भारताचा अव्वल मुष्टियोद्धा अमित पंघाल ऑलिम्पिकमध्ये हरलाच कसा?
जगातला नंबर एक मुष्टियोद्धा, जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत रौप्य, आशियाई स्पर्धेत सुवर्ण पदक… काय नव्हतं अमित पंघालकडं? भारतीय बॉक्सिंग पथकात पंघाल एकमेव असा बॉक्सर होता, ज्याच्याकडून ऑलिम्पिक पदकाची अपेक्षा होती. दुर्दैवाने तो पहिल्याच लढतीत पराभूत झाला. भारतीय बॉक्सिंगसाठी हा सर्वांत मोठा धक्का आहे. उपउपांत्यपूर्व फेरीत 52 किलो गटात अमित पंघाल याचे आव्हान कोलंबियाच्या युबिर्जेन मार्टिनेझने (Yuberjen Martínez) 1-4 असे मोडीत काढले. विश्वासच बसत नाही, की अमित पंघाल हरलाच कसा?
गेल्या चार वर्षांत अमित पंघाल (52 किलो) याच्या कामगिरीचा आलेख सतत उंचावत राहिला आहे. ऑलिम्पिक बॉक्सिंग स्पर्धेत तो पराभूत होईल, अशी जाणीवही कुणाला नसेल. मात्र, 31 जुलै 2021 रोजी त्याला कारकिर्दीतल्या पहिल्या उलथापालथीचा सामना करावा लागला. वाईट याचंच वाटतं, की हे सगळं ऑलिम्पिक स्पर्धेत घडलं. जागतिक बॉक्सिंग क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेला बॉक्सर अमित पंघाल याची फ्लायवेट गटात नेहमीच दादागिरी राहिली आहे. मात्र, ऑलिम्पिक बॉक्सिंग स्पर्धेत पंघाल पराभूत होणे धक्कादायकच आहे.
पंघालचा प्रतिस्पर्धी मार्टिनेझ हा काही लेचापेचा बॉक्सर नाही. याच मार्टिनेझने रियो ऑलिम्पिक स्पर्धेत लाइट फ्लायवेट गटात रौप्य पदक जिंकले आहे. मार्टिनेझसमोर पंघाल निष्प्रभ ठरला. मार्टिनेझने पंघालला ‘बॅक फूट’वर नेले. पंघालच्या बॉक्सिंग कारकिर्दीत असं कधीच झालं नव्हतं. भारतीय बॉक्सिंग पथकाचे हाय परफॉरमन्स निदेशक सांटियागो निएवा यांचा तर विश्वासच बसेना. त्यांच्या आवाजातून निराशा स्पष्टपणे जाणवत होती. ते म्हणाले, ‘‘होय, मला नाही वाटत, की त्याच्यावर अशा पद्धतीने कुणी वर्चस्व गाजवलं असेल. पंघाल जरी कुणाकडून हरला तरी त्या पराभवातलं अंतर अगदीच कमी असायचं. मात्र एवढ्या मोठ्या फरकाने तो प्रथमच हरला आहे.’’
पंघालबाबत नेमकी काय चुकलं? कोलंबियन मुष्टियोद्धा खरंच त्याच्यापेक्षा वरचढ होता की त्याचे ठोसे दमदार होते? की पंघालच या लढतीस पूर्णपणे तयार नव्हता? काय होती कारणं पंघालच्या पराभवाची? हे प्रश्न निएवा यांनाही पडलेच असतील. त्यावर ते म्हणाले, ‘‘यामागे एकच कारण असू शकत नाही. त्याला सायंकाळची बाउट खूप आवडते. तो सायंकाळी खेळणे अधिक पसंत करतो. मात्र, उत्तम कामगिरी न करण्याचं हे कारण होऊ शकत नाही किंवा तसा बहाणाही होऊ शकत नाही. जेव्हा आम्ही इटलीत होतो, तेव्हा पंघालला सराव लढतीतही या अडचणी आल्या होत्या. असं एकदा नाही, तर तीनदा झालं होतं.’’
हरण्यामागची कारणं शोधताना निएवा यांनी सांगितलं, ‘‘तो थकला होता. आता तुम्ही याला ‘स्थितिजन्य’ मुद्दा म्हणू शकता, पण असं कोणत्याही मुष्टियोद्ध्याविरुद्ध कधीच झालं नाही. तो काही जागतिक स्तरावरील मुष्टियोद्ध्यांशीही लढला आहे आणि त्यांना पराभूतही केलं आहे.’’
निएवा म्हणाले, ‘‘आम्ही इटलीत सराव सत्रादरम्यान याच गटातील आशियाई रौप्य पदक विजेत्या दीपक कुमारलाही आजमावलं होतं. दीपकलाही या कोलंबियन मुष्टियोद्ध्याविरुद्ध बरंच झुंजावं लागलं होतं. मार्टिनेझ खूपच दमदार मुष्टियोद्धा आहे.’’
बरीच मेहनत घेऊनही भारताच्या पाच पुरुष मुष्टियोद्ध्यांची कामगिरी निराशाजनकच राहिली. केवळ सतीश कुमार (91 किलोपेक्षा अधिक गट) हा एकमेव मुष्टियोद्धा पहिली लढत जिंकू शकला. मात्र, यातही त्याला दोन कट बसले आहेत. त्याचा फटका त्याला पुढच्या लढतीत बसू शकेल. त्याची पुढची लढत 2 ऑगस्ट 2021 रोजी बखोदिर जालोलोव याच्याविरुद्ध होणार आहे. बखोदिर सध्याचा जागतिक विजेता मुष्टियोद्धा आहे. त्यामुळे ही लढत सतीश कुमारसाठी सोपी नाही.
विकास कृष्ण (69 किलो), मनीष कौशिक (63 किलो) आणि आशीष चौधरी (75 किलो) यांचे आव्हान तर पहिल्याच लढतीत संपुष्टात आले आहे. मात्र, पंघालचं आव्हान संपुष्टात येणं भारतीयांसाठी वेदनादायी आहे. पंघाल ऑलिम्पिक बॉक्सिंग स्पर्धेत पदकाचा प्रबळ दावेदार होता. दुर्दैवाने पहिल्याच लढतीत त्याचे आव्हान संपुष्टात आले. काहीही म्हणा, कोलंबियाचा मुष्टियोद्धा ताजातवाना आणि आक्रमकच आहे. त्याने हरयाणाच्या अमित पंघाल याची मात्रा चालू दिली नाही.
कोलंबियन मार्टिनेझविषयी निएवा म्हणाले, ‘‘तो एका मिनिटात 100 पंच मारत होता. अमित पंघाल त्याच्या या वेगासमोर टिकूच शकला नाही. असं प्रथमच घडलं. कारण पंघाल यापूर्वीच्या प्रत्येक लढतीत प्रतिस्पर्ध्यावर वर्चस्व मिळवत होता.’’
अमित पंघाल याच्या नावावर अनेक किताब आहेत. गेल्या चार वर्षांत भारताचा तो सर्वांत यशस्वी मुष्टियोद्धा आहे. त्याने जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत भारताला पहिले रौप्य पदक आणि आशियाई स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवून दिले होते. पंघाल जेव्हा जेव्हा आशियाई स्पर्धेत खेळला आहे, तेव्हा तेव्हा त्याने पदक जिंकलेच आहे.
निएवा म्हणाले, ‘‘आपण प्रत्येक गोष्टीत काळा आणि पांढरा रंग पाहतो. पराभव नेहमीच वेदना देतो; दु:ख देतो. तोही खूप दु:खी आहे. आता उत्तम मार्ग हाच आहे, की हा पराभव विसरून पुन्हा सरावावर लक्ष केंद्रित करून पुढे जायला हवे. चुकांपासून बोध घ्यायला हवा. हाच एकमेव मार्ग आहे. कारण काही महिन्यांतच जागतिक बॉक्सिंग स्पर्धा आहे.’’
पंघालच्या धक्कादायक पराभवामुळे भारतीय बॉक्सिंग टीकाकारांच्या निशाण्यावर आले आहेत. राष्ट्रीय मुख्य प्रशिक्षक सी. एफ. कुटप्पा यांनी ही भीती व्यक्त केली. ते म्हणाले, की आता आम्हाला यापुढे टीकेचा सामना करावा लागणार आहे. आम्ही उत्तम कामगिरीची अपेक्षा करीत होतो. विशेषत: मुष्टियोद्ध्यांकडून. मात्र, तसं काही झालं नाही. आम्ही निराश झालो आहोत. मी समजू शकतो, की टीका होईल आणि आम्हाला ती स्वीकारायला हवी.
[jnews_block_22 first_title=”Read more at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”95″]