अवनी लेखरा : पॅरालिम्पिक स्पर्धेत दोन पदके जिंकणारी पहिली भारतीय
2012 मध्ये एका कार अपघातात ती गंभीर जखमी झाली. पाठीचा कणा मोडला. संपूर्ण आयुष्य व्हीलचेअरवर खिळलं. आता पुढे काय, हा प्रश्न साहजिकच ठाकला. मात्र, नेमबाजीने तिचा जिद्दीचा कणा ताठ राहिला. टोकियो पॅरालिम्पिक नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदकासह दोन पदके जिंकणारी अवनी लेखरा हिने तिची कहाणी स्वत:च लिहिली. निश्चयी, जिद्दी अवनीने सिद्ध केलं, की प्रयत्न केले तर यश मिळतेच…
अवनी लेखरा हिने टोकियो पॅरालिम्पिक नेमबाजी स्पर्धेत 10 मीटर एअर रायफल स्टँडिंग एचएस 1 वर्गात सुवर्णपदक जिंकले. मात्र, इथेच थांबली नाही, तर त्यानंतर 50 मीटर रायफल थ्री पोझिशन एसएच 1 स्पर्धेत तिने कांस्य पदकही जिंकले. एकाच पॅरालिम्पिकमध्ये दोन पदके जिंकत अवनीने इतिहास रचला. अशी कामगिरी करणारी ती एकमेव भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. पॅरालिम्पिक, तसेच ऑलिम्पिकमध्ये एकापेक्षा अधिक पदके जिंकणाऱ्या भारताच्या निवडक खेळाडूंपैकी अवनी एक आहे.
एका कार अपघातात अवनीच्या पाठीच्या कण्याला गंभीर दुखापत झाली. या दुखापतीने अवनी नखशिखांत हादरलीच. कारण कंबरेखालचा भाग लकवाग्रस्त झाला होता. अवनीलाच नव्हे, तर तिच्या कुटुंबालाही हा मोठा धक्का होता. मात्र, नैराश्यामुळे मुलीचं संपूर्ण आयुष्य खचलेलं पाहणं वडिलांना मान्य नव्हतं. म्हणूनच वडील प्रवीण लेखरा यांनी 2015 मध्ये अवनीला जयपूरमधील जगतपुरा क्रीडा परिसरात नेमबाजीच्या प्रशिक्षणासाठी घेऊन आले. एखाद्या अपघाताने आयुष्य संपत नाही, हे अवनीला नेमबाजीतून कळलं. त्याचा रिझल्ट टोकियोतील पॅरालिम्पिकमध्ये आपण सर्व पाहतच आहोत.
अवनीला एका आत्मकथेने मिळाली प्रेरणा
तसं पाहिलं तर अवनीने सुरुवातीला ‘फुल-टाइम’ नेमबाज होण्याचा विचार अजिबातच केला नव्हता. मात्र, अभिनव बिंद्रा (ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळविणारा भारताचा पहिला नेमबाज) याची ‘अ शॉट एट ग्लोरी’ ही आत्मकथा वाचली. या पुस्तकाने अवनी लेखरा हिला प्रेरणा मिळाली आणि त्यातूनच तिने पॅरालिम्पिक नेमबाजी स्पर्धेत इतिहास रचला. दुसरे पदक जिंकल्यानंतर अवनी म्हणाली, ‘‘जेव्हा मी अभिनव बिंद्रा सरांची आत्मकथा वाचली, तेव्हा मला प्रेरणा मिळाली. कारण त्यांनी भारतासाठी पहिले वैयक्तिक सुवर्ण पदक जिंकले होते. मलाही त्यांच्यासारखं (अभिनव बिंद्रा) व्हायचं होतं. मला नेहमीच वाटायचं, की आपणही देशाचं नाव मोठं करावं.’’
‘‘मी खूप आनंदी आहे, की मी देशासाठी आणखी एक पदक जिंकू शकले. माझा माझ्यावरच विश्वास बसत नाही.’’
– अवनी लेखरा
रायफल हाती घेतल्यानंतर अवनीने राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये उत्तम कामगिरी केली आहे. 2015 मध्ये राजस्थानातील राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम आणि नंतर राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत तृतीय क्रमांकावर राहिली. राजस्थानातील सहाय्यक वन संरक्षक पदावर कार्यरत असलेल्या 19 वर्षीय अवनी लेखरा हिने प्रथमच टोकियो पॅरालिम्पिक नेमबाजी स्पर्धेत भाग घेतला होता. टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत 10 मीटर एअर रायफल स्टँडिंग एचएस 1 श्रेणीत क्वालिफिकेशन आणि फायनल या दोन्हींत सलग 10 पेक्षा अधिक गुण नोंदवले.
अवनीने माजी ऑलिम्पियन नेमबाज सुमा शिरूर हिच्या मार्गदर्शाखाली प्रशिक्षण घेतले आहे. त्याचा तिला फायदाच झाला. अवनीने सोमवारी, 30 ऑगस्ट 2021 रोजी फायनलमध्ये 249.6 गुण मिळवत पॅरालिम्पिक स्पर्धेत नवा विक्रम प्रस्थापित केला. हा स्कोअर थोडाथोडका नव्हता, तर विश्वविक्रमाशी बरोबरी साधणारा होता. अवनीने या कामगिरीसह शुक्रवारी, 3 सप्टेंबर 2021 रोजी 50 मीटर रायफल थ्री पोझिशन एसएच 1 स्पर्धेत द्वितीय स्थान मिळवले. यासह तिने फायनलसाठी पात्रताही गाठली. फायनलमध्ये अटीतटीच्या लढतीत तिने युक्रेनच्या इरिना श्चेटनिकला मागे टाकत कांस्य पदक जिंकले.
एसएच1 रायफल वर्गात असे नेमबाज सहभागी होतात, जे हातांनी बंदूक पकडू शकतात. मात्र, त्यांचे पाय अधू असतात. यातील काही खेळाडू व्हीलचेअरवर बसून, तर काही उभे राहूनही नेमबाजी करू शकतात. कायद्याचा अभ्यास करणाऱ्या अवनीने संयुक्त अरब अमिरातीत 2017 च्या विश्वकप स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते. त्याच वर्षी भारत सरकारने तिचा समावेश लक्ष्य ऑलिम्पिक पोडियम कार्यक्रमात (टॉप्स) केला होता. तिने 2017 मध्येच झालेल्या बँकॉक येथील डब्लूएसपीएस (विश्व नेमबाजी पॅरा) विश्वकप स्पर्धेत कांस्य पदक जिंकले. त्यानंतर तिने क्रोएशियात 2019 मध्ये आणि संयुक्त अरब अमिरातीत झालेल्या पुढच्या दोन विश्वकप स्पर्धेत रौप्य पदक जिंकले. कोविड-19 महामारीमुळे टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेच्या सरावावर परिणाम झाला. विशेषत: फिजिओथेरपीच्या दिनचर्येवर अधिक परिणाम झाला. मात्र, कितीही अडथळे आले तरी तिच्या जिद्दीवर कोणताही परिणाम झाला नाही. पॅरालिम्पिक स्पर्धेत तिरंगा शानदारपणे फडकला. भारताचे राष्ट्रगीत जेव्हा टोकियोच्या भूमीत वाजले, तेव्हा तिने सर्वांचंच मन जिंकलं होतं.
[jnews_block_9 first_title=”Read more at:” include_category=”95″ sort_by=”oldest”]