‘Shooter Dadi’ Chandro Tomar dies of Coronavirus
‘शूटर दादी’ चंद्रो तोमर यांचं करोनामुळे निधन
‘शूटर दादी’ (Shooter Dadi) या नावाने प्रसिद्ध असलेल्या नेमबाज चंद्रो तोमर (Chandro Tomar) यांचं कोविड-19 मुळे (Coronavirus) 30 एप्रिल 2021 रोजी निधन झालं. त्या 89 वर्षांच्या होत्या. चंद्रो तोमर यांची नणंद व त्यांच्यासारखीच नेमबाज असलेल्या प्रकाशी तोमर (Prakashi Tomar) यांनी ट्विटर पेजवर ही माहिती दिली.
प्रकाशी तोमर यांनी ट्विटरवर भावना व्यक्त केल्या- ‘‘माझी सोबत सुटली. चंद्रो, कुठे गेलीस तू?’’ चंद्रो तोमर यांना याच आठवड्यात श्वास घेताना त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची तपासणी केली असता समजले, की त्यांना कोविड-19 चा संसर्ग झाला आहे.
उत्तर प्रदेशातील बागपत गावात राहणाऱ्या चंद्रो तोमर (‘Shooter Dadi’ Chandro Tomar ) यांनी वयाची साठी ओलांडल्यानंतर नेमबाजी खेळण्यास सुरुवात केली होती. मात्र, त्यांनी लवकरच या खेळावर आपली पकड घट्ट करीत अनेक राष्ट्रीय स्पर्धा जिंकल्या होत्या. चंद्रो तोमर व प्रकाशी तोमर यांच्या आयुष्यावर आधारित ‘सांड की आँख’ हा हिंदी चित्रपटही प्रदर्शित करण्यात आला होता. या चित्रपटात भूमी पेडणेकर, तापसी पन्नू आणि प्रकाश झा यांच्या प्रमुख भूमिका होत्या. अभिनेता आमिर खान याच्या ‘सत्यमेव जयते’ कार्यक्रमातही तोमर यांची विशेष मुलाखत घेण्यात आली होती. चंद्रो तोमर यांना ‘स्त्रीशक्ती सन्मान’ या पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. हा पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात आला होता.
चंद्रो तोमर व प्रकाशी तोमर जेव्हा नेमबाजीकडे वळल्या तेव्हा त्यांना घरातूनच विरोध केला. बागपतमधील घरातल्या पुरुषांनी दोघींच्या नेमबाजीवर नाराजी व्यक्त केली होती. मात्र त्यांची दोन्ही मुले, सुना आणि नातवांनी त्यांना पाठिंबा दिला. त्यामुळे त्या घरापासून जवळच्या शूटिंग रेंजवर सराव करण्यास जाऊ शकल्या. शूटर दादीने ज्येष्ठ नागरिक गटात अनेक पुरस्कार मिळवले.
तापसी पन्नू, भूमी पेडणेकरने वाहिली श्रद्धांजली
चंद्रो तोमर (‘Shooter Dadi’ Chandro Tomar) व प्रकाशी तोमर यांच्या जीवनावर ‘सांड की आँख’ हा चित्रपट काढण्यात आला होता. या दोघींच्या भूमिका तापसी पन्नू (Taapsee Pannu) आणि भूमी पेडणेकर (Bhoomi Pednekar) यांनी साकारल्या होत्या. चंद्रो तोमर यांची भूमिका भूमी पेडणेकरने साकारली होती. चंद्रो यांच्या निधनावर तापसी आणी भूमीने श्रद्धांजली अर्पण केली. भूमी म्हणाली, की मला अतिशय दुःख झालं आहे. जणू माझ्या आयुष्याचा एक भाग निघून गेला. त्यांनी त्यांचे नियम स्वतःच तयार केले आणि आजूबाजूच्या मुलींना जगणं शिकवलं. मी भाग्यवान आहे, मला त्यांची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. प्रकाशी तोमरची भूमिका तापसी पन्नूने साकारली होती. तापसीने चंद्रो तोमरसोबतचा एक फोटो ट्विटरवर शेअर करताना म्हंटले, की माझ्यासाठी त्या प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व होतं.