मेस्सीचा अर्जेंटिना कोपा फुटबॉल स्पर्धेचा विजेता
तमाम फुटबॉलप्रेमींचं लक्ष लागलेल्या कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत अखेर लियोनल मेस्सीच्या अर्जेंटिना संघाने बाजी मारली. अर्जेंटिनाने शनिवारी, 10 जुलै 2021 रोजी ब्राझीलचा 1-0 असा पराभव करीत कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेचं विजेतेपद मिळवलं. अर्जेंटिना संघाने तब्बल 28 वर्षांनी या किताबावर आपली मोहोर उमटवली. विशेष म्हणजे सुपरस्टार फुटबॉलपटू लियोनेल मेस्सीचाही संघासोबतचा हा सर्वांत मोठा आंतरराष्ट्रीय किताब आहे. अर्जेंटिना संघाचा हा प्रवास खडतर तर होताच, पण खेळाडूंच्या मानसिकतेची परीक्षाही पाहणारा ठरला…
अर्जेंटिनाने विजय मिळविल्यानंतर देशभर आनंदाच्या लाटा उसळल्या. दस्तूरखुद्द लियोनेल मेस्सीच्या डोळ्यांतून आनंदाश्रू घळाघळा वाहिले. विजयानंतर मैदानातच गुडघ्यावर बसून अश्रूंना वाट करून दिली. दोन्ही हातांनी चेहरा झाकत गुडघ्यावर बसलेला मेस्सीचं ते रूप पाहून हा विजय किती महत्त्वाचा होता याचा प्रत्यय येत होता. त्यानंतर संघातील सहकाऱ्यांनी मेस्सीला उचलून हवेत उंचावत हा विजयाचा आनंदसोहळा साजरा केला. पुरस्कार वितरण सोहळ्यात मेस्सीने कोपा ट्रॉफीचे चुंबन घेत ती उंचावली.
कोपा अमेरिका फुटबॉल या निर्णायक गोलमुळे जिंकला अर्जेंटिना
रियो दि जानिरोच्या माराकाना स्टेडियमवर (Maracana stadium) झालेल्या या अंतिम सामन्यात 22 व्या मिनिटाला एंजेल डी मारिया याने गोल केला. रॉड्रिगो डी पॉल याने मारियाकडे फुटबॉल पास केला. हा इतक्या लांबून पास केला होता, की त्याचं सोनं करण्यात मारियाने कोणतीही कसर नाही ठेवली. खरं तर या 33 वर्षीय अनुभवी स्ट्रायकरचं कौतुकच करायला हवं. कारण मारियाने लेफ्ट बॅक रेना लोडी याच्या खराब बचावाचा फायदा उचलत चेंडू आपल्या ताब्यात घेतला. इथेच अर्जेंटिना संघाच्या विजयाची कहाणी लिहिली गेली. गोलकीपर अँडरसनला चकवत मारियाने सुरेख गोल केला. हाच गोल कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेतला निर्णायक गोल ठरला. या जेतेपदासह अर्जेंटिनाने 1993 पासूनचा जेतेपदाचा दुष्काळही संपवला.
ब्राझील ज्या पद्धतीने विजय मिळवत होता, ते पाहता अर्जेंटिना संघाला ही लढत तशी सोपी नव्हतीच. संपूर्ण स्पर्धेत ब्राझीलने फक्त तीनच गोल खाल्ले. त्यातला अखेरचा तिसरा गोल अर्जेंटिना संघाने फायनलमध्ये केला होता. यावरून ब्राझील कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत कसा खेळला असेल, याचा अंदाज येईल. अर्जेंटिना संघाविरुद्ध नेमारचा खेळ अप्रतिमच होता. त्याने ज्या सुरेख पद्धतीने ड्रिबल आणि चेंडू पास करण्याचे कौशल्य पेश केले ते लाजवाबच होते. दुर्दैवाने त्याची ही लयबद्धता ब्राझीलला बरोबरीही मिळवून देऊ शकली नाही. यजमानांचा एकमेव नेमार हाच असा खेळाडू होता, ज्याने अर्जेंटिना संघाचा गोलकीपर एमिलियानो मार्टिनेज याच्यासमोर अडचणी उभ्या केल्या. प्रशिक्षक टिटेच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या ब्राझील संघाने कोपा अमेरिकेतील मागील पाचही सामने जिंकले होते. विशेष म्हणजे या पाचही सामन्यांत ब्राझीलनेच गोल केले होते.
अर्जेंटिना जिंकली असली तरी मेस्सीला एक सल नेहमी असेल. ती म्हणजे मागील सर्व लढतींप्रमाणेच त्याला अंतिम फेरीतही कामगिरी उंचावता आलेली नाही. नाही म्हंटलं, तरी स्पर्धेत त्याने चार गोल नोंदवले आहेत, तर पाच गोल करण्यात मदत केली आहे. अंतिम फेरीत मेस्सीला 88 व्या मिनिटात एक संधी मिळाली होती. मेस्सीला एवढंच करायचं होतं, ते म्हणजे ब्राझीलच्या गोलकीपरला चकवणं. मात्र, ऐन वेळी अँडरसनने मेस्सीचे मनसुबे धुळीस मिळवले.
अर्जेंटिनाच्या प्रशिक्षकाचे संघात धक्कादायक बदल
अर्जेंटिनाचा प्रशिक्षक लियोन स्केलोनी यांनी संघात धक्कादायक बदल केले होते. अर्जेंटिनाने उपांत्य फेरीत कोलंबियाला पेनल्टी शूटआउटमध्ये हरवले होते. ही कामगिरी कदाचित प्रशिक्षक स्केलोनी यांना रुचली नसावी. त्यांनी संघात एक-दोन नव्हे, तर पाच बदल केले. त्यांनी गोंजेलो मोंटिएल, क्रिस्टियन रोमेरो, मार्कोस एकुना, लिएंड्रो पेरेडेस आणि डी मारिया या नव्या खेळाडूंना संघात आणले. अकरा जणांच्या संघात पाच नवे खेळाडू? म्हणजे अर्धा संघ नवा.
हे नवे खेळाडू आले म्हणजे पाच खेळाडूंना बाहेर बसावे लागणार. हे बाहेर बसलेले पाच खेळाडू म्हणजे नाहुएल मोलिना, निकोलस टेगलियाफिको, गुइडो रोड्रिग्ज आणि निकोलस गोंजालेज. अर्जेंटिनाचा निम्मा संघ बदलला असला तरी ब्राझीलने सुरुवातीपासून संघात एकही बदल केला नाही. कारण ज्या त्वेशाने हा संघ खेळत होता, त्याअर्थी ब्राझीलला बदल करण्याची आवश्यकता भासली नसावी.
गंमत पाहा, स्केलोनींनी केलेला हाच बदल अर्जेंटिनाला जेतेपदाकडे घेऊन गेला. संघात स्थान मिळविलेल्या डी मारियानेच मिळालेल्या संधीचं शब्दशः सोनं केलं. मेस्सी सहा वर्षांचा होता, त्या वेळी अर्जेंटिनाने मोठा किताब जिंकला होता. आता या घटनेला 28 वर्षे उलटली आहेत. त्यानंतर 10 जुलै 2021 रोजी अर्जेंटिनाला दीर्घकाळानंतर कोपा अमेरिकेचा किताब जिंकता आला. रियोच्या माराकाना मैदानावर जिंकलेला हा अर्जंटिनाचा 15 वा कोपा अमेरिका किताब आहे. कोपा अमेरिका स्पर्धेत अर्जेंटिनाने एकही सामना गमावलेला नाही. ही स्पर्धा 15 वेळा जिंकणाऱ्या अर्जेंटिनाने आता उरुग्वेच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. त्या खालोखाल फुटबॉलची पंढरी मानलेल्या ब्राझीलने हा किताब नऊ वेळा जिंकला आहे.
गंमत पाहा, मेस्सीने बार्सिलोनाकडून खेळताना बरेच किताब जिंकले. मात्र, जेव्हा कोपा अमेरिका स्पर्धेची वेळ येते तेव्हा मेस्सीच्या संघाला काय होतं कुणास ठाऊक? आता हेच बघा ना, मेस्सीच्या अर्जेंटिनाने 2007, 2015 आणि 2016 मध्ये कोपा अमेरिकेची अंतिम फेरी गाठली. म्हणजे सहा-सात वर्षांपूर्वीच अर्जेंटिना विजेता ठरला असता. मात्र, या तिन्ही वेळा अर्जेंटिना पराभूत झाला. दुर्दैव इथंच संपलं नाही, तर 2014 च्या विश्वकप फायनलमध्येही हाच मेस्सीचा अर्जेंटिना होता. तेथेही त्यांना जर्मनीने पराभूत केले. चलो, देर आए दुरुस्त आए… आता अर्जेंटिनाकडे माराकाना स्टेडियमच्या किमान चांगल्या आठवणी तर आहेत…
‘कोपा अमेरिका’ फुटबॉलमुळे अर्जेंटिना संघाने चुकवलं कर्ज!
अर्जेंटिनाला चार मोठ्या स्पर्धांच्या अंतिम फेरीत पराभवाचा सामना करावा लागला होता. मोठ्या स्पर्धांत झटपट आव्हान संपुष्टात येणे, राष्ट्रीय संघातून निवृत्ती घ्यावी की काय, अशी टोकाची मानसिकता.. यामुळे लियोनेल मेस्सी जवळजवळ खचला होता. मात्र, कोपा अमेरिकेच्या जेतेपदाने मेस्सीला पुन्हा उभारी मिळाली आहे. हा आनंद तो लपवू शकला नाही. त्याच्या डोळ्यांतून वाहणारे आनंदाश्रू सगळं काही स्पष्ट करीत होते. किती तरी वर्षांचा जेतेपदाचा हा दुष्काळ आज संपला होता. चाहत्यांच्या अपेक्षांचं ओझं हलकं झालं. किती तरी पराभवांचं कर्ज डोक्यावर होतं, ते आज एका स्पर्धेतील विजयाने मेस्सीच्या अर्जेंटिनाने फेडलं होतं.
अर्जेंटिना संघाचा कर्णधार असलेला लियोनेल मेस्सी याने आतापर्यंत सर्वाधिक 151 सामने खेळले आहेत. सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा हा एक विक्रम आहे. उरुग्वेचे पंच एस्तेबान ओस्तोजिच यांनी जेव्हा सामना संपल्याची शिटी वाजवली तेव्हा मेस्सीच्या आनंदाला पारावर उरला नाही. हा विजय मेस्सीसाठी किती महत्त्वाचा आहे, हे मेस्सीशिवाय कोणालाही कळणार नाही. आता त्याच्यासमोर विश्वकपचे आव्हान असेल. ही स्पर्धा कतारमध्ये पुढच्या वर्षी म्हणजे 2022 मध्ये होणार आहे. जर अर्जेंटिनाने हा विश्वकपही जिंकला तर ती 1986 मधील मॅराडोनाच्या कामगिरीची पुनरावृत्ती ठरेल. त्याचबरोबर मॅराडोना यांना वाहिलेली श्रद्धांजलीही असेल…
मेस्सी सततच्या पराभवामुळे होता निराश
कोपा अमेरिकेच्या सामन्यापूर्वी अर्जेंटिनाच्या नावावर दोनच मोठ्या स्पर्धांचे जेतेपद होते. ते म्हणजे 2005 च्या 20 वर्षांखालील विश्वविजेतेपद आणि 2008 च्या बीजिंग ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक. ही कामगिरी सोडली तर अर्जेंटिनाच्या नव्या दमाच्या संघाकडे सांगण्यासारखं काहीही नव्हतं. त्यानंतर वरिष्ठ संघासोबत मेस्सीच्या दुर्दैवाचेच फेरे सुरू झाले. ऐन तारुण्यात वयाच्या 19 व्या वर्षापासूनच मेस्सीला नैराश्याने घेरण्यास सुरुवात केली. 2006 च्या विश्वकप स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत जर्मनीने अर्जेंटिनाचे आव्हान संपुष्टात आणले. हा पराभव धक्कादायक होता. त्यातून सावरत अर्जेंटिनाने वर्षभरातच कोपा अमेरिकेच्या अंतिम फेरीपर्यंत धडक मारली. दुर्दैव इथंही संपलेलं नव्हतं. अर्जेंटिनाला ब्राझीलने 3-0 असे पराभूत करीत कोपा अमेरिका किताबावर नाव कोरले. हातातोंडाशी आलेला घास ब्राझीलने हिरावून घेतला. हा पराभवही अर्जेंटिनाच्या हृदयाला घरे पाडणारा होता.
पाठीराखे कमालीचे हिरमुसले होते. पुन्हा नव्याने उभारी घेत अर्जेंटिना 2014 च्या विश्वकप स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत धडकला. इथेही तेच. जर्मनीने अर्जेंटिनाचे स्वप्न पुन्हा धुळीस मिळवले. तेव्हाही हेच रियोचे माराकाना स्टेडियम होते. याच मैदानावर मेस्सीचा अर्जेंटिना 0-1 ने पराभूत झाला. मेस्सी प्रचंड निराश झाला होता. विशेष म्हणजे या वर्ल्डकपमध्ये त्याला सर्वोत्तम फुटबॉलपटू म्हणून गौरविण्यात आले. मात्र, पराभूत संघाच्या कर्णधाराला या पुरस्काराचं महत्त्व तसुभरही नव्हतं. जर्मनी, ब्राझीलनेच मेस्सीच्या अर्जेंटिनाचे मनसुबे धुळीस मिळवले असे नाही, तर चिलीनेही त्यांच्या जखमांवर मिरची चोळली… कोपा अमेरिका स्पर्धेतच 2015 आणि 2016 मध्ये सलग दोन वेळा अंतिम फेरी गाठूनही मेस्सीच्या अर्जेंटिनाला चिलीने पराभूत केले. एकामागोमाग एक पराभव झेलताना मेस्सी जवळजवळ खचला होता. चिलीविरुद्ध सलग दुसऱ्या वर्षी पराभूत झाल्यानंतर तर मेस्सीने आपल्या उद्विग्न भावना व्यक्त केल्या. तो म्हणाला, “आता अर्जेंटिना संघाकडून मी खेळणार नाही.. मी खूप प्रयत्न केले. मात्र आता वाटतं, खूप झालं हे!”
अर्थात, इतक्या टोकाच्या निर्णयाप्रत येऊनही मेस्सीने पुन्हा दक्षिण अमेरिका विश्वकप पात्रता स्पर्धेत पुनरागमन केलंच. त्यासाठीही त्याच्या संघाला बराच घाम गाळावा लागला. संघाला विश्वकप स्पर्धेत स्थान मिळवून दिले; पण प्री क्वार्टर फायनलमध्ये फ्रान्सविरुद्ध त्यांना पुन्हा पराभवाचा सामना करावा लागला. चाहत्यांची मेस्सीविषयी एक तक्रार होती, मेस्सी आक्रमकपणे खेळत नाही. त्याच्या खेळण्यात उत्साह दिसत नाही. युरोपीयन खेळाडूंसारखा जोश मेस्सीत नाहीच. मेस्सीने मग 2019 च्या कोपा अमेरिका स्पर्धेत अधिक आक्रमकता दाखवली. चाहत्यांच्या तक्रारीची त्याने घेतलेली ही दखल होती. ही आक्रमकता पाहून चाहत्यांनीही आनंद व्यक्त केला. मेस्सी अन्य युवा खेळाडूंपेक्षा अनुभवी खेळाडू. त्यांचा प्रशिक्षक लियोनल स्केलोनी यांनाही फारसा अनुभव नव्हता. मात्र, तरीही मेस्सीने सर्वांशी जुळवून घेत आपलं सर्वोत्तम योगदान दिलं. त्याचं फलित म्हणजे 2021 ची कोपा अमेरिका. वयाच्या 34 व्या वर्षी मेस्सीने कोपा अमेरिका करंडक उंचावला. कारकिर्दीतल्या ज्या सर्वोत्तम विजयाची वाट तो पाहत होता, तो आता संपला होता.
मेस्सी, नेमार ठरले सर्वोत्तम खेळाडू
लियोनेल मेस्सी आणि ब्राझीलचा नेमार हे दोन्ही स्टार खेळाडू स्पर्धेतले सर्वोत्तम खेळाडू ठरले. खरं तर एकच खेळाडू सर्वोत्तम ठरतो. मात्र कोपा अमेरिका स्पर्धेत दोन खेळाडूंना सर्वोत्तम खेळाडूचा बहुमान मिळाला. त्यावर दक्षिण अमेरिका फुटबॉलच्या कोनमेबोल संस्थेने सांगितले, ‘‘फक्त एकच सर्वश्रेष्ठ खेळाडू निवडणे शक्य नव्हते. कारण या स्पर्धेत दोन सर्वोत्तम खेळाडू आहेत.’’ मेस्सीने सहा सामन्यांत चार गोल केले, तर पाच गोल करण्यात त्याने मदत केली. दुसरीकडे नेमारने पाच सामन्यांत दोन गोल केले, तर तीन गोल करण्यास त्याने मदत केली.
कोनमेबोलच्या तांत्रिक अभ्यास गटाने खुलासा केला, की दोन्ही खेळाडूंचा आपल्या संघांवर सकारात्मक प्रभाव राहिला. कोपा अमेरिका स्पर्धेत त्यांनी जेवढे सामने खेळले त्या सर्व सामन्यांत दक्षिण अमेरिकी डीएनएचं प्रतिबिंब होतं. या अभ्यास गटात कोलंबियाचे फ्रेंसिस्को मातुराना आणि कार्लोस रेसट्रेपो, उरुग्वेचे डेनियल बनालेस आणि गेरार्डो पेलुसो, अर्जेंटिनाचे सर्जियो बतिस्ता आणि नेरी पंपिडो, तर ब्राझीलचे ओस्वाल्डो डी ओलिविएरा यांचा समावेश होता. 2005 मध्ये पदार्पण अर्जेंटिनाकडून करणारा कर्णधार मेस्सी याची ही राष्ट्रीय संघातील सर्वोत्तम स्पर्धा आहे. मैदानातही कर्णधाराच्या रूपाने त्याचा सहज वावर दिसला. दुसरीकडे ड्रिबल, पास आणि शॉटमुळे ब्राझीलच्या संघात नेमारनेही महत्त्वाची भूमिका बजावली. मिडफील्डर लुकास पेक्वेटासोबत त्याने केलेल्या शानदार पासिंगने ब्राझील मजबुती दिली.
सर्वाधिक गोल करण्यात मेस्सी आणि लुईस डायज अव्वल
लियोनल मेस्सी आणि कोलंबियाचा लुईस डायज या दोघांनी कोपा अमेरिका स्पर्धेत प्रत्येकी चार गोल केले आहेत. स्पर्धेतील हे सर्वाधिक गोल करणारे खेळाडू ठरले आहेत. मेस्सीला ब्राझीलविरुद्ध अंतिम फेरीत एकही गोल नोंदवता आला नाही. अन्यथा तो एकमेव सर्वाधिक गोल करणारा खेळाडू ठरला असता. कोलंबियाचा युवा स्ट्रायकर डायज याने शुक्रवारी तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीत पेरूचा 3-2 असा विजय मिळवताना दोन गोल केले. मेस्सीने या स्पर्धेत पहिला गोल चिलीविरुद्ध गटसाखळीतील सामन्यात फ्री किकवर केला होता. त्या वेळी चिली- अर्जेंटिना हा सामना 1-1 असा बरोबरीत सुटला.
चौतीस वर्षीय मेस्सीने बोलिव्हियाविरुद्ध 4-1 असा विजय मिळविताना दोन गोल केले. चौथा गोल उपांत्यपूर्व फेरीत इक्वाडोरविरुद्ध नोंदवला. इक्वाडोरला अर्जेंटिनाने 3-0 असे पराभूत केले. त्याने पाच गोल करण्यातही संघाला मदत केली. फक्त ब्राझीलविरुद्धचाच सामना असा होता, की ज्यात मेस्सीचा यात कोणताही सहभाग नव्हता. हा गोल एंजेल डी मारिया याने केला. दुसरीकडे कोलंबियाचा 24 वर्षीय डायज याने गटसाखळीत ब्राझीलविरुद्ध शानदार व्हॉलीने गोल केला होता. अर्थात, या सामन्यात ब्राझीलने विजय मिळवला. मात्र, चर्चा डायजच्या गोलचीच झाली. तज्ज्ञांच्या मते, हा स्पर्धेतला सर्वोत्तम गोल आहे. नंतर डायजने उपांत्य फेरीत अर्जेंटिनाविरुद्ध एक गोल केला. तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीत पेरूविरुद्ध दोन गोल करीत मेस्सीच्या चार गोलशी बरोबरी केली.
मारियाला मानसोपचार तज्ज्ञाची घ्यावी लागली मदत
ब्राझीलविरुद्ध अंतिम फेरीत एकमेव गोल नोंदवत एंजेल डी. मारिया अर्जेंटिनासाठी हिरो ठरला आहे. मात्र, तुमचा विश्वास बसणार नाही, पण या सामन्यापूर्वी त्याची मानसिक स्थिती ठीक नव्हती. त्याला मानसोपचार तज्ज्ञाची मदत घ्यावी लागली होती. मारिया यानेच हा खुलासा केला. कामगिरी सर्वोत्तम होण्यासाठी अंतिम फेरीपूर्वी मला मानसोपचार तज्ज्ञाची मदत घ्यावी लागल्याचे त्याने सांगितले. अंतिम सामन्यात विजय मिळविल्यानंतर त्याने हा खुलासा केला.
तो म्हणाला, ‘‘मी भावूक नाही होऊ शकत, मी जमिनीवर पडून जल्लोषही नाही करू शकत. आम्ही हे विजेतेपद मिळविण्यासाठी किती स्वप्ने पाहिली होती. किती तरी लोकांनी सांगितलं, की मला संघात पुन्हा घेऊ नका. तरीही मी हिंमत हरलो नाही. आज हा विजय जेतेपदाकडे घेऊन गेला.’’
सामन्यातील 22 व्या मिनिटाला रॉड्रिगो डी पॉल याने डी मारियाकडे दीर्घ पल्ल्याचा पास दिला. हाच पास निर्णायक ठरला. किंबहुना या पासचं 33 वर्षीय स्ट्रायकर मारियाने सोनं केलं. त्याने लेफ्ट बॅक रेना लोडीच्या सदोष बचावाचा पुरेपूर लाभ उठवत चेंडू आपल्या ताब्यात घेतला. पुढे गोलकीपर अँडरसनला चकवत अर्जेंटिनाला आघाडी मिळवून दिली. पुढे हीच आघाडी निर्णायक ठरली. आज मारिया मॅचविनर ठरला असला तरी त्याचा भूतकाळ तुम्हाला माहीत नसेल. अर्जेंटीनाच्या या संघातील फक्त डी मारिया, कर्णधार लियोनेल मेस्सी आणि स्ट्रायकर सर्जियो अगुएरो हे तीनच खेळाडू असे होते, ज्यांनी 2014 ची विश्वकप स्पर्धा खेळली होती. ब्राझीलमध्ये झालेल्या या स्पर्धेत अर्जेंटिनाला जर्मनीने अंतिम फेरीत पराभूत केले होते. विशेष म्हणजे डी मारिया याला दुखापतीमुळे ही अंतिम फेरी खेळता आली नव्हती. त्याची ही उणीव संघाला जाणवली की नाही माहीत नाही, पण दुखापतीमुळेच तो आणखी दोन महत्त्वाच्या अंतिम फेरी खेळू शकला नाही. त्या म्हणजे 2015 आणि 2016 च्या चिलीविरुद्धच्या कोपा अमेरिका स्पर्धेच्या अंतिम फेरी. या दोन्हीही स्पर्धांत अर्जेंटिनाच पराभूत झाला.
हे नेमकं काय होतंय, हे माझ्याच बाबत का होतंय, हे प्रश्न मारियालाही पडलेच असतील. त्यातच त्याची मानसिक स्थिती दोलायमान झाली. यातून बाहेर पडण्यासाठी अखेर मारियाने एका मानसोपचार तज्ज्ञाची मदत घेतली. अर्जेंटिनाचे चाहते त्याला संघाबाहेर ठेवण्याची इच्छा बाळगत होते. मात्र, मारिया खचला नाही. किंबहुना त्याने दाखवून दिले, की तुम्ही मला जे समजता तसा मी नाही. त्याच्याच निर्णायक गोलवर आज अर्जेंटिनाला कोपा अमेरिका स्पर्धेचं विजेतेपद मिळालं. मारियाने आपल्या टीकाकारांना चूक ठरवलं होतं. तो म्हणाला, ‘‘मी इथेच थांबणार नाही. वर्ल्डकप लवकरत येत आहे. या विजयाने माझं मनोबल आणखीच वाढलं आहे.’’