सर्व्हे वेध घेणार बुद्धिबळ खेळातील प्रश्नांचा…
बुद्धिबळ खेळाडूंच्या संघटनेने सध्या ग्रँड सर्व्हे सुरू आहे. या बुद्धिबळ सर्व्हेतून अनेक प्रश्नांचा वेध घेतला आहे. या सर्व्हेने बुद्धिबळाचे प्रश्न सुटतील की जटिल होतील, हे सर्व्हेच्या निकालातूनच स्पष्ट होईल. तूर्तास या सर्व्हेविषयी…
असोसिएशन ऑफ चेस प्रोफेशनलने (एसीपी) सध्या एक विस्तृत ऑनलाइन सर्व्हे घेतला आहे. या सर्व्हेला एसीपीने ग्रँड सर्व्हे असं म्हंटलं आहे. खेळ अधिक चांगला आणि पारदर्शी कसा होईल यासाठी हा सर्व्हे घेतला आहे हे सर्वांत महत्त्वाचे. अन्य कोणत्याही खेळात खेळाडूंची स्वतंत्र संघटना नाही. त्यामुळे खेळातील नियम रुचो न रुचो, त्यावर काहीही प्रतिक्रिया न देता ते अवलंबण्याशिवाय खेळाडूसमोर पर्याय नसतो. बुद्धिबळात खेळाडूंची सक्रिय संघटना आहे आणि ही संघटना खेळाडू आणि आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघातील (फिडे) महत्त्वाचा दुवा ठरत आहे.
एसीपीने यापूर्वीही अनेक सर्व्हे घेतले आहेत. मात्र, यंदाचा सर्व्हे अतिशय वेगळा आहे. यात खेळातील नियम, नवी टायटल, कम्प्युटरच्या साह्याने खेळात होणारी फसवणूक, स्कोअरिंग पद्धत, रेटिंग पद्धत अशा एकूण दहा मुद्द्यांवर विस्तृत प्रश्नावली केली आहे. ज्यात एकूण ६२ प्रश्न आहेत. १५ मार्च २०१६ पर्यंत हा सर्व्हे राहील. विशेष म्हणजे हा सर्व्हे एसीपीच्या वेबसाइटवरच नाही, तर आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाच्या वेबसाइटवरही उपलब्ध आहे! यात खेळाडूंना सहभाग घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. हा सर्व्हे महत्त्वाचा आहे; तुम्ही आवर्जून वेळ द्या, असं आवाहनही एसीपीने केले आहे.
काय आहे एसीपी?
असोसिएशन ऑफ चेस प्रोफेशनल्स (एसीपी) ही व्यावसायिक बुद्धिबळ खेळाडूंची संघटना आहे. या संघटनेची स्थापना २००३ मध्ये फ्रान्समध्ये झाली. सध्याची कार्यकारिणी २०१२ मध्ये अस्तित्वात आली आहे. त्यात इस्राइलचे ग्रँडमास्टर एमिल सुतोव्हस्की अध्यक्ष आहेत, तर भारतीय ग्रँडमास्टर अभिजित कुंटे सदस्य आहेत. एसीपी ही संघटना फिडे आणि खेळाडू यांच्यात सुसंवाद घडवून आणण्याचं काम करीत आहे. म्हणजे खेळाडूंना जर नियम जाचक वाटत असतील तर खेळाडूंच्या भावना सर्व्हेच्या माध्यमातून किंवा चर्चेच्या माध्यमातून फिडेसमोर आणण्याचं काम एसीपी करीत आहे.
काय आहे हा सर्व्हे?
एसीपीचा हा सर्व्हे बुद्धिबळातील प्रमुख दहा मुद्द्यांवर आधारित आहे. यात बरोबरीचा प्रस्ताव (ड्रॉ ऑफर), वेळेचे नियंत्रण (टाइम कंट्रोल), जीएमच्या वरचढ टायटल, ऑनलाइन चेस, स्पर्धेत उशिरा येणाऱ्या खेळाडूंवरील कारवाई, स्कोअरिंग सिस्टेम, रेटिंग सिस्टेम, फसवणुकीविरुद्ध मोहीम, फिडेचे नियम, वर्ल्ड चॅम्पियन सायकल या मुद्द्यांचा समावेश आहे. या सर्व्हेचा निकाल १५ मार्चनंतर एसीपीच्याच वेबसाइटवर प्रसिद्ध होणार आहे. तो काय असू शकेल, याची प्रचंड उत्सुकता खेळाडूंना असेल. या सर्व्हेत सर्वाधिक प्रश्न बरोबरी, फसवणूक, स्पर्धेतील खेळाडूंचे उशिरा येणे यावर आहेत.
प्री-मॅच्युअर ड्रॉ घातक?
बुद्धिबळात बरोबरी (ड्रॉ) होणे सामान्य झालं आहे. पूर्वी न खेळताही दोन खेळाडू आपापसांत ठरवून ड्रॉचा रिझल्ट देत होते. आता फिडेने किमान ३० चालींनंतरच बरोबरी स्वीकारली जाईल असा नियम केला आहे. असं असलं तरी अन्य स्पर्धांमध्ये (फिडेच्या अधिकृत स्पर्धांव्यतिरिक्त) न खेळता सर्रास ड्रॉ होतात. हे घातक आहे. नाशिकमध्येच सहा फेऱ्यांची एक स्पर्धा होती. त्यात एका खेळाडूने सातपैकी सहा गुण घेतले. मात्र, त्याच्या रिझल्टचा परिणाम अन्य खेळाडूंच्या जय-पराजयावर अवलंबून होता. म्हणजे दुसऱ्या पटावर दोन्ही खेळाडू शेवटची सातवी फेरी खेळत होते आणि दोन्ही खेळाडूंचे साडेपाच गुण होते. यापैकी काळ्या मोहऱ्यांनिशी खेळणारा ड्रॉ केली काय किंवा जिंकला काय विजेता ठरणार होता. मात्र, हरलाच तर त्याला तिसऱ्या स्थानी फेकला जाईल. त्यामुळे या खेळाडूला ड्रॉचा प्रस्ताव उत्तम ठरणारा आहे. याउलट त्याचा प्रतिस्पर्धी जिंकला तर दुसऱ्या स्थानी जाईल. मात्र, हरला तर तिसऱ्या क्रमांकावर आणि बरोबरी केली तरी तिसऱ्या क्रमांकावर! बुद्धिबळात अशी रंजक स्थिती जगातील कुठल्याही स्पर्धेत निर्माण होते. त्यामुळे इथे समोरचा तुमच्यासमोर एक प्रस्ताव देऊ शकतो, तो म्हणजे बरोबरीचा (ड्रॉ). निकालावर परिणाम करणाऱ्या अशा अनेक लढती स्पर्धेत पाहायला मिळतात. त्यामुळे पटाबाहेर बरोबरीची सेटिंग हमखास होतात. म्हणूनच ड्रॉ या मुद्द्यावरच एसीपीने पाच ते सात प्रश्न तयार केले आहेत. किती चालींनंतर बरोबरीचा प्रस्ताव द्यावा, सांघिक स्पर्धेत कर्णधाराला बरोबरीच्या प्रस्तावावर संघातील खेळाडूशी चर्चा करण्याची मुभा द्यावी काय, असे अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
ऑनलाइन चेस
सध्या ऑनलाइन चेसच्या अनेक वेबसाइट आहेत. बोर्डवर आणि ऑनलाइनवर बुद्धिबळ खेळणे वेगळे नाही. फरक एवढाच आहे, की ऑनलाइनवर चुकीची चाल खेळता येत नाही. कारण सॉफ्टवेअर तसं खेळण्यास परवानगी देत नाही. म्हणजे चाल करताना चीटिंग करता येत नाही. मात्र, पटावर तुम्ही चुकीची चाल हेतुपुरस्सर खेळत असाल तर ती चाल प्रतिस्पर्ध्याच्या लक्षात आली तरच मागे घ्यावी लागेल. मात्र, खेळातलं बुद्धिचातुर्य दोन्हींमध्ये सारखंच पणाला लागतं. इथे ऑनलाइनवर सर्वांत मोठा धोका आहे, तो इतर सॉफ्टवेअरवरच्या आधारे खेळण्याचा. रॅपिड, ब्लिट्झ आणि बुलेट प्रकारच्या डावांमध्ये तसा आधार घेण्याची फारशी संधी मिळत नाही. मात्र, ऑनलाइनवर बुद्धिबळ प्रचंड लोकप्रिय आहे. त्यामुळेच फिडेही आता ऑनलाइन चेसकडे वळत आहे. मात्र, मर्यादित स्पर्धांमध्येच फिडेने ऑनलाइन चेसला मुभा दिली आहे. फिडेने यात महत्त्वाचा बदल केला आहे, तो म्हणजे ऑनलाइन रेटिंग आणि पटावरचं रेटिंग स्वतंत्र ठेवले आहेत. मात्र, ब्लिट्झ प्रकारात हे दोन्ही रेटिंग एकत्र करण्याचा विचार करीत आहे. ते योग्य आहे का, हा महत्त्वाचा प्रश्न बुद्धिबळ सर्व्हे ने घेतला आहे. फिडेने महिला गटात ब्लिट्झ प्रकारातील ऑनलाइन विश्वचॅम्पियन स्पर्धा आयोजित केली आहे. फिडेने ऑनलाइन स्पर्धा घ्यावी की घेऊ नयेत यावरही सर्व्हेत प्रश्न उपस्थित केले आहेत.
कम्प्युटरद्वारे फसवणुकीचा धोका
बुद्धिबळाचे अनेक सॉफ्टवेअर मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. फ्रिट्झ, चेसमास्टरसारखे अनेक सॉफ्टवेअरमध्ये ग्रँडमास्टरच्या दर्जाची विचारप्रणाली विकसित करण्यात आली आहे. स्पर्धेत अशा प्रणालीचा उपयोग एका छोट्या चीपच्या साह्याने पटावर अवलंबण्याचे प्रकार घडले आहेत. ग्रँडमास्टरचा बहुमान मिळविणारा खेळाडूही अशा प्रकारची फसवणूक करताना पकडला आहे. बुद्धिबळ खेळाला सुरुंग लावणारे हे गंभीर प्रकार रोखण्याचे आव्हान फिडेसमोर आहे. एसीपीने फिडेच्या उपाययोजना पुरेशा नाहीत, हे स्पष्टपणे नमूद केलं आहे. तसं त्यांच्या प्रश्नावलीतूनही डोकावतंय. फिडेने आणखी काय उपाययोजना करायला हव्यात, असा खुला प्रश्न एसीपीने केला आहे. यात खेळाडूंना मत व्यक्त करण्यास उद्युक्त केलं आहे. याच विषयावर अन्य वेबसाइटवरही भरपूर चर्चा झाल्या आहेत. ही गंभीर समस्या रोखण्यासाठी काहींनी मेटल डिटेक्टरसारख्या उपाययोजनाही सुचवल्या आहेत. मात्र, एसीपीच्या सर्व्हेत नेमक्या कोणत्या उपाययोजना खेळाडूंनी सुचवल्या असतील, त्या कितपत उपयोगी ठरतील हे सर्व्हेच्या निकालातून स्पष्ट होईलच. २०१६ मध्ये फिडेने मांडलेल्या बजेटमध्ये अँटि चीटिंग कमिशन स्थापन केली आहे. २०१५ च्या तुलनेत ती प्रभावी ठरत असली तरी फिडेचे हे पर्याय पुरेसे नाहीत असे एसीपीला वाटते.
दोन्ही हातांनी खेळावं का?
बुद्धिबळात एकाच हाताने खेळण्यास परवानगी आहे. रॅपिड गेममध्ये ज्या हाताने चाल खेळायची, त्याच हाताने घड्याळ दाबायचे असा नियम आहे. या नियमात कोणताही बदल केलेला नसला तरी फिडेने मध्यंतरी कॅसलिंग (किल्लेकोट) आणि एखादी सोंगटी जिंकताना दोन्ही हातांचा उपयोग करण्याचे सुचविले आहे. दोन्ही हातांनी खेळणे काही खेळाडूंना मूर्खपणाचे वाटत आहे. हा मुद्दा विचारात घेण्यामागे फिडेचा एक नियम आडवा येत असेल. तो म्हणजे ‘टच अँड मूव्ह’चा. कारण कॅसलिंग किंग (राजा) आणि रूक (हत्ती) या दोन सोंगट्यांमध्येच होते. टच अँड मूव्हमध्ये ज्या सोंगटीला हात लावला तीच सोंगटी खेळायला हवी असा नियम आहे. मग कॅसलिंग करताना राजाला स्पर्श केल्यानंतर हत्ती हलवावा लागतो. टच अँड मूव्हचा नियम तपासला तर आधी किंगला स्पर्श केला तर मग किंगच खेळावा लागेल! नेमकी हीच अडचण एखादी सोंगटी जिंकतानाही होते. अशा वेळी खेळाडू युक्तिवाद करू शकतो. त्यामुळे कदाचित फिडेने कॅसलिंग आणि सोंगटी जिंकताना दोन्ही हातांचा उपयोग सुचवला असेल. सर्व्हेत नेमकी हाच प्रश्न उपस्थित केला आहे. एसीपीचे सदस्य ग्रँडमास्टर अभिजित कुंटे यांनाही एकाच हाताने खेळणे योग्य वाटते. मात्र, अन्य खेळाडूंचा दृष्टिकोनही जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
झीरो टॉलरन्स मारक
स्पर्धेत झीरो टॉलरसन्स जातक असल्याचे एसीपीने म्हंटले आहे. झीरो टॉलरन्स म्हणजे स्पर्धेला येण्यास एक सेकंद जरी उशीर झाला तरी त्या खेळाडूला तो डाव न खेळता गमवावा लागतो. खेळाडूसाठी हे मारक आहे. स्पर्धेत खेळाडू उशिरा आल्यास कोणते पर्याय वापरता येतील यावरही सर्व्हेत प्रश्न विचारला आहे.
पुढे काय?
सर्व्हेचा हेतू स्पष्ट आहे, तो म्हणजे बुद्धिबळ हा खेळ अधिक स्पष्ट आणि पारदर्शी असणे. हा सर्व्हे फिडेसमोर ठेवला जाईल. या सर्व्हेतील २५ टक्के निर्णय जरी खेळाडूंच्या बाजूने गेले तर ते सर्व्हेचे यश म्हणावे लागले. दुसरे म्हणजे या सर्व्हेतून खेळाडूंची भूमिका समोर येईल. असं म्हणतात, की बुद्धिबळ एक परिकथा आहे, ज्यात १००१ घोडचुका सामावलेल्या आहेत. सर्व्हेतून एक चूक जरी सुधारली तरी ते मोठं यश म्हणावं लागेल.
‘‘बुद्धिबळावरील एसीपीचा हा विस्तृत सर्व्हे आहे. सध्या ज्या प्रश्नांना सामोरे जावे लागते तेच यात घेतले आहेत. खेळाडूंनी सुचवलेल्या पर्यायांतून काही तरी उत्तर मिळू शकेल हाच यामागे हेतू आहे. खेळाडूला विचारले तर तो मोकळेपणे बोलू शकणार नाही. सर्व्हेच्या माध्यमातून तो स्पष्टपणे आपले मत मांडेल अशी आम्हाला अपेक्षा आहे.’’
– ग्रँडमास्टर अभिजित कुंटे, सदस्य, एसीपी
[jnews_block_37 first_title=”Read more at:” header_text_color=”#1e73be” header_line_color=”#1e73be” include_category=”75″]