८०-९० च्या दशकात आयपीएल असती तर…?
८०–९० च्या दशकात आयपीएल असती तर…? कपिल, श्रीकांत, शास्त्री, जडेजावर झाला असता पैशांचा पाऊस पडला असता. या खेळाडूंवर घसघशीत बोली लागली असती…
एक जण कानाला रेडिओ लावून ऐकतो… आवाज मोठा आहे, पण प्रेक्षकांच्या गोंगाटातही समालोचकाचा प्रत्येक शब्द जिवाचे कान करून ऐकण्यासाठी प्रत्येक जण आसुसलेला असायचा. पण खरं सांगू, त्या वेळी एकही शब्द प्रयत्न करूनही फारसं कुणाला काही कळत नव्हता. रेडिओवरील समालोचनही इंग्रजीतच ऐकायला मिळायची. त्या वेळी इंग्रजी समजणारीही बोटावर मोजण्याइतकीच मंडळी होती. तरीही केवळ फोर रन्स… हा शब्द कानी पडला तरी जल्लोष व्हायचा. हा तोच काळ होता, जेथे एखाद्याच्याच घरी दूरचित्रवाणी संच (म्हणजे टीव्ही हो..) असायचा. त्या वेळी अँटेनावाले टीव्ही होते. भारत–पाकिस्तान सामना असेल तर त्या घरी मग गल्लीतल्या थोरामोठ्यांपासून सर्वांचीच गर्दी. मधूनच मुंग्या आल्या, की अँटेना हलवायला एक जण गच्चीवर चढायचा. अँटेना हलवला, की टीव्हीचं चित्र दिसायचं. मग गच्चीवरील पोराला सांगायचं, चित्र आलं रे… हा काळ आता ओसरला आहे. मात्र, आठवणी अजूनही चिरंतन टिकून आहेत.. १९८३ ची विश्वकरंडक स्पर्धा हा याच श्रद्धावान पिढीतली. विचार करा, ८०–९० च्या दशकात आयपीएल (इंडियन प्रीमियर लीग) असती तर त्या पिढीला कोण आनंद झाला असता…!
८०–९० च्या दशकात आयपीएल असती तर काय घडलं असतं?
आज अशी कल्पना केली तर कपिल, श्रीकांत, शास्त्रीने किती कमावले असते…! (रवी शास्त्री नव्या पिढीतही मार्गदर्शकाच्या भूमिकेतून कमावतोच आहे) ८०–९० च्या पिढीला म्हणूनच सलाम करावासा वाटतो. आजच्या पिढीला कदाचित या दंतकथा वाटतील, पण असाही एक काळ होता…. आयपीएल स्थगित झाल्यावर त्यावर किती खल होताना दिसतो. त्या काळी जर ही आयपीएल असती, तर त्या काळातल्या अनेक प्रतिभावान खेळाडूंवर तर पैशांचा पाऊस पडला असता. अनेक खेळाडूंची शैली तर अनोखी होती. जाहिरात न करताही गर्दी खेचण्याची त्यांची क्षमता तर अलौकिकच म्हणावी लागेल. जर त्या काळात आयपीएल असती तर कदाचित जावेद मियांदादच्या संघात चेतन चौहान असता. पॅट्रिक पॅटर्सन patrick patterson |, कोर्टनी वॉल्श courtney walsh |, अँब्रोजसारख्या खेळाडूंची वेगळीच चलती असती. कल्पना करा, कृष्णम्माचारी श्रीकांतने विनाहेल्मेट पॅट कमिन्ससारख्याचा बाउन्सर चेंडू कसा तडकावला असता? बेन स्टोक्सने मनोज प्रभाकरचा हळुवार येणारा चेंडू कसा खेळला असता? कल्पना करायला काय जाते… पण पीटीआयने भारताच्या अशा दहा माजी खेळाडूंबाबत कल्पना केली आहे, जे आयपीएलमध्ये असते तर काय झाले असते? जर ते नव्या पिढीतही सक्रिय खेळाडू असते तर अंबानी आणि शाहरूख खानसारख्या संघमालकांनी त्यांच्यावर पैशांचा वर्षाव करण्यात कोणतीही कसूर ठेवली नसती.
1. कपिल देव (Kapil Dev)
भारतीय क्रिकेट संघातील उत्तम अष्टपैलू खेळाडू. भारताचा सर्वोत्तम स्विंग गोलंदाजांपैकी एक आणि असा फलंदाज जो षटकार लीलया खेचणारा. नव्या चेंडूवर गोलंदाजीची सुरुवात केल्यानंतरही मधली काही षटके आणि अखेरच्या षटकांमध्येही चेंडू टाकण्याची हिंमत ठेवणारा कपिलदेव गुणवत्तेची खाण होता. केवळ गोलंदाजीच नाही, तर त्याची फलंदाजीही तितकीच धडाकेबाज. अखेरच्या षटकांमध्येही चेंडू सीमापार तडकावण्यात त्याला फारसे कष्ट घ्यावे लागत नव्हते. ८०–९० च्या दशकात आयपीएल असती तर…? अशा या ‘हरियाणा हरिकेन‘साठी कोणताही संघमालक धनादेशावर रक्कम लिहिताना एखाद्या अंकावर शून्यावर शून्य ठेवताना मनात कोणतेही आढेवेढे घेतले नसते.
2. कृष्णमाचारी श्रीकांत (Krishnamachari Srikkanth)
जर याला मानवप्राण्याच्या तीन अवस्थांपैकी वृद्धावस्था नसती तर श्रीकांत नव्या पिढीचा युवी असता. तो त्याच्या पिढीतच दोन पाऊले पुढे होता. त्याची आक्रमक शैली पाहण्यासाठी मैदान खचाखच भरलेले असायचे. श्रीकांतचे वैशिष्ट्य म्हणजे कितीही वेगवान गोलंदाज असो, त्याला तो विनाहेल्मेट सामोरा जायचा. अँडी रॉबर्ट्ससारख्या वेगवान गोलंदाजाच्या चेंडूवर तो विनाहेल्मेट पुलशॉट खेळायचा. हे कमी की काय, ज्याच्या गोलंदाजीवर भल्या भल्यांना धडकी भरायची त्या पॅट्रिक पॅटरसनलाही तो विनाहेल्मेट हुक शॉटवर चौकार खेचायचा. 80 च्या दशकातच तो १०० च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी करायचा. कदाचित चेन्नई सुपरकिंग्सने त्याला आपल्याकडे खेचण्यासाठी इतर फ्रँचाइजींनाही मागे टाकले असते.
3. विनोद कांबळी (Vinod Kambli)
हा असा खेळाडू होता, जो आजच्या काळातील आयपीएलसाठीच बनलेला होता. त्याचे फलंदाजीतले कौशल्य तर अप्रतिमच होते, पण त्याची लाइफस्टाइल आजच्या पिढीला भावणारी होती. दुर्दैवाने त्याने अशा पिढीत हटके लाइफस्टाइल स्वीकारली ज्या पिढीत तो टीकेचाच धनी झाला. त्याची कपड्यांची स्टाइल आयपीएलमध्ये आजच्या पिढीतल्या तरुणाईला प्रचंड भावली असती. 90 च्या दशकातील विनोद कांबळी हार्दिक पंड्यासारख्या क्रिकेटपटूंपेक्षा दहा पटींनी पुढेच होता. फिरकी गोलंदाजांची पिसे काढण्यात तर तो वाकबगार होता. ८०–९० च्या दशकात आयपीएल असती तर…? मुंबई इंडियन्समध्ये तो सचिन तेंडुलकरसोबत फलंदाजी करताना दिसला असता.
4. मोहम्मद अझहरुद्दीन (Mohammad Azharuddin)
मनगटाचा जादूगार असलेला हा उत्तम फलंदाज होता. मधल्या फळीतली त्याची फलंदाजी वाखाणण्याजोगी होती. कितीही क्षेत्ररक्षकांचे कडे त्याच्याभोवती असले तरी त्यांच्यामधून चौकार लगावण्याची त्याची कला तर अफलातूनच होती. एवढेच नाही तर वेगाने धाव घेताना त्याचा हात कोणीही धरू शकणार नाही. फिरकी गोलंदाजांचा सामना करताना त्याचे फुटवर्कही त्याला वेगळ्याच श्रेणीत घेऊन जाते. उत्तम फिटनेस आणि चपळ क्षेत्ररक्षणामुळे तो प्रत्येक सामन्यात किमान 15 धावा वाचविण्याची त्याची क्षमता होती. यातही त्याच्याकडे आणखी एक गुण होता, तो म्हणजे नेतृत्वगुण. याचमुळे तो इतरांपेक्षा उजवा ठरतो. स्थानिक हैदराबाद संघ किंवा कोलकाता (ईडन गार्डन हे त्याचं आवडतं मैदान म्हणून) संघाने अझहरुद्दीनला आपल्याकडे घेण्यात कोणतीही कसूर केली नसती.
5. अजय जडेजा (Ajay Jadeja)
महेंद्रसिंह धोनीपूर्वी देशातील सर्वांत समजदार खेळाडूंमध्ये गणल्या जाणाऱ्या जडेजाकडे डावाची सुरुवात आणि अखेरच्या षटकांमध्ये फलंदाजी करण्याची क्षमता होती. त्याने धोनीसारखीच मॅच फिनिशरची भूमिका उत्तम वठवली असती. क्षेत्ररक्षणात तो सर्वांत चपळ आणि गरज पडेल तेव्हा गोलंदाजी करण्याची त्याची क्षमता त्याला उत्तम क्रिकेटपटूंच्या पंक्तीत घेऊन जाते. तो दिल्ली संघाचा उत्तम खेळाडू ठरला असता.
6. मनोज प्रभाकर (Manoj Prabhakar)
नव्या चेंडूने स्विंग आणि अखेरच्या षटकांमध्ये मंदगतीची गोलंदाजी या वैशिष्ट्यांमुळे तो आयपीएलमध्ये अढळ स्थान मिळवू शकला असता. चौकार, षटकार खेचण्याची क्षमता त्याच्याकडे नसली तरी दुसऱ्या बाजूने उत्तम किल्ला लढवत जोडीदार फलंदाजाला उत्तम साथ देण्याची त्याच्याकडे क्षमता होती. कदाचित राजस्थान रॉयल्स संघात त्याला आपली प्रतिभा दाखविण्याची पुरेपूर संधी मिळाली असती.
7. रॉबिन सिंग (Robin Singh)
या अष्टपैलू खेळाडूवर धनवर्षा करण्यात कोणत्याही फ्रँचाईजीला अडचण आली नसती. धडाकेबाज फलंदाजीत वाकबगार आणि मध्यमगती गोलंदाजीसोबत क्षेत्ररक्षणातील चापल्य या अंगभूत गुणांमुळे तो कोणत्याही कर्णधाराच्या गळ्यातला ताईत होऊ शकला असता. अष्टपैलू खेळाडूंवर विश्वास ठेवणारा सनराइजर्स हैदराबाद कदाचित त्याच्यासाठी उत्तम संघ असता.
8. रवी शास्त्री (Ravi Shastri)
डाव्या हाताची मंदगतीची गोलंदाजी आणि कोणत्या क्रमावर फलंदाजीस उपयुक्त असा हा खेळाडू. फिरकी गोलंदाजावर सहजपणे षटकार खेचण्याच्या क्षमतेमुळे तो क्रिकेटप्रेमींमध्ये विशेष लोकप्रिय आहे. जर तो आयीएलमध्ये असता तर चेन्नई सुपरकिंग्सचा कर्णधार असता.
9. मनिंदर सिंग (Maninder Singh)
डाव्या हाताचा फिरकी गोलंदाजी करणाऱ्या या खेळाडूचं वैशिष्ट्य म्हणजे त्याचा चेंडूला उसळी कमी असायची. चेंडू थेट फलंदाजाच्या यष्ट्या उडविण्यासाठी आसुसलेलाच असायचा. आजच्या पिढीतही टी–२० क्रिकेटमध्ये त्याची गोलंदाजी खेळणे अवघड झाले असते. किंग्स इलेव्हन पंजाबने कदाचित त्याला आपल्याकडे खेचले असते.
10. जवागल श्रीनाथ (Javagal Srinath)
भारताचा सर्वांत वेगवान गोलंदाज म्हणून त्याचा एक काळ होता. वेग आणि चेंडूला उसळी देण्यात वाकबगार असलेल्या श्रीनाथकडे गोलंदाजीचं वैविध्य होतं. आज तो जर आयपीएल खेळला असता कोणत्याही कर्णधाराचा आवडता गोलंदाज ठरला असता. सुरुवातीच्या षटकांमध्ये संघाला विकेट मिळवून दिली असती आणि फलंदाजीतही त्याने कधी कधी योगदानही दिले असते. आरसीबीत त्याची निवड नक्कीच झाली असती.
One Comment