All SportscoronavirusInspirational Sport storyInspirational storyLockdown sports

जगभरात लॉकडाऊन असताना खेळाडू काय करीत होते?

ग लॉकडाऊन असताना खेळाडू काय करीत होते, असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला होता. कारण करोना विषाणू संसर्गाच्या covid 19 pandemic | धास्तीने 2019 मध्ये संपूर्ण जगात लॉकडाऊन होते. कोणालाही बाहेर पडता येत नव्हते. जे खेळाडू घरात स्वस्थ बसू शकत नाही, त्यांची अवस्था या लॉकडाऊनमध्ये विचित्र झाली असेल. तेव्हा आपसूकच एक प्रश्न मनात येतो, जग लॉकडाऊन असताना हे खेळाडू काय करीत होते? क्रिकेट, फुटबॉल, बॅडमिंटन आदी अनेक खेळाडूंनी लॉकडाऊनमध्ये आपण काय काय करीत आहोत, याचे व्हिडीओच शेअर केले होते. आताही जग या कोरोना महामारीतून सावरलेलं नाही. अपवाद वगळता जगात लॉकडाऊनही फारसं कुठे नाही. मात्र, 2019 चा काळ जगाला धडकी भरवून गेला

हॉकीचे मैदान सोडून ‘ती’ बनली परिचारिका


लॉकडाऊन खेळाडू
ऑस्ट्रेलियाची हॉकीपटू रशेल लिंच झाली परिचारिका

करोना महामारीमुळे टोकियो ऑलिम्पिक Tokyo Olympics | एक वर्षासाठी स्थगित झाल्याने अनेक खेळाडूंचे सुवर्ण जिंकण्याचे स्वप्न भंगले. ऑस्ट्रेलियाची हॉकीपटू रशेल लिंच Russell Lynch | हिच्याही मनसुब्यांवर पाणी फिरले आहे. मात्र, तिचं कौतुक करायला हवं. कारण ही महिला हॉकीपटू परिचारिकेच्या रूपाने आपल्या देशाच्या सेवेत रुजू झाली आहे. ऑस्ट्रेलिया संघाची गोलकीपर असलेली लिंच एक नोंदणीकृत परिचारिकाही आहे. तिने एका क्लिनिकमध्ये परिचारिकेच्या रूपाने नोंदणीही केली आहे. ती यापूर्वीही आठवड्यातून एक दिवस ‘न्यूरो रिहॅबिलिटेशन वॉर्ड’मध्ये neuro rehabilitation ward | काम करीतच होती. त्यामुळे लिंचचं कौतुक करावं तितकं थोडंच आहे.

मॅजिक  ट्रिक्स’ करतोय श्रेयस


लॉकडाऊन खेळाडू
श्रेयस अय्यरच्या मॅजिक ट्रिक्स

जग लॉकडाऊन असताना खेळाडू काय करीत होते, हा प्रश्न 2019 मध्ये औत्सुक्याचाच होता. कोविड 19 महामारीमुळे खेळाडूंची अवस्था विचित्र झाली होती. आता क्रिकेटपटू श्रेयस अय्यरचंच shreyas iyer | बघा ना! सध्या तो जादूच्या ट्रिक्स magic tricks | करून चाहत्यांचं मनोरंजन करीत आहे. काय करणार, घरात वेळ जात नाही. मग जादूच्या ट्रिक्स सांगून तेवढाच आपला टाइमपास! कोविड 19 मुळे क्रिकेटचे सर्वच कार्यक्रम स्थगित झाले आहेत. त्यामुळे अय्यरने घरी बसून वेळ सत्कारणी लावण्याचा प्रयत्न केला आहे. बीसीसीआयने त्याचा व्हिडीओ ट्विट केला आहे. या व्हिडीओत तो त्याची बहीण नताशासोबत पत्त्यांची जादू दाखवताना दिसतात. यावर बीसीसीआयने गमतीदार ट्वीट केले होते

‘‘आमचे जादूगार श्रेयस अय्यर घरात बसून आमचे मनोरंजन करीत आहेत. सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविल्याबद्दल धन्यवाद चॅम्पियन.”

बीसीसीआयचे ट्विट

टेनिसपटू करतोय हॉटेल मार्केटिंग


lockdown sports
जीवन नेदुंचेझियान, टेनिसपटू

लॉकडाऊन असताना अनेक खेळाडू अस्वस्थ झालेले पाहायला मिळाले. टेनिसपटूंचीही हीच अवस्था होती. आयुष्यभर आता काही टेनिस खेळू शकणार नाही, अशी भावना अनेक टेनिसपटूंची झाली होती. या करोनामुळे जबरदस्तीने घरात बसावे लागत असल्याने भारतातील काही टेनिसपटूंनी करिअरचे इतर मार्ग शोधले. 2019 चा काळ असा होता, की जगभरातील सर्वच क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या किंवा स्थगित तरी झाल्या. जिममध्येही जाता येत नव्हते. डेव्हिस कपमध्ये नुकताच कुठे पदार्पण करणारा तमिळनाडूचा जीवन नेदुंचेझियान Jeevan Nedunchezhiyan | याची अवस्था विचित्र झाली होती. एक संधी मिळाली आणि तीही करोनाने हिरावून घेतली. त्यामुळे तो सध्या पुद्दुचेरीमध्ये आपल्या कौटुंबिक हॉटेल व्यवसायात मार्केटिंगचे काम पाहत आहे.

‘‘ही विचित्र परिस्थिती आहे. आशा आहे, की ही परिस्थिती बदलल्यानंतर टेनिसचा सराव करू शकेन. सध्या तरी घरातच कसरत सुरू आहे. सगळ्यांचीच अवस्था एकसारखी आहे.’’

जीवन नेदुंचेझियान, टेनिसपटू

मुंबईच्या पुरव राजाची वेगळीच तऱ्हा आहे. तो रॅकेट बनविण्याचा व्यवसाय सुरू करणार होता. ‘रेस्ट्रंग इंडिया’ हे त्याच्या व्यवसायाचं नावही निश्चित केलं होतं. जर्मनीचा एक तज्ज्ञ त्याला मदतही करीत होता. आता हा आतबट्ट्यातला व्यवसाय न ठरो म्हणजे मिळवलं. सगळा क्रीडा व्यवसाय ठप्प पडल्याने त्याचे हे रॅकेट कोण घेणार, हाही प्रश्नच होता. असो, काही तरी करतोय, हेही नसे थोडके. आता या व्यवसायाचं काय झालं, माहीत नाही. सध्या भारतात निर्बंध असले तरी लॉकडाऊन नाही. मग काय झालं असेल त्याच्या व्यवसायाचं त्यालाच माहीत. प्रज्ञेश गुणेश्वर या टेनिसपटूनेही 2019 मध्ये चिंताग्रस्त होता. तो म्हणतो, सध्या तरी आयुष्य दावणीला लागलं नाही; पण पुढे हीच स्थिती राहिली तर नक्कीच परिस्थिती गंभीर होईल.

पी. गोपीचंद देताहेत ऑनलाइन टिप्स


lockdown sports
भारतीय बॅडमिंटन संघाचे मुख्य प्रशिक्षक असलेले पुल्लेला गोपीचंद आघाडीच्या खेळाडूंना वेगवेगळ्या व्हिडीओद्वारे मार्गदर्शन करीत आहेत.

लॉकडाऊन असताना अनेक खेळाडू ऑनलाइन सरावातही व्यस्त झालेले पाहायला मिळाले. अर्थात, बुद्धिबळ वगळता अन्य कोणताही खेळ ऑनलाइन शिकणे शक्यच नाही. मात्र, थिअरॉटिकल नॉलेज किंवा शारीरिक सराव तेवढे करता येत होते. त्यामुळे अनेक प्रशिक्षकही वर्क फ्रॉम होममध्ये व्यस्त झालेले पाहायला मिळाले. भारतीय बॅडमिंटन संघाचे मुख्य प्रशिक्षक असलेले पुल्लेला गोपीचंद आघाडीच्या खेळाडूंना वेगवेगळ्या व्हिडीओद्वारे मार्गदर्शन करीत होते. कोविड-19 महामारीमुळे सध्या सर्वच स्पर्धा रद्द वा स्थगित झाल्याने प्रशिक्षकही घरात बसले आहेत. गोपीचंद Pullela Gopichand | यांनाही घराबाहेर पडता आले नाही. मात्र, ते स्वस्थ बसणाऱ्यांमधले नाहीत. घरात बसूनही बॅडमिंटनपटूंना मार्गदर्शन करता येते हे त्यांना कळले आहे. पुल्लेला गोपीचंद आघाडीच्या खेळाडूंना वेगवेगळ्या व्हिडीओद्वारे मार्गदर्शन करीत होते.

‘‘गोपी सर आम्हाला रोज व्हॉट्सअॅपवर दिवसभराचा कार्यक्रम पाठवतात. यात ध्यान करण्यापासून भिंतीवर शटल मारण्यापर्यंत माहिती देत असतात. आम्ही सायंकाळी ट्रेनरसोबत एक तास घालवतो. ’’

चिराग शेट्टी

लॉकडाऊनमुळे खेळापासून दूर राहिल्याने फिटनेसवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे त्यांनी व्हॉट्सअॅप ग्रुपवरून खेळाडूंना मार्गदर्शन सुरू केले आहे. गोपीचंद म्हणाले, की आम्ही केवळ फिटनेससंबंधी अभ्यास करू शकतो. कारण कोणीच कोर्टवर जाऊ शकत नाही. त्यामुळे जे करता येईल तेवढेच आपण करू शकतो. मी व्हॉट्सअॅप ग्रुपवरून खेळाडूंना व्हिडीओ पाठवून काय करायला हवे, याचे मार्गदर्शन करीत आहे. गोपीचंदशिवाय जमशेदपूरमध्ये जन्मलेले ट्रेनर दिनाज वरवतवालासुद्धा झूम अॅपद्वारे खेळाडूंना फिटनेसबाबत मार्गदर्शन करीत आहेत.

‘‘गोपी सरांच्या कार्यक्रमात भिंतीवर अभ्यास, दोरीउड्या, हलक्याफुलक्या कसरती आदी प्रकारांचा समावेश आहे. दिनाज दिवसाआड आमचा वर्ग घेतात. यात सिक्की (रेड्डी), अश्विनी (पोनप्पा), साई (बी साई प्रणीत), गुरू (आर गुरूसाईदत्त), कश्यप (पारूपल्ली) आणि (एचएस) प्रणय सर्वच उपस्थित राहतात.’’

सात्त्विकसाईराज रँकीरेड्डी

लॉकडाऊन काळात हा खेळाडू पुन्हा रमला बुद्धिबळात


लॉकडाऊन खेळाडू

लॉकडाउन असताना अनेक खेळाडू आपल्या जुन्या छंदाकडे वळले होते. आपल्या गुगली गोलंदाजीने भल्या भल्या क्रिकेटपटूंची भंबेरी उडविणारा युजवेंद्र चहल Yuzvendra Chahal | हा देखील लॉकडाऊनमध्ये आपल्या जुन्याच छंदाकडे वळला होता. ते म्हणजे बुद्धिबळ खेळण्याकडे. त्याने ऑनलाइन ब्लिट्झ टुर्नामेंटमध्ये भागही घेतला होता. चेस डॉट कॉमवर तो व्यस्त होता. तुम्हाला माहीत नसेल, पण चहल बुद्धिबळ केवळ टाइमपास म्हणून खेळत नाही, तर बुद्धिबळातील निष्णात खेळाडू आहे. तो १२ वर्षांखालील वयोगटातील राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेचा विजेताही राहिला आहे. एवढेच नाही, तर त्याने जागतिक युवा बुद्धिबळ स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्वही केले होते. आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाच्या (फिडे) वेबसाइटवरही रेटेड खेळाडूंमध्ये त्याचं नाव समाविष्ट आहे. त्याचे एलो रेटिंग 1956 आहे. तो म्हणतो, ‘‘बुद्धिबळाने मला संयम शिकवला. क्रिकेटमध्ये तुम्ही भलेही उत्तम गोलंदाजी करीत असाल, पण कदाचित तुम्हाला विकेट मिळणार नाहीत. म्हणून खचून न जाता धीराने सामना करणे आवश्यक आहे. ते मला बुद्धिबळातून मिळालं आहे.’’ भारताचा बुद्धिबळपटू बी. अधिबानही ज्युनिअर स्तरावर चहलविरुद्ध खेळला आहे.

‘‘मी चहलविरुद्ध खेळलो आहे. तो उत्तम बुद्धिबळपटू होता आणि त्याने १२ वर्षांखालील राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा जिंकली आहे. त्याने नंतर खेळ बदलला आणि आता तो क्रिकेटमध्येही उत्तम खेळाडू आहे. त्याला पाहून आनंद होतोय. आशा करतो, की लवकरच मी त्याला भेटेन.’’

बी. अधिबान, ग्रँडमास्टर

हे महाशय मस्त आराम करताहेत


lockdown in sports
लॉकडाऊनमुळे केकेआरचे प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्लम सध्या आराम करण्यात धन्यता मानताहेत.

लॉकडाऊनमध्ये केकेआरचे प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्लम यांनी आराम करण्यातच धन्यता मानली होती. लॉकडाऊन असताना वेगवेगळ्या कामात व्यस्त असलेले अनेक खेळाडू, प्रशिक्षक पाहिले आहेत. मात्र, सगळेच व्यस्त झाले होते असे नाही. कारण त्यातून एक ना व वजा करावं लागणार आहे. ते म्हणजे न्यूझीलंडचा माजी कर्णधार आणि कोलकाता नाइटरायडर्सचे KKR | प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्लम Brendon Mccullum | यांचं. आयपीएलची चमक झाकोळल्याची वेदना त्यांना अस्वस्थ करीत होती. मात्र, कोरोनाच्या फैलावामुळे घरातच राहावे लागत असल्याने त्यांनी आराम करण्यातच धन्यता मानली. मॅक्लम 2019 मध्ये इंडियन प्रीमियर लीगमध्ये IPL | केकेआरचे मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यरत होते. यष्टिरक्षक म्हणून कारकीर्द घडविणारे मॅक्लम म्हणतात, ‘‘मी गेल्या तीन वर्षांपासून फारच व्यस्त होतो.’’ मॅक्लम यांनी 2016 मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर न्यूझीलंडच्या उत्तरेतील कॅमल रेंज पर्वतरांगेतील निसर्गरम्य मातामाता Matamata | येथे आपला डेरा जमवला आहे. तेथे ते घोड्यांशी संबंधित व्यवसाय करीत आहेत.

मित्र आणि पाळीव कुत्र्यासोबत लबुशेनचा सराव


लॉकडाऊन खेळाडू
मार्नस लबुशेनचा सराव

लॉकडाऊनमध्ये काय करायला हवं, याचं विशेष मार्गदर्शन टिप्स कुठेही मिळणार नाहीत. अनुभवातूनच शिकावं लागणार आहे. ऑस्ट्रेलियाची रन मशीन म्हणून ओळखला जाणारा मार्नस लबुशेनही Marnus Labuschagne | सध्या अशाच अनुभवातून जात आहे. जगभरात लॉक़डाऊन असताना खेळाडू सरावाच्या नवनवीन क्लृप्त्या लढवत होता. लबुशेननेही अशीच एक शक्कल लढवली. त्याचा सर्वांत जवळचा मित्र त्याचा पाळीव कुत्रा आहे. लॉकडाऊनदरम्यान तो आपल्या या कुत्र्याच्या मदतीने फलंदाजीचा अभ्यास करीत होता. लबुशेनचा आणखी एक मित्र आहे. तो टेनिसबॉलने त्याला गोलंदाजी करतो, तर लबुशेन फलंदाजी आणि त्याचा कुत्रा यष्टिरक्षकाचं काम इमानेइतबारे पार पाडत होता. मार्नस लबुशेन 2019 मध्ये हा व्हिडीओ शेअर केला होता. त्यात त्याने म्हंटले होते, ‘‘मी काही दिवसांपासून सराव सुरू केला आहे. मी नशीबवान आहे, की क्वारंटाइनमध्ये माझा जीवलग मित्र सोबत आहे. त्याने शेअर केलेल्या व्हिडीओत त्याचा कुत्रा स्टम्पच्या मागे उभा असलेला दिसतो. ब्रिस्बेनमध्ये घराच्या गॅरेजमध्ये तात्पुरती खेळपट्टी तयार केली आहे.”

लॉकडाऊन काळात हा खेळाडू शिकतोय कराटे


लॉकडाऊन खेळाडू

तुम्हाला राशीद खान Rashid Khan | माहितीच असेल. हा तोच राशीद आहे, जो टोकियो ऑलिम्पिकमध्ये पात्र ठरण्यासाठी प्रबळ दावेदार मानला जात होता. राशीद खान आशियाई टूर स्पर्धेचा दोन वेळा विजेता आहे. लॉकडाऊनमुळे गोल्फचा सरावही शक्य नव्हता. मात्र, स्वत:ला तंदुरुस्त राखण्यासाठी त्याने सध्या मार्शल आर्ट्सचे धडे घेतले होते. 29 वर्षीय राशीद खान म्हणाला होता, की ‘‘घरातच सध्या मी मार्शल आर्ट्सचा अभ्यास सुरू केला आहे. अमेरिकेचा मार्शल आर्टिस्ट बिली ब्लँक्सचे यूट्यूबवरील व्हिडीओ पाहून मी कराटे शिकतोय. मी सध्या हेच करू शकतो. माझ्या घरात जिम नाही. त्यामुळे मला स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी कराटेचीच मदत घ्यावी लागणार आहे.’’ आशियाई क्रीडा स्पर्धेत 2010 मध्ये त्याने रौप्यपदक जिंकले आहे. राशीद खान म्हणतो, ‘‘गोल्फ कोर्सवर पोहोचणे अशक्य आहे. त्यामुळे सराव करता येत नाही. पण पुटिंगचा अभ्यास करतोय. स्टीक हवेतल्या हवेत फिरवून मला किमान ती जाणीव होतेय.’’

स्कॉशपटूचा सुरू आहे आहारशास्त्राचा अभ्यास


लॉकडाऊन काळात खेळाडू काय क्लृप्त्या शोधतील याचा नेम नाही. आता हेच घ्या ना, भारताचा आघाडीचा स्क्वॉशपटू सौरव घोषाल Saurav Ghosal | लॉकडाऊनच्या काळात आहारतज्ज्ञाचा अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत होता. स्क्वॉशमध्ये तंदुरुस्ती हवी. घोषालचा फिटनेसही चांगला आहे. मात्र, एका खेळाडूला तंदुरुस्त राहण्यासाठी उत्तम आहारही आवश्यक असतो. त्यामुळे घोषाल या लॉकडाऊनचा सदुपयोग आहारशास्त्रातील माहिती मिळवण्यासाठी करीत होता. ‘‘तुम्ही दिवसभर घरीच असतात. त्यामुळे या काळात नव्या गोष्टी शिकण्याची गरज आहे. म्हणून मी आहाराचा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला आहे. हा अभ्यासक्रम पीएसएने (व्यावसायिक स्क्वॉश संघटना) प्रमाणित केलेला आहे. यात ११ लेक्चर असतात. प्रत्येक लेक्चरच्या शेवटी आकलन घेतले जाते. त्यानंतरच पुढच्या लेक्चरकडे जाता येते. आता मी प्रोटिन, कार्बोहायड्रेट, फॅट, मिनरल आणि व्हिटॅमिनशी संबंधित माहिती घेतली आहे. कोणत्या आहारात कोणती पोषकतत्त्वे असतात, त्यावर आधारितच आहाराचा सल्ला दिला जातो,’’ असे सौरवने म्हंटले होते. एव्हाना आहारशास्त्रात तो कुशल झाला असेल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही.

बुद्धिबळपटू मेंडोंका सरावात मग्न


कोविड-19 महामारीमुळे जगभरातील आंतरराष्ट्रीय प्रवास बंद झाले आहेत. लॉकडाऊन असल्याने खेळाडू, नागरिकांना घराबाहेरही पडता येत नव्हते. त्यामुळे लिओन मेंडोंका Leon Mendonca | हंगेरीतच अडकून पडला होता. सोबत त्याचे वडील होते. लॉकडाऊनमुळे मिळालेल्या वेळेचा सदुपयोग बुद्धिबळ कौशल्य वाढवण्याबरोबरच तो शैक्षणिक अभ्यासात घालवत होता. अवघा चौदा वर्षीय लिओन गोव्याचा खेळाडू आहे. आंतरराष्ट्रीय मास्टर स्पर्धा खेळण्यासाठी तो बुडापेस्टला गेला होता. 18 मार्च 2019 नंतर तो तेथेच अडकला. 17 मार्च 2019 रोजी त्याने आपला अंतिम सामना खेळला आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी तो भारताकडे रवाना होणार होता. मात्र, भारताने आंतरराष्ट्रीय विमानप्रवास बंद केल्याने त्याला हंगेरीत मुक्काम करण्याशिवाय अन्य पर्याय उरला नव्हता. ‘‘मी सकाळी साडेसात वाजता उठतो आणि प्रार्थना केल्यानंतर योगा करतो. संपूर्ण वेळ मी शालेय अभ्यास आणि बुद्धिबळ यातच घालवत आहे. बाहेर कुठेही जाता येत नाही. माझे वडील माझ्यासाठी जेवण बनवतात. बाजारातून दहा दिवसांचं सामान घेऊन आलो आहे,’’ असा अनुभवही त्याने ट्विटरवर शेअर केला होता.

दीपिका मांसाहारी पाककृती शिकतेय


लॉकडाऊन असल्याने अनेक खेळाडू जे काही घरच्या घरी शिकता येईल ते शिकण्याचा प्रयत्न करीत होते.
धनुर्धारी दीपिका कुमारी मांसाहारी पाककृती बनविण्यास शिकत आहे.

लॉकडाऊन असल्याने अनेक खेळाडू जे काही घरच्या घरी शिकता येईल ते शिकण्याचा प्रयत्न करीत होते. भारतीय धनुर्धारी दीपिका कुमारीचीही Deepika Kumari | अवस्था वेगळी नाही. तिला सराव करता येत नसल्याने तिने फावल्या वेळेत काही तरी शिकण्याचा प्रयत्न केला आहे. तिचं लग्न सहकारी धनुर्धारी अतनू दास Atanu Das | याच्याशी ठरलं. 2017 मध्ये या दोघांचा वाङनिश्चय म्हणजे साखरपुडा झाला होता. आता भावी पतीच्या आवडीनिवडी जोपासण्यासाठी दीपिकाने मांसाहारी पाककृती, विशेषतः चिकन बनविण्यास शिकली. आपल्याकडे म्हणतात ना, ‘आधी लगीन कोंडाण्याचं’, तसे या दोघांनी ‘आधी लगीन टोकियो ऑलिम्पिकचं’ करायचं ठरवलं होतं. त्यामुळे दोघांनीही या स्पर्धेच्या तयारीवरच लक्ष केंद्रित केले होते. मात्र, कोविड १९ महामारीने त्यांच्या अपेक्षेवर पाणी फेरले. ऑलिम्पिक एक वर्षांसाठी म्हणजे 2021 पर्यंत स्थगित केल्याने आता वाटते, की आधी लगीन या दोघांचंच होईल. जागतिक रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर राहिलेल्या दीपिकाने हॉलमध्येच पाच मीटरची रेंज बनवली आहे. तेथे दीपिका दुपारी अतनूसह जवळपास दोन तास सराव करतात. अर्थात रेंजवर जसा सराव केला जातो, तसा हा सराव अजिबात नाही. मात्र, घरातच राहत असल्याने तेवढाच दिलासा असल्याचे दीपिका म्हणते.

‘‘भात आणि डाळ शिजवणे येत होते. आता मांसाहारी अन्न विशेषतः चिकन बनविणे शिकतेय. मी दिवसाची सुरुवात प्राणायामपासून करते आणि नंतर 45 मिनिटे सराव. नाश्ता केल्यानंतर स्वयंपाक शिकते.’’

दीपिका कुमारी

या अंपायरला रेंजसाठी झाडावर चढावे लागते


तुम्ही चौकार, षटकार मारा किंवा बाद व्हा, हे महाशय अतिशय शांतपणे, चेहऱ्यावर कोणत्याही भावना न आणता निर्णय देत स्थितप्रज्ञासारखा उभे असतात. होय, अंपायर अनिल चौधरीच ते. आयसीसी पॅनलवर असलेले अंपायर अनिल चौधरी Umpire Anil Chaudhary | कधी झाडावर, तर कधी घराच्या छतावर चढून मोबाइल  हलवत कानाला लावत असतात. त्यांची अशी ही अवस्था लॉकडाऊनमुळे झाली आहे. लॉकडाऊन असल्याने अनेक खेळाडू, प्रशिक्षकांसमोर भविष्यातील वाटचालीबाबत प्रश्नचिन्ह होते. मात्र अंपायर अनिल चौधरी वेगळ्याच पेचात सापडले होते. कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे त्यांना त्यांच्या गावातून बाहेर पडताच न आल्याने ते शेतात अडकले होते. भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यानच्या एकदिवसीय मालिकेत त्यांना पंचगिरी करायची होती. मात्र, ही मालिका मध्यावरच रद्द झाल्याने ते 16 मार्च रोजी उत्तर प्रदेशातील श्यामली जिल्ह्यातील त्यांच्या डांगरोल गावात आले होते. ‘‘मी 16 मार्च रोजी दोन्ही मुलांसोबत गावी आलो होतो. खूप दिवसांनी गावाकडे आल्याने चांगला आठवडाभर मुक्काम करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यानंतर संपूर्ण देशच लॉकडाऊन झाल्याने मी गावातच अडकून पडलो आहे. माझी आई आणि पत्नी दिल्लीत आहे,’’ असा अनुभव त्यांनी 2019 मध्ये सांगितला होता. ‘‘गावात नेटवर्कची गंभीर समस्या आहे. आम्ही कोणाशीच बोलू शकत नाही. नेटही वापरू शकत नाही. मोबाइल नेटवर्कसाठी मला गावाबाहेर किंवा एखाद्याच्या छतावर, झाडावर चढावे लागते. नेहमीच इथं नेटवर्क राहत नाही,’’ अशी खंतही त्यांनी व्यक्त केली होती. चौधरींना सर्वांत मोठी चिंता मुलांची लागली आहे. कारण त्यांचे ऑनलाइन शिक्षण सुरू झाले आहे. त्यांचा मुलगा हिंदू कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता. त्याचे कॉलेज सुरू होते, पण नेटवर्कच नसल्याने ते सर्वच हतबल झाले. चौधरींचं गाव दिल्लीपासून अवघ्या 85 किलोमीटरवर आहे. गावच्या सरपंचाने जिल्हाधिकारी जसजित कौर यांना पत्रही लिहिले होते. मात्र त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नव्हती. चौधरी यांनी आतापर्यंत 20 वनडे आणि 28 टी– 20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पंचगिरी केली आहे. आयसीसीच्या कार्यशाळा ऑनलाइनच होत असून, त्यातही चौधरी यांना सहभागी होता येत नव्हते.

हा भारतीय फुटबॉलपटू हेल्पलाइन सेंटरमध्ये


लॉकडाऊन असल्याने अनेक खेळाडू, प्रशिक्षकांनी सोशल वर्किंगमध्येही स्वतःला झोकून दिले होते. केरळचा लोकप्रिय भारतीय फुटबॉलपटू सी. के. विनीत C K Vineeth | त्यापैकीच एक. कोविड 19 महामारीपासून कसा बचाव करावा, काय काळजी घ्यावी, यासाठी त्याने पुढाकार घेतला. त्यामुळेच तो केरळ सरकारच्या हेल्पलाइन सेंटरशी जोडला गेला होता. म्हणूनच लॉकडाऊनमध्ये काय करायचं, असा प्रश्न आता त्याच्यासमोर अजिबात उरलेला नव्हता. कारण जोपर्यंत लॉकडाऊन संपत नाही तोपर्यंत त्याला या हेल्पलाइन सेंटरमध्ये लोकांना सल्ला द्यावा लागणार होता. ‘‘जेव्हा मी केरळमध्ये परतलो तेव्हा मला केरळ क्रीडा परिषदेने फोन केला, की तुम्ही कोव्हिड-19 हेल्पलाइनमध्ये मदत करू शकता का? मी लगेच हो म्हणालो. या आपत्कालीन स्थितीत मी काही तरी मदत करू शकतो. त्यामुळेच मी हा निर्णय घेतला,’’ अशी प्रतिक्रिया त्याने व्यक्त केली होती. विनीतने 28 मार्च 2019 पासून या सेंटरमध्ये काम सुरू केले होते. इंडियन सुपर लीग 2019-20 मध्ये जमशेदपूर एफसी संघात त्याने सहभाग घेतला होता. जोपर्यंत लॉकडाऊन संपत नाही, तोपर्यंत विनीत हेल्पलाइनमध्ये व्यस्त राहिला होता.

अजिंक्यने लॉकडाऊनमध्ये मुलीसोबत घालवला वेळ


भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे Ajinkya Rahane | याने लॉकडाऊनमध्ये मुलगी आर्यासोबत वेळ घालवला. भारतीय क्रिकेट बोर्डाने BCCI | आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर रहाणेचा एक व्हिडीओ संदेश पोस्ट केला होता. त्यात आपल्या सहा महिन्यांच्या आर्यासोबत अजिंक्य वेळ घालवतोय, स्वयंपाकात पत्नी राधिकाला मदत करताना दिसत होता. या व्हिडीओत तो व्यायाम करताना, तसेच पुस्तक वाचतानाही दिसतोय. ‘‘या सर्व गोष्टींतून जेव्हा मला वेळ मिळतो तेव्हा मी संगीत ऐकणे पसंत करतो. पुस्तके वाचतो. आता मी पार्थसारथीची ‘दि हॉलोकास्ट ऑफ अॅटॅचमेंट वाचतोय. खूप सुंदर पुस्तक आहे. यातून मला बरचसं शिकायला मिळालंय. यातून वेळ कसा जातो ते कळतही नाही,’’ असे त्याने आपल्या व्हिडीओत म्हंटले होते.

तो ‘ऑनलाइन ट्रेनिंग’ घेतोय


ऑलिम्पिकध्ये रौप्यपदक मिळविणारा नेमबाज विजय कुमार Vijay Kumar | पोलिस उपअधीक्षक पदासाठी (डीएसपी) हिमाचल प्रदेशात प्रशिक्षण घेत होता; पण कोविड-19 महामारीमुळे देशभर लॉकडाऊन असल्याने हा खेळाडू फिल्डवरील ट्रेनिंगपासून मुकला. सोशल डिस्टन्सिंग आवश्यक आहे. त्यामुळे तो ‘ऑनलाइन ट्रेनिंग’च घेऊ शकत होता. लॉकडाऊनच्या काळात त्याचे शारीरिक प्रशिक्षण पूर्णपणे बंद होते. मात्र, त्याचा ऑनलाइन कायद्याचा अभ्यास सुरू होता. हमीरपूरचा रहिवासी असलेल्या विजयची ही स्थिती जगातील सर्वच खेळाडू, नागरिकांना वेगवेगळ्या पातळ्यांवर अनुभवायला मिळाली असेल. ‘‘मी घरी नाही. कारण डीएसपीसाठी माझे सध्या प्रशिक्षण सुरू आहे. प्रशिक्षण केंद्राच्या बाहेरचं जग मला माहिती नाही. सगळीकडे कर्फ्यूसारखी अवस्था आहे,’’ अशी भावना विजय कुमारने लॉकडाऊन काळात व्यक्त केली होती. विजय कुमार आधी सैन्यात सुभेदारपदावर कार्यरत होता. लंडन ऑलिम्पिकमध्ये त्याने रॅपिड फायर पिस्तूल प्रकारात रौप्यपदक मिळविले होते. 2016 मध्ये तो सैन्यातून निवृत्त झाला. सैन्यानंतर आता तो पोलिस खात्यात आपली नवी इनिंग सुरू करीत आहे.

विराट कोहलीने प्रथमच सोसला हा विरह

Lockdown in sports

[jnews_block_17 first_title=”Read more at :” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”95″]

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!