त्यांना बीसीसीआयचे समर्थन अजिबातच मिळणार नाही. न्यूझीलंड क्रिकेटचे अध्यक्ष डेबी हॉकले यांचेही नाव समोर येत आहे.
एहसान मनी म्हणतात, आयसीसीचे अध्यक्षपद माझ्या अजेंड्यात नाही!
आयसीसीच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत एहसान मनी यांचं नाव पुढे आल्यानंतर क्रिकेटविश्वात आता चर्चा झडू लागल्या आहेत. मात्र, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) अध्यक्ष एहसान मनी यांनी स्पष्ट केले, की मला आयसीसीच्या अध्यक्षपदासाठी मी अजिबात इच्छुक नाही. माझं लक्ष्य फक्त पाकिस्तान क्रिकेटचा विकास हाच आहे.
मनी म्हणाले, की पंतप्रधान इम्रान खान यांनी मला पाकिस्तान क्रिकेटचा चेहरामोहरा बदलण्यासाठी पुन्हा क्रिकेट प्रशासनात आणले आहे. असं म्हंटलं जात होतं, की जुलैमध्ये शशांक मनोहर यांचा कार्यकाळ संपल्यानंतर मनी आयसीसीच्या अध्यक्षपदी आपला अर्ज सादर करू शकतील आणि या पदासाठी सौरव गांगुली त्यांना आव्हान देऊ शकतील. अनुभवी क्रिकेट प्रशासक मनी म्हणाले, ‘‘इम्रानने मला पाकिस्तान क्रिकेटमध्ये काम करण्यासाठी सांगितले आहे. आयसीसीचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर तब्बल १२ वर्षे मी क्रिकेटपासून दूर होतो. त्यामुळे मी परतलो ते पाकिस्तान क्रिकेटमध्ये काम करण्यासाठी. आयसीसीसाठी नव्हे.’’
मनी यांनी एक मात्र स्वीकारले, की त्यांना आयसीसीच्या काही सदस्यांनी अध्यक्षपदासाठी आग्रह केला आहे. मात्र, माझ्या अजेंड्यात हा विचार अजिबात नाही.
3 Comments