नाशिकमध्ये कोपेनहेगनसारखी सायकल चळवळ हवी
नाशिकमध्ये सायकल चळवळ सुरू झाली आहे, लवकरच हे सायकलींचं शहर होईल वगैरे आता म्हंटलं जात आहे. दिल को बहलाने के लिए ग़ालिब, ये खयाल अच्छा है, पण…
गीअरवाली महागडी सायकल, ती इकडून तिकडे वाहून नेण्यासाठी आलिशान कार, एकवेळ मोटारसायकलवर हेल्मेट वापरणार नाही, पण सायकलसाठी खास हेल्मेट परिधान करणारे सायकलवीर असा सगळा थाटबाट पाहिला, की वाटतं, नाशिकमध्ये सायकल चळवळ जोमाने रुजत आहे!तसंही कधी काळी फुलांचं शहर असलेलं गुलशनाबाद नंतर मंत्रभूमी म्हणून संबोधू लागले. पुढे तर यंत्रभूमीकडे वाटचाल करणारं शहर म्हणूनही त्याची ओळख मिरवू लागले. कविता राऊतने आंतरराष्ट्रीय स्तरावर छाप पाडल्यानंतर या शहराला धावपटूंचं भरतं आलं आणि नाशिक हे धावपटूंचं शहर झालं. आता सायकलींचं शहर म्हणून ओळख व्हायलाही वेळ लागणार नाही. कारण तशीही सायकल विक्रीतून वर्षाकाठी ३० कोटींची उलाढाल होतच आहे.
काय आहे, की सुजलेल्या देहाला बलदंड म्हंटल्याने कोणी पहिलवान होत नाही, तसं मोठी उलाढाल झाल्याने किंवा शौक म्हणून महागड्या सायकल फिरवल्याने (की मिरवल्याने?) शहरात सायकल चळवळ रुजत नाही. मोठमोठे सायकल इव्हेंट घेतल्याने, सायकल टूर काढल्याने फार तर एखादी क्लबसंस्कृती फळास येऊ शकेल, पण सायकल चळवळ रुजत नाही. मग सायकलींचं शहर ही तर रॅमच्या अंतरापेक्षाही दूरची गोष्ट.
अर्थात, नाशिकमधील स्थिती अगदीच नकारात्मक नाही. आता जे काही प्रयत्न सुरू आहेत, त्यामुळे सायकलीवर विचार करण्यास भाग पाडणारे आहेत यात दुमत नाही. पण सायकल चळवळ काय असते, सायकलींचं शहर म्हणजे काय हे जाणून घ्यायचं असेल तर डेन्मार्कमधील कोपेनहेगन पाहावं, जेथे सायकल दैनंदिन जीवनाचा भाग आहे. नेदरलँड्समधील युट्रेच, अॅमस्टरडॅम पाहा, जेथे सायकल पार्किंग आणि रस्त्यांना प्राधान्य दिलंय, फ्रान्समधील स्ट्रासबोर्गमध्ये ५८० किलोमीटरचे सायकल ट्रॅक आहेत, स्वीडनचे माल्मो हे तर सायकलस्नेही शहर म्हणून ओळखलं जातं, जेथे सायकलीवर फिरणे आनंददायी मानले जाते.
सायकल हाऊस ही संकल्पना या शहराने रुजवली. ही काही निवडक शहरे आहेत, ज्यांनी 2017 मधील जगातील सायकलींच्या शहरांमध्ये पहिल्या पाच क्रमांकांत स्थान मिळवले. यात पहिल्या स्थानावर आहे कोपेनहेगन. दुर्दैव म्हणजे, भारतातील एकही शहर पहिल्या ५० शहरांच्याही यादीत नाही.
कोपेनहेगन आणि आपण
डेन्मार्कची राजधानी कोपेनहेगनला खरं तर सायकल हेवन (सायकलींचा स्वर्ग) म्हणायला हवं. 19 व्या शतकापासून या शहरात सायकल चळवळ रुजलेली होती. या शहराने 2002 ते 2012 असे दहा वर्षांचे सायकल धोरण आखले आणि सर्वांत प्रथम त्यांनी सायकलींसाठी पायाभूत सुविधा दिल्या. ज्यात सायकल मार्ग तयार करण्यास प्राधान्य दिले. गेल्या दहा वर्षांत या शहराने तब्बल 90 हजार कोटी रुपये निव्वळ सायकलींच्या पायाभूत सुविधांवरच खर्च केले. आपण मात्र एवढा खर्च कर्ज काढून बुलेट ट्रेनवर करतो. कोपेनहेगनच्या धोरणाचे सकारात्मक परिणाम असे पाहायला मिळाले, की आज या शहरात तब्बल 65 टक्के नागरिक सायकलचा वापर करतात. या शहरात फक्त नऊ टक्के नागरिक कार चालवतात. सायकल वापरात पुरुषांपेक्षा महिला आघाडीवर आहेत. तब्बल 53 टक्के महिला सायकल वापरतात. 11 ते 15 वर्षे वयोगटातील 49 टक्के मुले शाळेत जाण्यासाठी सायकलीचा वापर करतात. आपल्याकडे मात्र व्हॅनशिवाय मूल शाळेत जाऊ शकत नाही.
कोपेनहेगनमधील नोकरदार वर्गाला कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी सायकलशिवाय दुसरे वाहन माहीत नाही. याचे कारण म्हणजे या शहराने खास सायकलींसाठी उड्डाणपूल, रस्ते तयार केले आहेत. या शहरात खास सायकलींसाठी १५ किलोमीटरचे सुपर एक्स्प्रेस हायवे आहेत. याशिवाय 20 हजारपेक्षा अधिक पार्किंगस्थळे आहेत, जेथे फक्त सायकली पार्क करता येऊ शकतात. साहजिकच या शहरात नागरिकांपेक्षा अधिक सायकली आहेत. येथे आपल्यासारखी रिक्षा, बसने घरी जाण्याची अजिबात सवय नाही. नागरिकांना पावलोपावली सायकल भाड्याने मिळतात. त्यामुळे या शहरात अपघात नगण्य आहेच, शिवाय शहर प्रदूषणमुक्त आणि स्वच्छ आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाची वर्षाकाठी एक लाखापेक्षा अधिक रुपयांची बचत होते. कोपेनहेगन हे जगातील पहिल्या स्थानावरील सायकलींचं शहर का आहे, याची ही थोडक्यात माहिती. नाशिकमध्ये यापैकी एकही सुविधा सध्या अस्तित्वात नाही आणि त्या दृष्टीने प्रयत्नही सुरू नाहीत. त्यामुळे नाशिकचं कोपेनहेगन व्हायचं असेल तर आधी क्षुल्लक यशाची सूज कमी करून पायाभूत सुविधांनी बलदंड व्हायला हवं.
‘रॅम’वीरांना सलाम
कोपेनहेगन व्हायचं की दिल्ली?
यंदाची जगातील सर्वोत्तम 20 सायकल शहरांची यादी
1 | कोपेनहेगन (डेन्मार्क) | 11 | बार्सिलोना (स्पेन) |
2 | युट्रेच (नेदरलँड्स) | 12 | व्हिएन्ना (ऑस्ट्रिया) |
3 | अॅमस्टरडॅम (नेदरलँड्स) | 13 | पॅरिस (फ्रान्स) |
4 | स्ट्रासबोर्ग (फ्रान्स) | 14 | सेव्हिल (स्पेन) |
5 | माल्मो (स्वीडन) | 15 | म्युनिच (जर्मनी) |
6 | बोर्डिअक्स (फ्रान्स) | 16 | नांटेस (फ्रान्स) |
7 | अँटवर्प (बेल्जियम) | 17 | हॅम्बुर्ग (जर्मनी) |
8 | जुबल्जना (स्लोव्हेनिया) | 18 | हेलसिंकी (फिनलंड) |
9 | टोकियो (जपान) | 19 | ओस्लो (नॉर्वे) |
10 | बर्लिन (जर्मनी) | 20 | माँट्रियल (कॅनडा) |
नाशिकमध्ये सायकल चळवळ कशी रुजेल?
रेस अॅक्रॉस अमेरिका अर्थात राम म्हणजे काय?
Maharashtra Times, Nashik : 19 Nov. 2017
[jnews_block_37 first_title=”Read more at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”60″]