All SportsCricketsports news
रिचर्ड्स यांचा हा विक्रम कोणीही मोडू शकलेला नाही…!
cricket-one-day-score-record |
31 May 2020
नफ़स नफ़स मे उतरना कमाल होता है
नज़र नज़र मे उतरना कमाल होता है
बुलंदियों पे पहुचना कोई कमाल नहीं
बुलंदियों पे ठहरना कमाल होता है
अशोक साहिल यांचा हा शेर व्हिवियन रिचर्ड्स Vivian Richards | यांना चपखल लागू पडतो. वेस्ट इंडीजचे महान फलंदाज व्हिवियन रिचर्ड्स Vivian Richards | यांची आज आठवण येण्याचं कारण म्हणजे त्यांची वनडेमधील १८९ धावांची विक्रमी खेळी. आजच्या दिवशी म्हणजेच ३१ मे १९८४ रोजी तब्बल ३६ वर्षांपूर्वी त्यांनी ही विक्रमी खेळी साकारली होती, जी वन-डेमधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या होती. या विक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे क्रिकेटच्या इतिहासात हा विक्रम तब्बल १३ वर्षे अबाधित होता. अखेर पाकिस्तानच्या सईद अन्वर Saeed Anwar | ने हा विक्रम Record | मोडीत काढला खरा, पण तब्बल १३ वर्षे कालावधीपर्यंत रिचर्ड्स यांचा विक्रम अबाधित राहणे हाही एक विक्रमच आहे. शिखरं अनेक जण सर करतील, पण त्या शिखरावर अनेक वर्षे विराजमान होण्याची कमाल मात्र रिचर्ड्स यांच्याशिवाय कोणीही करू शकलेलं नाही.
वनडे सामन्यात एका डावात सर्वोच्च धावांचा विक्रम आजही भारताचा सलामीचा फलंदाज रोहित शर्माच्या Rohit Sharma | नावावर आहे. रोहितने १३ नोव्हेंबर २०१४ रोजी श्रीलंकेविरुद्ध २६४ धावसंख्या उभारली होती. ही वन-डेतील सध्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. रोहितच्या नावावर असलेला हा विक्रम पाच वर्षे आणि सहा महिन्यांपासून कायम आहे. आता हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल, की रोहितचा हा विक्रम किती वर्षे टिकून राहतो. जर वनडेमधील एका डावातील सर्वाधिक धावसंख्येच्या विक्रमाचा कालावधी पाहिला, तर तो मेलबर्नमध्ये ५ जानेवारी १९७१ झालेल्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यातीलच म्हणावा लागेल. या सामन्यात इंग्लंडचा जॉन एड्रिचने John Edrich | ८२ धावा केल्या होत्या. वन-डेच्या इतिहासातील ही पहिली सर्वोच्च धावसंख्या, जो विक्रम जॉन एड्रिचच्या नावावर नोंदला गेला होता. इंग्लंडच्याच डेनिस एमिस (१०३) Dennis Amiss | याने दीड वर्षातच हा विक्रम मोडीत काढला होता. एमिसचा हा विक्रमही फार काळ टिकला नाही. वेस्ट इंडीजच्या रॉय फ्रेडरिक्सने (१०५) Roy Fredericks | हा विक्रम मोडीत काढला. फ्रेडरिक्सलाही या विक्रमावर फार काळ विराजमान होता आले नाही. कारण वर्षभरातच इंग्लंडच्या डेव्हिड लॉइड (नाबाद ११६) David Lloyd | याने सर्वोच्च धावसंख्येचा नवा विक्रम नोंदवला. या विक्रमालाही मागे सारत न्यूझीलंडच्या ग्लेन टर्नरने Glenn Turner | १९७५ मधील पहिल्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १७१ धावांचा नवा विक्रम प्रस्थापित केला. आता फलंदाजांसाठी हे नवे आव्हान होते. कारण त्याचा हा विक्रम आठ वर्षांपर्यंत कोणीही मोडीत काढू शकलं नाही.
भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू कपिलदेव Kapil dev | याने १८ जून १९८३ रोजी झिम्बाब्वेविरुद्ध टनब्रिज वेल्सवर साकारलेली नाबाद १७५ धावांची खेळी भारतीय कसे विसरतील? या खेळीने टर्नरचा आठ वर्षांपासून अबाधित राहिलेला विक्रम मोडीत निघालाच, शिवाय नवा विक्रमही प्रस्थापित झाला. मात्र, भारतीय संघाच्या माजी कर्णधाराचा हा विक्रम वर्षभरही टिकला नाही. कारण ३१ मे १९८४ रोजी रिचर्ड्सने इंग्लंडविरुद्ध मँचेस्टरमध्ये झालेल्या सामन्यात नाबाद १८९ धावांची विक्रमी खेळी रचली आणि नवा विक्रम प्रस्थापित केला. रिचर्ड्स यांचा हा विक्रम १२ वर्षे ११ महिने आणि २१ दिवसांपर्यंत कोणीही मोडू शकला नाही. वनडेच्या इतिहासात सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम सर्वाधिक काळ आपल्या नावावर कोरण्याचाही एक नवा विक्रमच म्हणावा लागेल. रिचर्ड्सचा सर्वाधिक धावसंख्येचा विक्रम मोडीत निघालाही, पण सर्वाधिक काळ विक्रमावर विराजमान होण्याचा विक्रम आजपर्यंत कोणीही मोडू शकलेला नाही.
पाकिस्तानचा सईद अन्वर Saeed Anwar | याने रिचर्डस यांचा विक्रम मोडीत काढला. त्यासाठी २१ मे १९९७ हा दिवस उजाडावा लागला. अन्वरने भारताविरुद्ध चेन्नईत १९४ धावांचा नवा विक्रम रचला. सईद अन्वर Saeed Anwar | च्या नावावर हा विक्रम पुढे १२ वर्षे नऊ महिने राहिला. कदाचित त्याने रिचर्ड्स यांच्या सर्वाधिक कालावधीपर्यंतच्या विक्रमाला मोडीतही काढू शकले असते. पण झिम्बाब्वेच्या चार्ल्स कावेंट्रीने Charles Coventry | अन्वरचे (नाबाद १९४) १६ ऑगस्ट २००९ मध्ये त्याच्या विक्रमाशी बरोबरी केली. आता सर्वाधिक धावसंख्येच्या विक्रमावर केवळ अन्वरच नव्हता, तर झिम्बाब्वेचा चार्ल्सही त्याच्यासोबत होता. अखेर या दोघांचेही विक्रम मोडीत काढले ते भारताचा मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने Sachin Tendulkar |. ग्वाल्हेरमध्ये २४ फेब्रुवारी २०१० मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या वन-डे सामन्यात सचिनने (नाबाद २००) नाबाद द्विशतकी धावांची खेळी साकारली आणि अन्वर आणि चार्ल्स या दोघांचेही विक्रम मोडीत काढले. मात्र, हा विक्रम सचिनच्या नावावर फार काळ राहिला नाही. अवघ्या एक वर्ष आणि १४ महिने या विक्रमावर सचिन विराजमान होता. मात्र, सचिनच्या पावलावर पाऊल ठेवत भारताच्याच वीरेंद्र सेहवागने ८ जून २०११ मध्ये इंदूरमध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध खेळताना २१९ धावांची विक्रमी खेळी साकारली. सेहवागच्या नावावर हा विक्रम २ वर्षे ११ महिने आणि पाच दिवसच राहिला. रोहितने १३ नोव्हेंबर २०१४ रोजी २६४ धावसंख्या साकारत सेहवागचा विक्रम मोडीत काढत नवा विक्रम प्रस्थापित केला. मात्र, विक्रम बनले आणि मोडीतही निघाले. मात्र, रिचर्ड्स यांचा १८९ धावांचा सर्वाधिक काळ राहिलेला विक्रम आजपर्यंत कोणीही मोडू शकलेला नाही. अर्थात, हा १८९ धावसंख्येचा विक्रम सध्या वनडेच्या सर्वाधिक धावसंख्येच्या यादीत ११ व्या स्थानावर घसरला आहे. एकमेवर रोहितनेच ही संख्या तीन वेळा मोडीत काढत द्विशतकी खेळी साकारली आहे.