All Sportschesssports news

दोम्माराजू गुकेश World Chess Champion

भारताचा ग्रँडमास्टर दोम्माराजू गुकेश याने सिंगापूरमध्ये विश्वविजेतेपदावर मोहोर उमटवली.

दोम्माराजू गुकेश World Chess Champion

सिंगापूरमध्ये भारताचा ग्रँडमास्टर दोम्माराजू गुकेश याने 12 डिसेंबर 2024 रोजी इतिहास रचला. जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत अखेरच्या चौदाव्या डावात चीनच्या गतविजेत्या डिंग लिरेन याला पराभूत करीत गुकेशने विश्वविजेतेपदावर मोहोर उमटवली. या जेतेपदासह सुमारे ११ कोटी ३ लाख रुपयांचे घसघशीत बक्षीसही जिंकले.

दोम्माराजू गुकेश
दोम्माराजू गुकेश

जगज्जेतेपदाला गवसणी घालताना १८ वर्षीय गुकेशने विक्रमाची नोंद केली. तो सर्वांत कमी वयाचा जगज्जेता ठरला. याबाबतीत त्याने रशियाच्या गॅरी कास्पारोवचा विक्रम मोडीत काढला. कास्पारोवने १९८५ मध्ये अनातोली कार्पोवला हरवून विश्वविजेतेपद पटकावले होते. त्या वेळी त्याचे वय होते २२ वर्षे.

2 जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत बाजी मारणारा गुकेश भारताचा दुसरा खेळाडू ठरला. यापूर्वी विश्वनाथन आनंदने अशी कामगिरी केली होती.

12 भारतीय खेळाडूचे बारा वर्षांनंतर विश्वविजेतेपद. यापूर्वी २०१२ मध्ये आनंदने विश्वविजेतेपद मिळवले होते.

रशियाचा गॅरी कास्पारोव याने 1985 मध्ये अनातोली कार्पोव याला पराभूत करीत वयाच्या 22 व्या वर्षी विजेतेपद मिळवले होते

असाही योग

2010 मध्ये विश्वनाथन आनंदने बल्गेरियाच्या वेसेलिन टोपालोववर 6.5-5,5 अशी मात करून विश्वविजेतेपद पटकावले होते. अखेरच्या बाराव्या डावात काळे मोहरे असताना आनंदने टोपालोवला हरवून विश्वविजेतेपदावर नाव कोरले होते; तसेच गुकेशच्या बाबतीतही घडले. पहिल्या गेममध्ये डिंगने गुकेशला हरवले होते आणि अखेरच्या चौदाव्या डावात गुकेशने काळ्या मोहऱ्यांसह खेळताना डिंगला पराभूत केले.

या विश्वविजेतेपदाबरोबरच गुकेशला 25 लाख डॉलरचे घसघशीत बक्षीस मिळाले. दिग्गज बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद याच्यानंतर जागतिक बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद मिळविणारा दुसराच भारतीय खेळाडू आहे. 2013 मध्ये पाच वेळचा विश्वविजेता आनंद नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनविरुद्ध पराभूत झाला होता.

कोण आहे गुकेश?

दोम्माराजू गुकेश याचं पालनपोषण अशा आईवडिलांनी केलं, ज्याच्या स्वप्नासाठी त्यांनी जिवाचं रान केलं. एवढंच नाही, तर त्याच्या स्वप्नासाठी त्यांनी लोकवर्गणी गोळा करण्यात कोणताही संकोच बाळगला नाही. त्याचा प्रवास सोपा नव्हता. त्याचे वडील डॉ. रजनीकांत ईएनटी सर्जन, तर आई पद्मा माइक्रोबायोलॉजिस्ट आहे. या मातापित्यांनी त्याच्यासाठी आपल्या करिअरचा त्याग केला. रजनीकांत यांना 2017-18 मध्ये आपली ‘प्रॅक्टिस’ सोडावी लागली. या पितापुत्राने माफक बजेटमध्ये जगाची यात्रा केली. जेव्हा गुकेशला ग्रँडमास्टरचा अखेरचा नॉर्म मिळवण्यासाठी झुंजत होता, तेव्हा त्याच्या आईने घरखर्चाची जबाबदारी उचलली. घरात तीच एकमेव कमावती महिला. गुकेश जेव्हा वयाच्या 17 व्या वर्षी विश्वविजेतेपदाचा सर्वांत कमी वयाचा आव्हानवीर बनला, तेव्हा बालपणीचे त्याचे प्रशिक्षक विष्णु प्रसन्ना यांनी एप्रिलमध्ये त्याच्या आईवडिलांच्या त्यागाचा खुलासा केला. ते म्हणाले, की ‘‘गुकेशच्या आईवडिलांनी खूप मोठा त्याग केला आहे.’’ ते म्हणाले, की ‘‘गुकेशच्या वडिलांना आपलं करिअर जवळपास सोडलं आहे. गुकेशची आईच कुटुंबाचा खर्च उचलत आहे. स्पर्धेच्या निमित्ताने जगाची सफर करताना हे कुटुंब एकमेकांचा चेहरा अभावानेच पाहायचे.’’

गुकेश बुद्धिबळाच्या इतिहासातील सर्वांत कमी वयाचा ग्रँडमास्टरचा बहुमान मिळवला आहे. तो 12 वर्षे सात महिने आणि 17 दिवसांचा असताना हा बहुमान मिळवला. ​​चेन्नईतील हा मुलगा 2700 च्या एलो रेटिंग क्लबमध्ये जाऊन बसला. अशी कामगिरी करणारा तो जगातला तिसरा सर्वांत कमी वयाचा खेळाडू ठरला आहे आणि 2750 चे रेटिंग पार करणाराही तो सर्वांत कमी वयाचा खेळाडू आहे.

क्रामनिक का म्हणाले, हा बुद्धिबळाचा अंत!

माजी विश्वविजेता व्लादिमीर क्रामनिक याने भारतीय ग्रँडमास्टर डी गुकेश आणि चीनचा डिंग लिरेन यांच्यातील जागतिक बुद्धिबळ स्पर्धेबाबत फारसे समाधानी नाहीत. ते या दोघांच्या गुणवत्तेवर फारसे प्रभावितही नाहीत. ही लढत पाहून ते म्हणाले, हा बुद्धिबळाचा अंत आहे. मात्र, यामागचे नेमके कारण काय?

गुकेशने 12 डिसेंबर 2024 रोजी अतिशय तनावपूर्ण लढतीत 14 वीं आणि अखेरची फेरी जिंक विश्वविजेतेपदावर मोहोर उमटवली. गतविजेता चीनचा डिंग लिरेन याला त्याने पराभूत केले. या डावानंतर क्रामनिक यांनी आपली नाराजी स्पष्टपणे व्यक्त केली. या डावात डिंग लिरेनने एक चूक केली. ही चूक पोरकटपणाची असल्याचे ते म्हणाले.

क्रामनिक यांनी ‘एक्स’वर लिहिले, ‘‘काहीच बोलायचं नाही. दुःखद. बुद्धिबळाचा शेवट झाला आहे हे आपण जाणूनच आहोत.’’ आणखी एका ट्विटमध्ये ते म्हणाले, ‘‘आतापर्यंत एकाही जागतिक बुद्धिबळ स्पर्धेचा निकाल अशा पोरकट चालीने झालेला नाही.’’ क्रामनिकने या स्पर्धेतील सहाव्या डावानंतरही खेळआतील खालावलेल्या दर्जावर टीका केली होती. ‘दुर्बळ’ खेळ झाल्याचे त्यांनी म्हटले होते.

के म्हणाले, ‘‘खरं सांगायचं तर मी आजचा खेळ (सहावा डाव) पाहून खूप निराश झालो आहे. एवढंच नाही तर पाचवा डावही फार उच्च दर्जाचा नव्हता. मात्र, आज – एका व्यावसायिक खेळासाठी- दोन्ही खेळाडूंचा खेळ खरंच फारच कमकुवत होता. हा अतिशय निराशाजनक दर्जा आहे.’’

रशियाचे 49 वर्षीय क्रामनिक 2000 ते 2006 पर्यंत क्लासिकल जागतिक बुद्धिबळ स्पर्धेचे विजेते होते. क्रामनिकने 2000 मध्ये दिग्गज गॅरी कास्पारोव यांना पराभूत करीत क्लासिकल जागतिक बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते.

दशकापूर्वीचे स्वप्न साकारले

‘सुमारे अकरा वर्षांपूर्वी भारताकडून बुद्धिबळातील जगज्जेतेपद दुरावले, ते मी पाहिले होते. त्या वेळी मी ते विजेतेपद भारतास जिंकून देण्याचे स्वप्न पाहिले होते. हे स्वप्न दहा वर्षे बघत होतो. ते प्रत्यक्षात येणे याशिवाय अजून काय जास्त असू शकते,’ अशी भावना भारताचा नवा जगज्जेता दोम्माराजू गुकेश याने व्यक्त केली. जगज्जेतेपद जिंकल्यानंतर गुकेशला अश्रू अनावर झाले.

‘या विजेतेपदाची मला खूपच आस लागली होती. सहा-सात वर्षांचा असल्यापासून हे विजेतेपद कायम खुणावत होते. मला ते जिंकायचे होते. प्रत्येक बुद्धिबळपटूचे हे स्वप्न असते. ते स्वप्न पूर्ण झाल्याचा अनुभव मी घेत आहे. त्यासाठी मी देवाचा खूप आभारी आहे. कँडिडेट्समधील यशापासून आतापर्यंतचा प्रवास देवाचे आशीर्वाद असल्यामुळेच शक्य झाला,’ अशी भावना गुकेशने व्यक्त केली. या प्रवासात साथ देणाऱ्या प्रत्येकाचा मी ऋणी आहे. माझ्या मनात अनेक भावना निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे बोलताना काहीतरी वेड्यासारखेही बोलू शकतो, असे म्हणताना गुकेशला हसू आवरत नव्हते; मात्र तो काही वेळातच शांत झाला.

‘देशाचे प्रतिनिधित्व करणे हा बहुमानच असतो. अकरा वर्षांपूर्वी भारतात झालेली जगज्जेतेपदाची लढत अजूनही मला आठवत आहे. ते २०१३ वर्ष होते. त्या वेळी मी काचेच्या पलीकडून सामना बघितला होता. ती लढत पाहताना आपणही शांतपणे खेळ करायचा, हे ठरवले होते. त्याच वेळी भारतात हे जगज्जेतेपद जिंकून द्यायचे, हे स्वप्न पाहिले होते,’ असे गुकेशने सांगितले.

‘मी आता जिंकलेले हे विजेतेपद आठ वर्षांचा असताना स्वप्न पाहणाऱ्या मुलासाठी नक्कीच खूप मोठे आहे. मी कधीच विक्रमाचा विचार करणे सोडून दिला आहे. मला जगज्जेता व्हायचे आहे, हे मी सांगत असलेली ती २०१७मधील क्लीप सगळीकडे फिरत आहे. हे त्या वेळी सांगणारा तो आठ वर्षांचा मुलगा जास्त आनंदीत असेल,’ असे सांगताना गुकेशचा कंठ काहीसा दाटून आला होता.

‘या लढतीतील पहिल्या डावासाठी मी आलो, तो क्षण मी कधीही विसरणार नाही. त्या डावात नक्कीच चांगला खेळ झाला नाही; २०१३मध्ये मी ग्लास बॉक्सच्या बाहेर होतो; मात्र या वेळी आतमध्ये होतो. माझ्यासोबत तिरंगा होता. तो क्षण अविस्मरणीय होता. त्या वेळी आपण जगज्जेतेपद जिंकण्याचा प्रवास पूर्ण करू असे वाटले नव्हते,’ असे गुकेश म्हणाला.

अखेरचा डाव बरोबरीत सुटणार असेच वाटत होते; मात्र त्यानंतरही प्रयत्न करण्याचे ठरवले. त्या वेळीही बरोबरीच होईल, अशीच भावना होती; मात्र त्याची ती खेळी पाहून आपण जिंकणार अशी खात्री झाली आणि स्वतःवर नियंत्रण ठेवू शकलो नाही; मात्र हा क्षण कसा विसरता येणार. विजेतेपद जिंकल्यानंतर आईला भेटलो, त्या वेळी आम्हा दोघांनाही अश्रू आवरत नव्हते. मी फक्त तिला अभिनंदन एवढेच म्हणू शकलो. – दोम्माराजू गुकेश

विशी सरांची कायम साथ

जगज्जेतेपद जिंकण्याच्या मोहिमेत विशी सरांचा (विश्वनाथन आनंद) थेट सहभाग नव्हता; मात्र त्यांची मला कायम साथ होती. ते मला, माझ्या सहकाऱ्यांना पूर्वतयारीसाठी कायम मदत करीत होते, अशा शब्दांत गुकेशने त्याच्या आवडत्या, आदर्श खेळाडूबाबत भावना व्यक्त केल्या.

‘विजेतेपद आई वडिलांचेही’

‘आई-वडिलांनी मला खूपच साह्य केले. त्यांची साथ किती होती, हे सांगण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. माझे स्वप्न माझ्यापेक्षा त्यांच्यासाठी खूप मोठे होते. ते दोघेही क्रीडाप्रेमी आहेत. त्यांना आपले स्वप्न पूर्ण करता आले नाही. मला जे काही करायचे असेल, त्यासाठी साथ द्यायचा निर्णय त्यांनी माझ्या जन्माच्या वेळीच घेतला होता. त्यांनी मला साथ देण्यासाठी खूप काही केले. त्यासाठी त्यांनी कसलाही विचार केला नाही. माझ्यासाठी त्यांनी जे काही केले, ते पाहून माझ्या इच्छा, किती वेड्यासारख्या होत्या, हेच मनात येते. माझ्या संपूर्ण प्रवासात त्यांची साथ आहे, हे म्हणणेही पुरेसे नसेल. हे विजेतेपद केवळ माझे नाही, त्यांचेही आहे,’ अशा शब्दांत गुकेशने आई-वडिलांचे ऋण मानले.

‘मी यशासाठी कसलाही मोबदला दिला नाही; पण आई-वडिलांनी नक्कीच दिला. आमच्या आप्तेष्टांनी दिला. आमची आर्थिक स्थिती फारशी चांगली नव्हती; पण त्यांनी मला काही कमी पडू दिले नाही. त्याची जाणीव तेव्हा मला नव्हती; मात्र मोठा झाल्यावर त्यांनी माझ्यासाठी किती केले, हे मी जाणले. माझे सर्व सहकारी माझ्या यशासाठी त्यांच्या कुटुंबापासून दूर राहिले. त्यांनी जो काही त्याग केला, त्याला तोड नाही.’

गुकेश म्हणाला….

  • माझे सहकारी, आप्तेष्ट माझी सर्वांत भक्कम बाजू. कामगिरी खराब होत असताना त्यांनी दिलेली प्रेरणा मोलाची
  • जगज्जेतेपदाच्या प्रवासात अनेक मार्ग खुंटल्याचे दिसले; पण कधीही निराश नाही
  • पराभूत झाल्यावरही खेळ कसा झाला, हा विचार करीत असे आणि जास्त परिश्रम घेत असे
  • शेवटपर्यंत आणि प्रतिकूल परिस्थितीत कसा लढा द्यावा हे डिंगकडून शिकलो.
  • कार्लसनविरुद्ध जगज्जेतेपदाची लढत खेळायला नक्कीच आवडेल. ते खडतर आव्हान असेल; पण हा निर्णय त्याने घ्यायचा आहे
  • अर्जुन एरिगेसी, प्रज्ञानंद, निहाल सरीन हेही चांगली कामगिरी करीत आहेत. आम्ही एकमेकांविरुद्ध लढतानाच सर्वोत्तम कामगिरीसाठी प्रेरितही करतो

वय १८, जगज्जेताही १८वा

दोमाराजू गुकेश हा अवघा १८ वर्षांचा आहे. या वंडरकिडने काही महिन्यांपूर्वी कँडिडेट्स स्पर्धा जिंकून आव्हानवीर होत बुद्धिबळ जगतास धक्का दिला होता. आता त्याने हे यश खुजे वाटावे, अशी कामगिरी गुरुवारी करताना १८वा बुद्धिबळ जगज्जेता होण्याचा मान गुकेशने मिळवला. ही कामगिरी करताना त्याने सर्वांत लहान जागतिक विजेता होण्याचा बहुमानही मिळवला.

या जगज्जेतेपद लढतीत तेरा डावानंतर ६.५-६.५ अशी बरोबरी होती. चौदावा डाव बरोबरीत सुटणार आणि लढत टायब्रेकवर जाणार असेच वाटत होते; मात्र त्याच वेळी गुकेशच्या संयमी खेळाने आणि त्याचा शांतपणा पाहून प्रतिस्पर्धी डिंगवरील दडपण वाढले. त्याच्याकडून चूक झाली आणि गुकेशने या संधीचा पुरेपूर फायदा घेऊन चौदावा डाव जिंकला. गुकेशने ही जगज्जेतेपदाची लढत ७.५-६.५ अशी जिंकली.

चुक झाली हे पाहून चांगलाच धक्का बसला होता, अशी कबुली डिंगने लढतीनंतरच्या पत्रकार परिषदेत दिली. त्याने आता सर्व लक्ष गुकेशवर असणार हे जाणले. डिंगने संधी दिली आहे, यावर विश्वासच बसला नाही. आपण विजयी स्थिती मिळवली, हे समजले तो सर्वोत्तम क्षण होता, असे गुकेशने सांगितले.

१९८३च्या तोडीचे यश

‘गुकेशचे हे यश अविश्वसनीय आहे. त्याच्या या यशाने आपल्याला दिलेला आनंद १९८३च्या क्रिकेट वर्ल्ड कप विजेतेपदाइतका आहे. या यशाचा आनंदसोहळा सर्व भारतीयांनी एकमेकांच्या साथीत साजरा केला होता. गुकेशचे हे यश त्यासारखेच आहे,’ असे भारतीय संघाचे प्रशिक्षक श्रीनाथ नारायणन यांनी सांगितले. बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये सुवर्णपदक जिंकलेल्या भारतीय संघाचे श्रीनाथ प्रशिक्षक होते. १९८३ मधील वर्ल्ड कप विजेतेपद; तसेच विश्वनाथन आनंदच्या पाच जगज्जेतेपदांनी भारतीयांना आपण जगज्जेते होऊ शकतो, हा विश्वास दिला होता. सर्व देशवासियांचा आत्मविश्वास उंचावला होता. गुकेशच्या यशामुळे नवोदितांचा बुद्धिबळाकडील ओढा वाढेलच त्याहीपेक्षा त्यांना जगज्जेते होण्याची प्रेरणा मिळेल, ते जास्त मोलाचे आहे, असेही श्रीनाथ यांनी सांगितले.

आनंदला वाढदिवसाची भेट

विश्वनाथन आनंद बुधवारी ५५ वर्षांचा झाला आणि पाच वेळा जागतिक विजेतेपद जिंकलेल्या आनंदच्या वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी गुकेश जगज्जेता झाला. गुकेशला घडवण्यात आनंदचा मोलाचा वाटा आहे.

आनंद.. आता गुकेश

२००६पासून जगज्जेतेपदाच्या ११पैकी सहा लढतींचा निर्णय टायब्रेकविना झाला. त्यात चार वेळा आनंदने ही कामगिरी केली होती. आता गुकेशने याच प्रकारे यश मिळवले. मॅग्नस कार्लसननेही जगज्जेतेपद टायब्रेकरविनाच जिंकले.

अभिनंदन गुकेश… बुद्धिबळ, भारत आणि माझ्यासाठीदेखील हा अभिमानाचा क्षण आहे… गुकेशच्या या लखलखत्या यशाने आपल्या सगळ्यांची मान अभिमानाने उंचावली आहे. डिंगनेही चुरशीची लढत दिली. डिंग जगज्जेता का ठरला होता, हे त्याने या कडव्या लढतीतून सिद्ध केले. – विश्वनाथन आनंद, माजी जगज्जेता बुद्धिबळपटू

Watch All Live 14 Games

Visit us

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!