पुन्हा कुटप्पा प्रशिक्षक
द्रोणाचार्य पुरस्कार विजेते सी. ए. कुटप्पा यांची भारतीय पुरुष बॉक्सिंग संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदी पुन्हा निवड झाली आहे.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय पुरुष बॉक्सरनी एकही पदक न जिंकल्यामुळे कुटप्पा यांना दूर करण्यात आले होते.
ऑलिम्पिकनंतर २०२१च्या ऑक्टोबरमध्ये कुटप्पा यांच्याऐवजी लष्कर क्रीडा संस्थेचे नरेंदर राणा यांची मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाली होती.
मात्र, आता हाय परफॉर्मन्स डिरेक्टर बर्नार्ड दुन्ने यांच्या सूचनेनुसार पुन्हा कुटप्पा यांची निवड झाली आहे.
मुख्य प्रशिक्षकपदावरून दूर केल्यानंतरही कुटप्पा यांचा भारतीय संघाच्या प्रशिक्षकांमध्ये समावेश होता.
जागतिक स्पर्धा, आशियाई क्रीडा स्पर्धा; तसेच ऑलिम्पिक आगामी दीड वर्षात होणार आहे.
कुटप्पा पॅरिस ऑलिम्पिकपर्यंत पदावर कायम राहण्याची शक्यता आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सध्या भारतीय संघाचा सराव सुरू आहे.
‘कुटप्पा हेच ऑलिम्पिकपर्यंत प्रशिक्षक असावेत, अशी आमची इच्छा आहे. मात्र, महत्त्वाच्या स्पर्धेतील कामगिरीवर अंतिम निर्णय असेल,’ असे भारतीय बॉक्सिंग महासंघाचे सचिव हेमंत कलिता यांनी सांगितले.
दरम्यान, स्ट्रँजा स्मृती स्पर्धेसाठी भारतीय महिलांचा दुय्यम संघ सहभागी होणार आहे.
राष्ट्रीय स्पर्धेतील विजेते बॉक्सर जागतिक स्पर्धेत खेळणार आहे, तर उपविजेत्यांची स्ट्रँजा स्मृती स्पर्धेसाठी निवड होईल.
बल्गेरियातील स्ट्रँजा स्मृती स्पर्धा १८ ते २७ फेब्रुवारी दरम्यान आहे, तर जागतिक स्पर्धा १५ मार्चपासून नवी दिल्लीत होईल.
कोण आहेत कुटप्पा?
सी. ए. कुटप्पा यांनी विजेंदरसिंग, सुरंजयसिंह, शिवथापा यांच्यासारखे बॉक्सर घडवले आहेत.
त्यांना 2018 मध्ये वयाच्या अवघ्या 39 व्या वर्षी द्रोणाचार्य पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
ज्या विजेंदर सिंग याला कुटप्पा यांनी प्रशिक्षण दिले, त्या कुटप्पांना राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत 2003 मध्ये विजेंदरसिंग यांनी पराभूत केले होते.
मात्र, असे असले तरी विजेंदर सिंग याला कुटप्पा यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले आहे.
सुरंजय सिंह याने सलग आठ आंतरराष्ट्रीय सुवर्णपदके मिळवली आहेत. शिव थापा याने आशिया स्पर्धेचे तीन वेळा विजेतेपद मिळवले आहे.
अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय बॉक्सर आहे.
कुटप्पा यांनी 2006 मध्ये एनआयएसमधून प्रशिक्षणाचा डिप्लोमा घेतला.
त्यानंतर त्यांची नेमणूक सैन्य क्रीडा संस्थेत (एएसआय) झाली. त्यानंतर पतियाळातील राष्ट्रीय शिबिरात त्यांची निवड झाली.
नंतर राष्ट्रीय प्रशिक्षक गुरबक्ष सिंग संधू यांचं लक्ष कुटप्पा यांच्याकडे लक्ष गेलं. त्यानंतर प्रशिक्षक म्हणून कुटप्पा यांनी आपली छाप सोडली.
Read More : भारताचा अव्वल मुष्टियोद्धा अमित पंघाल ऑलिम्पिकमध्ये हरलाच कसा?
[jnews_block_9 first_title=”Read more at:” include_category=”boxing”]