बाफना सरांविषयी…
छगनलाल बाफना |
सरांविषयी आठवणी खूप आहेत…
ते आम्हाला इंग्रजी विषय शिकवायचे… उन्हाळ्याचे दिवस होते. फळ्यावर ते काही तरी लिहीत होते… त्या वेळी मी पहिल्या की दुसऱ्या बेंचवर बसलो होतो. हुश्श करताना माझ्या तोंडातून अनायासे शिट्टीचा आवाज निघाला… शांत वर्गात तो आवाज भयंकरच होता! मी भेदरलो. मला माहीत होतं, की मी तो जाणीवपूर्वक काढलेला नाही. तसा माझा इतका काही डॅम्बीस स्वभावही नाही. पण काय कोण जाणे आवाज निघाला आणि बाफना सरांनी गर्रकन वळून पाहिले…
वर्ग शांत आणि गंभीर… ती शांतता मला भयंकर संकटाची जाणीव करून देत होता… सर तडक माझ्या बेंचजवळ आले आणि त्यांनी मला जो ‘प्रसाद’ दिला तो यापूर्वी कोणीही चाखला नसेल… विशेष म्हणजे, मला कोणाही शिक्षकाने अशी शिक्षा केली नव्हती… असं असलं तरी त्यांच्याविषयी माझ्या मनात कधीच कटुता आली नाही… उलट मी त्यांच्याविषयी जेवढ्या आठवणी शेअर केल्या त्या अन्य कोणत्याही शिक्षकाच्या नसतील… असो..
दुसऱ्या दिवशी बाफना सर पान खाऊन व्हरांड्यातून जात होते… आता मला त्यांच्याशी नजरानजर करण्याचंही धाडस नव्हतं… पण ते थांबले आणि मी पुन्हा चपापलो… ते म्हणाले, ‘‘मला तुला शिक्षा करायची नव्हती; पण इतरांना संदेशही जायला हवा होता…’’ पुढेही काही तरी बोलले. पण त्यांच्या बोलण्याचा मूळ आशय असाच काही तरी होता.
मला कळून चुकले होते… ते त्यांच्या जागी योग्यच होते… कारण त्यांनाही त्यांची इमेज टिकवायची होती आणि माझीही चांगली इमेज घडवायची होती…!
आता या गोष्टीला सुमारे २५ वर्षांचा काळ लोटला आहे… आम्ही सर्व शाळकरी मित्र आयुष्याच्या वळणावर अनेक वळणे घेत विखुरलो… पण व्हॉट्सअॅपने पुन्हा एकत्र आलो.. गेट टु गेदरच्या निमित्ताने अनेक वर्षांनी एकत्र आलो, त्या वेळी संदीप भटेवरा आणि प्रवीण गांगुर्डे या शाळकरी मित्रांनी भेटवस्तू दिली. ती भेटवस्तू पाहून गंमत वाटली…
संदीपने एक पेन भेट दिलं. या गिफ्टवरून सुनील फुलेने छान आठवण काढली होती. बाफना सरांनी इंग्लिश ग्रामरमध्ये प्रथम येणाऱ्यास पेन बक्षीस देण्याचे कबूल केले होते. माझ्यासारख्याने अशा बक्षिसाची अपेक्षा करणे म्हणजे उसेन बोल्टला १०० मी.मध्ये हरवण्याइतपत अवघड होतं. पण संदीपने पेन भेट दिलं आणि भरून पावलो. उसेन बोल्टला आता आव्हानही देऊ शकेन, इतकी ऊर्जा या पेनने दिली; पण बाफना सरांचं चॅलेंज आता स्वीकारू शकत नाही ही खंत आहे. कारण आज ते हयात नाहीत.
प्रवीणने डाळिंब आणि मनुके भेट दिले तेव्हा विशेष वाटले. प्रवीणने मनुके आणि डाळिंबच का निवडले गिफ्टसाठी काही कळेना; पण नंतर उलगडा झाला. सगळ्यांचे गाल वर आले, पण वयोमानानुसार ते निस्तेज होऊ नये म्हणून प्रवीणने ही काळजी घेतली असावी. कारण डाळिंबाने ओठ लालचुटूक व गाल लालबुंद होतात, तर मनुक्याने बुद्धी वाढते… त्यामुळे रक्तही वाढतं, असं म्हणतात. दोघांचीही ही भेट विशेष लक्षात राहील आणि मैत्रीप्रेमाची अनोखी आठवणही देत राहील.
अशा अनेक प्रसंगांतून बाफना सरांच्या स्मृतींनाही उजाळा मिळत राहतो… ५ ऑक्टोबर २००९ रोजी त्यांचे निधन झाले. आठ वर्षे झाली… आठवणींत मात्र सर कायम असतील…
सरांना भावपूर्ण आदरांजली…