तोरंगण हरसूल गावचा संघर्ष आणि निरागसता…
kheliyad.sports@gmail.com | Mob. +91 80875 64549
तोरंगणमध्ये एक चिमुरडा गाडी खेळत होता.
ही गाडीही त्याने स्वत:च बनवली होती.
त्याला मोठी काठी जोडत तो ती फिरवत होता.
त्याचे दोन सवंगडी त्याचा हेवाच करीत होते.
त्याचं खेळणं पाहून मलाही राहवलं नाही.
म्हंटलं, “काय रे, गाडी बघू तुझी…”
तो नाही म्हणू शकला नाही.. त्याने लगेच दिली.
मी म्हणालो, “तू बनवलीस ही गाडी?”
हा.. (हा उच्चार हलकासा करीत त्याने मान डोलावली)
“मी चालवू का?”
पुन्हा मान डोलावली..
ओबडधोबड मातीच्या रस्त्यावरून ती चालवताना माझं मलाच हसू आवरलं नाही..
ती सगळी चिमुरडी एकमेकांकडे पाहत गोड हसली…
मी गमतीने म्हंटलं, “मला देतो का ही गाडी…?”
परत त्याने मान डोलावली.
मी त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि म्हणालो, “घे रे तुझी गाडी. तूच ती छान चालवू शकेल…”
त्याची कळी लगेच खुलली.
त्याने ती घेतली आणि झिंगाट पळवली…
या चिमुकल्यांचा ‘आज’ मजेशीर आहे, बेधुंद आहे.
मात्र, त्यांचा ‘उद्या’ही असाच असेल का?
तोरंगण हरसूल या आदिवासी गावात मला एकीकडे निखळ आनंद देणारं निरागस बालपण घावलं, तर दुसरीकडे वार्धक्याने खंगलेल्या परशुरामबाबाच्या अनुभवाची धगही जाणवली.
परशुरामबाबा बोरसे हा ७३ वर्षांचा गावातला सर्वांत वयोवृद्ध.
गावाविषयी माहिती कोण देईल, असा प्रश्न विचारला, की गावातली समदी मंडळी परशुरामबाबाकडे बोट दाखवतील.
गावात सगळीच माणसं असोशीने जगणारी, प्रतिकूल परिस्थितीतही स्वत:चं अस्तित्व टिकवणारी.
कोणाविषयी असूया नाही, की कोणाशी स्पर्धा नाही. मनमुराद जगणं.
गावपण जपलेल्या या तोरंगण हरसूल गावाचं नाव ‘तोरंगण’ का पडलं, हा प्रश्न मला सतावत होता.
आता याचं उत्तर परशुरामबाबाच देणार म्हंटल्यावर मला परशुरामबाबाची कमालीची उत्सुकता लागली होती.
एक मुलगा म्हणाला, “चला मी घेऊन जातो तुम्हाला…”
मी निघालो त्याच्या मागं मागं…
एका छोट्याशी बोळीतून वळण घेत निघालो, तर पुढे जायचं कसं हा प्रश्न पडला. मी त्याला म्हंटलं,
“आता रे भो, पुढं कसं जायचं?’’
तो हसत म्हणाला, “तुम्ही चला माझ्या मागं…”
आता उतार लागला होता… खाली उतरलो, तर मोठ्या पडवीसारखं घर लागलं.
तो मुलगा म्हणाला, “हे बघा आलं… आता मी जातो..” असं म्हणत तो निघून गेला.
मी त्या घरात गेलो. परशुरामबाबा पहुडलेला होता.
दुपारीही थंडी अंगाला झोंबत होती. परशुरामबाबा तापाने फणफणत होता.
अंगावर काहीही नाही. थंडी वाजू नये म्हणून दोन लाकडं पेटवलेली होती.
शेकोटीच्या उबेतच तो पहुडलेला होता. मी आलो तर लागलीच उठून बसला.
“अरे उठू नका… झोपूनच असा..”
“काही नाही… राहूद्या. मी बराय असाच.”
परशुरामबाबा माझ्याकडे प्रश्नांकित नजरेने पाहत म्हणाला.
“मी नाशिकहून आलोय. इथे गावाविषयी विचारलं तर कोणी काही सांगेना.
ते म्हणाले, की परशुरामबाबाला माहिती आहे.”
मी मनातलं कुतूहल थेट सांगितलं.
“हा ते व्हय. इथं खैरायचा किल्ला आहे. या किल्ल्याच्या पायथ्याला गाव वसलंय, ते पाली. या किल्ल्यावर शिवाजी महाराजांचे मावळे आले होते. त्यांनी जाताना गावात तोरण बांधलं. त्यावरून गावाचं नाव ‘तोरंगण’ पडलं.” परशुरामबाबात सांगत होता.
गावच्या अंगणात ‘तोरण’ बांधलं त्यावरून ‘तोरंगण’ (तोरण+अंगण) नाव असेल.
मी तोरंगण हरसूल गावाच्या नावाची आणखी फोड करीत मनाशी आडाखे बांधले.
“इतकं छान गाव, पण गावाचा काही विकास झाला नाही…”
मी परशुरामबाबाचं मत जाणून घेण्यासाठी बोललो.
“कसंय, आधी ब्रिटिशांनी, नंतर आजच्या राजकारण्यांनी गावाला छळलं. कोणाला लक्ष द्यायला वेळ आहे? आधी ब्रिटिशांचं राज्य होतं तेच बरं होतं.
नाही तर काय? पूर्वी रॉकेल मिळायचं. आता तर ते पाहायलाही मिळत नाही!” – परशुरामबाबा बोलत होता.
“आता रॉकेलची काय गरज आहे?” मला काही कळलं नाही, म्हणून प्रतिप्रश्न.
“काय आहे, इथं वीज आली… काय गरज होती? तुम्हा लोकांना पगार झाला, की वीजबिल भरता येतं. इथं आदिवासींकडे कुठं आलं पैकं? तुम्हाला जेवढं बिल येतं, तेवढंच आम्हालाही. आम्ही ते कुठून भरणार? नाही भरलं तर वीज कट! तेव्हा सांगा हा इकास काय कामाचा? आता त्यो मोदी, मनाचं बोलतो. वेडपटपणा सगळा. काहीही केलं नाही. मला एवढंच म्हणायचंय, कोणतंही सरकार येवो, भलेही भाजप सरकार परत आलं तरी हरकत नाही; पण हा मोदी पंतप्रधान नको…”
परशुरामबाबाने उद्वेग व्यक्त केला. मी चकितच झालो.
गावात वर्तमानपत्रे कधी येत नाहीत, टीव्ही तर अजिबातच नाही; पण बाबाला मोदीविषयी एवढा राग व्यक्त करण्याइतपत असं काय कळलं असेल, असा मलाच प्रश्न पडला.
मी विषय बदलत म्हणालो, “गावात आणखी काय वेगळं आहे..?”
“गावात खैरायचा किल्ला सोडला तर काहीही नाही. वेताळाचा डोंगर आहे; पण त्याची जत्रा ठाणापाड्याला भरते.”
“वेताळाचा डोंगर? काय आहे त्याचं वैशिष्ट्य?” – मी कुतूहलाने विचारलं.
“मनातल्या इच्छा पूर्ण करतो, म्हणून वेताळाला नवस बोलतात.” – परशुरामबाबा म्हणाला.
“तुम्ही काही मागितलं की नाही वेताळाकडं?” – मी परशुरामबाबाला गमतीने विचारलं.
“माझा मुळीच विश्वास नाही. अहो, असं काही मागितल्यानं देव काही देतो का? सगळे मनाचे खेळ आहेत. मला सांगा, पोरगं शाळेत धाडलं. त्याने अभ्यासच केला नाही आणि देवाला म्हणलं, पोराला पास कर. तर ते खरंच पास व्हईल का?” – मी काहीच बोललो नाही.
पण परशुरामबाबा ‘गाडगेबाबा’सारखा बोलत होता. कुठून या माणसाला एवढी प्रगल्भता आली, याचंच आश्चर्य दाटलं.
“मग वेताळाची जत्रा ठाणापाड्याला का भरते? इथं का नाही भरत?” – मी शंका व्यक्त केली.
“हा डोंगर चढायला अवघड आहे. लहान पोरंसोरं, बाया तो चढू शकत नाही. त्यामुळे जत्रा ठाणापाड्याला भरते.” – परशुरामबाबाने शंकेचं निरसन केलं; पण मला काही पटलं नाही.
आदिवासीचं आयुष्यच डोंगरदऱ्यात गेलं. त्याला वेताळाचा डोंगर चढायची काय अडचण?
पण आधुनिक काळात आदिवासीही सजग झाले असतील.
कारण बदलत्या काळानुसार डोंगरदऱ्यातलं आयुष्य सरकारने जवळजवळ हिरावूनच घेतलं आहे.
आता वेगवेगळ्या वनस्पतीही नामशेष झाल्या आहेत.
बाजारपेठा आल्या आणि इथला आदिवासीलाही नव्या प्रवाहातलं जगणं अपरिहार्य झालं आहे.
सगळं काही विकतच घ्यायचंय, मग त्यांचं नैसर्गिक जगणं हळूहळू कमी झालं.
मग आता ठाणापाड्याला जत्रा भरवण्याचा निर्णय यातूनच पुढे आला असेल कदाचित…
मी मनातल्या मनात कयास व्यक्त केला.
“इथं भात शेती होते म्हणजे पाऊस चांगलाच पडतो… मग तलाव वगैरे का केले जात नाही. पाण्याचं नियोजन व्हायला हवं…” – माझा पुन्हा प्रश्न.
“इथं कोणाला लक्ष द्यायला वेळ आहे? जो निवडून येतो तो पुन्हा गावाकडं फिरकतही नाही. तलाव काय बांधणार? पाणी अडवलं तर खेकडं तो फोडून काढतो. काही उपयोग होत नाही.” – परशुरामबाबाने खंत व्यक्त केली.
खडकाळ, मुरमाड, तांबड्या रंगाची जमीन पाहिल्यानंतर परशुरामबाबाचं म्हणणं पटतं.
ज्याची हयात गावात गेली आहे, त्याची खंत दुर्लक्षित करता येणार नाही.
परशुरामबाबाला जाणवलं, की आता याला काही प्रश्न नसतील.
तो म्हणाला, “बरं, आता मी झोपतो. माझी तब्येत ठीक नाही. अंग दुखतंय. थंडी वाजून आलीय…”
मलाही बाबाला जास्त त्रास द्यावासा वाटला नाही. म्हंटलं, “खरंच, तुम्ही आराम करा…”
मी परशुरामबाबाचा निरोप घेतला आणि गावाकडं निघालो.
परशुरामबाबाचा निरोप घेताना ‘तोरंगण’ आणि मावळे या दोन गोष्टी मनात रुंझी घालत राहिल्या.
नंतर माहिती घेतल्यानंतर कळलं, की शिवाजी महाराजांचे मावळे आदिवासी भागात अधिक सक्रिय होते.
खैरायचा किल्ला याच आदिवासी मावळ्यांनी जपला. आज या खैरायच्या किल्ल्याची रया गेली आहे.
मात्र, हे मावळे कोण होते, याची माहितीही कुठे उपलब्ध नाही.
कालौघात त्यांची नावे पुसली गेली आहेत; पण एक जाणवत राहतं, की या घरातला प्रत्येक माणूस मावळा असेल…
तेवढ्यात एक तरुण भेटला. म्हंटलं, “हा रस्ता कुठं जातो रे?”
“पुढं काही नाही. दवाखाना आहे.”
“चल बरं दाखव…” मी त्यालाच संगती घेतलं.
आम्ही थोडं पुढं गेलो… रस्त्याला उतार लागला. समोरच मोठंधाटं प्राथमिक आरोग्य केंद्र.
“वाह! दवाखाना तर भारीच बांधलाय?” – मी आनंदाने उद्गारलो.
“कसचं काय? नुसताच बांधून ठेवलाय. वर्ष झालं. अजून उद्घाटन नाही…” त्याने माझ्या आनंदाची हवाच काढून घेतली.
“मग दवाखाना कुठे?” – मी आश्चर्याने विचारलं.
“तो मागं आहे. छोट्याशा खोलीत.” – तो तरुण म्हणाला.
मग आम्ही मागं फिरलो. शाळेजवळ आलो. शाळेची कमानच भारी होती…
त्यावर लिहिलं होतं, “जिल्हा परिषद प्राथ. शाळा, तोरंगण ह., ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक. स्थापना : 14.4.1945.”
माझं लक्ष स्थापनेच्या तारखेवरच खिळलं… “1945 ची शाळा!”
मी चकितच झालो. कौलारू छपरांची, फुलझाडांच्या सान्निध्यातली टुमदार शाळा स्वातंत्र्यापूर्वीची आहे!
म्हणजे ब्रिटिशांनी ही शाळा काढली.
शाळेला आता 73 वर्षे झाली.
परशुरामबाबाच्या वयाची ही शाळा.
शाळा कितवीपर्यंत? तर आठवीपर्यंत!
मला हा दुसरा धक्का!
मी सोबतच्या तरुणाला म्हणालो, “काय रे, आठवीपर्यंतच शाळा?”
तो म्हणाला, “पुढं हरसूल, ठाणापाड्याला किंवा त्र्यंबकेश्वरला, जिथं अॅडमिशन मिळंल तिथं शिकायला जावं लागतं…”
“किमान दहावीपर्यंत शाळा व्हायला हवी होती. ७३ वर्षे झाली ना शाळेला?” मी आश्चर्याने विचारलं.
“झेडपी शिक्षक देत नाही. त्यामुळे दहावीपर्यंत शाळा झाली नाही.” – तो निर्विकारपणे म्हणाला.
“कमाल आहे, गावातल्या पोरांच्या पुढच्या शिक्षणाचं काय मग? त्यांना नववीला कोणी घेतलं नाही तर?” – मी पुन्हा चकितपणे विचारलं.
“नाही मिळालं तर वर्षभर पोरं शाळेत जात नाही.” – तो पुन्हा निर्विकारपणे म्हणाला.
मग मला परशुरामबाबाचं बोलणं पटलं. ब्रिटिशांचं राज्य खरंच बरं होतं.
त्यांनी शाळा सुरू केली तर आतापर्यंत त्यांनी दहावीपर्यंतच काय, पदवीपर्यंत कॉलेजही काढलं असतं!
काय हे जगणं! काय ही आदिवासींची दशा! आदिवासींचं जगणंच मुळी संघर्षावर.
मात्र, हा संघर्ष अशा पातळीवरही!
आजही व्यवस्थेतून निर्माण केलेले ‘द्रोणाचार्य’ या एकलव्यांचे अंगठे कापत आहेत…
दवाखाना नाही, शाळा पूर्ण नाही… हे कमी की काय, जगण्यासाठी गावं सोडण्यास त्यांना भाग पाडलं जातंय…
तोरंगण हरसूल गावात ब्रिटिशांमुळेच आली शाळा
शिवाजी महाराजांच्या काळात आदिवासी मावळ्यांनी आपलं योगदान दिलं.
पुढे या देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात आदिवासींनी हिरिरीने सहभाग घेतला.
१८५७ मध्ये आदिवासींनी उठाव केल्याची नोंद आहे.
इंग्रजांशी सशस्त्र लढले. अनेक जण धारातीर्थी पडले.
पेठचा उठाव म्हणून ब्रिटिशांच्या गॅझेटिअरमध्येही नोंद आढळते.
या उठावात अनेकांना तुरुंगवास झाला, काही फासावर गेले, तर काही ब्रिटिशांच्या बंदुकीचे शिकार झाले.
आदिवासींच्या उठावामुळे ब्रिटिश अस्वस्थ झाले.
त्यांची अस्वस्थता दूर करण्यासाठी ब्रिटिशांनी आदिवासींच्या विकासाचा विडा उचलला.
ब्रिटिश सरकारने १९३८मध्ये सेमिंग्टन समिती नेमत पाहणी केली.
कदाचित या विकासाच्या प्रवाहातच तोरंगण हरसूलमध्ये १९४५ मध्ये शाळा सुरू झाली.
या शाळेचे रूपडे आता बदलले आहे. कमान अलीकडची आहे.
मात्र, पाऊणशतकाकडे वाटचाल करणारी ही शाळा मुलांसाठी संघर्ष उभी करणारीच म्हणावी लागेल.
आईबापाला अॅडमिशन काय, पटकन कळणार नाही..
त्यांची मुलं मात्र नववीनंतर कुठे कुठे हेलपाटे मारत असतील, कुठे विनवण्या करीत असतील या अशिक्षित आईबापांना माहीतही नसेल.
पण हा संघर्ष ७३ वर्षांपासून आजही सुरू आहे.
गावोगाव विकासाचा डंका पिटवणाऱ्या या राज्य सरकारला तरी हे माहीत आहे का?
जगण्याचा हा लढा आजही संपलेला नाही.
खंत एवढीच वाटते, की इतकं सुंदर गाव असूनही ते आता ओस पडत आहे.
जगण्यासाठी गावात काहीही शिल्लक नाही. शेती, ऐसपैस टुमदार घरे असूनही आदिवासी शहराकडे जगण्यासाठी वळतोय.
त्यांना त्यांच्या गावातच जगण्याचे मार्ग हवेत. मात्र, आता ते हळूहळू संपुष्टात येत आहे.
काय करावं या माणसांनी? या आदिवासींना कधी तणाव माहीत नव्हता.
आज अनेक आदिवासी तणावाखाली आले आहेत.
कारण त्यांचं नैसर्गिक जगणं हिरावून घेतलंय.
कृत्रिम शहरी जगणं त्यांना या व्यवस्थेने भाग पाडलंय.
मनमुराद जगण्याचा ‘बोहाडा’ त्यांच्या आयुष्यात शिल्लकच राहिलेला नाही…
तोरंगण हरसूल गावातली ग्रामीण जीवनशैली
विटामातीचं दुमजली घर…
विटामातीचं दुमजली घर… अशी घरं आता पाहायलाही मिळणार नाही… हे घर आता पडीक आहे. कोणीही राहत नाही. जीर्णशीर्ण झालेल्या घरात किती तरी आठवणी असतील…
तोरंगण हरसूलची ग्रामपंचायत…
तोरंगण हरसूलची ग्रामपंचायत…शेजारी जो फळा आहे तो आदिवासींनी तयार केलेला खो-खो सामने दर्शविणारा फलक आहे. आपण हातानेही मोठ्या मुश्किलीने लिहितो. पण या गावातील लोकांनी संघाच्या नावांची प्रिंट काढून तो चिकटवलेला आहे. ही कल्पनाच भन्नाट आहे. असं इतर कोणत्याही स्पर्धेत पाहायला मिळत नाही.
तोरंगण हरसूलची शाळा…
तोरंगण हरसूलची हीच ती शाळा, जिला ७३ वर्षे झाली आहेत. मात्र, शाळा फक्त आठवीपर्यंत आहे. ब्रिटिशांनी बांधलेली या शाळेकडे स्वातंत्र्यानंतरच्या आजच्या भारताचं लक्षही नाही…
तोरंगण हरसूल शाळेची कमान…
तोरंगण हरसूल शाळेची ही कमान. कमानीवर शाळेची स्थापना नमूद केलेली आहे. शाळा स्वातंत्र्यपूर्व काळातली असली तरी कमान अलीकडची आहे.
गावातली कौलारू टुमदार घरं…
तोरंगण हरसूल गावातली कौलारू टुमदार घरं…
गावातला सरकारी दवाखाना
गावातला सरकारी दवाखाना. छान दिसत असला तरी अजून दवाखान्याचं उद्घाटनही नाही. त्यामुळे ही वास्तू वापराविना अशीच पडून आहे…
शेतीपयोगी वस्तू बनविणारा गावातला एक कारागीर…
शेतीपयोगी वस्तू बनविणारे गावातला एक कारागीर. वेचणी करण्यासाठी ही टोपली (याला नक्की काय म्हणतात हे कळलं नाही. कोणाला माहीत असल्यास जरूर कळवावे) बनविली जाते. मागणी असेल तरच बनविली जाते. एका वस्तूसाठी तीन तास किमान लागतात.
Follow on twitter @kheliyad
[jnews_block_37 first_title=”Read more at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”69″]
महेश शेठ आदिवासी भागाशी ओळख झाली ती खेळामुळे. पण तुम्ही तर त्यांची जीवनशैली अणि आजचे वास्तव याचा छान गोफ़ विणाला. आपल्या गावापासून अवघ्या ५० ते ६० किलोमीटर अंतरावर असलेले ही गावं तिथे गेल्यावर कळते की हजारों मैल दूर आहेत ते ज्या पद्धतीने जगतात ते पाहिल्यावर आपला विकास किती खोटा आहे स्वातंत्र्य मिळून ७० वर्षापेक्षा जास्त काळ लोटला तरी त्यांना प्राथमिक सुविधा आपण देऊ शकलो नाही. हे तुम्हा आम्हा सर्वांचे सामुदायिक अपयश आहे. माणूस म्हणुन आपण किती आत्मकेंद्री झालो आहोत ह्याची ह्या लेखाने पुन्हा जाणीव झाली.
व्वा.. महेशराव, आदिवासी गावात फेरफटका मारल्याचा अनुभव मिळाला…
धन्यवाद.. खरं तर शिवाजी महाराजांच्या काळात आदिवासी मावळे होते, स्वातंत्र्यलढ्यात सशस्त्र बंड करणारे आदिवासीही होते. अनेक आदिवासी धारातीर्थी पडले, अनेकांनी तुरुंगवास भोगला, तर काही ब्रिटिशांच्या बंदुकीचे बळी ठरले… असं असूनही त्यांची कुठेही नोंद नाही. अशा आदिवासींना ब्रिटिशांचे राज्य बरे होते असं म्हणावे लागते. यातच सरकारचं अपयश आहे. सरकारने याची दखल घ्यायला हवी एवढीच अपेक्षा…
धन्यवाद… 🙂