रेस अॅक्रॉस अमेरिका अर्थात राम म्हणजे काय?

रेस अॅक्रॉस अमेरिका अर्थात राम ही अल्ट्रा–डिस्टन्स रोड सायकलिंग स्पर्धा म्हणून जगभरात ओळखली जाते. सायकलिंग स्पर्धेतील माउंट एव्हरेस्ट म्हणूनही ही स्पर्धा ओळखली जाते. या स्पर्धेची सुरुवात 1982 मध्ये बाइक रेसने सुरू झाली होती. क्षमतेची कसोटी पाहणाऱ्या या स्पर्धेसाठी तुम्हाला आधी पात्रता फेरी पूर्ण करावी लागते. त्यानंतरच या स्पर्धेस तुम्ही पात्र ठरतात. ही स्पर्धा पूर्ण करण्यासाठी निश्चित असा कालावधी असतो. रेस अॅक्रॉस अमेरिका जिंकण्यासाठी या कालावधीच्या आत स्पर्धा पूर्ण करावी लागते. एकूणच ही रेस अॅक्रॉस अमेरिका नेमकी आहे काय, याचा घेतलेला आढावा…

अनेक जण या स्पर्धेची तुलना टूर दि फ्रान्सशी करतात. मात्र, दोन्ही स्पर्धांमध्ये मोठा फरक आहे. टूर दि फ्रान्समध्ये थेट स्पर्धा असते, तर रेस अॅक्रॉस अमेरिका क्षमतेची कसोटी पाहणारी असते. म्हणजे स्पर्धा स्वतःशीच असते. यात टूर दि फ्रान्ससारखे स्टेज म्हणजे श्रेणी किंवा टप्पे नसतात. रेस अॅक्रॉस अमेरिका पश्चिम तटापासून पूर्वेच्या तटापर्यंत अशी सलग सायकलिंग करावी लागते. म्हणजे स्पर्धक अंदाजे 3000 मैलांचे म्हणजे सुमारे 4,800 किलोमीटरचे अंतर पूर्ण करतो. म्हणजेच स्टार्ट टू फिनिश अशी ही स्पर्धा आहे. म्हणजे वेगवान सायकलिस्ट ही स्पर्धा दहा ते बारा दिवसांतही पूर्ण करू शकतो.
रेस अॅक्रॉस अमेरिका स्पर्धेतील विभाग
रेस अॅक्रॉस अमेरिका स्पर्धेत वयोगटनिहाय वेगवेगळे विभाग आहेत. खुल्या गटातील महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र सोलो विभाग आहे. यातच वेगवेगळ्या वयोगटांसाठीही या विभागात स्थान दिले आहे. 50 ते 59 वयोगट, 60 ते 69, तसेच पुरुष गटातील सोलो- रिकमबेंट प्रकारातही 50 ते 59 हा वयोगट निश्चित करण्यात आला आहे. पुरुष गटात दोन व्यक्तींचा संघ, पुरुष व महिला असा दोन व्यक्तींचा मिश्र गट, पुरुष गटात मुख्य स्पर्धेसाठी 50 ते 59 व 60 ते 69 वयोगटासाठी चार व्यक्तींचा संघ, महिलांसाठीही 50 ते 59 हा वयोगट आहे. आठ जणांचा संघही यात सहभागी होऊ शकतो.
रेस अॅक्रॉस अमेरिकाचा इतिहास
ही स्पर्धेला मोठा इतिहास नाही. ही स्पर्धा 1982 मध्ये जॉन मरिनो यांनी सुरू केली. त्या वेळी ही स्पर्धा भविष्यात सायकलिस्टची कसोटी पाहणारी ठरू शकेल असे वाटले नव्हते. कारण या स्पर्धेची सुरुवात बाइक रेसने झाली. त्या वेळी केवळ चार स्पर्धक सहभागी झाले होते. या चार स्पर्धकांमध्ये स्वतः जॉन मरिनो, जॉन होवर्ड, मायकेल शेर्मर आणि लॉन हाल्डमन यांचा समावेश होता. ही स्पर्धा कॅलिफोर्नियातील सांटा मोनिकापासून सुरू होऊन न्यूयॉर्क शहरापर्यंत तिचा समारोप झाला. या स्पर्धेत हाल्डमन विजेता ठरला. या पहिल्या इव्हेंटनंतर स्पर्धेचे नामांतर झाले. रेस अॅक्रॉस अमेरिका असे या स्पर्धेचे नाव ठेवण्यात आले. स्पर्धेत काही बदल करण्यात आले. निमंत्रितांऐवजी पात्रतेनुसार या स्पर्धेत स्पर्धकाला सहभागी केले जाऊ लागले. ही संकल्पना यशस्वी ठरली आणि जगभरातील स्पर्धक सहभागी होऊ लागले.1986 मध्ये या स्पर्धेचे जगभरात प्रक्षेपण झाले. 1989 मध्ये या स्पर्धेत आणखी बदल करण्यात आले. यात त्यांनी संघांची विभागणी करताना तंत्र आणि व्यूहरचनेचा समावेश केला. चार जणांचा एक संघ स्पर्धेत सहभागी करण्याची संकल्पनाही यशस्वी ठरली. सोलो विभाग अगदी अलीकडे म्हणजे 12 जून 2018 रोजी समाविष्ट करण्यात आला.
कोण सहभागी होऊ शकतं?
रॅम स्पर्धेत जगभरातील हौशी आणि व्यावसायिक खेळाडू सहभागी होऊ शकतात. मात्र, या स्पर्धेत व्यावसायिक खेळाडू फारच कमी सहभागी होतात. ज्यांना सायकल चालविण्याचे पॅशन आहे असे हौशी खेळाडूंचा सहभाग सर्वाधिक असतो. स्पर्धेच्या 30 वर्षांच्या इतिहासात 25 पेक्षा अधिक देशांतील खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला आहे. अंदाजे 40 टक्क्यांपेक्षा अधिक स्पर्धक अमेरिकेबाहेरील असतात. त्यात महिलांचे प्रमाण किमान 15 टक्के आहे.
सुरक्षेबाबत प्रश्न
सुमारे साडेचार हजार किलोमीटरपेक्षा अंतराची ही स्पर्धा किती सुरक्षित असेल, असा प्रश्न अनेकांना पडला असेल. या स्पर्धेत स्पर्धकांसोबक सपोर्ट स्टाफ असतो. मात्र, या स्पर्धेच्या इतिहासात तीन मोठे अपघात घडले आहेत, ज्यात स्पर्धकांना जीव गमवावा लागला आहे., 2003 मध्ये ब्रेट मालीन या स्पर्धकाचा अपघातात मृत्यू झाला. न्यू मेक्सिकोच्या पाय टाउन येथे 18 चाकांच्या ट्रेलरने त्याला धडक दिली होती. सोलोमध्ये सहभागी झालेला बॉब ब्रीडलोव याचा 2005 मध्ये कोलोरॅडोतील त्रिनिदादमध्ये अपघातात मृत्यू झाला. हा अपघात नेमकी कसा झाला, याची माहिती समोर आलेली नाही. मात्र, असे सांगितले जाते, की समोरून येणाऱ्या वाहनाच्या धडकेमुळे तो कोसळला. सपोर्ट स्टाफ त्य़ाच्यापासून काही मैलांच्या अंतरावर असल्याने नेमकी घटना कशी घडली याचा उलगडा झालेला नाही. जी गाडीला तो धडकला तीही त्याच्यासोबत कोसळल्याने नेमकी काय झाले ते समोर येऊ शकलेले नाही. या दोन घटनांनंतर 16 जून 2010 मध्ये स्पेनचा दिएगो बॅलेस्टेरोस कुकुरुल या स्पर्धकालाही एका कारच्या धडकेत गंभीर जखमी झाला. कन्सासमधील विशिता येथे ही घटना घडली. त्यामुळे त्याला जखमी अवस्थेत उपचारानंतर स्पेनमध्ये त्याच्या घरी रवाना करण्यात आले. मात्र, महिनाभरातच त्याला पॅरालिसिसचा झटका आला. तत्पूर्वी 1985 मध्ये कॅनडाचा सायकलिस्ट वेन फिलिप्स हा हिट अँड रनमुळे जायबंदी झाला होता. 2015, 2018 मध्येही दोन स्पर्धक अपघातामुळे गंभीर जखमी झाले होते. अर्थात, स्पर्धेत सुरक्षेबाबत काळजी घेतली जात असली तरी या घटना आयोजकांना रोखता आलेल्या नाहीत हेही तितकेच खरे आहे.
कशी असते ही रेस अॅक्रॉस अमेरिका?
अनेकांना या रेसबाबत कुतूहल असते. नेमकी ही रेस असते कशी? अनेकांना वाटते, ही रेस टूर दि फ्रान्ससारखी असेल. मात्र, तसे अजिबात नाही. टूर दि फ्रान्समध्ये स्टेज असतात. प्रत्येक स्टेजचे विशिष्ट अंतर असते. रेस अमेरिकामध्ये स्टेज मुळीच नाही, शिवाय प्रतिदिन किती अंतर सायकलिंग करावी, किती वेळ विश्रांती घ्यावी, याचेही बंधन नाही. त्यामुळे या दोन्ही स्पर्धा भिन्न आहेत. रेस अॅक्रॉस अमेरिका स्टार्ट टू फिनिश असल्याने तुम्ही विश्रांती घेत असला तरी घड्याळ सुरूच राहते. ते तुमचा विश्रांतीचा काळ वजा करीत नाही. कारण ही स्पर्धा टाइम ट्रायल आहे. त्यामुळे वेळेचे निकष पाळावेच लागतात. ही स्पर्धा जिंकणाऱ्याला किमान आठ ते नऊ दिवसांचा कालावधी लागतो. स्पर्धकांसोबत क्रू मेंबर असतात. हे क्रू मेंबर खेळाडूंचे भोजन, पाणी, तांत्रिक सुविधा पुरविण्यासाठी सोबत असतात.
रेस अॅक्रॉस अमेरिका स्पर्धेतील विक्रम
प्रत्येक स्पर्धेत खेळाडूचे विक्रम नोंदवले जातात. विक्रमी कामगिरीचे निकष सर्वोत्तम खेळाडू या निकषावरच असतात. मात्र रेस अॅक्रॉस अमेरिका यापेक्षा थोडी वेगळी आहे. या स्पर्धेत एकूण वेळ नोंदवली जात नाही, तर सरासरी वेग नोंदवला जातो. 1986 मध्ये पीट पेनसिरेस याने 3107 मैलांचे (5000 किलोमीटर) अंतर 15.40 मैल प्रतितास (24.78 किलोमीटर प्रतितास) या वेगाने पूर्ण केले होते. तब्बल 33 वर्षे हा विक्रम त्याच्या नावावर होता. मात्र, 2013 मध्ये ख्रिस्तोफर स्ट्रासर या सायकलिस्टने हा विक्रम काढत नवा विक्रम प्रस्थापित केला. ख्रिस्तोफरने 3,020 मैलांचे अंतर (4,860 किमी) 16.42 मैल प्रतितास (26.43 km/h) या वेगाने पूर्ण केले. या स्पर्धेतील सर्वांत वेगवान महिला सायकलिस्टचा मान सीना होगनला जातो. तिने 1995 मध्ये 13.23 मैल प्रतितास (21.29 किमी प्रतितास) वेगाने सुमारे 2,912 मैलांचे (4,686 किलोमीटर) अंतर पूर्ण केले होते.
रेस अॅक्रॉस अमेरिकामध्ये सहभागी होण्याची कारणे
रॅम रेस माऊंट एव्हरेस्टसारखा अनुभव आहे. रॅममध्ये सहभागी होणारा प्रत्येक स्पर्धक असाधारण समजला जातो. कारण स्पर्धेसाठी जो पैसा ते खर्च करतात तो सर्व सेवाभावी संस्थांना जातो. दुसरे म्हणजे रॅममध्ये विक्रम प्रस्थापित करण्याची संधी असते, मित्रांसोबत वेळ घालवता येतो, देश पाहायला मिळतो, रेस पूर्ण करणाऱ्यांच्या यादीत नाव समाविष्ट होतं. काही जणांसाठी ही रेस एक आनंद असतो, स्वतःला दिलेले ते एक आव्हान असते. कारणे काहीही असोत, पण संपूर्ण देश पाहण्याची ती एक सुंदर संधी म्हणजे रॅम आहे.
स्पर्धेसाठी किती खर्च येतो?
ही स्पर्धा अत्यंत खर्चिक आहे. मात्र, केवळ पैसे असून उपयोग नाही, तर क्षमता असणेही महत्त्वाचे आहे. एका स्पर्धकाला दोन लाखांवर प्रवेश शुल्क असते. 2018 मध्ये या स्पर्धेतील विविध प्रकारांतील प्रवेश शुल्क पुढीलप्रमाणे होते. आता त्यात आणखी वाढ असू शकेल. मात्र, 2018 मधील प्रवेश शुल्कावर नजर टाकली तर तुम्हाला एकूण खर्चाचा अंदाज येऊ शकेल.
रेस अॅक्रॉस अमेरिका स्पर्धेसाठी येतो इतका खर्च |
सोलो |
3100 डॉलर (2,02,957 रुपये) |
सांघिक रिले |
2 व्यक्ती : 4935 डॉलर (3,23,094 रुपये) |
4 व्यक्ती : 8190 डॉलर (5,36,199 रुपये) |
8 व्यक्ती : 13655 डॉलर (8,93,992 रुपये) |
(मुदतीच्या आत प्रवेश शुल्क भरल्यास काही सवलत मिळते. मात्र, मुदतीनंतर शुल्क भरल्यास मूळ शुल्कापेक्षा अधिक रक्कम मोजावी लागते.)
अशी आहे रेस |
3,000 मैलांचे अंतर (4,828 किमी) |
12 राज्यांतून प्रवास |
88 काउंटींमधून रेस |
1,70,000 फूट उंचीचा प्रवास |
15 देशांतील स्पर्धकांचा दरवर्षी सहभाग |
550-800 किमीचे अंतर सांघिक स्पर्धकांना प्रतिदिन पूर्ण करणे आवश्यक |
400-550 किमी अंतर सोलो स्पर्धकाला प्रतिदिन पूर्ण करणे आवश्यक |
या ऑलिम्पिकमध्ये विजेत्याला देण्यात आले होते खऱ्या सोन्याचे पदक