नाशिककर बापू नाडकर्णी यांना का म्हणतात कंजूष गोलंदाज?
सलग 21 षटकं निर्धाव गोलंदाजी करण्याचा विक्रम रचणारे माजी कसोटीपटू रमेशचंद्र गंगाराम उर्फ बापू नाडकर्णी यांचं वयाच्या 87 व्या वर्षी निधन झालं. पन्नासच्या दशकात क्रिकेटचं मैदान गाजवणारे बापू नाडकर्णी नाशिकचे होते. वृद्धापकाळ आणि दीर्घ आजारांमुळे 17 जानेवारी 2020 रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. बापूंनी जी कामगिरी केली आहे, ती आजपर्यंत एकही क्रिकेटपटू करू शकलेला नाही. बापू नाडकर्णी यांची कंजूष गोलंदाज म्हणून ख्याती होती. त्यांच्याविषयी या गोष्टी वाचाल तर थक्क व्हाल…
बापूंचं शालेय व महाविद्यालयीन शिक्षण नाशिकमध्ये झालं आहे. रुंग्ठा हायस्कूलचे ते माजी विद्यार्थी होते. त्यांच्या मागे पत्नी व दोन मुली आहेत. पन्नासच्या दशकातील क्रिकेट आणि आजच्या क्रिकेटमध्ये कमालीचा फरक आहे. बापू नाडकर्णी यांच्या नावावर जो निर्धाव षटकांचा विक्रम आहे, तो अद्याप कोणीही मोडू शकलेला नाही. बापू नाडकर्णी 1950-51 मध्ये पुणे विद्यापीठाच्या संघात होते. त्या वेळी विद्यापीठाच्या संघात प्रवेश करणे हीच मुळी अचाट कामगिरी मानली जायची. पुणे विद्यापीठाकडून ते रोहिंटन बारिया ट्रॉफी स्पर्धा खेळले. त्याच्या पुढच्याच वर्षी 1952 मध्ये बापूंनी महाराष्ट्र संंघाकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर दोन वर्षांनी त्यांनी बॉम्बे संघाविरुद्ध कारकिर्दीतली पहिले शतक झळकावले. ब्रेबोर्न स्टेडियमच्या खेळपट्टीवर तीन तासांपेक्षा अधिक काळ टिकून नाबाद 103 धावा झळकावल्या. त्या वेळी एकट्या बापूंच्या 103 धावा होत्या.
बापूंचं पदार्पण न्यूझीलंडविरुद्ध, अखेरही न्यूझीलंडविरुद्धच
बापू नाडकर्णी यांनी 1955 मध्ये आंतरराष्ट्रीय कसोटीत पदार्पण केले. दिल्लीतील फिरोजशाह कोटला मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध त्यांचं हे पहिलं कसोटीपाऊल होतं. विनोद मंकड यांनी विश्रांती घेण्याचा निर्णय घेतल्याने बापूंना ही संधी चालून आली. त्यात त्यांनी नाबाद 68 धावा केल्या. पण आपल्या फिरकी गोलंदाजीवर त्यांनी 57 षटके टाकली. मात्र एकही गडी बाद करता आला नाही. जेव्हा मंकड संघात परतले तेव्हा नाडकर्णींना संघाबाहेर राहावे लागले. याच वर्षात ते महाराष्ट्र संघाचे कर्णधार झाले. विशेष म्हणजे त्यांनी अखेरचा कसोटी सामनाही न्यूझीलंडविरुद्धच 1968 मध्ये खेळला. ऑकलंडमध्ये झालेल्या या सामन्यात भारतीय संघाच्या कर्णधारपदी मन्सूर अली खान पतौडी होते.
बापू नाडकर्णी यांना का म्हटले जाते कंजूष गोलंदाज?
क्रिकेटविश्वात बापूंची फिरकी गोलंदाजी अधिक लोकप्रिय होती. मद्रासमध्ये (आताचे चेन्नई) 1963-64 मध्ये इंग्लंडविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात बापूंची गोलंदाजी क्रिकेटच्या पुस्तकात कायमची अजरामर झाली. त्यांनी 29 षटकांत 26 षटके मेडन टाकली आणि धावा दिल्या अवघ्या 3. या एकूण स्पेलमध्ये त्यांना एकही विकेट मिळाली नाही. मात्र, त्यांनी सलग 21 षटके निर्धाव टाकण्याचा विक्रम केला. त्यांच्या गोलंदाजीचं विश्लेषण होतं 32-27-5-0. इतका कंजूष गोलंदाज बापू नाडकर्णी यांच्यानंतर दुसरा कुणी शोधूनही सापडणार नाही. तब्बल 114 मिनिटे त्यांनी गोलंदाजी केली. विशेष करून इंग्लंडचे फलंदाज ब्रायन बोलस (Brian Bolus) आणि केन बारिंग्टन (Ken Barrington) यांच्याविरुद्ध त्यांनी अधिक गोलंदाजी केली. कसोटी मालिकेतील हा अंतिम सामना होता. फलंदाजीतही बापूंची कामगिरी उत्तमच राहिली. पहिल्या डावात त्यांनी 52, तर दुसऱ्या डावात 122 धावांची शतकी खेळी साकारली. कसोटी कारकिर्दीतले त्यांचे हे एकमेव शतक आहे.
बापूंच्या फिरकीने जिंकला भारत
ऑस्ट्रेलियाविरुद्ध बापूंनी पहिल्या व दुसऱ्या डावात 31 धावांत 5 व 91 धावांत 6 गडी टिपले होते. मद्रासमध्ये 1964-65 मध्ये ते हा सामना खेळले होते. मात्र, याच काळात बिशनसिंग बेदी यांच्या फिरकी गोलंदाजीचा जसजसा उदय झाला, तसतसे बापू अस्ताला लागले. 1967 मध्ये इंग्लंड दौऱ्यातून त्यांना वगळण्यात आले. मात्र, न्यूझीलंडविरुद्ध त्यांना पुन्हा संधी मिळाली. वेलिंग्टनमध्ये झालेल्या या सामन्यात बापूंच्या फिरकीने कमालच केली. त्यांनी 43 धावांत 6 गडी टिपले. बापूंच्या फिरकीवरच भारतीय संघाने या सामन्यात विजय मिळवला. न्यूझीलंड दौऱ्यावरून परतल्यानंतर बापूंनी प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.
सहा तास फलंदाजी, साकारली द्विशतकी खेळी
बापूंनी 1951-52 ते 1959-60 दरम्यान महाराष्ट्राकडून रणजी करंडक सामने खेळले. 1957-58 मध्ये त्यांनी सौराष्ट्राविरुद्ध द्विशतकी खेळी साकारतानाच पहिल्या डावात 17 धावांत 6 व दुसऱ्या डावात 38 धावांत 3 गडी बाद केले. गुजरातविरुद्ध 1958-59 मध्ये 167 धावांची शतकी खेळी साकारताना 7 गडीही टिपले होते. त्यांची दिल्लीविरुद्धची द्विशतकी खेळी स्मरणीय ठरली. 1960-61 मध्ये रणजी करंडक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत त्यांनी तब्बल सहा तास खेळपट्टीवर टिकून 283 धावा केल्या.
कंजूष गोलंदाज
बापू नाडकर्णी यांच्या गोलंदाजीचं विश्लेषण ऐकलं तर थक्क व्हाल. मद्रास (आताचे चेन्नई)मध्ये झालेल्या कसोटी सामन्यात त्यांची गोलंदाजी 32-27-5-0 अशी होती. म्हणजे 32 षटकांत तब्बल 27 षटकं मेडन म्हणजे निर्धाव टाकली होती आणि धावा दिल्या होत्या अवघ्या 5. तब्बल 131 चेंडूंत एकही रन न देणारे बापू नाडकर्णी कमालीचे कंजूष गोलंदाज मानले जातात. बापूंनी पहिल्या डावात सरासरी 0.15 धावा दिल्या होत्या. बापू टी-20 मध्ये असते तर काय झालं असतं फलंदाजांचं, याची कल्पनाच न केलेली बरी.
असं म्हणतात, की बापू खेळपट्टीवर नाणे ठेवून गोलंदाजीचा सराव करायचे. त्यामुळेच त्यांच्या फिरकी गोलंदाजीचा सामना भल्या भल्यांना शक्य होत नसायचा. त्यांच्या गोलंदाजीची सरासरी ऐकली तर तुम्ही थक्क व्हाल. बापूंनी एका षटकात सरासरी दोनपेक्षा कमी धावा दिल्या आहेत. |
बापू नाडकर्णी डावखुरे फलंदाज व फिरकी गोलंदाज होते. त्यांनी इंग्लंडविरुद्ध एका कसोटी सामन्यात सलग 21 षटकं निर्धाव टाकली. हा विक्रम अद्याप कोणीही मोडू शकलेलं नाही. पन्नासच्या दशकात आठ चेंडूंचं एक षटक होतं. आता सहा चेंडूंचं एक षटक मानलं जातं. |
बापू नाडकर्णी यांनी भारताकडून 41 कसोटी सामने खेळले आहेत. या 41 कसोटी सामन्यांत त्यांनी 1414 धावा काढल्या, तर 88 गडी बाद केले आहेत. |
43 धावांत 6 गडी बाद करण्याची त्यांची कारकिर्दीतली सर्वश्रेष्ठ कामगिरी आहे. |
बापू नाडकर्णी यांनी 191 प्रथम श्रेणी सामन्यांत 500 गडी टिपले आहेत, तर 8880 धावा केल्या आहेत. |
कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्धही त्यांनी टिच्चून गोलंदाजी करताना पाकच्या फलंदाजांना अक्षरशः जेरीस आणले होते. पाकिस्तानविरुद्ध 1960-61 मध्ये कानपूरमध्ये झालेल्या सामन्यात त्यांनी 32 षटकांत 24 षटके निर्धाव टाकली, तर केवळ 23 दिल्या. दिल्लीत झालेल्या पुढच्या सामन्यातही बापूंनी पाकिस्तानी फलंदाजीला चाचपडत खेळण्यास भाग पाडले. दिल्लीत त्यांनी 34 षटके टाकताना तब्बल 24 षटके तर पाकिस्तान्यांसाठी वांझोट्याच ठरल्या. केवळ 24 धावा देताना बापूंनी एक गडी बाद केला होता. |
इंग्लंडविरुद्ध सलग 21 षटके निर्धाव टाकण्याचा बापूंचा विक्रम 54 वर्षांत कोणीही मोडू शकलेलं नाही. जसा बापूंच्या नावावर सलग सर्वाधिक षटके निर्धाव टाकण्याचा विक्रम आहे, तसा सर्वाधिक चेंडू निर्धाव टाकण्याचा विक्रम दक्षिण आफ्रिकेचा फिरकी गोलंदाज ह्यू टेफिल्ड यांच्या नावावर आहे. त्यांनी 137 चेंडू निर्धाव टाकले होते. 1956-57 मध्ये त्यांनी ही कामगिरी केली होती. त्यांनी 17.1 षटके सलग निर्धाव टाकली होती. |
कमी धावा देणारा गोलंदाज म्हणून ओळखले जायचे. |
बापूंची नाबाद 122 धावांची सर्वोच्च फलंदाजी आहे. त्यांनी एका शतकासह 7 अर्धशतकेही झळकावली आहेत. प्रथम श्रेणीत त्यांनी नाबाद द्विशतकी (288) खेळी साकारली आहे. प्रथम श्रेणीत एकूण 14 शतके व 46 अर्धशतके साकारली आहेत. |
कसोटीत एका डावात पाच गडी बाद करण्याची किमया पाच वेळा, तर प्रथम श्रेणीत हीच किमया 19 वेळा साधली आहे. |
बापूंनी संपूर्ण संघ तंबूत धाडण्याची किमया दोन वेळा केली आहे. कसोटी कारकिर्दीत एकदा, तर प्रथम श्रेणीत एकदा त्यांनी संपूर्ण संघच बाद केला आहे. |
सचिन तेंडुलकरचे ट्विट…
मी तुमच्या गोलंदाजीचा विक्रम ऐकतच मोठा झालो. माझ्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली.