समर्पिता- रजनी नागेश लिमये
मानसिक अपंग मुलांचं जगण सुकर करणाऱ्या रजनी नागेश लिमये यांचं कार्य नाशिककरांना माहीत नाही असं नाही. मात्र, मानसिक विकलांगांसाठी झटणारे निष्काम कर्मयोगी असतात. त्यांना ना फळाची चिंता, ना प्रसिद्धीची हौस. 16 जानेवारी 2018 रोजी त्यांचं निधन झालं. त्यांच्या प्रथम स्मृतिदिनी 2019 मध्ये रोहिणीताई ढवळे यांनी वाहिलेली ही सुमनांजली.
जन्मजात सात्त्विकता ल्यालेलं एक निरागस हास्य संपलं. प्रबोधिनीवर नितांत प्रेम करणारं एक आभाळ संपलं.
क्षणभर काळही थबकला. संवेदना सुन्न झाल्या.
प्रबोधिनीच्या संस्थापक अध्यक्षा रजनी नागेश लिमये यांच्या निधनाची बातमी आली आणि डोळ्यासमोर अंधार पसरला.
जाणिवा बोथट झाल्या.
बाईंचं छत्र डोक्यावर नाही याची खरी जाणीव करून दिली आमच्या मानसिक अपंग मुलांच्या रडण्याने.
फारशी समज नसतानाही त्यांचं अनावर होणं खूपच धक्कादायक होतं.
आज त्यांचा प्रथम स्मृतिदिन. ‘दरवळ रजनीगंधाचा’मधून त्यांच्या देदीप्यमान कारकिर्दीला उजाळा देऊन त्यांना आदरांजली वाहण्यात येईल.
एखाद्या ध्येयाने झपाटलेला माणूसच इतिहास घडवू शकतो हे त्यांनी प्रत्यक्ष दाखवून दिले.
आपल्या मानसिक अपंग मुलाला- गौतमला साक्षर करण्यासाठी त्यांनी खचून न जाता पदर खोचला आणि कामाला लागल्या.
आधुनिक काळातल्या सावित्रीच्या या लेकीने म्हणजेच रजनी नागेश लिमये यांनी 1 जानेवारी 1977 रोजी नाशिकमध्ये प्रबोधिनीचे इवलेसे रोपटे लावून मानसिक अपंग मुलांना शिक्षणाची दारे खुली करून दिली.
अर्थातच गौतम शाळेचा पहिला विद्यार्थी ठरला. घरोघर फिरून गोळा केलेल्या चार मुलांना घेऊन शाळा सुरू झाली.
आज गौतम अस्खलित वाचतो, लिहितो आणि रोज रात्री न चुकता डायरीही लिहितो.
या शाळेला वेड्यांची शाळा म्हणून हिणवला जायचं, पण बाई डगमगल्या नाहीत.
मानसिक अपंग मुलांना माणूस म्हणून स्वाभिमानाने जगता यावे यासाठी आयुष्यभर सजगपणे अथक प्रयत्नांची पराकाष्ठा केली.
आज प्रबोधिनीच्या इवल्याशा रोपट्याचा वटवृक्ष झाल्याचे आपण प्रत्यक्ष पाहत आहोत.
प्रबोधिनी ट्रस्ट ही संस्था गेली 41 वर्षे शिक्षण, प्रशिक्षम आणि पुनर्वसन या त्रिसूत्रीवर अव्याहतपणे कार्यरत आहे.
अनेक क्षेत्रांत प्रबोधिनीच्या विशेष मुलांनी उज्ज्वल यश मिळवले आहे.
1 जानेवारी 1967 रोजी पावलापुरता प्रकाश घेऊन बाईंनी प्रबोधिनीची स्थापना करून सातत्याने ध्यानीमनी प्रबोधिनी ठेवून अनेक अडचणींचे डोंगर पार केले.
त्यांना मिळालेल्या पुरस्काराची रक्कम नेहमीच प्रबोधिनीला देऊन टाकली.
त्यांनी दिलेली देणगी नक्कीच अमूल्य आहे. इतकेच नव्हे, तर ऑगस्ट 2017 मध्ये गौतमने स्वकष्टाने कमावलेल्या पैशांतून प्रबोधिनीला 50 हजार रुपये देणगी देऊन आईच्या पावलावर पाऊल ठेवून आपले वेगळेपण सिद्ध केले.
बाईंनी आपलं सारं आयुष्यच प्रबोधिनीसाठी वेचलं आहे.
पार्थाचं ध्येय आणि कौंतेयाचं दातृत्व या दोन्हींची सांगड घालत वेळप्रसंगी पदरमोड करून प्रबोधिनीच्या विकासासाठी झटत राहिल्या.
मानसिक अपंग मुले लवकर शाळेत घातली तर शहाणी होतात असे नाही, पण त्यांना मिळणाऱ्या प्रशिक्षणाने ती सांभाळायला मात्र सोपी होतात, असं त्या नेहमी म्हणायच्या.
त्यासाठी पालकांचे समुपदेशन होणं खूप गरजेचं आहे. आज प्रबोधिनीची तीन ते सहा वर्षे वयोगटासाठी बालवाडी आहे.
सहा ते 18 वयोगटासाठी प्रबोधिनी विद्यामंदिर व सुनंदा केले विद्यामंदिर कार्यरत आहे.
अठरा वर्षांवरील मुलांसाठी प्रबोधिनी संरक्षित कार्यशाळेत व्यावसायिक शिक्षण देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवले जाते.
मुले मोठी झाली, की त्यांची ताकद वाढते, पण पालक थकलेले असतात.
आपल्या पाल्याचे पुढे काय होणार या कल्पनेने धास्तावलेले असतात.
त्या स्वतः पालक असल्याने त्यांनी मुला-मुलींसाठी दोन स्वतंत्र इमारतींमध्ये वसतिगृह सुरू करून पालकांना दिलासा दिला.
विशेष मुलांना शिकवण्यासाठी विशेष शिक्षक लागतील म्हणून प्रबोधिनी शिक्षक प्रशिक्षण सुरू केले.
प्रबोधिनीचा विकास होत असताना अनेक दानशूर व सच्चे सहकारी त्यांना लाभले.
प्रबोधिनीच्या यशामध्ये, कारकिर्दीमध्ये सुलभा सरवटे यांचे योगदान वाखाणण्याजोगे आहे.
बाईंच्या पाठीशी त्यांचे पती नागेश लिमये खंबीरपणे उभे होते, म्हणूनच त्या एवढे कार्य करू शकल्या.
खूप काही करायचे आहे असे म्हणता म्हणता अल्पशा आजाराने 16 जानेवारी 2018 रोजी त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांचे देहदान करण्यात आले.
हा जगन्नाथाचा रथ पुढे नेण्यासाठी आता समाजातील दानशूर व्यक्तींनी आणि तरुण पिढीने पुढे येण्याची गरज आहे.
या विशेष मुलांच्या शिक्षणाचा विचार करून आपली जबाबदारी ओळखायला हवी.
बाईंच्या देदीप्यमान कारकिर्दीला, समर्पित आयुष्याला आमचा मानाचा मुजरा आणि प्रबोधिनी परिवाराकडून विनम्र आदरांजली.
कोण आहेत रजनी नागेश लिमये?
(प्रा. सुहासिनी पटेल यांचा हा लेख खेळियाडच्या वाचकांसाठी उपलब्ध करून देत आहे.)
रजनी नागेश लिमये पूर्वाश्रमीच्या रजनी दातीर. त्यांचे प्राथमिक शिक्षण नाशिक येथील सरस्वती मंदिरात झाले.
त्यांच्या वडिलांची नोकरी बदलीची असल्याने माध्यमिक शिक्षण पुणे, पंढरपूर, पनवेल येथे झाले.
पनवेलच्या के. व्ही. कन्या विद्यालयातून 1954 मध्ये त्या माध्यमिक शालान्त परीक्षा उत्तीर्ण झाल्या. त्या वेळी ठाणे केंद्राच्या गुणवत्तायादीत त्या प्रथम क्रमांकाच्या मानकरी होत्या.
नाशिकच्या एचपीटी कॉलेजमधून मराठी व संस्कृत विषय घेऊन त्या एम. ए. झाल्या. कोल्हापूरच्या शिक्षक प्रशिक्षण महाविद्यालयातून त्यांनी बीएड पदवी संपादन केली.
नाशिकच्या पुष्पावती रुंग्टा कन्या विद्यालयात १९६४ मध्ये शिक्षक म्हणून त्यांनी कामास सुरुवात केली.
इंग्रजी, मराठी व संस्कृत या भाषांच्या उत्तम शिक्षिका म्हणून त्यांचे नाव झाले. माध्यमिक शालान्त परीक्षा मंडळाच्या गुणवत्ता यादीत चमकणाऱ्या अनेक विद्यार्थिनींंना त्यांचे मार्गदर्शन लाभले.
शिक्षक मार्गदर्शन शिबिरातही तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून त्या काम करीत होत्या.
मात्र, याच वेळी नर्सरीत शिकणारा त्यांचा मुलगा गौतम हा मतिमंद आहे हे स्वीकारण्यास अत्यंत कठीण असे वास्तव त्यांच्यासमोर आले.
या वास्तवाचा रजनीताईंनी स्वीकार केला आणि हे आव्हान समजून जानेवारी १९७७ मध्ये दातीर यांच्या बंगल्यातील एका खोलीत त्यांनी मतिमंद मुलांसाठी शाळा सुरू केली. रजनीताईंबरोबर नागपूर येथील ‘नंदनवन’ संस्थेत प्रशिक्षण घेऊन आलेल्या अहोर नावाच्या शिक्षिका होत्या.
दोघींंनी मुलांच्या क्षमतेप्रमाणे शिकविण्यास सुरुवात केली. मुलाचे मतिमंदत्व स्वीकारून मुलांविषयी जागरूक असणाऱ्या पालकांमुळे मुलांची संख्या वाढत गेली. मतिमंद मुलांच्या शिक्षणाच्या संदर्भात विशेष प्रशिक्षण घेतलेल्या शिक्षिकांच्या सहकार्याने शाळेला स्थिरता प्राप्त झाली.
रजनीताईंनी ‘प्रबोधिनी न्यास’ संस्थेची स्थापना केली व कार्यवाह म्हणून त्या काम पाहू लागल्या.
नगरपालिकेने 1983 मध्ये नव्या पंडित कॉलनीतील जागा संस्थेसाठी दिली. त्या वेळचे महाराष्ट्राचे राज्यपाल लतीफ यांच्या हस्ते भूमिपूजन झाले.
अवघ्या दोन वर्षांत आदरणीय कविश्रेष्ठ तात्यासाहेब शिरवाडकर यांच्या हस्ते ‘प्रबोधिनी न्यास’च्या इमारतीचे उद्घाटन झाले.
याच वर्षी म्हणजे 1986 मध्ये रजनीताईंचा केंद्र सरकारच्या आदर्श शिक्षक राष्ट्रपती पुरस्काराने गौरव झाला, तर 1988 मध्ये मागासवर्गीय जनतेसाठी केलेल्या कार्याबद्दल त्या ‘दलित मित्र पुरस्कारा’च्या मानकरी ठरल्या.
1989 मध्ये पुष्पावती रुंग्टा कन्या विद्यालयाच्या उपप्राचार्या म्हणून काम करीत असताना रजनीताईंनी स्वेच्छानिवृत्ती घेतली व संपूर्ण वेळ प्रबोधिनीच्या कार्यात वाहून घेतले.
प्रबोधिनी न्यासाच्या त्या कार्यवाह होत्याच, पण ‘प्रबोधिनी शिक्षक प्रशिक्षण केंद्रा’ची स्थापना करून त्याच्या प्रमुख समन्वयिका म्हणून त्यांचे काम वेगाने सुरू झाले.
पुण्याच्या कामायनी प्रशिक्षण महाविद्यालयातून डीटीएमआर म्हणजे डिप्लोमा इन टीचिंग ऑफ मेंटली रिटायर्डेड ही पदविका प्रथम क्रमांकाने त्यांनी यापूर्वीच मिळविली होती.
या शाळेत मुलांचा शैक्षणिक प्रवास, शारीरिक विकास, स्वावलंबन, मनोसामाजिक कौशल्य, संपर्क कौशल्य या चार प्रमुख उद्दिष्टांच्या पूर्तीच्या दिशेने चालतो.
तीन ते अठरा वर्षे वयोगटातील मुले या शाळेत आहेत. त्यांच्या क्षमतेनुसार शिक्षणयोग्य, प्रशिक्षणयोग्य व नुसते सांभाळण्यास योग्य अशा तीन गटांत ही मुले विभागली जातात.
त्याप्रमाणे क्रमश: लेखन-वाचन-अंकगणित, व्यवहार करण्यापुरते उद्योग व सांभाळ असे तीन प्रकारचे संस्कार त्यांच्यावर होतात. मानसोपचार, शारिरोेपचार या विषयांतील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या अभ्यासक्रमाची योजना करावी लागते. मुलांजवळ असलेल्या बुद्धीचा उपयोग कसा करावयाचा याचे शिक्षण त्यांना देतात.
सोपी व पुनरावृत्ती असणारी कामे म्हणजे पॅकिंग, फाइल्स तयार करणे त्यांना शिकवतात.
शाळेत इतर सामान्य शाळांप्रमाणेच विविध सण-समारंभ, विविध दिन साजरे केले जातात. ही मुले सहलीचा आनंद घेतात.
शिक्षकांच्या खूप मेहनतीमुळे राख्या, ग्रीटिंग कार्डस तयार करतात, धान्ये निवडण्यासारखी कामे करतात. बालवाडीपासून दहावीपर्यंत काही मुले पुढे जातात.
अठरा वर्षें पूर्ण झालेल्या मुलांना शाळेत ठेवता येत नाही. त्यांच्यासाठी नाशिकमधील सातपूर भागात संरक्षित कार्यशाळा आहे.
या शाळेत शिवणकाम, बाइंडिंग, सुतारकाम असे व्यवसाय शिक्षण दिले जाते.
यातून त्यांना स्वत:च्या पायावर काहीअंशी उभे राहण्याचा आत्मविश्वास मिळतो. कार्यशाळेच्या शेजारच्या जागेत मुलांसाठी वसतिगृह आहे.
तिथे वीस मुलांची सोय आहे. सर्व मिळून दीडशे मुलांची मान्यता संस्थेला मिळाली आहे.
शिक्षक प्रशिक्षण केंद्रातून दरवर्षी वीस शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाते. या केंद्रास दिल्लीच्या ‘राष्ट्रीय पुनर्वास संस्थाना’ची मान्यता मिळाली आहे.
शिक्षकांना स्पेशल डीएड पदविका मिळते. सर्व शिक्षण अभियानांतर्गत जिल्हा परिषदांच्या, नगरपालिकांच्या शाळांतून मोबाइल टीचर म्हणून नोकरी मिळते.
शिक्षकांच्या बरोबरीने पालकांचे मोठे सहकार्य या सर्व गोष्टींंत महत्त्वाचे ठरते.
हा सर्व कार्यभार यशस्वीपणे सांभाळणाऱ्या रजनीताईंमधील लेखिका, कवयित्रीही जागी आहे, याचा प्रत्यय ‘गोधूलि गाणी’ (बालकांची गाणी) व ‘जागर’ (मतिमंदांच्या क्षेत्रात पंचवीस वर्षांत आलेल्या अनुभवांचे चित्रण) या त्यांच्या पुस्तकांतून येतो.
प्रबोधिनी न्यासाच्या विकासासाठी रजनीताईंनी अमेरिका, इंग्लंड, कॅनडा या देशांचा चाळीस दिवसांचा अभ्यास दौरा केला.
तेथील विविध प्रशिक्षण व पुनर्वसन केंद्रांना भेटी दिल्या.
सिंगापूर, दिल्ली येथील आंतरराष्ट्रीय परिसंवादात ‘कौटुंबिक सहानुभूतीची आवश्यकता’ या विषयावर त्यांचे निबंधवाचन झाले. राष्ट्रीय न्यासाच्या जिल्हा समिती सदस्या, प्रबोधिनी पालक समितीच्या अध्यक्षा म्हणून रजनीताई काम करीत आहेत.
रजनीताईंच्या या विशेष कार्यासाठी लोककल्याण पुरस्कार, श्यामची आई पुरस्कार, संस्कृतीवैभव पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांचा सार्थ गौरव झाला आहे.
या महिला खेळाडू गर्भवती असतानाही मैदानात उतरल्या…!
[jnews_block_9 first_title=”हेही वाचा” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”91″]