महाराष्ट्र केसरी विजय चौधरी याचं पुढचं लक्ष्य होतं ऑलिम्पिक
जळगाव जिल्ह्यातील सायगाव बगळीसारख्या लहानशा गावातला विजय चौधरी याने पुण्याच्या सचिन येलबरचा अवघ्या एका गुणाने पराभव करीत 2015 मध्ये महाराष्ट्र केसरी बहुमान मिळवला. कारकिर्दीत तब्बल ५१ चांदीच्या गदा मिळविणारा विजय चौधरी याचा महाराष्ट्र केसरीपर्यंतचा प्रवास थक्क करणारा आहे.
उजव्या पायाच्या लिगामेंट तुटल्यानंतरही दोन वर्षे कुस्तीपासून लांब राहिला. त्यानंतर त्याचं हे यशस्वी कमबॅक आहे. तीन वेळा महाराष्ट्र केसरीचा बहुमान पटकावणारा महाराष्ट्रातला एकमेव पहिलवान ठरला. या विजेतेपदानंतर विजय चौधरी म्हणाला होता, आता माझं पुढचं लक्ष्य ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळविण्याचं आहे. मात्र, तीन महाराष्ट्र केसरीचा बहुमान मिळविण्यातच त्याने समाधान मानलं. त्याचा कुस्ती प्रवास जाणून घेताना त्याच्याशी साधलेला संवाद…
चाळीसगाव तालुक्यातील सायगावचा तू. तसं पाहिलं तर जळगाव जिल्ह्यात कुस्तीचं फारसं वलय नाही आणि म्हणावं तसं प्रोत्साहनही नाही. कोणतीही पार्श्वभूमी नसताना तू कुस्तीत पुढे कसा काय आला? तुझा आदर्श कोण आहे?
महाराष्ट्र केसरी विजय चौधरी : माझा आदर्श माझे वडीलच आहेत. आमच्या गावात कुस्तीचा लौकिक मोठा आहे. गावातले खूप मोठमोठे पैलवान होते. त्यांचं नाव तालुक्यात, जिल्ह्यात होतं. त्यातले एक माझे वडीलही होते. त्यांचं नाव जिल्ह्यातही होतं; पण काही आर्थिक अडचणी असल्याने ते वरच्या लेव्हलपर्यंत नाही खेळू शकले. मात्र, त्यांची इच्छा होती, की आपल्या मुलानं महाराष्ट्र केसरी, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळावी. त्यांनी मला पैशांचीही कमी पडू दिली नाही. जे मी सांगितलं ते त्यांनी दिलं.
मला इथं जायचंय, मला पंजाबच्या आखाड्यात जायचंय. त्यासाठी जे मला पैसे लागतील ते त्यांनी उसने घेऊन मला पुरवले. मला समजत होतं, की आपली परिस्थिती नाही. वडिलांजवळ आपण कसे मागायचे पैसे? पण काय करणार? मी कोणाकडून पैसे मागणार? वडीलच पैसे देणार! कारण वडिलांचं नाव होतं. कुस्तीत नाव असलं तरी क्रेडिट नव्हतं; पण वडिलांवर विश्वास ठेवून लोक त्यांना उसने पैसे द्यायचे. माझ्या लहानपणी कुस्तीतली पकड मी त्यांच्याकडून शिकलो. त्यांच्यामुळेच आज मी इथं आहे. जळगाव जिल्ह्यात खूप चांगले मल्ल आहेत. महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सेमी फायनलपर्यंत त्यांनी मजल मारली आहे. पण परिस्थितीमुळे त्यांना पुढे खेळायला मिळत नाही.
गोंदियात २०१२ मध्ये झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत तू फायनलपर्यंत पोहोचला होता. त्या वेळी तुझ्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने जवळपास दोन वर्षे तू खेळू शकला नाही. मात्र, या गंभीर दुखापतीवर मात करून तू यशस्वी कमबॅक कसं काय केलं?
महाराष्ट्र केसरी विजय चौधरी : हो… गोंदियात २०१२ मध्ये महाराष्ट्र केसरीच्या फायनलपर्यंत मजल मारली होती. सेमी फायनलला कोल्हापूरच्या सुनील साळुंकेविरुद्ध खेळताना माझ्या उजव्या पायाचा लिगामेंट तुटला. हाच साळुंके गेल्या वर्षी उपमहाराष्ट्र केसरी झाला होता. ती कुस्ती मी जिंकली आणि फायनलमध्ये गुडघ्याला पट्ट्या बांधून नरसिंग यादवबरोबर खेळलो.
ती इंज्युरी मी कोणालाच सांगितली नाही. ना माझ्या घरच्यांना, ना प्रशिक्षकांना. कारण कदाचित त्या वेळी त्यांचा निर्णय वेगळा राहिला असता. अनेकांनी मला कुस्ती खेळू नको, असंच सांगितलं असतं. गंभीर वेदना होत असतानाही नरसिंगबरोबर खेळलो आणि पहिला राऊंडही जिंकलो होतो. (सहा मिनिटांच्या कुस्तीत दोन-दोन मिनिटांच्या तीन फेऱ्या असतात. दोन फेऱ्या जिंकणारा विजेता ठरतो.) दुसऱ्या फेरीला काही सेकंद बाकी असताना माझ्या पायातून असह्य कळ उठली. तिथं मला चीत व्हावं लागलं.
कारण इजा किती गंभीर आहे हे फक्त मलाच माहीत होतं. कुस्तीचं मैदान मला सोडावं लागलं. त्यानंतर मी डॉ. आनंद जोशी यांच्याकडे उपचारासाठी गेलो. ते म्हणाले, की तुझ्या पायाला इतकी गंभीर दुखापत आहे, की तुला कुस्तीपासून काही काळ लांब राहावं लागेल.
मी त्यांना कळकळीने विचारलं, ‘‘डॉक्टर, मला पुन्हा कुस्ती खेळता येईल ना?’’ ते म्हणाले, ‘‘बाळा, पहिले तुला चालता येतं का ते बघ. मग कुस्तीचा विचार कर. कारण चालता येणं हेच खूप मोठं नशीब आहे!’’ डॉक्टरांच्या या उत्तराने माझं डोकंच काम करणं बंद झालं होतं.
तब्बल सहा महिन्यांनंतर डॉक्टरांनी माझी प्रगती बघितली आणि थक्कच झाले. माझ्या हातापायातली ताकद पाहिल्यानंतर ते म्हणाले, बाळा, तू खूप चांगली प्रगती करतोय. असाचा व्यायाम सुरू ठेव. तुझा दोन महिन्यांत पाय चांगला होईल आणि तू कुस्ती खेळायला लागशील. खरंच तसं झालं.
कारण मी कुस्तीतून रेस्ट घेतली होती; पण व्यायामात कुठलीही रेस्ट नव्हती. तब्बल आठ महिन्यांनंतर माझा कुस्तीचा सराव सुरू झाला. त्यानंतर तब्बल दोन वर्षांनंतर मी पुणे जिल्ह्यातील एका जत्रेतली पहिली कुस्ती खेळलो. कोल्हापूरच्या महेश वरुटेसोबत ती माझी पहिली कुस्ती आणि ती मी जिंकलोही.
वडील माझ्या पाठीशी खंबीर
मी कुस्ती खेळू शकतो, याचाच मला खूप आनंद झाला. कारण माझ्या गुडघ्याची जागा जर तुम्ही बघितली, तर ती जागा ऑपरेशनमध्ये पूर्णपणे फाडलेली आहे. मी कुस्ती खेळूच शकणार नाही, असंच कोणीही त्या वेळी म्हंटलं असतं. पण वडील माझ्या पाठीशी खंबीरपणे राहिले. त्यांनी मला धीर दिला.
अरे वेड्या, ही काही मोठी दुखापत नाही. तू पुन्हा कुस्ती खेळू शकशील. प्रशिक्षकांनीही मला प्रोत्साहन दिलं. माझं ऑपरेशन झालं हे मी घरी कोणालाही सांगितलं नाही. फक्त वडील, कोचेस यांच्या व्यतिरिक्त कोणालाही माहिती नव्हतं. कारण आईला माहिती झालं असतं, तर तिने मला कुस्ती खेळूच दिली नसती.
ऑपरेशननंतर मी घरी गेलो नाही. तालमीतच राहिलो. तालमीत माझ्या मित्रांनी माझी खूप काळजी घेतली. बाथरूममध्येही जाता येत नव्हतं इतकी अवघड परिस्थिती होती. पूर्ण पाय व्यवस्थित झाला तेव्हाच मी घरी आलो.
तू जस्सापट्टी, विजय चिंकारा, जितू पहिलवान अशा भारतातील अव्वल दर्जाच्या मल्लांना चीतपट केलं आहे. रुस्तम-ए-हिंद रोहित पटेल यांनीही म्हंटलं होतं, की तू भारतातील अव्वल मल्लांपैकी एक आहे. तुझा नेमका खुराक काय आहे?
महाराष्ट्र केसरी विजय चौधरी : मी दिवसातून दोन टाइम नॉनव्हेज खातो. किमान अर्धा किलो चिकन किंवा मटण खातो. माझे आठवड्यातले तीन वार मात्र देवासाठी आहेत. सोमवार शंकराचा, मंगळवार हनुमानाचा, तर शनिवार शनीचा. या दिवशी मी उपवास करत नाही; पण नॉनव्हेज नाही खात. देवाला मी खूप मानतो.
माझ्या दिवसाची सुरुवात पहाटे तीनपासून होते. पहाटे तीन ते सहा सराव करतो. त्यानंतर पाच अंडी, दोन केळी, दलियाचा (दलिया गव्हाचा प्रकार आहे. तो दुधात गरम करून घेतला जातो.) नाश्ता करतो. त्यानंतर सकाळी नऊ वाजता एक तास पुन्हा सरावाला जातो.
त्यानंतर जेवण घेतो. त्यात मिक्स भाजी किंवा पालक पनीर, डाळ असा आहार असतो. दुपारी बारा वाजता दूध घेतो. मला दिवसभरात दोन लिटर दूध लागतं. नंतर बारा ते तीन आराम म्हणजे झोप घेतो. नंतर तीन ते सहा कुस्तीतील पकडीची प्रॅक्टिस करतो. एक दिवस मॅटवर, तर एक दिवस मातीतला सराव असतो.
सहाला एक लिटर बदामाची थंडाई घेतो. त्यानंतर केळी आणि दोन सफरचंद खातो. सात ते आठ पुन्हा प्रॅक्टिस. आठनंतर थोडे बदाम खातो. नऊला जेवण. जेवणानंतर वॉकिंग आणि नंतर झोप. रात्री बाराला दूध घेतो. त्यासाठी अलार्म लावलेला असतो. कारण जेवणानंतर दूध पचत नाही. त्यामुळे ते रात्री बाराला घेतो.
तू महाराष्ट्र केसरीचा बहुमान मिळवला आहे. आता तुझं पुढचं लक्ष्य काय आहे? आंतरराष्ट्रीय पातळीवर जाणार, हिंदकेसरी होणार, की पुन्हा महाराष्ट्र केसरी लढणार?
महाराष्ट्र केसरी विजय चौधरी : माझं एक वैशिष्ट्य आहे, की मी फक्त कुस्ती खेळत राहतो. महाराष्ट्र केसरी राज्यातील अव्वल मल्लांची स्पर्धा आहे. तीही मी खेळत राहणार. हिंद केसरीतही मी महाराष्ट्राचं नेतृत्व करणार आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेतही भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे. हे माझं स्वप्न आहे आणि ते मी पूर्ण करणारच. अर्थात, माझं मुख्य लक्ष्य ऑलिम्पिकमध्ये जाऊन मेडल आणण्याचं.
ऑलिम्पिकमध्ये मेडल आणण्याचं तुझं स्वप्न असलं तरी तेथे तुला मॅटवर खेळावं लागणार आहे. त्यासाठी तुला सरावही मॅटवरच करावा लागणार आहे. पण तू तर पंजाबच्या धूमछडी आखाड्यात सराव करतोय, जो मातीतले मल्ल घडविणारा आखाडा म्हणून ओळखला जातोय…
महाराष्ट्र केसरी विजय चौधरी : मला धूमछडीत जाऊन आता चार वर्षे झाली आहेत. मी ज्या वेळी गेलो त्या वेळी तो मातीचाच आखाडा होता. मी धूमछडीचं नाव आता पूर्ण महाराष्ट्रात, भारतात केलं आहे. तिथले पलविंदर पहिलवान आहेत. त्यांनी आता तिथं खूप मोठा हॉल बांधला आहे.
तिथं या वर्षी रोहित पटेल यांनी साडेचार लाखाची मॅट आणली आहे. त्याच मॅटवर माझा त्यांनी सराव करून घेतला.
आता जो मी महाराष्ट्र केसरी झालो आहे, तो त्यामुळेच झालो आहे. मला आशा आहे, की या धूमछडी आखाड्यातून नक्कीच कोणी ना कोणी पहिलवान ऑलिम्पिकमध्ये जाईल.
महाराष्ट्र केसरीच्या अंतिम लढतीत सुरुवातीला तू खूप आक्रमक खेळला आणि नंतर तू खूपच बचावात्मक पवित्रा घेतला. यामागची तुझी नेमकी रणनीती काय होती?
महाराष्ट्र केसरी विजय चौधरी : माझे प्रशिक्षक महान भारत केसरी रोहित पटेल, रुस्तम-ए-हिंद अमोल बुचडे, कामगार केसरी ज्ञानेश्वर महांगडे यांनी त्याची कुस्ती पाहिली होती. त्यांनी त्याच्यावर अभ्यास केला. त्यांनी मला त्याची कुस्ती नाही दाखवली. तो काय करतो हे नाही सांगितलं. त्यांनी मला फक्त त्याचे मुख्य कच्चे दुवे सांगितले.
त्यांनी मला सांगितलं, की तो प्रत्येक कुस्तीत पहिले चार मिनिटे काहीही करीत नाही. फक्त बचाव करतो आणि नंतर तो आक्रमक होतो. त्यामुळे मला त्याच्यावर सुरुवातीलाच आक्रमण करून चार गुण वसूल करण्यास सांगितलं होतं. त्यानंतर तू बचावात्मक पवित्रा घे. मी तेच केलं. मी पहिल्याच आक्रमणात माझा आवडता दुहेरी पट आणि भारंदाज डाव टाकला.
त्यात मला चार गुण मिळाले. त्याने पहिले तीन मिनिटे काहीच आक्रमण केलं नाही. तो जर उभाच राहतोय, तर मग मी कशाला त्याच्यावर अॅटॅक करू? माझ्याकडे चार गुण आहेत. मग आपण कशाला उगाच थकायचं? मीही बचावात्मक पवित्रा घेतला. मला पंचांनी तंबी दिली आणि त्याला एक गुण बहाल केला. गुण झाले ४-१. ज्या वेळी चार मिनिटे झाले त्या वेळी कुस्ती सुरू झाली. तो कुस्ती करायला लागला. त्या वेळी त्याने दोन गुण घेतले; पण कुस्तीची वेळ संपली होती. मी विजयी झालो.
तू सगळ्या कुस्त्या वाकून खेळलाय. त्यामागचं कारण काय होतं?
महाराष्ट्र केसरी विजय चौधरी : महाराष्ट्रातले सगळे पहिलवान उभे राहून खेळतात. माझ्या प्रशिक्षकांनी सांगितलं, की तू जर वाकून खेळला तर प्रतिस्पर्ध्याचं माइंड चेंज होईल. अरे हा वाकून का खेळतोय, उभा केव्हा राहील आणि केव्हा आपल्याला अॅटॅक करता येईल, अशी द्विधा मनःस्थिती होईल. माझं वाकून खेळण्यामागचं कारण म्हणजे लवकरात लवकर गुण वसूल करणं हेच होतं. बाकी काही नाही.
तू एका मुलाखतीत म्हणाला होता, की मला क्लासवन ऑफिसर व्हायचंय. मग तू नोकरीच करणार आहे की पैलवानकी करणार आहे?
महाराष्ट्र केसरी विजय चौधरी : मी जास्तीत जास्त दहा किंवा पंधरा वर्षे कुस्ती खेळू शकतो. मी शरीरात ताकद असेपर्यंत कुस्ती खेळू शकतो. पुढे एखादा नवीन मुलगाही मला हरवू शकतो. कारण तो नव्या दमाचा खेळाडू असतो. आपल्याकडे फक्त अनुभव असतो. कुस्तीत जोपर्यंत माझा फॉर्म आहे तोपर्यंत माझं नाव राहील.
एकदा हरल्यानंतर करीअर डाऊन होतं. कोणताही पहिलवान कधी ना कधी हरतोच. सतत हरल्यानंतर कुस्ती सोडावी लागते. त्यामुळे मला पुढचा विचार करावाच लागेल. मी चांगला शिकलेला आहे. त्यामुळे मला क्लासवन नोकरी हवीच आहे.
सर्वच पैलवानांना साधारणपणे वाटतं, की नोकरी असावी, स्वतःचा आखाडा असावा, राजकारण करता यावं. पुढच्या पिढीने तुझा आदर्श घ्यावा की तूही अन्य पहिलवानांसारखा गर्दीत सामील होणार आहे?
महाराष्ट्र केसरी विजय चौधरी : तसं तर नाही. माझा आदर्श घेतला पाहिजे. माझे वडील मला असा पहिलवान बनवणार होते, की मी चांगला क्लासवन ऑफिसरपण आहे आणि चांगला मल्लही आहे. मला दोन्हींमध्ये मोठं व्हायचं आहे. मला हे दाखवून द्यायचं आहे. असं नाही, की एक मल्ल नोकरी करू शकत नाही.
मी एमपीएससीचा दोन वर्षे अभ्यास केला; पण कुस्ती आणि अभ्यास यांचा ताळमेळ बसत नव्हता. ना कुस्तीकडे लक्ष लागत होतं, ना अभ्यासाला वेळ देता येत होता. मी वडिलांना सांगितलं, ‘‘अण्णा, मी एमपीएससीचा अभ्यास करू की कुस्ती करू? मला दोन्ही एकाच वेळी झेपत नाही.
तुम्ही मला काही तरी सांगा, या दोघांपैकी काय करू?’’ मग वडिलांनी सांगितलं, की तुझं नाव कुस्तीत आहे. तू कुस्तीच कर. एमपीएससी थोडं साइडला ठेव. मी तेच केलं. कुस्तीकडे पूर्ण लक्ष केंद्रित केलं आणि त्याचं उदाहरण तुमच्यासमोर आहे आता.
महाराष्ट्राला कुस्तीची मोठी परंपरा आहे. मारुती माने यांनी कवठेपिरानसारख्या हजार-दोन हजार लोकवस्तीच्या गावात सराव करून हिंदकेसरीचा बहुमान मिळवला, जाकार्तात दोन मेडलही मिळवले. महाराष्ट्राच्या कुस्तीला, आखाड्यांना मोठी परंपरा असताना तू महाराष्ट्र सोडून सरावासाठी पंजाबचा धूमछडी आखाडा का निवडला?
महाराष्ट्र केसरी विजय चौधरी : पहिले परिस्थिती वेगळी होती. आता कुस्ती क्षेत्राकडे महाराष्ट्राचे अजिबात लक्ष नाही. राजकारण असेल किंवा मुलांची परिस्थिती अशा अनेक गोष्टी आहेत. त्यांना सपोर्ट मिळत नाही. दिल्ली, हरियाणाचे मल्ल आपल्याकडे येऊन जिंकून जातात. आपल्या महाराष्ट्राचे मल्ल मागे पडत चालले आहेत.
मी जेव्हा पुण्यात आलो त्या वेळी इथले आखाडे, पहिलवान पाहून मला खूप चांगलं वाटलं. मी त्यांना हरवायला लागलो. तेव्हा मला जाणवायला लागलं, की इथं आपल्याला प्रॅक्टिस कमी भेटतेय. मग माझ्या प्रशिक्षकांनी मला रोहित पटेल यांच्याकडे पंजाबच्या धूमछडी आखाड्यात पाठवलं. तिथं सर्वच पहिलवान चांगलेच आहेत.
तू कुस्तीत जीव ओतलाय. लोकाश्रय तर मिळतोच आहे, पण तुला राजाश्रय मिळाला का?
विजय चौधरी : अजून तर काही राजाश्रय मिळाला नाही. लोकाश्रय तर खूप भेटलाय. सरकारकडून मी काही अपेक्षा करणे योग्य नाही. ते आपल्या सरकारचं काम आहे. महाराष्ट्र केसरीत रोख इनाम ठेवायला हवा. फक्त गदा आणि बहुमान दिला जातो. आपण एवढी वर्षे मेहनत घेतो. अनेक मल्लांची परिस्थिती नाही.
तेव्हा काही तरी इनाम ठेवायला हवा. ते सरकार, संयोजकांचं काम आहे. अर्थात, मी स्वतः सरकारकडून काही मागणं बरोबर नाही. सरकारनेच ते समजून घ्यायला हवं. माझ्या जळगाव जिल्ह्यातील नेत्यांनाही हे समजलं पाहिजे.
तू ११ डिसेंबरला तुझ्या मायभूमीत म्हणजेच गावी परततोय. गावाकडे परतताना मनात काय भावना आहेत?
विजय चौधरी : मी गावाचे, तालुक्याचे, माझ्या जिल्ह्याचे स्वप्न पूर्ण केले आहे.
हे स्वप्न पूर्ण करून मी माझ्या गावाकडे परतणार आहे. त्याचा आनंद खूप आहे.
पूर्ण गाव, तालुका आतुरतेने वाट पाहतोय. मीही सगळ्या गाववाल्यांना भेटण्यासाठी आतुर झालोय.
तू अशा ठिकाणाहून आलाय, त्या जळगाव जिल्ह्यात कुस्ती फारशी राहिलेली नाही. कुस्तीच्या विकासासाठी तुझ्या जिल्ह्यात तू काय योगदान देणार आहे?
विजय चौधरी : मी जळगावसाठी नक्कीच काही तरी करणार आहे. कुस्ती हा खेळ खूप हार्ड आहे.
पाच-सहा वर्षे मेहनत घेतल्याशिवाय कुस्तीत यश नाही. यात खर्चही खूप लागतो. जळगाव जिल्ह्यात अनेक चांगले मल्ल आहेत.
मात्र, त्यांना बाहेर खर्च पेलवत नाही. त्यांना चांगले मार्गदर्शन मिळत नाही. कुस्तीच्या विकासासाठी जळगाव जिल्ह्यात एक आंतरराष्ट्रीय कुस्ती सेंटर उभं करण्याचं माझं स्वप्न आहे.
कुस्तीतला तुझ्या आठवणीतला क्षण कोणता?
विजय चौधरी : मी जेव्हा पंजाबमध्ये गेलो. माझी पंजाबमध्ये दोन वर्षे खूप हवा होती. पंजाबमध्ये जस्सा पट्टी हाही मोठा पहिलवान होता. त्याचीही खूप हवा होती.
तो कोणाकडूनही पराभूत झालेला नव्हता. त्याचे मोठे कौतुक होत होते. तेव्हा पलविंदर पहिलवान म्हणाले, की मग आमच्या विजय चौधरीबरोबर लावा कुस्ती. बघूया कोण मोठं! मला खूप प्रेशर आलं. कारण मी नवीन होतो. जस्सा पट्टी हा नावाजलेला मल्ल होता. कसं खेळायचं, कोणता डाव मारायचा, असा मनात गोंधळ होत होता आणि पलविंदर भाईंचं जगात नाव आहे.
जर या लढतीत मी पराभूत झालो तर पलविंदर यांचं, धूमछडीचं नाव खराब होईल. मुल्लापूर नावाच्या गावात ही कुस्ती होती. पूर्ण पंजाब कुस्ती बघायला आलं होतं.
मी मैदानात उतरलो आणि कुस्ती सुरू झाली. ढाक डावावर मी त्याला दहा सेकंदांत चीतपट केला. ती कुस्ती व्हॉट्सअॅप, यूट्यूबवर प्रचंड लोकप्रिय झाली.
महाराष्ट्र केसरीचा तिसऱ्यांदा बहुमान मिळवला तो क्षण…
[jnews_element_embedplaylist playlist=”https://www.youtube.com/watch?v=DQsH23i5tH4″ column_width=”4″]महाराष्ट्र केसरी विजय चौधरी झाला नाशिकचा जावई
विजय चौधरी : महाराष्ट्र केसरीची गदा तीन वेळा उंचावणारा पहिलवान २९ जानेवारी 2020 रोजी लग्नाच्या बेडीत अडकला. तो आता नाशिकचा जावई झाला आहे. नाशिकची लेक व राष्ट्रीय जलतरणपटू कोमल भागवत हिच्याशी नाशिकमध्ये गंगापूर रोडवरील बालाजी लॉन्सवर गोरज मुहूर्तावर त्यांचा विवाह समारंभ थाटामाटात पार पडला.
लग्नापूर्वी त्याने आपल्या अस्सल खान्देशी ठसक्यात आवाहन केलं होतं, ‘बठ्ठा जन लगनला या बरं भो…’. त्याच्या आवाहनाला मान देत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली. लग्नाविषयी तो म्हणाला, की समाजात एका विशिष्ट टप्प्यावर जबाबदारी घ्यावी लागते. लग्नानंतरही आम्ही खेळाडू म्हणूनच समाजात वावरणार आहोत.
भविष्यात आणखी खेळाडू घडविण्याचा आमचा प्रयत्न राहील, असे विजय चौधरी यांनी सांगितले. महाराष्ट्र केसरी किताबाची लढत तीन वेळा जिंकत त्याने उत्तर महाराष्ट्राचे नाव कुस्तीत उंचावले होते. याच कामगिरीच्या जोरावर त्यांना महाराष्ट्र सरकारने पोलिस सेवेत नोकरी दिली.
सायगाव बगळी (ता. चाळीसगाव, जि. जळगाव) येथील रहिवासी असलेला विजय चौधरी सध्या पुणे येथे पोलिस उपअधीक्षक म्हणून कार्यरत आहे. कोमल भागवत देखील उत्तम जलतरणपटू आहे. ती राष्ट्रीय स्तरावर जलतरण स्पर्धा खेळली आहे.
Read more : नाशिकचे मल्ल गेले कुठे?