मी पाहिलेली बुद्धिबळाची तणावग्रस्त शाळा…
एका फिडे रेटेड मुलासोबत अवघ्या सात वर्षांचा मुलगा खेळत होता. तो मुलगा हरला. तसं पाहिलं तर सात वर्षांचं ते वय शिकण्याचंच. पण हरला म्हणून त्या पालकाने त्याला गोड बोलून बाजूला नेले आणि गालावर जोराची चापटी मारली. त्या निरागस मुलाचा चेहरा भेदरलेला. डोळे पाण्याने डबडबले. मात्र, मोकळं रडतानाही त्याच्या मनात भीतीची छटा स्पष्टपणे दिसत होती. हा सगळा प्रकार पाहून मी सुन्न झालो. मी पाहिलेली ही बुद्धिबळाची तणावग्रस्त शाळा, जिथे मुले पालकांच्या ओझ्याखाली दबलेली पाहिली.
एक चुणचुणीत मुलगी टमाटमा बोलत होती. वय अवघं सहा वर्षांचं. आईशी बांगड्यांचा रंग कोणता चांगला, कानातल्या रिंगा कशा चांगल्या यावर बालसुलभ गप्पा मारत होती. मात्र, हे बोलणं अवघ्या दहा मिनिटांचं! बुद्धिबळ शिकविण्यासाठी आलेल्या प्रशिक्षकाने तिला आवाज दिला आणि ती जराशी नाखुशीनेच पुन्हा बुद्धिबळाचे धडे गिरवायला बसली. तसं तिचं दिवसभराचं शेड्यूल पाहिल्यानंतर कोणीही अवाक् होईल. पण तो ट्रेंडच झाला आहे. सकाळी आठ ते साडेबारापर्यंत शाळा, शाळेतून आल्यानंतर दुपारी दोन ते सायंकाळी पाचपर्यंत बुद्धिबळाचा सराव. त्यासाठी तासाभराच्या अंतराने तीन प्रशिक्षकांची नियुक्ती. पाचनंतर कथकचा क्लास. त्यानंतर रात्री नऊपर्यंत पुन्हा तेच पटावरचे हत्ती, घोडे, उंट… याच मुलीने राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत सात वर्षांखालील गटात पहिला क्रमांक मिळविला आणि अशी कामगिरी करणारी महाराष्ट्रातली पहिली खेळाडू ठरली. जळगावची भाग्यश्री पाटील असं तिचं नाव.
भाग्यश्री ही एकमेव खेळाडू नाही, जी बुद्धिबळाचं बिझी शेड्यूल अनुभवतेय. नगरचा संकर्ष शेळके, शार्दुल गागरे, मुंबईची अनन्या गुप्ता, नागपूरची दिव्या देशमुख… असे कितीतरी बालखेळाडू आज शाळेपेक्षा बुद्धिबळाच्या शाळेला जास्त महत्त्व देत आहेत. अर्थात, त्यात त्यांनी गतीही दाखवली आहे आणि पालकांचा विश्वासही सार्थ ठरवला आहे. मात्र, मी अशीही बुद्धिबळाची तणावग्रस्त शाळा पाहिली आहे, जिथे मुलांवर पालकच अपेक्षांचं ओझं लादत आहेत.
बुद्धिबळात करिअर करण्यासाठी मुलांना शाळाच नाही, तर बालपणही सॅक्रिफाइस करावं लागतंय. म्हणजे या मुलांची शाळा परीक्षेपुरतीच दोन ते तीन महिन्यांची. करिअर होईल किंवा नाही हा नंतरचा प्रश्न. पण बुद्धिबळासाठी बालपण सॅक्रिफाइस करण्यासाठी बऱ्याचअंशी पालकांचीही टोकदार भूमिका कारणीभूत आहे. एवढं मात्र खरं आहे, की बुद्धिबळात करिअर करण्यासाठी मुलं सध्या प्रचंड बिझी झाली आहेत. वर्षभरात दहा ते बारा स्पर्धा देशभर खेळत असतात. हा ट्रेंड मूळचा दक्षिणेतला. तमिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेशात बुद्धिबळ स्ट्राँग का आहे, त्यामागचं कारण हेच आहे. मात्र, यात बालपण सॅक्रिफाइस होतं का? यावर मुंबईचे प्रशिक्षक नागेश गुट्टुला यांनी सांगितलं, की बुद्धिबळात करिअर करायचं असेल तर तुम्हाला काही तरी सॅक्रिफाइस करावंच लागेल. पण जर तो मुलगा किंवा ती मुलगी रिझल्ट देत नसेल तर बुद्धिबळात त्याला कुठपर्यंत न्यायचं हे तुम्हाला ठरवावं लागेल.
नागेश गुट्टुला यांच्या म्हणण्यानुसार एक मात्र खरे आहे, की जर मुलाची किंवा मुलीची प्रगती साधारण असेल तर त्याला किंवा तिला बुद्धिबळासाठी फार आग्रह धरू नये. त्यात बालपणही हिरावलं जातं आणि शालेय प्रगतीही खुंटते. मात्र, हे लक्षात न घेता पालक मुलांवर आणखी दबाव टाकतात.
जळगावात एक जिल्हास्तरीय स्पर्धा सुरू होती. एका फिडे रेटेड मुलासोबत अवघ्या सात वर्षांचा खेळत होता. तो मुलगा हरला. तसं पाहिलं तर सात वर्षांचं ते वय शिकण्याचंच. पण हरला म्हणून त्या पालकाने त्याला गोड बोलून बाजूला नेले आणि गालावर जोराची चापटी मारली. त्या निरागस मुलाचा चेहरा भेदरलेला. डोळे पाण्याने डबडबले. मात्र, मोकळं रडतानाही त्याच्या मनात भीतीची छटा स्पष्टपणे दिसत होती. हा सगळा प्रकार पाहून मी सुन्न झालो. पालकाला मुलाची झेप कुठपर्यंत आहे, तो कसा खेळतो याची माहितीच नसेल तर अशा मुलांचं भविष्य काय असू शकेल? ‘मुलाचे पाय पाळण्यात दिसतात’ असं म्हणतात. मात्र, इथं मुलाचा कल, गतीच पाहिली जात नसेल तर कोणत्याही खेळात करिअर अशक्य.
अर्थात, बुद्धिबळ हा खेळ एकाग्रता वाढविण्यासाठी, गणितात प्रगतीसाठी अत्यंत फायदेशीर आहे. त्यामुळे या खेळाकडे कोणत्या दृष्टीने पाहावं हा प्रत्येकाचा वैयक्तिक विषय आहे. याबाबत हंगेरीची ग्रँडमास्टर सुसान पोल्गार हिने मुलांना काही टिप्स दिल्या. सुसान जगातील पहिली महिला ग्रँडमास्टर आहे.
न्यूयॉर्कमधील चेस क्लबमध्ये सुसान दर गुरुवारी रात्री बुद्धिबळावर व्याख्यान देण्यासाठी जात होती. ब्लॅक पँटसूट परिधान करून, छानसा परफ्यूम लावून सुसान व्याख्यान देण्यासाठी आली. ‘मी तुम्हाला अतिशय छान ट्रीट करणार आहे’, असं तिने आपल्या कोमल हंगेरी बोलीत सांगितले. आज रात्री मी प्रत्येकाशी ब्लिट्झ चेस खेळणार आहे. या खेळात प्रत्येकाला पाच मिनिटे मिळतील. ती प्रथम एका सर्बियन तरुणासमोर खेळण्यासाठी बसली. सुसानने वेगवान चाली रचत त्या युवकाला ३० सेकंद राखून पराभूत केले. एक निवृत्त बारटेंडर आणि चौदा वर्षांचा मुलगाही सुसानसमोर टिकू शकले नाहीत. एका नऊ वर्षीय मुलालाही सुसानसोबत खेळण्यासाठी तयार केले. तो थोडासा गोंधळलेला होता. त्याच वेळी सुसानची आई त्याला म्हणाली, ‘‘कोण कोण हरलं याची तू काळजी करू नकोस.’’ मात्र, तो मुलगाही एका मिनिटात पराभूत झाला. त्यानंतर सुसान म्हणाली, ‘‘जिंकण्याची स्थिती एकदाच येते. तुम्ही डोक्याने नव्हे, तर हाताने खेळा! तुमच्या अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवा.’’
सुसानचे बुद्धिबळातले अनुभव एक खेळाडू म्हणूनच नाही, महिला म्हणूनही खूप शिकण्यासारखे आहेत. तिने बुद्धिबळाच्या पटावरीलच नाही, तर पटाबाहेरीलही अनुभव शेअर केले आहेत. बुद्धिबळ हा एकमेव खेळ असा आहे, की ज्यात महिला आणि पुरुष असा भेद नाही. पुरुषांच्या बरोबरीने महिलाही या खेळात आपलं बुद्धिकौशल्य सिद्ध करू शकतात. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे सुसान, सोफिया आणि ज्युडिट या पोल्गार भगिनी. मात्र, ज्या काळात पोल्गार भगिनींनी खेळायला सुरुवात केली तो काळ पुरुषी वर्चस्वाचा होता. ज्युडिटने २००२ मध्ये गॅरी कास्पारोवला पराभूत केले त्या वेळी तो अत्यंत धक्कादायक निकाल होता. ज्युडिट त्या वेळी जगातील ९५० ग्रँडमास्टरमध्ये आठव्या स्थानावर होती. कास्पारोवने त्या वेळी महिला खेळाडूंविषयी एक टिप्पणी केली होती, की महिला बुद्धिबळात असाधारण खेळाडू नाहीत. म्हणजेच त्या सशक्त फायटर नाहीत, असं तो म्हणाला होता. मात्र, पोल्गार भगिनींनी कास्पारोवच्या या टिप्पणीला छेद दिला. जागतिक क्रमवारीत सुसान आणि ज्युडिट पहिल्या क्रमांकात होत्या. मात्र, या पोल्गार भगिनींनी पुरुषी अहंकार, वर्चस्वाची बुद्धिबळाची एक तणावग्रस्त शाळा अनुभवली आहे.
पोल्गार भगिनींत सुसान सर्वांत थोरली. तिला बुद्धिबळाचा परिचय तिच्या वडिलांनी करून दिला. सुसानचे वडील तिला म्हणायचे, की बुद्धिबळासाठी जन्मजात बुद्धी असण्याची गरज नाही. तुम्हाला यशासाठी ९९ टक्के हार्डवर्क करावेच लागते.’’ सुसानच्या मनात हे वाक्य कायमचे कोरले. त्या विश्वासानेच तिने पुरुषी वर्चस्वाला हादरे देत एक यशस्वी खेळाडू म्हणून लौकिक मिळवला. पोल्गार भगिनींनी बुद्धिबळ गाजवले. पुरुषी वर्चस्वाला मात्र ते मान्य नसायचं. सुसान म्हणायची, की ज्या वेळी चांगला खेळाडू आमच्याकडून पराभूत व्हायचा, तेव्हा तो पहिली प्रतिक्रिया व्यक्त करायचा, माझं डोकं फार दुखत होतं..!
भारतीय महिला खेळाडूंमध्ये कोनेरू हम्पी या एकमेव महिला खेळाडूने जागतिक क्रमवारीत दुसरे स्थान मिळविले आहे. त्यानंतर अनेक महिला खेळाडू पुढे आल्या, येत आहेत. भारतीय बुद्धिबळाचा विचार केला, तर विश्वनाथन आनंद हे नाव अग्रक्रमाने घ्यावं लागेल. विश्वनाथन आनंदमुळेच खरं तर भारतीय बुद्धिबळाने मोठी झेप घेतली आहे. बुद्धिबळात करिअर होऊ शकतं, पण ते आपल्या मुलांच्या वाट्याला यावं, यासाठी पालकांचा दृष्टिकोन स्पष्ट असायला हवा. त्याला काय हवं याची जाणीव पालकांना हवी. सुसानच्याच म्हणण्यानुसार, बुद्धीपेक्षा हार्डवर्क खूप महत्त्वाचं आहे. पोल्गार भगिनींनी ते सिद्ध केलं आहे.
(Ashtapailu)
[jnews_block_37 first_title=”Read more at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”75″]