आशिया कप- भूक पोटाची नि विजयाची!
आशिया कप- भूक पोटाची नि विजयाची!
जीवन-मरणाचा संघर्ष अनुभवणाऱ्या श्रीलंकन नागरिकांच्या मुखी मोठ्या कालावधीनंतर एक हास्याची लकेर उमटली. ती म्हणजे आशिया कप विजेतेपदाची. जगण्याची लढाई हरायची नसते हे श्रीलंकेने क्रिकेटच्या मैदानावरही सिद्ध केलं. हीच अवस्था अफगाणिस्तानही अनुभवत आहे. दोन्ही देशांतला संघर्ष थोड्याअधिक फरकाने सारखाच. दोन्ही देश भूकबळी, अस्थिरतेने वेढले गेले आहेत. देशाची स्थिती ढासळली तरी मनोबल मात्र ढळू दिले नाही हे या दोन्ही देशांचे वैशिष्ट्य. या यशाने अन्नान्न दशा झालेल्या नागरिकांच्या पोटाची भूक शमणार नाही, पण प्रतिकूल प्रसंगातही विजयाची भूक मोठीच हवी हा संदेश जास्त अधोरेखित करणारा ठरला. आशिया कप स्पर्धेत क्रीडाविश्वाची मने जिंकणाऱ्या या श्रीलंका आणि अफगाणिस्तानच्या कामगिरीवर टाकलेला हा प्रकाश…
उमेद वाढविणारा विजय
सैराट चित्रपट आठवत असेल. आर्ची, परश्या, लंगड्या, सल्ल्या या व्यक्तिरेखा साकारणारी अतिशय सामान्य घरची मुलं. कुणालाही वाटलं नव्हतं, चित्रपट यश मिळवेल. पण हे सगळे समज खोटे ठरले अन् चित्रपट 100 कोटींच्या क्लबमध्ये जाऊन बसला. आशिया कप स्पर्धेतला विजेता श्रीलंका संघ या ‘सैराट’सारखाच- तिमिरातून तेजाकडे निघालेला. संघात कोणीही सुपरस्टार खेळाडू नाही. अलीकडे काही उल्लेखनीय कामगिरी केली, तर तीही नाही. गेल्या वर्षी इंग्लंड दौऱ्यावर झालेल्या दारुण पराभवामुळे या संघाची आशिया कपमध्ये फारशी कुणी दखलही घेतली नव्हती. अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात पराभव स्वीकारल्यानंतर तर क्रिकेटच्या जाणकारांनीही श्रीलंकेला बेदखलच केलं. या संघाची धुरा दासून शनाका या नवख्या शिलेदाराच्या खांद्यावर. अवघ्या पाच वर्षांपूर्वी त्याने टी-20 मध्ये पाऊल ठेवलं होतं. एकीकडे संघाची ही निराशाजनक कामगिरी, तर दुसरीकडे आर्थिक स्थितीमुळे डबघाईस आलेल्या देशाची अवस्थाही केविलवाणी. महागाईने तर कळस गाठला. देशात दहापैकी नऊ कुटुंबांना फक्त एकवेळचं अन्न मिळत आहे. अशा स्थितीत मनोधैर्य आणायचं तरी कुठून…? मात्र पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त.. असं म्हणत ज्या त्वेशाने श्रीलंकेने टी-20 आशिया कप खेचून आणला त्याला तोड नाही. क्षणात या देशाकडे, संघाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. देशाची स्थिती ढासळली तरी आमचे मनोबल ढळलेले नाही, हे क्रिकेटनेच नाही, तर या देशाच्या नेटबॉल संघानेही दाखवून दिले. क्रिकेटच्या बरोबरीने श्रीलंकेच्या नेटबॉल संघानेही आशिया स्पर्धेचे विजेतेपद मिळविले. एकाच दिवशी या दोन गोड बातम्या अस्थिर, सैरभैर झालेल्या देशवासीयांसाठी दिलासादायकच म्हणाव्या लागतील.
काही महिन्यांपूर्वीच श्रीलंकेतील रस्त्यांवर जनक्षोभ उसळला होता. महागाईची धग अजूनही शांत झालेली नाही. देशभरात संताप, त्रागा, हतबलता याशिवाय दुसरं काहीही दिसत नव्हतं. मात्र, आज चित्र वेगळं होतं. ज्या रस्त्यावर लोकांनी दगडफेक केली, आज तीच लोकं फुलं उधळत होती. महागाई संपलेली नव्हती, आर्थिक अरिष्ट टळलेलं नव्हतं. तरीही लोकांच्या चेहऱ्यावर आनंद विलसत होता… त्याचं कारण होतं श्रीलंकेच्या क्रिकेट संघाने जिंकलेल्या ‘आशिया कप’चं. या विजेत्या संघाची श्रीलंकेतील प्रमुख शहरांतील रस्त्यांवरून मिरवणूक काढण्यात आली. नागरिक आपलं सगळं दु:ख विसरून आपल्या विजेत्या संघाचं स्वागतात लीन झालं होतं.
एका विजेतेपदाने श्रीलंकेचं जीवन एकाएकी अजिबात बदलणारं नाही. मात्र, हा विजय नवी उमेद जागवून गेला. पोटाची भूक जितकी तीव्र, तितकीच विजयाचीही आहे, हे नव्या दमाच्या श्रीलंकन संघानं दाखवून दिलं.
एखाद्या देशातील आर्थिक अरिष्टाचं दु:ख काय असतं, त्याची कल्पना करवत नाही. श्रीलंका संघाच्या जेतेपदाच्या मिरवणुकीचे फोटो जेव्हा ट्विटरवर व्हायरल झाले, त्या वेळी त्यांच्यावर कौतुकही होत होतं आणि काही जण खोचक प्रश्नही विचारत होते. सजलेल्या ट्रॅव्हल बसवर अभिवादन करतानाचा फोटो पाहून एकाने खोचक प्रश्न विचारलाच, “बसमध्ये डिझेल आहे का?”
सोशल मीडियावर चांगलं आणि वाईट यातली रेषा पुसट होत चालली आहे, याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे हा खोचक प्रश्न. श्रीलंकेसाठीही अशीच फूटपट्टी लावली तरी हा संघ उमेद अजिबात हरलेला नाही. आशिया कप स्पर्धेपाठोपाठ नेटबॉलमध्येही आशियाई विजेतेपद ही उमेद जागविणारी, आनंद देणारी घटना होती.
श्रीलंकेचं एक कौतुक वाटतं, ते म्हणजे परिस्थितीचं भान या देशातील नागरिकांना कमालीचं आहे. जुलैतलीच घटना. अन्न, इंधन, औषधांच्या टंचाईने संघर्ष करणाऱ्या श्रीलंकेत जनक्षोभ टिपेला पोहोचला होता. त्याच वेळी ऑस्ट्रेलिया, पाकिस्तानचा संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर होता. ऑस्ट्रेलियाविरुद्ध गॅलेच्या स्टेडियममध्ये दुसरा कसोटी सामना सुरू असताना स्टेडियमबाहेर संतप्त नागरिक श्रीलंकेचे अध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांच्या हकालपट्टीची मागणी करीत होते. अशा भयंकर परिस्थितीत आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळविण्याचे धाडस कोणताही देश करणार नाही. मात्र, श्रीलंकेने ते धाडस केलं. विशेष म्हणजे पाकिस्तान, ऑस्ट्रेलियाच्या संघानेही हा दौरा सुरू ठेवला. एकीकडे देश महागाईने होरपळत असताना श्रीलंकेत क्रिकेट खेळले जात होते. पाकिस्तानचा संघही श्रीलंकेत खेळण्यासाठी आला होता. हा संघ कोलंबोतील ज्या हॉटेलमध्ये थांबला होता, त्याच्या एक किलोमीटरवर आंदोलन सुरू होते. मात्र, आंदोलकांनी किंवा राजकीय पक्षाने क्रिकेटवर अजिबात क्षोभ व्यक्त केला नाही. कारण त्यांना माहीत होतं, की परकीय चलनाची तीव्र टंचाई असलेल्या देशासाठी क्रिकेट आवश्यक आहे. दुर्दैवाने आशिया क्रिकेट स्पर्धेचे यजमानपद श्रीलंकेला राखता आलं नाही. अस्थिरता, अस्वस्थतेने ग्रासलेल्या देशात या प्रतिष्ठेच्या स्पर्धेचे यजमानपद देणे आयसीसीला धोक्याचं वाटलं. अखेर ही स्पर्धा संयुक्त अरब अमिरातीत घेण्यात आली. श्रीलंकेवर ओढवलेली ही केवढी नामुष्की! अर्थात, अंडे चोरी गेल्याने कोंबडी वांझोटी थोडीच होते. यजमानपद गमावलं तरी श्रीलंकेने विजेतेपद मात्र हिमतीने जिंकले.
ज्या वेळी श्रीलंकेचा संघ मैदानात उतरला त्या वेळी त्यांच्याविरुद्ध सुपरस्टार खेळाडूंचा पाकिस्तान अजिबात नव्हता. त्यांच्यासमोर होती देशातील लाखो नागरिकांची केविलवाणी अवस्था. त्यांची लढाई पाकिस्तानविरुद्ध नाही, तर भूक, अस्थिरतेविरुद्ध होती. ही लढाई होती अस्तित्वाची, प्रतिष्ठेची. परतीचे दोर तसेही कापलेलेच होते. अंतिम फेरीतला पाकिस्तानविरुद्धचा सामना कोण विसरणार नाही… शिशिरातली पानगळ आणि वसंतातला नवपल्लवांचा बहार हे दोन्ही ऋतुचक्र एकाच सामन्यात दासुकाच्या संघाने दाखवले. बघा ना, पाकिस्तानच्या भेदक माऱ्यापुढे 58 धावांत श्रीलंकेने पाच फलंदाज गमावले. ही पानगळ पाहिली तर पाकिस्तान एकहाती सामना जिंकेल हे नाक्यानाक्यावरच्या क्रिकेटतज्ज्ञांनी एव्हाना जाहीर करून टाकलं होतं. भानुका राजपक्षे, भानुका हसरंगा यांच्यावर किती दबाव असेल याची कल्पना करवत नाही. मात्र, नंतर या नवख्या फलंदाजांनी जी धावांची बरसात केली, तिला कशाचीच सर नाही. हाच तो नवपल्लवांचा बहार! हसरंगाने गोलंदाजीतही छाप पाडली. त्याने तीन गडी बाद केले. प्रमोद मधुशन या तरुण गोलंदाजाने पाकिस्तानी फलंदाजी पिसे काढून घेतली. त्याने चार गडी टिपत विजयावर शिक्कामोर्तब केले. या विजयामुळे किती तरी महिन्यांनंतर देशवासीयांच्या चेहऱ्यावर आनंद विलसत होता.
राजकीय अनिश्चितता, आर्थिक अडचणींमुळे गेले काही महिने श्रीलंका प्रचंड तणावातून जात होता. राष्ट्रपतींच्या निवासस्थानात घुसून तीन-तीन दिवस तळ ठोकत नागरिकांनी जो धुमाकूळ घातला होता, तो अवघ्या विश्वाने पाहिला. सोफ्यावर आराम करणारे, स्विमिंग टँकमध्ये यथेच्छ डुंबणारे आंदोलक पाहिल्यानंतर देशात किती अस्वस्थता धुमसत आहे, याचा प्रत्यय एव्हाना संपूर्ण जगाला आला होता. अर्थात, काही संघटनांनी हा आक्रोश केला होता. मात्र, त्याचं अतिरंजित चित्रण जगभरात झालं. आशिया कप स्पर्धेत धडाकेबाज फलंदाजीने मने जिंकणाऱ्या भानुका राजपक्षे याने सरकारला दोष दिला, तर सनथ जयसूर्याने जनक्षोभाचे समर्थन केले होते. मात्र, या घटना जगात वेगळ्या दृष्टीने पाहिल्या गेल्या. ज्या वेळी लंकेचा संघ मैदानात उतरला तेव्हा संपूर्ण जग आपल्यावर कुत्सितपणे हसतंय, कुणी हेटाळणी करतंय अशा अपमानास्पद भावना लंकेच्या पाठीराख्यांना बोचत होत्या. तसंही गेल्या सहा महिन्यांत असं काहीही घडलेलं नव्हतं, ज्यामुळे श्रीलंकेला अभिमान वाटेल. या अपयशाच्या गर्तेतून बाहेर काढायला श्रीलंकेचा नवखा संघ धावून आला. निम्मा संघ साठीतच गारद झाल्यानंतरही न खचता जसे आम्ही लढलो, तसंच आपल्याला या आर्थिक संकटातून बाहेर पडायचं आहे, हा संदेश जणू श्रीलंकेच्या नवख्या संघाच्या या विजेतेपदाने दिला. हा विजय श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी उभारी देणारा ठरेल, अशी आशा करूयात.
पाकिस्तानची अवस्थाही श्रीलंकेपेक्षा वेगळी नाही. पुराच्या तडाख्यात पाकिस्तानची आर्थिक स्थिती दोलायमान झाली आहे. या क्रिकेटवेड्यांच्या देशात उरुसातील बॅट पाहून रडणारी मुलं आज पोटाच्या भुकेसाठी व्याकुळ झाल्याचे विदारक चित्र आहे. अनेक नागरिकांची अन्नान्न दशा झाली आहे. श्रीलंका आणि पाकिस्तान दोन्हीही मायदेशी परतले आहेत. पोटाची भूक शमेना आणि विजयाची भूक आवरेना…अशा दोलायमान स्थितीत या दोन्ही देशांनी क्रीडाविश्वाची मने जिंकली. या कामगिरीमुळे पोटाची भूक शमणार नाही, पण जगण्याची उमेद तर नक्की वाढवतील.
डर के आगे जीत…
युरोपमधील खेळाडू मानसिक भीतीवर खुलेआम बोलू लागले आहेत. कोणाला आरशात पाहण्याची, तर कोणाला मोबाइल जवळ नसल्याची, कुणाला बाहुल्यांची, कुणाला लोकांमध्ये वावरण्याची… या भीतीमुळे खेळातील कामगिरीवर परिणाम होतो, असं या खेळाडूंना वाटतं. सुरक्षित देशांमध्ये ही परिस्थिती! असं असेल तर मग रोज भीतीच्या छायेत वावरणाऱ्या अफगाणिस्तानातील खेळाडूंना कुर्निसातच करावा लागेल. एका २१ वर्षीय महिलेने बुरखा घातला नाही म्हणून तिला गोळ्या घातल्या… चिमुकल्या मुलांसमोर एका कुटुंबाची हत्या… अंगाचा थरकाप उडविणाऱ्या अफगाणिस्तानातील या घटना अगदी अलीकडच्या. भीती काय असते तर ती अशी. जगण्याची कोणतीही शाश्वती नसलेल्या या देशाने आशिया कप स्पर्धेत सुपर फोरमध्ये दिमाखात पाऊल ठेवलं तेव्हा संपूर्ण विश्वाने कौतुकाचा वर्षाव केला. डर के आगे जीत है… हे अफगाणिस्तानने सिद्ध केलं.
आव्हानं काय आहेत, हे अफगाणिस्तानच्या खेळाडूंना सांगण्याची गरज नाही. कारण ते अशा परिस्थितीतून आले आहेत, अशा वातावरणातून आले आहेत, जेथे जगण्या-मरण्याची आव्हाने नेहमीचीच. तुलनेने क्रिकेटमधील आव्हाने तर त्यांच्यासाठी फारच क्षुल्लक म्हणावी लागतील. तणाव तर ते फारसे घेतच नसावेत. म्हणूनच आशिया खंडातील पाकिस्तान, भारत, श्रीलंकेसारख्या संघांना टक्कर देत सुपर फोरमध्ये पोहोचणारा अफगाणिस्तानच पहिला संघ होता. ही कामगिरी खूप मोठी मानली जाते. आंतरराष्ट्रीय स्तरावरचा फारसा अनुभव अफगाणिस्तानला अजिबातच नाही. या देशाला आयसीसीने पूर्ण सदस्यत्व बहाल करून उणीपुरी पाच वर्षे झाली. इतक्या कमी कालावधीतही राशीद खान, मोहम्मद नबी, इब्राहिम झादरान ही नावं स्टार खेळाडूंच्या यादीत जाऊन बसली. आशिया कप जिंकणाऱ्या श्रीलंकेला पहिल्याच सामन्यात पराभूत करणारा आणि उपविजेत्या पाकिस्तानच्या नाकीनऊ आणणारा अफगाणिस्तान आता नवखा राहिलेला नाही.
या देशाचं वर्णन एका वाक्यात केलं जातं, ते म्हणजे जगणं महाग, तर मृत्यू इथं स्वस्त आहे! या देशाच्या क्रौर्याची ओळख जीवघेण्या ‘बुजकाशी’ खेळातूनच होते. पोलोसारखा हा खेळ. मात्र, पोलोत चेंडू असतो. इथं चेंडूऐवजी बकरी मारलेली असते. अशा या देशात क्रिकेट रुजला हीच बाब मोठी आहे. या देशाला निसर्गाने भरभरून दिलं. मात्र, तरीही गरिबी, भूकबळी आणि दहशतवाद्यांच्या क्रौर्याने हा देश पिचला आहे. आनंद, उत्सव साजरा करण्याचे प्रसंग फारच कमी वाट्याला येतात. त्यापैकी एक क्रिकेट आहे. क्रिकेट हा एकमेव खेळ होता, जो सामान्यही सहजपणे खेळू शकत होते. म्हणूनच हा देश उशिराने क्रिकेटमध्ये दाखल झाला तरी तो प्रगतीच्या दिशेने वेगाने पावले टाकत आहे. तसं पाहिलं तर सतत कुणाच्या तरी अधिपत्याखाली या देशाचं वाटोळंच झालं. आधी दुर्राणी साम्राज्याने, नंतर 19 व्या शतकाच्या तिसऱ्या दशकात ब्रिटिशांनी पाय रोवले. ब्रिटिशांमुळेच या देशाला क्रिकेटची ओळख झाली. मात्र, लगेच रुळला अजिबातच नाही. आशिया खंडात 1932 मध्ये भारताने पहिल्यांदा, तर त्याच्या 20 वर्षांनी पाकिस्तानने क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. ही दोन शेजारी राष्ट्रे क्रिकेटमध्ये रुळत असताना अफगाणिस्तानला या खेळाची बाराखडीही येत नव्हती. कळत होतं, पण क्रिकेटमध्ये रुळण्याचा विचार या देशात कधीच आला नाही. त्याला कारणे होती- गरिबी, भूकबळी आणि दहशतवाद! 1926 मध्ये या देशाला स्वतंत्र देशाचा दर्जा मिळाला. मात्र, दहशतवाद आणि भूकबळीने या देशाची पाठ सोडली नाही. सत्तरच्या दशकात सतत युद्धाने पोळलेल्या बहुतांश नागरिकांनी पाकिस्तानात आश्रय घेतला. इथंच अफगाण्यांना क्रिकेटची ओळख नव्याने झाली. 1990 मध्ये अफगाणिस्तानमध्ये तालिबानची राजवट आली आणि पुन्हा पलायनाची मालिका सुरू झाली. पाकिस्तानातील निर्वासित म्हणून अफगाण्यांना क्रिकेट जवळचा वाटू लागला. कारण रोजच्या यातना विसरण्यासाठी क्रिकेट हाच एक स्वस्त मार्ग होता. जे काही मिळेल त्या वस्तू घेऊन ते क्रिकेट खेळू लागले. 1992 मध्ये पाकिस्तानने विश्वकरंडक उंचावला तेव्हा अफगाणी निर्वासितांमध्येही क्रिकेटविषयी जवळीक आणखी वाढली. याच निर्वासितांमध्ये ताज मलिक याने या खेळाला चालना दिली. अर्थात, तो मार्ग सोपा नव्हता. कारण जेथे खायला काही नाही, तेथे क्रिकेटसाठी वेळ देणे कसे शक्य आहे? त्या वेळी ताज मलिककडेही देण्यासाठी काहीही नव्हते. मात्र, त्याने प्रयत्न सोडले नाहीत. 1995 मध्ये क्रिकेट खेळणारे अफगाणी वाढले. तालिबान्यांच्या विरोधानंतरही ताज मलिकने अफगाणिस्तान क्रिकेट फेडरेशनची स्थापना केली. हाच ताज मलिक आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा जनक मानला जातो. आज ताज मलिक कदाचित विस्मरणात गेला असेल. मात्र, त्याने जपलेला हा वारसा नवी पिढी पुढे घेऊन जात आहे.
राशीद खान, मोहम्मद नबी, जादरान हे या नव्या पिढीचे शिलेदार. भारत, पाकिस्तानसारख्या बलाढ्य संघांचं भय त्यांना कधीही शिवलं नाही. रोज मृत्यू पाहणाऱ्या या संघाला प्रतिस्पर्ध्यांची भीती ती काय असेल! तालिबानची राजवट गेल्या वर्षी पुन्हा आली. पुन्हा क्रिकेटचं भवितव्य अधांतरी झालं. राशीद खान त्या वेळी इंग्लंडमध्ये होता. तालिबान राजवटीमुळे आईवडिलांची काळजी वाटू लागल्याची ट्विटरवरील पोस्ट त्या वेळी चर्चेत आली होती. काबूलमधील क्रिकेट बोर्डाच्या मुख्यालयावर एके 56 घेऊन तालिबान्यांनी कब्जा केला तेव्हाच क्रिकेट संपलं होतं. आता भलेही तालिबान्यांनी क्रिकेटला धोका नसल्याचं जाहीर केलं असलं तरी त्यांच्यावर भरवसा राहिलेला नाही. महिला तर अजिबातच सुरक्षित नाहीत. महिला क्रिकेटवर बंदी घातल्यानंतर या देशातील पुरुषांच्या क्रिकेटचंही भवितव्य धोक्यात आलं होतं. गेल्या वर्षी टी-20 वर्ल्डकपमध्ये अफगाणिस्तानने बांगलादेशवर विजय मिळवला होता. मात्र, देशात ना फटाके फुटले, ना आनंद साजरा केला. कारण तालिबानची राजवट! अफगाणिस्तानचे प्रवक्ते सुहेल शाहीन यांनी ट्विटरवर फक्त शुभेच्छा दिल्या होत्या. शारजाह मैदानावर आशिया कपच्या सुपरफोर लढतीत पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात जो राडा झाला, तो अनपेक्षित नव्हता. मात्र, पाकिस्तान अफगाणिस्तानला जेव्हा खुन्नस देतो, तेव्हा हा देश क्रिकेटमधील ताकद बनू पाहतोय, हे मानायला हरकत नाही. सुपरफोरमध्ये आव्हान संपुष्टात आलं तरी अफगाणिस्तानचा जिगरबाज खेळ नेहमीच स्मरणात राहील. क्रिकेटमुळे या देशाने काही क्षण मुक्तीचे अनुभवले हेही नसे थोडके.
निवृत्ती घेणाऱ्या खेळाडूंमुळे श्रीलंका क्रिकेट चिंतेत
One Comment