या खेळाडूला मिळाला 50 वर्षांनंतर कसोटी क्रिकेटपटूचा दर्जा
इंग्लंडसाठी एकमेव कसोटी सामना खेळणारे माजी फलंदाज अॅलन जोन्स Alan Jones | यांना तब्बल ५० वर्षांनंतर कसोटी क्रिकेटपटूचा दर्जा (Cricket cap) मिळाला आहे. विशेष म्हणजे त्यांच्या नावावर प्रथमश्रेणीमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम आहे, जो आजपर्यंत कोणीही मोडू शकलेला नाही.
जोन्स 1970 मध्ये शेष विश्व एकादशसंघाविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळले होते. इंग्लंडमध्ये ही कसोटी मालिका होती. या सामन्यांना सुरुवातीला कसोटीचा दर्जा होता. मात्र, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) 1972 मध्ये हा दर्जा काढून घेतला. जोन्स यांना दोन्ही डावांत फारशी कामगिरी उंचावता आली नाही. माइक प्रॉक्टर यांनी त्यांना एकदा शून्यवर, तर एका डावात पाच धावांवर बाद केले. त्यानंतर त्यांना पुन्हा कधीही क्रिकेट (Cricket) खेळण्याची संधी मिळाली नाही. अशा प्रकारे जोन्स यांचा तब्बल 48 वर्षांपासून कसोटीचा दर्जापासून वंचित राहावे लागले होते. अॅलन जोन्स आता ८१ वर्षांचे आहेत. आता इंग्लंड वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) जोन्स यांना अधिकृतपणे 696 व्या नंबरचा कसोटी क्रिकेटपटूचा दर्जा बहाल केला आहे.
सध्याच्या लॉकडाउनच्या निर्बंधामुळे जोन्स यांना कॅप सुपूर्द करण्याचा कार्यक्रम एका व्हिडीओ लिंकद्वारे करण्यात आला.
नवी कॅप मिळाल्यानंतर जोन्स मिश्कीलपणे म्हणाले, ‘‘ही आता फिट बसतेय. आता मी हेल्मेटची प्रतीक्षा करीत आहे.’’ (अॅलन जोन्स यांच्या काळात हेल्मेट हा प्रकारच अस्तित्वात नव्हता.) जोन्स यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये तब्बल 36 हजार 49 धावा केल्या आहेत. या धावा आयसीसीच्या अधिकृत प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये आतापर्यंत जगातील कोणत्याही फलंदाजाला करता आलेल्या नाहीत.
‘ग्लेमॉर्गन’कडून (इंग्लिश कौंटी क्लब) खेळणारे ते सर्वांत आकर्षक आणि उपयुक्त फलंदाज होते, यात कुणाचेही दुमत नाही. 1957 पासून खेळताना त्यांनी कारकिर्दीतील 26 मोसमांत प्रथम श्रेणीत खोऱ्याने धावा काढल्या. थोड्याथोडक्या नव्हे, तर तब्बल 36 हजारांपेक्षा जास्त. अर्थात, एवढं सगळं असतानाही त्यांना इंग्लिश संघाकडून खेळण्याची फारशी संधी मिळाली नाही. जर ते मिडलसेक्स किंवा सरेकडून खेळले असते तर ते पन्नास वेळा इंग्लिश संघाकडून खेळले असते. दुर्दैवाने ते ग्लेमॉर्गनकडून खेळले. त्यामुळे ते दुर्लक्षित राहिले.
81 वर्षांचे जोन्स आजही तसेच आहेत, जसे ते 50 च्या दशकात होते. ते म्हणतात, मी खेळत होतो, तेव्हाही माझं वजन तेवढंच होतं, जेवढं आज आहे आणि तारुण्यात मी जे ब्लेझर परिधान करीत होतो, त्या ब्लेझरमध्ये मी आजही व्यवस्थित घुसू शकतो.
जोन्स यांना नऊ भाऊ होते. पैकी इफियन हा त्यांच्यापेक्षा चार वर्षांनी लहान होता. तोही ग्लेमॉर्गनकडून दोन दशकांहून अधिक काळ खेळला आहे. अॅलन जोन्स क्रीझवर देखणे दिसायचे. त्यांची सडपातळ शरीरयष्टी आणि क्रीझवर निडरपणे वेगवान गोलंदाजांचा ते सामना करायचे. त्या वेळी हेल्मेट नव्हतेच. अशा वेळी भेदक गोलंदाजांचा ते कसे सामना करीत असतील त्याची आज कल्पनाही करू शकत नाही. मात्र, अशाही परिस्थितीत त्यांनी प्रथमश्रेणीत ३६ हजारपेक्षा धावांचा विक्रम करणे आताच्या पिढीत कुणालाही जमलेले नाही. शास्त्रशुद्ध फलंदाजी, कट आणि ड्राइव्ह सुरेख खेळणारे जोन्स संघात सर्वांत लहान डावखुरे फलंदाज होते.