महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या पटावर…
महाराष्ट्राच्या बुद्धिबळाला ‘अच्छे दिन’ येण्याची चिन्हे आहेत, असे म्हणायला हरकत नाही. महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या अध्यक्षपदी अशोक जैन यांची फेरनिवड व अमरावतीच्या स्वप्नील धोपाडे याला मिळालेला ग्रँडमास्टरचा बहुमान या दोन्ही आनंददायी घटना 2015 या वर्षातल्या ऑक्टोबर महिन्यात घडल्या. मात्र असे असले तरी संघटनात्मक पातळीवर जैन यांच्यावर, तर स्पर्धात्मक पातळीवर स्वप्नीलवर आव्हानांचा डोंगर आहे.
काही वर्षांपूर्वी महाराष्ट्राचं बुद्धिबळ केवळ पश्चिम महाराष्ट्रापुरतं सीमित होतं. अशोक जैन यांनी संघटनेची धुरा सांभाळल्यानंतर त्यांनी महाराष्ट्रातील दुर्लक्षित जिल्ह्यांकडे प्राधान्याने लक्ष दिलं आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्र बुद्धिबळाने व्यापला. ‘चेस इन स्कूल’चा उपक्रम असो किंवा फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धा, धुळे, नंदुरबार, रायगड, नगरसारख्या जिल्ह्यांमध्ये होऊ लागल्या. स्पर्धांमध्ये सातत्य आलं. विशेष म्हणजे ग्रामीण भागात खऱ्या अर्थाने बुद्धिबळ साक्षरता वाढली. आयपीएलच्या धर्तीवर बुद्धिबळातील एमसीपीएल (महाराष्ट्र चेस प्रीमिअर लीग) ही स्पर्धा सुरू करण्यामागची कल्पनाही जैन यांचीच. त्यामुळे खेळाडूंचाही भाव वधारला. खेळाडूंना पैसे मिळवून देणारी बुद्धिबळातली भारतातील ही एकमेव लीग म्हणावी लागेल.
अर्थात, हा एक टप्पा झाला. महाराष्ट्राच्या बुद्धिबळातील मूळ समस्यांवर संघटनेकडून उपाय हवेत. तशी अपेक्षा खेळाडूंना आहे. विशेषतः जैन यांचं नेतृत्व असल्याने अपेक्षा जास्त वाढल्या आहेत. महाराष्ट्रात लहान मुलांचं बुद्धी‘बळ’ जोखलं जात असलं तरी खुल्या गटाकडे दुर्लक्ष होत आहे. प्रत्येक जिल्ह्यात लहान मुलांच्या गटात स्पर्धा अधिक होत आहेत. त्या तुलनेत खुल्या गटाच्या स्पर्धा कमी कमी होत आहेत.
स्पर्धा झाल्या महाग!
बुद्धिबळात सर्वांत मोठी अडचण प्रवेश शुल्काची आहे. असं म्हटलं जातं, की बुद्धिबळ खेळणं स्वस्त आहे; पण स्पर्धात्मक खेळणं अतिशय महागडं आहे. जगाच्या पाठीवर हा एकमेव खेळ असा आहे, की ज्यात सहजासहजी यश मिळत नाही. त्यामुळे स्पर्धा खेळणं अपरिहार्य होत जातं आणि कोणत्याही रेटिंग स्पर्धेत खेळायचं असेल तर एका खेळाडूमागे दीडदोन हजार रुपयांपासून प्रवेशशुल्क आकारलं जातं. वानखेडे स्टेडियमवरील तिकीट एक वेळ परवडेल; पण रेटिंग स्पर्धा खेळणं अत्यंत महाग झालं आहे. जर स्पर्धा जिल्ह्याबाहेर असेल तर निवास, भोजनव्यवस्थेपासूनचा खर्च सामान्यांच्या बजेटबाहेरचा असतो. ग्रामीण भागात बुद्धिबळ साक्षरतेचं व्रत ‘एमसीए’ने घेतलं असल्याने प्रवेश शुल्काबाबत विचार करणं जास्त आवश्यक झालं आहे. एमसीएच्या पातळीवर महाराष्ट्रातील स्पर्धांचे प्रवेश शुल्क निम्म्यावर आणलं तरी महाराष्ट्राचं बुद्धी‘बळ’ वाढेल.
गुणवंतांना मिळेना प्रायोजक
गुणवंत खेळाडूंना सध्या प्रायोजक मिळत नसल्याचीही खंत आहे. एमसीएने अनेक समित्या नियुक्त केल्या आहेत. त्यात मार्केटिंग व स्पॉन्सरशिप कमिटीचाही समावेश आहे. या समितीचं कार्य, जबाबदारी अद्याप स्पष्ट झालेली नसली तरी खेळाडूंच्या प्रायोजकत्वासाठी ही समिती सहाय्यभूत ठरेल, अशी अपेक्षा आहे. अनेक गुणवंत खेळाडू आर्थिक परिस्थितीमुळे या खेळात पुढे जाऊ शकलेले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. जैन स्पोर्ट्स अॅकॅडमीने अशा काही खेळाडूंसाठी मदत केली असली तरी ती खान्देशापुरतीच मर्यादित राहिली आहे. नाही म्हणायला विदित गुजराथीसारख्या खेळाडूचा अपवाद आहे. मुळात जैन स्पोर्ट्स अॅकॅडमी सर्वच खेळाडूंना मदत करू शकणार नाही. मात्र, प्रायोजक नक्कीच उपलब्ध करून देऊ शकेल. गुणवंतांना प्रायोजक मिळवून देण्यासाठीही एमसीएने पावलं उचलायला हवीत.
रेटिंग स्पर्धेची वानवा
बुद्धिबळात रेटिंग स्पर्धेला जितकं महत्त्व असतं तितकं अन्य कोणत्याही खेळाला नसेल. याशिवाय आंतरराष्ट्रीय मास्टर, ग्रँडमास्टर नॉर्मच्या स्पर्धा महाराष्ट्रात अपवादानेच होतात. मुंबईची ‘मेयर्स कप’ स्पर्धा सोडली तर नॉर्मच्या स्पर्धा महाराष्ट्रात फारशा नाहीच. अर्थात, या स्पर्धांच्याही आधी रेटिंग स्पर्धा अधिक महत्त्वाच्या आहेत. महाराष्ट्रात जळगाव, नगर, पुणे, मुंबई, सांगली, नागपूर हे बोटावर मोजण्याइतके जिल्हे सोडले तर कुठेही रेटिंग स्पर्धा होत नाहीत. त्यामुळे अन्य जिल्ह्यांतील खेळाडूला या स्पर्धा खेळण्यासाठी बाहेर जाणे परवडणारे नाही. नाशिकमध्ये तब्बल आठ-दहा वर्षांनी एक रेटिंग स्पर्धा झाली. कारण खेळाडूच्या रेटिंगवरच नॉर्मच्या स्पर्धा अवलंबून आहेत. २५०० इलो रेटिंग नसेल तर ग्रँडमास्टरचा नॉर्म मिळूनही बहुमान मिळत नाही. महाराष्ट्रात ग्रँडमास्टरचा बहुमान केवळ पाच खेळाडूंना आहे. रेटिंग स्पर्धा आणि नॉर्मच्या स्पर्धांसाठी एमसीएने पावलं उचलायला हवीत. अशोक जैन यांच्यापुढे सर्वांत महत्त्वाचं आव्हान हेच असेल. महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात किमान एक रेटिंग स्पर्धा व्हावी, असं बंधनच घातलं पाहिजे.
नाशिककडे कधी लक्ष देणार?
जैन यांची फेरनिवड झाल्याने नाशिककरांच्याही अपेक्षा वाढल्या आहेत. नाशिकच्या बुद्धिबळातली निष्क्रीयता किमान संपेल, अशी अपेक्षा आहे. कारण नाशिक जिल्हा संघटनेला अद्याप संलग्नता नाही. नाशिकच्या बुद्धिबळ संघटनेची निष्क्रीयता संपवण्यासाठी एकत्र यायला कुणी तयार नाही. रेषा मल्टिअॅक्टिव्हिटी सेंटरचे मिलिंद कुलकर्णी यांनी गेल्या महिन्यात फिडे रेटिंग स्पर्धा घेतली होती, ज्या स्पर्धेशी नाशिक जिल्हा बुद्धिबळ संघटनेचा कोणताही संबंध नव्हता. नाशिकच्या संघटनेची गरजच नाही, हेही यामुळे पुढे आले. संघटनेतील साठमारी पाहता कोणालाही यात काम करावेसे वाटत नाही. म्हणूनच काही जणांना संघटनेसाठी नवी टीम अपेक्षित आहे. काम करणाऱ्या संघटकांची टीम तयार करण्यासाठी एमसीएनेही अशा नव्या बुद्धिबळप्रेमींना संधी द्यायला हरकत नाही. यापूर्वी एमसीएने आवाहन केलं होतं, की संघटनेसाठी काम करणाऱ्या लोकांनी एकत्र येऊन निर्णय घ्यावा. आता या आवाहनामुळे कोणी एकत्र यायचं हे एमसीएने स्पष्ट केलेलं नाही. त्यामुळे एकत्र येण्यासाठी कोणीही पुढे आलेलं नाही आणि एकत्र यायचं तर कोणी पुढाकार घ्यायचा? ज्याने पुढाकार घेतला त्याचं का ऐकावं, असे नाना प्रश्न आहेत. एमसीएने ही कोंडी फोडायला हवी आणि नाशिकच्या संघटनेची उभारणी करावी, अशी नाशिककरांची अपेक्षा आहे.
महाराष्ट्राचा पाचवा ग्रँडमास्टर!
अक्षयराज कोरे, विदित गुजराथीनंतर महाराष्ट्राला अमरावतीच्या स्वप्नील धोपाडेच्या रूपाने पाचवा ग्रँडमास्टर लाभला. मात्र, त्याचा गौरव ज्या दिमाखात व्हायला हवा होता, तेवढा झाला नाही. महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेकडून यथोचित सन्मान होईलच, मात्र महाराष्ट्र सरकारनेही त्याचा गौरव करावा यासाठी एमसीएने पुढाकार घ्यायला हवा. विश्वनाथन आनंदमुळे भारतात बुद्धिबळाला खऱ्या अर्थाने चालना मिळाली. आनंदला १९८८मध्ये वयाच्या १९व्या वर्षी ग्रँडमास्टरचा बहुमान मिळाला. आनंदनंतर तीन वर्षांनी पश्चिम बंगालच्या दिब्येंदू बारूआने, तर बारूआनंतर तब्बल सहा वर्षांच्या खंडानंतर प्रवीण ठिपसे याला ग्रँडमास्टरचा बहुमान मिळविला. महाराष्ट्राचा हा पहिला ग्रँडमास्टर, ज्याला वयाच्या ३८ व्या वर्षी या बहुमानासाठी झुंजावे लागले. त्यानंतर अभिजित कुंटे, अक्षयराज कोरे, विदित गुजराथी आणि आता स्वप्नील धोपाडे असे दोन ते तीन वर्षांच्या अंतराने ग्रँडमास्टर झाले. म्हणजे ठिपसे ते धोपाडे या तब्बल १७ वर्षांच्या बुद्धिबळ प्रवासात केवळ पाच ग्रँडमास्टर महाराष्ट्राला लाभले. बुद्धीच्या कसोटीवरच नव्हे, तर सर्वच कसोट्यांवर आजही बुद्धिबळातला हा सर्वोच्च बहुमान मिळणे किती अवघड आहे, याची प्रचीती येईल.
बुद्धिबळातील आंतरराष्ट्रीय मास्टर, ग्रँडमास्टर नॉर्म्सच्या स्पर्धा संपूर्ण भारतातच फार कमी होतात. स्वप्नील वयाच्या दहाव्या वर्षी बुद्धिबळाचे हत्ती, घोडे शिकला. त्याचा ग्रँडमास्टर बहुमानापर्यंतचा प्रवास तब्बल १५ वर्षांचा आहे. म्हणजे प्रशिक्षकापासून स्पर्धा खेळण्यापर्यंत त्याला किती पैसे मोजावे लागले असतील, याची कल्पनाच न केलेली बरी. नॉर्म स्पर्धा खेळण्यासाठी एका खेळाडूला २५ हजार रुपयांपर्यंत प्रवेश शुल्क मोजावे लागते. त्यातही तिन्ही नॉर्म मिळाल्यानंतर २५०० इलो रेटिंग जर नसेल तर नॉर्म मिळूनही ग्रँडमास्टरचा बहुमान मिळत नाही. स्वप्नीलच म्हणाला, की २४९७ रेटिंगपर्यंत पोहोचलो असताना ग्रँडमास्टरचा बहुमान माझ्यापासून अवघे तीन गुण लांब होता. मात्र खराब कामगिरीमुळे माझं रेटिंग २४१८ पर्यंत घसरलं. त्या वेळी स्वप्नीलची अवस्था काय झाली असेल, याची कल्पनाच न केलेली बरी. २५०० रेटिंग मिळवण्यासाठी पुन्हा स्पर्धा खेळणं आलं. फक्त खेळायचं नाही तर सर्वोच्च कामगिरी करून रेटिंग वाढवायचंही आहे. त्यासाठी प्रत्येक स्पर्धेचे प्रवेश शुल्क भरणे आलेच. प्रशिक्षकासाठी होणारा खर्चही वेगळा. म्हणूनच स्वप्नीलचे हे यश कौतुकास्पद आहे. विशेष म्हणजे त्याला कोणीही प्रायोजक नाही! सध्या तो रेल्वेकडून खेळत असला तरी त्यालाही मर्यादा आहेच. मात्र, घरातून मिळणारा सपोर्ट आणि विजिगीषू वृत्ती यामुळे स्वप्नील या अडथळ्यांवर मात करू शकला. मात्र अनेक स्वप्नील बुद्धिबळाच्या अर्ध्या वाटेवरूनच नाउमेद होतात त्याचे काय? अशा गुणवंत स्वप्नीलसाठी एमसीएने पुढे यावे. तरच बुद्धिबळाचा प्रवास कुणालाही ‘स्वप्नील’ म्हणजेच स्वप्नातील, स्वप्नवत वाटणार नाही…
खुप छान लेख महेश…
महाराष्ट्रात बुद्धिबळाचा विकास होणे गरजेचे आहे…..
खुप छान लेख महेश…
महाराष्ट्रात बुद्धिबळाचा विकास होणे गरजेचे आहे…..