राहुल द्रविड आणि नैतिकता
पाय जमिनीवर असलेले राहुल द्रविड यांनी नम्रपणे पैसे नाकारले. पाच कोटींऐवजी फक्त अडीच कोटीच घेतले. कारण...
राहुल द्रविड आणि नैतिकता
वर्ल्ड कप येतो घरा तोचि दिवाळी दसरा… हे क्रिकेटवेड्या भारतातलं वास्तव. भारतीय क्रिकेट संघाने टी२० वर्ल्ड कप जिंकला आणि देशभर आनंदाचं भरतं आलं. का नाही? १६ वर्षांनी वर्ल्ड कप भारताकडे आला हे काय कमी? मग सुरू झाला बक्षिसांचा वर्षाव! बीसीसीआयने १२५ कोटी रुपये खेळाडूंवर ओवाळून टाकले. प्रत्येक खेळाडूला प्रत्येकी पाच-पाच कोटी रुपये देण्यात आले. विशेष म्हणजे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनाही पाच कोटी देऊ केले. दुसरीकडे त्यांचा चार जणांचा जो कोचिंग स्टाफ होता त्यांना मात्र प्रत्येकी अडीच कोटी देण्यात आले. पाय जमिनीवर असलेले राहुल द्रविड यांनी नम्रपणे हे पैसे नाकारले. पाच कोटींऐवजी फक्त अडीच कोटीच घेतले. कारण माझ्या सपोर्ट स्टाफची रक्कम जेवढी, तेवढीच माझी. हा केवढा मोठा निर्णय!
मुळात पाच कोटी रक्कम मोठीच! माझ्यासारख्या मध्यमवर्गीय माणसाने आयुष्य खर्च केलं तरी एवढी रक्कम गोळा करू शकणार नाही. असो. जर राहुल द्रविड यांनी ही रक्कम स्वीकारली असती तर इट्स ओके. त्यांचं योगदान पाहता एवढी मोठी रक्कम ते डिझर्व्ह करतात. म्हणजे ते ती रक्कम घेण्यास पात्र आहेत.
मात्र, त्यांनी जेव्हा ही रक्कम नाकारली तेव्हा ही रक्कम फारच क्षुल्लक वाटली. राहुल द्रविडसारख्या व्यक्तिमत्त्वासमोर अगदीच कचरा! नैतिक मूल्य किती मोठं असतं, याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे राहुल द्रविड. किंबहुना नैतिकता जपणाऱ्या खेळाडूंमध्ये राहुल द्रविड यांचं स्थान सर्वांत वरचं म्हंटलं तर ते वावगं ठरणार नाही.
आपल्या ऐकण्यात किंवा पाहण्यात अनेकदा एकदोन बातम्या तर येतच असतात… अमुक व्यक्तीने सापडलेली लाखोंची रक्कम प्रामाणिकपणे परत केली… वगैरे वगैरे. मुळात जी रक्कम आपली नाहीच ती परत करणे स्वाभाविक आहे. तो आपल्यात इनबिल्ट असलेला नीतिमत्तेचा एक गुण आहे. तो कुणी वापरतं, कुणी वापरत नाही.
इथं राहुल द्रविडला मिळालेली रक्कम तर वैधच होती. ती त्याला देऊ केली होती अधिकृतपणे! म्हणजे तब्बल अडीच कोटी रक्कम चक्क नको म्हणाले राहुल द्रविड! जेवण अगदी तट्ट झालं, तरी गुलाबजामची एक वाटी नाकारणं आपल्यासारख्याला जड जातं. राहुल द्रविडने तर अडीच कोटी नाकारले…! नैतिकता काय असते तर ती राहुल द्रविड यांनी कृतीतून दर्शवली.
आता ही न्यूज चॅनेलवाल्यांसाठी ब्रेकिंग न्यूज न व्हावी तरच नवल! पण ही सगळी प्रसारमाध्यमे अजय जडेजाला सोयीस्करपणे विसरली.
मला आठवतंय, अजय जडेजाने अफगाणिस्तानच्या क्रिकेट संघाला २०२३ च्या वनडे वर्ल्ड कपदरम्यान असंच मार्गदर्शन केलं होतं. त्या वेळी अफगाणिस्तानने पाकिस्तानला पराभूत केलं होतं. काय कमाल केली अफगाणिस्तानने! अर्थात, यामागे मार्गदर्शन होतं अजय जडेजाचं. त्या वेळी अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे सीईओ नसीब खान यांनी अजय जडेजाला मोठी रक्कम देऊ केली होती. मात्र, अजय जडेजाने नम्रपणे ती रक्कम नाकारली. म्हणाला, “तुमचं चांगलं खेळणं हेच माझं पैसा आणि बक्षीस! मला काय पाहिजे अजून?”
एका देशाच्या संघाला मार्गदर्शन करण्यासाठी प्रशिक्षक कोट्यवधीची रक्कम घेतात. इथं तर अजय जडेजाने एक छदामही घेतला नाही. काय म्हणावं या नैतिकतेला!
राहुल द्रविड, अजय जडेजा यांच्याही आधी एका रशियन गणितज्ञानेही अशीच कोट्यवधीची रक्कम नाकारली होती. एवढंच नाही, तर गलेलठ्ठ पगाराच्या नोकऱ्याही नाकारल्या. हा गणितज्ञ होता ग्रेगोरी पेरेल्मन. या रशियन गणितज्ञाने २००२-२००३ मध्ये ‘थर्स्टनचे भूमितीकरण अनुमान’ (Thurston’s Geometrization Conjecture) याचे प्रमाण एका वेबसाइटवर प्रकाशित केले. यालाच ‘प्वाइनकरे अनुमान’ असंही म्हटलं जातं. गणितातलं अतिशय असं हे अवघड सूत्र पेरेल्मन यांनी सोडवलं. आइनस्टाइन, टेस्ला यांच्यासारख्या दिग्गजांनाही जे जमलं नाही, ते पेरेल्मन यांनी करून दाखवलं. त्याबद्दल त्यांना फिल्डस पदकाने गौरविण्यात आले. मात्र, या पदकाची रक्कम त्यांनी नम्रपणे नाकारली. त्यांना २०१० मध्ये सहस्राब्दी पुरस्कारही जाहीर झाला. या पुरस्काराची रक्कमही त्यांनी नम्रपणे नाकारली. ही रक्कम होती दहा लाख अमेरिकी डॉलर. म्हणजे भारतीय रुपयांत ही रक्कम होते तब्बल साडेसात कोटी. ही रक्कम अगदी सहजपणे नाकारली!
“मला पैसे किंवा प्रसिद्धीत अजिबात रस नाही. मला प्राणिसंग्रहालयातील प्राण्यासारखं प्रदर्शन करायचं नाही.” पेरेल्मन यांचा हा विचार किती मौल्यवान म्हणावा!
इथंही मला तेच म्हणायचंय, की ही रक्कम स्वीकारली असती तर ती रक्कम खरंच खूप मोठी होती. मात्र, जेव्हा ती नाकारली तेव्हा पेरेल्मनचं व्यक्तिमत्त्व तेज:पुंज अधिक झळाळून आलं. इतकं, की त्यापुढे कोट्यवधीची रक्कमही फिकी पडते!
एका ऑलिम्पियन खेळाडूचा अनुभव मला इथं आवर्जून नमूद करावासा वाटतो. ऑलिम्पिकला पात्र ठरलेला हा खेळाडू अतिशय सामान्य परिस्थितीतून आलेला. ऑलिम्पिक खेळून आला. पदक मिळालं नाही, पण ऑलिम्पिकसारख्या वैश्विक यात्रेत सहभाग घेणं केवढं मोठं काम. एका संस्थेने त्याला पाच लाख रुपये दिले होते. सरकारकडूनही प्रचंड पैसे मिळाले. खरं तर त्याचा प्रवास प्रेरणादायीच म्हणावा.
मात्र, एका प्रसंगाने त्याच्याविषयीचा आदर क्षणार्धात लोपला. झालं काय, की महाराष्ट्र टाइम्स नेहमीच गरजू गुणवंत मुलांना लाखो रुपयांची मदत देतो. ही मदत दानशूरांकडून जमा केली जाते. ही रक्कम सुपूर्द करायची होती. त्यासाठी योग्य प्रेरणादायी व्यक्ती प्रमुख पाहुणी असावी, म्हणून या ऑलिम्पिक खेळाडूला बोलावण्याचं ठरलं. त्याला आमंत्रित करण्याची जबाबदारी माझ्यावर होती.
मी त्याला फोन केला. फोन घेतला त्याच्या काकाने. ते म्हणाले, तो तर कामात आहे. आता तो नागपूरला आहे. त्याला एवढा खर्च पेलवणार नाही.
मी म्हटलं, त्याचं जाण्यायेण्याचं भाडं देण्यात येईल. मग तर झालं…
तर त्याचा काका म्हणतो, अहो, त्याने काय होईल, आम्हाला केवळ येणं परवडणारं नाही. वगैरे वगैरे…
त्यांची कारणं पाहता, त्याला पैसे हवे होते हे स्पष्ट होत होतं. पण मी त्यांना म्हटलं, अहो, आर्थिक परिस्थिती नसलेल्या मुलांना आपण मदत करतो. त्यांचं पुढचं शिक्षण सुकर व्हावं, त्यांना प्रेरणा मिळावी म्हणून आम्ही त्यांच्यासारख्याच गरिबीतून यश मिळविणाऱ्या ऑलिम्पियनला आमंत्रित करतोय. ही केवढी आनंददायी बाब आहे.
तर तो काका म्हणतो, ती मोठ्यांची कामं आहे. आम्हाला नाही जमणार.
नंतर कळलं, की तो नागपूरला नाही तर नाशिकमध्येच होता. हाच खेळाडू नंतर एका मोठ्या शैक्षणिक संस्थेत प्रमुख पाहुणा म्हणून आला. या कार्यक्रमात त्याला संस्थेने पाच लाख रुपयांचा धनादेशही दिला.
नंतर या खेळाडूने त्याला घडविणाऱ्या प्रशिक्षकाचं नावही कुठे घेतलं नाही. उलट त्याने प्रशिक्षक म्हणून भलत्याच खेळातल्या व्य्यक्तीचं नाव पुढं केलं आणि प्रशिक्षकाला सरकारकडून मिळणारी रक्कम त्या व्यक्तीला मिळवून दिली. ही व्यक्ती एक महिला होती, जिच्याशी या खेळाडूने पुढच्या महिन्यातच लग्नही केलं.
हा खेळाडू पुढे कुठेही खेळताना दिसला नाही. मला व्यक्तिशः आलेला हा अनुभव आहे. मी जाणीवपूर्वक त्या खेळाडूचं नाव टाळलं आहे. मात्र, नाशिकमध्ये माझ्यानंतर असाच अनुभव अनेकांना आला. असो.
अगदी काही महिन्यांपूर्वी आंतरराष्ट्रीय ॲथलेटिक्स संघटनेने ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळविणाऱ्या खेळाडूंना 50 लाख रुपयांची रक्कम जाहीर केली. यावरून बरंच वादंग रंगलं. खेळाडू देशासाठी खेळतात, पैशांसाठी नव्हे वगैरे वगैरे म्हंटलं गेलं. काहींनी या देऊ केलेल्या बक्षिसाचं कौतुक केलं, तर काहींनी टीका. मात्र, पैशांच्या हव्यासापायी कोणी खेळत नाही. त्यासाठी जी ऊर्जा लागते, ती आतूनच यावी लागते. पैशांतून येत नाही. असा एकूणच सूर होता.
400 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळविणारा कार्स्टन वारहोम (Karsten Warholm) याने मात्र या निर्णयाचं समर्थन केलं. मात्र तो असंही म्हणाला, की ऑलिम्पिक सुवर्णपदक रोख रकमेपेक्षाही मौल्यवान आहे. या रकमेमुळे माझ्या प्रेरणेत काही बदल होणार नाही. मात्र, हा निर्णय चांगला संकेत आहे.
व्यक्तीनिहाय प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगवेगळा असू शकतो. त्यावर आक्षेप असण्याचं काही कारण नाही. मात्र, राहुल द्रविड, अजय जडेजा, पेरेल्मन यांनी स्वतःचं स्वातंत्र्य जपलंय. पैशांच्याही पलीकडे माझं काही तरी अस्तित्व आहे. माझी काही तरी नैतिक मूल्ये आहेत, हे सिद्ध केलं. स्पॉन्सरशिप मिळूनही अतिरिक्त पैशांसाठी भांडणारे अनेक खेळाडू या विश्वात आपण पाहिले आहेत. मात्र, निष्काम कर्मयोग्याप्रमाणे आपले योगदान देणारे स्वतःला किमतीचे कोणतेही टॅग लावू न देणारे राहुल द्रविड, जडेजा, पेरेल्मन म्हणूनच वेगळे ठरतात. कोणत्याही क्षेत्रात उत्तुंग यश मिळवणं एवढंच महत्त्वाचं नाही, तर माणूस म्हणूनही तुम्ही तेवढेच उत्तुंग असणं आवश्यक आहे. नाही का…?